आज पहाटे साधारण ४.३० च्या सुमारास मला जाग आली, पाणी प्यावं म्हणून उठले आणि लक्षात आलं लाईट गेलेत. लाईट गेले 😳😱??
डोळ्यावरची झोप खाड्कन उडालीच माझी!
कारण यूके वास्तव्यामधे असा प्रसंग एकदाही आला नाही ना आमच्या मित्र-मंडळींपैकी कोणी अनुभवल्याचं ऐकलं!
एक क्षण असं वाटलं की कदाचित खोलीतला दिवा गेला असेल म्हणून बाहेर येऊन इतर ठिकाणचे दिवे लावले पण अं हं! खरंचंच लाईट गेले होते!!
आता काय करायचं? फ्यूज गेला असेल का? पण आवाज तर नाही आला 🤔
शेजारच्यांकडे, खाली राहणाऱ्या घरांमधे पण झालंय की फक्त आपल्या घरात म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर बाहेर मिट्ट काळोख!
रस्त्यावरचे दिवे पण डोळे मिटून गप उभे होते!
बापरे! आता काय करायचं म्हणून नव-याला वार्ता दिली तर झोपेतंच त्याने, 'येतील गं, झोप झोप' म्हणत कूस बदलली!
पण मला कसली येते झोप 😢 लाईट नाही म्हणजे मोठ्ठा प्रश्न आला इंटरनेटचा!
आॅफिसला लाॅगिन कसं करणार? फोनचं हाॅटस्पाॅट वापरायचं म्हटलं तरी स्पीड नाही मिळाला तर??
भरीत भर फोन आणि लॅपटाॅपच्या बॅट-या पुरतील का(२४ तास लाईट असतात त्यामुळे बॅटरी शेवटच्या घटका मोजायला लागली की मगच आम्हांला तिला जीवदान देणाऱ्या चार्जरची आठवण येते चे परिणाम 😟 कोथरूडात राहतांना कसं लोड-शेडिंगची सवय असल्यामुळे सगळे कंदील घासून स्वच्छ करुन ठेवायची म्हणजे आपलं सगळ्या बॅटरीज, पाॅवर बँक्स चार्ज करुन ठेवायची सवय होती हो 😜 )??
हे तर झालं आॅफिसचं पण लाईट नाही मग गिझर चालणार नाही म्हणजे गरम पाणी नाही 😳अरे देवा🤦
एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले आणि अचानक आठवलं की गुगल बाबा आहे की, त्याला विचारूया ना 😃
लगेच गुगलबाबाला पाचारण केलं, माझ्या घराचा पोस्टकोड टाकला आणि सांगितलं लाईट गेले आता काय करू? लगेच एक फोन नंबर मिळाला आणि फोन लावला पण रेकाॅर्डेड मेसेज ने एक एक आॅप्शन द्यायला सुरूवात केली. मी योग्य पर्याय निवडला आणि 'इतक्या फाटे फाटे कोण आॅपरेटर बसला असणार माझी तक्रार ऐकायला 😒', असं म्हणेपर्यंत समोरून एका माणसाने, 'यू आॅलराईट, हाऊ कॅन आय हेल्प यू', म्हणत स्वागत केलं. मी पटकन झालेला प्राॅब्लेम सांगितला. त्याने माझा घर नंबर एकदा परत विचारला आणि सांगितलं की,'हो तुमच्यासारख्या अजून १२५ घरांना हा प्राॅब्लेम झाला आहे, आम्ही दुरूस्ती करत आहोत, तुम्ही काळजी करु नका दोन तासात सगळं पूर्ववत होईल. तुम्हांला होणा-या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो'. हुश्श!
चला ही लोकं काम करत आहेत म्हणजे, हे ऐकून माझं सगळं टेन्शन पळालं आणि त्याला धन्यवाद देत फोन बंद केला.
या सगळ्या गोंधळात झोपेचं पार खोबरं झालं पण आता दिवस वेळेत उगवतो उन्हाळा संपत आल्यामुळे म्हणून तासभर पहुडले.
७च्या सुमारास खरंच लाईट चालू झाले 😃👏👏
रोजच्याप्रमाणे आमचा दिवस सुरु झाला. साधारण ११वा. मला एक काॅल आला, एक बाई बोलत होत्या, म्हणाल्या तुम्ही आज सकाळी काॅल करुन लाईटचा प्राॅब्लेम झाल्याची तक्रार केली होती त्याबद्दल हा फाॅलोअप काॅल आहे. आता तुमच्याकडे लाईट व्यवस्थित चालू आहेत नं? मी सांगितलं सगळं व्यवस्थित आहे. त्यावर तिने परत एकदा माफी मागत नेमकं काय झालं आणि किती घरांना याचा फटका बसला हे थोडक्यात सांगितलं. तसंच, यापुढे परत कधी असा प्राॅब्लेम आला तर नक्की कळवा ही विनंती पण केली 😊
इतकं छान वाटलं नं हा फाॅलोअप काॅल आहे कळालं तेंव्हा.
म्हणजे फक्त तत्पर सेवाच नाही तर झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं आहेच शिवाय फाॅलोअप काॅल 😃 ह्याला म्हणतात खरी सर्व्हिस 👏👏👏
#चांगल्याकामाचंकौतुक #मुक्कामपोस्टUK
Friday, September 4, 2020
#मुक्कामपोस्टUK : लाईट गेले!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment