Friday, August 14, 2020

पिरिएड्स लीव्ह

 

एका भारतीय कंपनीने 'पिरिएड्स लीव्ह' सुरु केली. लगेच माझ्या पेजवर भूछत्रासारखे वेगवेगळे फोरम्स उगवले आणि 'तुम्हांला याबद्दल काय वाटतं?' असा सवाल विचारू लागले!

मला याबद्दल काय वाटलं - एकच वाटलं की माझी 'खाजगी' बाब आता चव्हाट्यावर आली!

आता मी अशी सुट्टी घेणार हे माझ्या टीम मधल्या बहुतांश 'मेल कलिग्ज'ना समजणार. माझी पाळी येणं-न-येणं हा माझा, 'फक्त माझ्यापुरता' विषय आता इतर लोकांना सहज कळणार!!

तुम्ही कितीही गफ्फा मारा हो इक्वॅलिटीच्या पण एका स्त्रीच्या 'शारीरिक खाजगी गोष्टींबद्दल' किती चवीचवीने बोललं जातं आॅफिस आणि समाजामध्ये ते सगळ्या स्त्रियांना व्यवस्थित माहीत आहे आणि प्रत्येकजण दुर्दैवाने का होईना एकदा तरी ते अनुभवतेचं!!

'सिक लीव्ह' होतीच की आणि अजूनही आहेच नं मग असं धडधडीत नामकरण करुन द्यायची गरजच काय म्हणते मी??

विकली टाईमशीट भरतांना प्रत्येक महिन्यात मी १ सुट्टी जरी घ्यायची म्हटलं तरी माझं 'बिलिंग' नाही होणार म्हणजे प्रोजेक्टला नुकसान 😳 बरं टीम मधे एकापेक्षा जास्त मुली असतील आणि त्याही त्याच दरम्यान किंवा पुढे-मागे ही सुट्टी घेणार म्हणजे एकूणच प्रोजेक्टला किती मोठं नुकसान??? असं प्रत्येक मॅनेजर म्हणेलच.

मुळातच एक मुलगी कंपनीमधे काम करते म्हणजे तिची बुद्धी, क्षमता, तिच्यामधे असणारे गुण यापेक्षाही काही दिवसांनी ती लग्नासाठी सुट्टी घेईल, त्यानंतर 'पहिले १०० सण' साजरे करायला सुट्टी घेईल मग प्रेगनन्सी लीव्ह आणि त्यानंतर एक्स्टेन्शन लीव्ह पण द्यावीच लागेल!! त्यात आता भर ह्या 'पिरियड्स' लीव्हची??? कित्ती मोठ्ठा प्रश्न उभा राहिला बघा नं!!!

काही जणींना वाटेल, तुला नसेल होत बाई त्रास पण आम्हांला होतो आणि सुट्टीच मिळावी अशी प्रत्येक वेळेस इच्छा होते, आता आयती मिळत आहे तर का नाकारायची!

मला त्रास होत नाही असं नाही पण उलट अशावेळेस घरी बसून बोअर होण्यापेक्षा कामात मन जास्त रमतं माझं, अर्थात हे फक्त माझं-माझ्यापुरतं गणित आहे. बाकी अशी सुट्टी घेऊन किती जणींना घरी 'खरंच' आराम करायला मिळेल 🤔 हेही सगळ्यांना नीटच ठाऊक आहे!!

No comments:

Post a Comment