Friday, November 27, 2020

#खाण्यासाठी_जन्म_आपुला #हिवाळास्पेशल : पौष्टिक हलवा

 

#खाण्यासाठी_जन्म_आपुला
हिवाळा आल्याची चाहूल जशी बोच-या हवेतून होते तशीच ती बाजारामधे टोपली टोपलीतून सजवलेल्या लालचुटूक, लांबसडक गाजरांना बघून होते 😃
हे जे गाजर असतं नं त्याला खरी चव असते😋👌
डोळ्यांना सुखावणारा लालसर-गुलाबी रंग आणि गोडुस चव असलेली ही गाजरं बाजारात मिळायला लागली रे लागली की मी किलो-किलो खरेदी करते. कारण हिवाळ्याचे ३-४ महिनेच यांचा आस्वाद घेता येतो,नाहीतर वर्षभर ती शेंदरी-बेचव गाजरं बघून खायची इच्छाच मरून जाते!
असो, तर हे गोड-गोजिरे गाजरं बाजारातून आणल्यावर पहिला पदार्थ काय बनतो तर 'पौष्टिक हलवा', येस्स!
आज मी तुम्हांला माझ्या या खास पदार्थाची 'सिक्रेट' रेसिपी सांगणार आहे बरं 😄
तर तुम्हांला आवडेल तितकी गाजरं घ्या म्हणजे मी तरी किमान किलोभर घेते. ती स्वच्छ धुवून-पुसून घ्या आणि त्याचा छानसा कीस/खीस करुन घ्या. यासोबतच गाजराइतकाच महत्वाचा घटक किंबहुना गाजरापेक्षा जास्त जीवनसत्त्व असणारा घटक म्हणजे बीटरुट घ्या.
एक किलो गाजरासाठी बीटरुट जे वजनात साधारण १५०-२००-२५०ग्रॅ असेल असं घ्या, त्याचाही कीस/खीस बनवून घ्या. हे झाले पदार्थ बनवायला लागणारे दोन मुख्य घटक. आता तुम्ही ज्या भांड्यात गाजराचा हलवा करता ते घ्या..
हां हां हां थांबा!नाॅन-स्टीक पॅन अज्जिबात वापरायचं नाही बरं 👊
तर गॅसवर भांडं ठेवा आणि मोठ्या चमच्याने ३-४ चमचे तूप घालून ते वितळू द्या. तुपाचा सुगंध दरवळायला लागला की मग त्यात गाजराचा आणि त्यावर बीटाचा कीस/खीस घालून त्याला व्यवस्थित एकत्र करुन घ्या. भांड्यावर झाकण ठेवा आणि तूप-गाजर-बीट यांचं मिश्रण वाफेवर मस्तपैकी शिजू द्या.
डोन्ट-वरी आपण अधूनमधून झाकण उघडून ते मिश्रण एकत्र करत राहणार आहोत पण आत्ताच ठेवलंय ना, जरा होऊ देत पाच मिनिटं.
तर आता आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे. किलोभर गाजराच्या कीसासाठी अर्धा लीटर दूध तापवायला दुस-या भांड्यात ठेवायचं.
इकडे 'धीमी आँच'पे हलव्याचं मिश्रण छान तयार होतंय.
झाकण उघडून बघा, कसा मस्त बीटाचा रंग घेऊन गाजराचा कीस लालचूटूक्क झाला आहे आणि तूपमिश्रित सुगंध घ्राणेंद्रियाला तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थाची चुणूक देतोय 😘 हां पुरे पुरे - नैवेद्य दाखवायचा आहे म्हटलं आधी देवाला😏 मग तुमच्या पोटोबाला!
तर साधारण १५मिनीटात गाजर-बीटाचा कीस तुपात वाफवून मस्त मऊसर तयार होतो, आता त्यात मगाशी तापत ठेवलेलं दूध घालायचं. दूध जितकं आहे तितकं सगळं नका घालू हं, जरा अंदाज घेत घेत पण पौष्टिक हलवा शिजायला मदत होईल इतपत घालायचं. म्हणजे बघा गाजर-बीटाचा खीस आहे नं त्याच्या साधारण अर्धा इंच वर येईल इतपत दूध घालायचं.
हां आता या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित हलवून एकत्रित करायचं. परत एकदा झाकण ठेवत पुढच्या तयारीला लागायचं.
या पौष्टिक हलव्यामधे एक साखर सोडली तर बाकी सगळ्या जिन्नसांचा वापर अगदी सढळ हाताने + आवडीनुसार तुम्ही करु शकता. आता सुकामेवा चा नंबर - चला आता प्रत्येकी एक मूठ काजू-बदाम-अक्रोड(हो अक्रोड अतिशय महत्वाचा घटक आहे) घ्या आणि त्याची जाडसर पूड करुन घ्या. आता तुम्ही म्हणाल, काप का नको? पूड का करायची?
बीटरुट असल्यामुळे या पोष्टिक हलव्याचा रंग अगदी गडद लाल होतो त्यात मग बदाम-काजूचे काप फारच बेरंगी लाल दिसतात, कसं वाटेल मग ते खातांना 😒 आणि आक्रोड जरासे तुरट(मला तरी त्यांची चव तुरटच वाटते) लागतात त्यामुळे त्याचे नुसते तुकडे नकोच म्हणून सोप्पा उपाय आहे पूड 😁
हां झाली का पूड करुन,चला आता झाकण उघडून बघा बरं हलवा कितपत शिजला ते? हां दूध आता ब-यापैकी आटलं आहे, परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करा आणि झाकण ठेवा. आता साखरेचा नंबर, तर या हलव्यामधे साखर अगदी कमीतकमी घालायची. म्हणजे बघा जर एक किलो गाजर+२५०ग्रॅ बीटरुट असेल तर २००ग्रॅ साखर पुरेशी आहे. कारण मुळात गाजर असतात गोड त्यात परत बीटरुट शिजलं की त्याचाही गोडवा उतरतो त्यामुळे अगदी कमी साखर जरी घातली तरी अतिशय स्वादिष्ट बनतो पौष्टिक हलवा 😊
खूप झाल्या गप्पा, झाकण उघडलं तर अहाहा वाफेवर स्वार होऊन हलव्याचा सुगंध 'मी तय्यार आहे' ची वर्दी देत आला 😊 तरी एकदा निरखून बघा दूध कुठे दिसत नाही नं भांड्यात? हां म्हणजे हलवा छानपैकी शिजला बरं 😊 त्यात आता साखर घाला आणि हलवून घ्या. पदार्थाच्या उष्णतेने साखर लगेच वितळायला लागेल. परत एकदा सगळं मिश्रण एकत्र करा आणि साखर विरघळून हलवा तयार होईतो जरा दम धरा 😜
१०मिनीटांमधे साखरपाक विरघळून हलव्याला चकाकी यायला लागेल. एकदा का सगळा पाक त्या मिश्रणात मिसळला की हलवा छान तयार होईल, भांड्यापासून थोडा वेगळा व्हायला सुरूवात होईल. आता तुमच्या आवडीनुसार अजून पाच मिनीटं त्या मिश्रणाला हलवून ड्राय करु शकता किंवा आत्ताच गॅस बंद केला तरी चालेल👍
१०मिनीटं मिश्रण निवलं की त्यात मगाशी केलेली ती काजू-बदाम-अक्रोडची जाडसर पूड घालून मिक्स करुन घ्या. आता एका वाटीमधे त्यातला दोन-तीन चमचे पौष्टिक हलवा घ्या त्यावर काजू-बदाम लावून जरा सजावट करा आणि देवाला चाखायला द्या🙏
त्यानंतर कुटुंबियांसाठी आणि स्वतःसाठी पौष्टिक हलव्याच्या वाट्या भरून घ्या आणि सुगंधी-चविष्ट-स्वादिष्ट अशा पौष्टिक हलव्याची लज्जत अनुभवा 😋👌👌👌
माझ्या घरी हिवाळ्यात पहिला हा पदार्थ बनतो, तुमच्याकडे काय बनवतात?
#हिवाळास्पेशल
#पौष्टिकहलवा
#गावरानगाजरcravings
#खाण्यासाठी_जन्म_आपुला

Sunday, November 15, 2020

#मुक्कामपोस्टUK : लाॅकडाऊन दिवाळी

  यंदाची आमची दिवाळी युके ला करायची वेळ आली. अगदी ऐन वेळेवर दुसरा लाॅकडाऊन लागला आणि घरी जाणं स्थगित करावं लागलं 😭
आलं करोनाच्या मनात, तिथे कोणाचं चालणार 😖
मन खट्टू झालं खरं, पण मनाला समजावत म्हटलं, वर्षभराचे सण जसे आनंदात साजरे केले तसंच दिवाळी पण करुया की या घरात-देशात 😃
आंजारुन-गोंजारुन मनाला तयार केलं खरं पण मग आता दिवाळीची तयारी नेमकी कशी करावी बरं हा पेच पडला 🤔
दिवाळी म्हटलं की पणत्या-आकाशकंदिल-दाराला लावायला तोरण-रांगोळी-रंग-पुजेचं साहित्य कित्ती कित्ती म्हणून सामान आणायचं असतं नै!
आमच्या कडे दुसरा लाॅकडाऊन चालू झालेला, बरं इथे या सगळ्या वस्तू मिळतात का आणि कुठे हे शोधण्यापासून सुरूवात!
काय करावं बरं हा विचार करत गुगल करत असतांना एकेक साईट्स सापडायला लागल्या 😊 माझी इथली पहिली दिवाळी असली म्हणून काय झालं, कैक वर्षांपासून भारतीय इथे आहेतच आणि अगदी आंब्याच्या डहाळी-दुर्वा-शेणाच्या गोव-या काय म्हणाल ते सगळं मिळतं, फक्त शोधायचा अवकाश!
या साईट्स सापडल्या आणि माझ्या अज्ञानाचा आणि भीतीचा अंध:कार पळूनच गेला 😁
आता तर मला तुळशीबागच सापडली होती, उत्साहात मी पणत्या काय रांगोळी काय रंग काय दिसेल ते कार्ट मधे टाकायला सुरूवात केली.देवाच्या पूजेला लागणारं सगळं सामान मिळालं बाई, काय खुश झाले मी 👏💃💃
उटणं-सुगंधी साबण-तेल-घरातल्या लावायच्या दिव्यांच्या माळा एक एक गोष्ट समोर आली आणि माझ्या दिवाळी खरेदीची लिस्ट पूर्ण होत गेली 😊
चला बाहेरची आवश्यक खरेदी तर पार पडली पण दिवाळी फराळाचं काय?? अरे देवा!!😰😰
चकल्या-शेव करायची सोय आपलं सो-या नाही आणि नुसत्या लाडू-चिवड्यावर तर दिवाळी भागायची नाही 😳 आता काय करावं बरं असं म्हणत मी परत डोकं खाजवायला सुरूवात केली. तशात अचानकच मला Indieats.in म्हणून माझ्या मैत्रिणीच्या फेबु पेजवर दिवाळी फराळाची आॅफर दिसली आणि मला तर बाई आकाशच ठेंगणं झालं, इतका आनंद झाला म्हणून सांगू 😄 क्षणाचाही विलंब न-लावता मी चकल्या-चिरोटे-शेव-खोब-याच्या वड्या-बालुशाही अशा सगळ्या पदार्थांची आॅर्डर दिली. त्या साइटवर बाकी मसाले-तयार पिठं दिसली, लगे हात ती पण मागवली 😄 हुश्श!!!
झाली एकदाची दिवाळीची सगळी तयारी 💃💃
जसजशी दिवाळी जवळ यायला लागली तस रोज काही ना काही सामानचं पार्सल यायला लागलं. नवरा म्हणायचा अगं काय-काय मागवलं आहेस इतकं?? मी फक्त 'आली दिवाळी-दिवाळी-दिवाळी' इतकंच म्हणत उड्या मारत होते 😜😄😄
दिवाळीच्या एक आठवडाआधी रविवारी भल्या पहाटे मी लाडू आणि चिवड्याचा घाट घातला आणि बेसनाचे लाडू, मुरमु-याचा खमंग चिवडा(अर्थात माझ्या आईच्या सुपरव्हिजनखाली) बनवून डब्बे भरून ठेऊन दिला 😄😋
घरामधे मग दिव्यांच्या माळा लावल्या आणि आकाशकंदील नसेना का पण या लुकलुकणाऱ्या ता-यांनी माझं घर उजळून निघालं 😍
रमा एकादशीला रंग-रांगोळीने माझं यूकेच्या घरासमोरचं अंगण सजलं आणि पहिला दिवा दारात लागला 😊
दिवाळी सुरु झाली हो 😊 😊 👏👏🙏
तसं बघितलं तर पुण्याच्या घरासमोर मी इतक्या उत्साहाने सकाळ-संध्याकाळ रांगोळी काढत नव्हते. पण युकेतल्या करड्या आणि निरस वातावरणाला छेद देता यावा म्हणून खास रंगसंगती करत मी रांगोळ्या काढायला सुरूवात केली 😊
नरकचतुर्दशीच्या पहिल्या आंघोळीकरता उटणं-तेल-साबण काढून ताट तयार केलं आणि सुपरिचित वासांनी घरच्या सगळ्या दिवाळींच्या आठवणी मनात फेर धरु लागल्या.गरम-कढत पाण्यात तीळ घालून-उटण्याचा उष्णसुगंधी लेप अनुभवत पहिली आंघोळ उरकली आणि देवाला नमस्कार करत फराळाच्या ताटावर ताव मारायला बसलो. चिवडा-लाडू-चकली-शेव-चिरोटे एकेक पदार्थ जिभेवर विसावत होता आणि अहा क्या बात है, म्हणत दिवाळी संपन्न झाल्याचा आनंद द्विगुणीत होत होता 😋😋😘
मी बनवलेल्या लाडू-चिवड्याला पण नव-याने 'छान झालं आहे'ची पावती दिल्यावर तर मी डब्बल खुश झाले आणि आणखीन एक लाडू फस्त केला(लाॅकडाऊन ने बहाल केलेला गुटगुटीतपणा कमी करायच्या ऐवजी?? ए गपे! दिवाळी आहे,चलता है 😁)
दिवाळी म्हटलं की आपल्या आप्तेष्टांना भेटणं-फराळाच्या गप्पा-खरेदी-फटाके अशी सगळी धम्माल असते. यावर्षी ते जरी होऊ नाही शकलं तरी व्हिडिओ काॅलवर मात्र सतत आमच्या गप्पा चालू आहेत त्यामुळे, अगदीच ओकीबोकी वाटत नाहीए ही दिवाळी 😌
बाकी तुमची दिवाळी कशी सुरु आहे, मजा करा-मस्त लाडू-चिवडा खा
तुम्हां सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊 🙏

Thursday, November 12, 2020

गुरूद्वादशी : नृसिंहवाडी उत्सव

  आज गुरूद्वादशी, नृसिंहवाडी/ नरसिंहवाडीला खूप मोठा उत्सव असतो. यावर्षी करोना मुळे कदाचित नसावा.
तर माझ्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींमधे प्रमुख आठवण ही नरसिंहवाडीच्या उत्सवाची आहे.
सुट्टी चालू झाली की मामाच्या गावाला किंवा आजोळी जाण्याच्या ऐवजी आम्ही नृसिंहवाडीला जायचो.
औ'बादहून पुण्याला शिवाजी नगर स्थानकाला जायचं तिथून पुढे स्वारगेट स्थानकावर कोल्हापूर किंवा त्यापुढे जाणारी लालपरी पकडायची आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे रात्री १०-११वा. आम्ही नरसिंहवाडीला पोहोचायचो.
तिथे एका गुरुजींच्या घरी आमची राहायची सोय केलेली असायची. बसमधूम उतरल्यावर चालत त्यांच्या घरी जाईपर्यंतच थंडीने हुडहुडी भरायची.
गुरुजींकडे गेल्यावर एकमेकांची विचारपूस करत दुस-या दिवशी पूजा किती वाजता करायची आहे, इतर कार्यक्रमांची रूपरेषा काय आहे हे सगळं ठरवून, 'पहाटे लवकर उठून नदीवर आंघोळीला जायचं आहे', या सूचनेसकट पांघरूणात दडी मारावी लागायची.
पहाटे उठून आमचे आई-बाबा नदीवर आंघोळीला जायचे पण, आमची कधी इतक्या थंडीत पाण्यात पाय ठेवायची हिम्मत नाही झाली. त्यामुळे अगदीच उशीरा नाही पण ७-८वा आम्ही घरुन तयार होऊन जायचो. नदी मधे आंघोळ करणे हा एकूणच किळसवाणा प्रकार वाटत असल्याने मी विशेष कधी प्रयत्न आणि हिम्मत केली नाही. शास्त्र म्हणून दोन थेंब स्वतःवर शिंपडायचे आणि पवित्र व्हायचं असा शाॅटकट मारलेला चालायचा 😜
मंदिराकडे जातांना दुतर्फा दुकानांची रांग आहे. पुजेचं साहित्य, मिठाई, खेळण्या अशा विविध वस्तू मिळणारी ही दुकानं बहुतांश लोकांच्या घराच्या समोरच्या भागात वसवलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला नारायणस्वामींचं मंदिर आहे आणि त्यामागे धर्मशाळा. थोडं पुढे जाऊन डाव्या हाताला वळालं की कृष्णामाईचं विस्तीर्ण पात्र दिसतं आणि ते बघत बघतच आपण पाय-या उतरून कधी नदीपात्रात उतरतो कळतच नाही.
नदीच्या पाण्यात हात खळखळत तिला नमस्कार करुन, चार पाय-या चढून मुख्य मंदिराकडे जायला वळायचं. मुख्य मंदिर नदिपात्राच्या अगदी लगत आहे. पण हे मंदिर इतर मंदिरांसारखं नसून एक माणूस जेमतेम डोकाऊ शकतो इतकं छोटुसं आहे.तिथे नृसिंहसरस्वती महाराजांच्या 'मनोहारी पादुका' आहेत आणि त्यावर सावली धरुन औदुंबराचा विशाल वृक्ष वर्षानुवर्षे उभा आहे.
कृष्णामाईच्या या नेत्रदीपक पात्राला शोभेल असा सुंदर घाट आणि मंदिराभोवती गोलाकार विशाल सभामंडप आहे.
नदीपात्राच्या एका बाजूला नृसिंहवाडी आहे तर दुस-या बाजूला अमरेश्वर म्हणून एक श्री दत्तमहाराजांचं अजून एक मंदिर आहे. नृसिंहवाडीला जितकी भाविकांची गर्दी असते त्यामानाने अमरेश्वरला बरीच शांतता असते. कृष्णामाईच्या पात्रातून बोटीने त्या बाजूला जाता येतं किंवा मुख्य रस्त्याने गाडीने पण जाता येतं.
नृसिंहवाडीला मुख्य मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसून पादुकांवर अभिषेक करुन पूजा करायची व्यवस्था केलेली आहे. त्यानुसार आमचे आई-बाबा पुजेला बसायचे आणि आम्ही त्यांच्या अलीकडे-पलिकडे बसून पूजा कशी करतात हे उत्सुकतेने बघत बसायचो. एकदा पूजा झाली की मुख्य आरती होईपर्यंत मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या किंवा मग मुख्य दारापाशी असणाऱ्या दुकांनाकडे फेरफटका मारायचा असा माझा कार्यक्रम असायचा.
मंदिरामधे पूजा चालू असतांना मंत्रोच्चारांचा होणारा आवाज दूरवर ऐकू यायचा.एका विशिष्ट लयीत म्हटल्या जाणाऱ्या त्या वेगवेगळ्या स्तोत्रांमुळे सगळं वातावरण इतकं प्रसन्न वाटायचं ना 😊 मला आजही तो आवाज कानात घुमल्यासारखा वाटतो.
मंदिर परिसारामधे दगडी रस्ता आहे. त्यावरून चालतांना होणारा गार स्पर्श मला फार मजेशीर वाटायचा. प्रवेशद्वारापासून बाहेर गावात जाणारा रस्ता तेंव्हा मातीचा होता, त्यावरुन चालतांना पण मऊशार मातीचा स्पर्श झाला की गुदगुल्या होतात असं वाटायचं 😄
हां तर प्रवेशद्वारापाशी ना २-३ दुकानं होती, तिथे गोष्टीची पुस्तकं मिळायची. मी तासनतास् उभी राहून ठरवत बसायचे की हे पुस्तक घेऊ की ते घेऊ. मागच्या वर्षी घेतलेलं पुस्तक परत नाही घेतलं जात ना, हे आठवून मग एकाच छानश्या पुस्तकाची निवड मी करायचे आणि बाबांनी घेऊन दिलं की लगेच वाचायला सुरूवात करायचे 😊
पुस्तकांच्या दुकानांमधे खेळणी तर असायचीच त्यातही मला ती पाण्यावर फिरणारी 'टर्र' आवाज करणारी होडी घ्यायची विशेष आवड होती 😜
जशी पुस्तकं-खेळणी घ्यायची उत्सुकता असायची तसंच तिथे मिळणाऱ्या विशेष मिठाईचं सुद्धा आकर्षण असायचं. कंदी पेढे,कवठाची बर्फी आणि भरपूर खोबरं-काजु-किसमिस-खसखस-डिंक-कमी साखर घालून बनवलेली बर्फी(माय फेव्हरेट). ही बर्फी इतकी स्वादिष्ट लागते मी कितीही खाऊ शकते. माझ्या मोठ्या बहिणीला मात्र कवठाची बर्फी जास्त आवडायची. अशा आमच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार + इतरांना प्रसाद द्यायला म्हणून, प्रत्येक जिन्नस किलोभर तरी घ्यावा लागायचा आईला 😄
दुसरं एक आकर्षण वाटायचं ते घरोघरी बनवलेल्या एक से एक सुंदर मातीच्या किल्ल्यांचं!
आम्ही ज्या गुरुजींच्या घरी राहायचो त्यांची मुलं तर दरवेळेस इतका सुंदर किल्ला बनवायचे नं की बघतच रहावं.आणि एका वर्षी तर गुरुजींच्या मुलाने महादेवाच्या जटेतून गंगा अवतरली असा देखावा केला होता. छोटी मोटर लाऊन खरंच महादेवाच्या जटेतून पाण्याचा फवारा तयार केला होता, असलं भारी वाटलेलं मला ते सगळं बघून 😁
मंदिरामधे दुपारच्या आरतीला हजेरी लावून झाली की आम्ही घरी येऊन सुग्रास जेवणावर ताव मारायचो आणि ताणून द्यायचो 😄
संध्याकाळ होत आली की पटकन आवरून परत मंदिरामधे जायचो. सकाळच्या पुजेपेक्षा मला संध्याकाळच्या पालखीची जास्त उत्सुकता असायची. जितकी पालखी खास तितकीच त्याआधीची तयारीही खास.
नारायणस्वामी मंदिरामधे उत्सवमूर्तींच्या मुखवट्याची सजावट केली जाते. काजळ-चंदन आणि फुलांची सजावट करुन उत्सवमूर्तींना सजवलं जातं. तो सजावट सोहळा बघणं फार आनंददायी आणि डोळे तृप्त करणारा असतो. अतिशय नाजूकपणे आणि निगुतीने केलेली ती सजावट पूर्ण झाली की उत्सवमूर्तींच्या मुखवट्याला सोन्याची झळाळी प्राप्त होते. वर्णन करायला शब्द कमी पडत आहेत माझे खरंतर, इतकं, डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य असतं ते 😍 एकदा सजावट पूर्ण झाली की उत्सवमूर्तींना फुलांची आरास केलेल्या पालखीमधे ठेवलं जातं आणि 'अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त' म्हणत मुख्य मंदिरासमोर पालखी आणली जाते. देवाची आरती करुन पालखी प्रदक्षिणेसाठी सज्ज होते.
हातात दिवटी घेऊन पुढे एकजण उभा राहतो, पालखीला सांभाळत चार जण असतात. सगळे गुरुजी एका सुरात आणि अतिशय खणखणीत आवाजामधे पंचपदी म्हणायला सुरूवात करतात आणि पालखी प्रदक्षिणा आरंभ करते. कधी ३ तर कधी ५ प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा करतांना प्रत्येक दिशेला पालखी थांबवून भाविकांना दर्शन घ्यायची संधी दिली जाते. मंदिराभोवती पालखीसोबत प्रदक्षिणा घालायला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय गोळा झालेला असतो. प्रत्येकजण कानात प्राण एकवटून दत्तमहाराजांची स्तुतिपर कवनं ऐकण्यात गुंगून गेलेला असतो. कृष्णामाईचा काठ, संध्याकाळचा हवेतला गारवा, धुपा-दिपाचा सुगंध आणि ब्रम्हवृंदांचा धीरगंभीर आवाज यामुळे एकूणच मंतरलेलं वातावरण असतं आणि तन-मन एका भारावलेल्या पण सुखद अनुभवाची प्रचिती घेत असतं, फार फार मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे ह्या पालखी सोहळ्याचा. प्रदक्षिणा झाली की शेजारती होते आणि मंदीर बंद केलं जातं.
दुस-या दिवशी म्हणजे गुरुद्वादशीला खूप मोठा उत्सव असतो.
पहाटेपासूनच पूजेला प्रारंभ करतात, असंख्य भाविक दर्शनासाठी रांगा लावून महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत, सोहळ्याचा अनुभव मनात साठवून तृप्त होत असतात. मुख्य पुजा-आरती झाली की महाप्रसादाची लगबग सुरु होते. त्या दिवशी नरसिंहवाडीमधे राहणाऱ्या आणि बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जातो. गावामधे असणाऱ्या सगळ्या धर्मशाळा, शाळा, पटांगणं अशा ठिकाणी एकाच वेळी पंगती बसवल्या जातात. हजारोंनी भाविक त्या अमृतासमान चविष्ट प्रसादाचा आस्वाद घेतात. प्रसाद म्हणून दोनच पदार्थ पानात वाढतात - गव्हाची गुळ घालून बनवलेली गरमागरम खीर आणि वांग्याची खमंग भाजी - हा प्रसाद इतका चविष्ट असतो की पोट भरलं तरी मनाची भूक काही भागत नाही 😄
महाप्रसाद घेऊन झाला की आमची घरी परतायची लगबग चालू व्हायची. मिळेल त्या गाडीने पुण्याला येऊन लगोलग औ'बादला पोहोचून दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचा मुहूर्त गाठायचा असायचा!
गुरुद्वादशीचा मंत्रमुग्ध करणारा सोहळा मनभरुन बघितला नं की दिवाळीची सुरूवात अतिशय मंगलमय व्हायची 😊🙏
गेल्या काही वर्षात मात्र आम्हांला नरसिंहवाडीला जायचा योग फारसा आला नाही पण, लहानपणीच्या या सुखद आठवणी दर दिवाळीला मनात रुंजी मात्र नक्कीच घालतात 😌

Monday, November 9, 2020

दिवाळी : पोटात दुखणं

दिवाळी आली की बरोब्बर काही 'विशिष्ट' लोकांच्या पोटात दुखायला लागतं!!
का म्हणून फक्त दिवाळीच्या फटाक्यांनीच 'प्रदूषण' होतं??
तिकडे त्या दिल्ली च्या आसपास शेतातला कचरा जाळणा-यांना धरा की धारेवर, त्यांच्याबद्दल कुठेतरी फक्त एक छोटी बातमी येते. त्यांनी असं करु नये म्हणून शाब्दिक फुलं उधळतात पण इतक्या वर्षात कोणाचीही हिम्मत नाही झाली त्यांना परावृत्त करायची, का बरं??
बरं फटाके तर फटाके आता पदार्थांवरही यांना घाला घालायचा आहे??
आमच्या सणा-वाराला काही महत्वच नाही, सगळंच थोतांड आहे, शरीराला-पर्यावरणाला हानिकारक आहे असं ऊठसुट सांगत सुटायला हिम्मत होतेच कशी!!
शाळा-काॅलेज-अक्कल पाजळणारे स्टँड-अप काॅमेडिअन्स-वर्तमानपत्रात स्वतःच्या अकलेचे तारे तोडणारे महानतम ज्ञानी यांना फक्त आणि फक्त हिंदू सणांची खिल्ली उडवायची, बंद करायची भाषा बोलता येते.
जी एक विशिष्ट जमात क्रूरतेच्या सीमा ओलांडून निर्बुद्ध नियमांना कवटाळून आजतागायत त्यांचे सण साजरी करत आली आहे त्यांना थांबवणं तर सोडाच उलट त्यांच्या वागण्याचं समर्थनच केलं जातं. त्यांच्या प्रत्येक कृत्यातून कसा प्रेमाचाच झरा वाहतो याचे गोडवे गायले जातात! अर्थात त्यांचे हे लाड काही ह्याच दशकात केले जातात असं नाहीए! पार १८८३ म्हणजे आजच्या तारखेला १३७ वर्षांपूर्वीपासून त्यांना असं गोंजारणं चालू झालेलं आहे!!
समानतेच्या गफ्फा मारणाऱ्या लोकांना फक्त आम्हा हिंदूंना समजावून सांगायची हौस आणि आमच्यातले काही जण, 'जाऊ देत ना, कुठे या मूर्ख लोकांकडे लक्ष द्यायचं, आपण बरं अन आपलं काम बरं', असं म्हणतो किंवा काही जण 'बरोबर आहे त्यांचं म्हणणं करत इतक्या वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या सणा-वाराला-परंपरांना काहीही विचार न-करता मूठमाती देऊन मोकळे होतात!' काही लोक असेही आहेत की त्यांना या दोन टोकाच्या लोकांच्या वागण्याने आणि कानावर पडणाऱ्या शब्दांनी इतकं संभ्रमीत व्हायला होतं की त्यांना ना धड सण साजरे करुन आनंद मिळवता येतो ना धड सण साजरं करणं बंद करता येतं, त्रिशंकू अवस्था!
गमतीची बाब बघा, कालच युकेच्या पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि भगवान श्रीरामांनी जसा रावणावर विजय मिळवला तसाच येत्या दिवाळीच्या रुपाने आपण कोरोनावर विजय मिळवू अशी आशा व्यक्त केली.
म्हणजे ज्यांना या सणाचं सोयरसुतक पण नाही अशांना पण महत्व पटायला लागलं आहे पण ज्यांच्या पूर्वजांनी हे सण जोपासत पुढच्या पिढ्यांना आशीर्वाद रुपात बहाल केले त्यांनाच ते साजरे करायची लाज वाटायला लागली आहे!!
धन्य हो!!