Sunday, November 15, 2020

#मुक्कामपोस्टUK : लाॅकडाऊन दिवाळी

  यंदाची आमची दिवाळी युके ला करायची वेळ आली. अगदी ऐन वेळेवर दुसरा लाॅकडाऊन लागला आणि घरी जाणं स्थगित करावं लागलं 😭
आलं करोनाच्या मनात, तिथे कोणाचं चालणार 😖
मन खट्टू झालं खरं, पण मनाला समजावत म्हटलं, वर्षभराचे सण जसे आनंदात साजरे केले तसंच दिवाळी पण करुया की या घरात-देशात 😃
आंजारुन-गोंजारुन मनाला तयार केलं खरं पण मग आता दिवाळीची तयारी नेमकी कशी करावी बरं हा पेच पडला 🤔
दिवाळी म्हटलं की पणत्या-आकाशकंदिल-दाराला लावायला तोरण-रांगोळी-रंग-पुजेचं साहित्य कित्ती कित्ती म्हणून सामान आणायचं असतं नै!
आमच्या कडे दुसरा लाॅकडाऊन चालू झालेला, बरं इथे या सगळ्या वस्तू मिळतात का आणि कुठे हे शोधण्यापासून सुरूवात!
काय करावं बरं हा विचार करत गुगल करत असतांना एकेक साईट्स सापडायला लागल्या 😊 माझी इथली पहिली दिवाळी असली म्हणून काय झालं, कैक वर्षांपासून भारतीय इथे आहेतच आणि अगदी आंब्याच्या डहाळी-दुर्वा-शेणाच्या गोव-या काय म्हणाल ते सगळं मिळतं, फक्त शोधायचा अवकाश!
या साईट्स सापडल्या आणि माझ्या अज्ञानाचा आणि भीतीचा अंध:कार पळूनच गेला 😁
आता तर मला तुळशीबागच सापडली होती, उत्साहात मी पणत्या काय रांगोळी काय रंग काय दिसेल ते कार्ट मधे टाकायला सुरूवात केली.देवाच्या पूजेला लागणारं सगळं सामान मिळालं बाई, काय खुश झाले मी 👏💃💃
उटणं-सुगंधी साबण-तेल-घरातल्या लावायच्या दिव्यांच्या माळा एक एक गोष्ट समोर आली आणि माझ्या दिवाळी खरेदीची लिस्ट पूर्ण होत गेली 😊
चला बाहेरची आवश्यक खरेदी तर पार पडली पण दिवाळी फराळाचं काय?? अरे देवा!!😰😰
चकल्या-शेव करायची सोय आपलं सो-या नाही आणि नुसत्या लाडू-चिवड्यावर तर दिवाळी भागायची नाही 😳 आता काय करावं बरं असं म्हणत मी परत डोकं खाजवायला सुरूवात केली. तशात अचानकच मला Indieats.in म्हणून माझ्या मैत्रिणीच्या फेबु पेजवर दिवाळी फराळाची आॅफर दिसली आणि मला तर बाई आकाशच ठेंगणं झालं, इतका आनंद झाला म्हणून सांगू 😄 क्षणाचाही विलंब न-लावता मी चकल्या-चिरोटे-शेव-खोब-याच्या वड्या-बालुशाही अशा सगळ्या पदार्थांची आॅर्डर दिली. त्या साइटवर बाकी मसाले-तयार पिठं दिसली, लगे हात ती पण मागवली 😄 हुश्श!!!
झाली एकदाची दिवाळीची सगळी तयारी 💃💃
जसजशी दिवाळी जवळ यायला लागली तस रोज काही ना काही सामानचं पार्सल यायला लागलं. नवरा म्हणायचा अगं काय-काय मागवलं आहेस इतकं?? मी फक्त 'आली दिवाळी-दिवाळी-दिवाळी' इतकंच म्हणत उड्या मारत होते 😜😄😄
दिवाळीच्या एक आठवडाआधी रविवारी भल्या पहाटे मी लाडू आणि चिवड्याचा घाट घातला आणि बेसनाचे लाडू, मुरमु-याचा खमंग चिवडा(अर्थात माझ्या आईच्या सुपरव्हिजनखाली) बनवून डब्बे भरून ठेऊन दिला 😄😋
घरामधे मग दिव्यांच्या माळा लावल्या आणि आकाशकंदील नसेना का पण या लुकलुकणाऱ्या ता-यांनी माझं घर उजळून निघालं 😍
रमा एकादशीला रंग-रांगोळीने माझं यूकेच्या घरासमोरचं अंगण सजलं आणि पहिला दिवा दारात लागला 😊
दिवाळी सुरु झाली हो 😊 😊 👏👏🙏
तसं बघितलं तर पुण्याच्या घरासमोर मी इतक्या उत्साहाने सकाळ-संध्याकाळ रांगोळी काढत नव्हते. पण युकेतल्या करड्या आणि निरस वातावरणाला छेद देता यावा म्हणून खास रंगसंगती करत मी रांगोळ्या काढायला सुरूवात केली 😊
नरकचतुर्दशीच्या पहिल्या आंघोळीकरता उटणं-तेल-साबण काढून ताट तयार केलं आणि सुपरिचित वासांनी घरच्या सगळ्या दिवाळींच्या आठवणी मनात फेर धरु लागल्या.गरम-कढत पाण्यात तीळ घालून-उटण्याचा उष्णसुगंधी लेप अनुभवत पहिली आंघोळ उरकली आणि देवाला नमस्कार करत फराळाच्या ताटावर ताव मारायला बसलो. चिवडा-लाडू-चकली-शेव-चिरोटे एकेक पदार्थ जिभेवर विसावत होता आणि अहा क्या बात है, म्हणत दिवाळी संपन्न झाल्याचा आनंद द्विगुणीत होत होता 😋😋😘
मी बनवलेल्या लाडू-चिवड्याला पण नव-याने 'छान झालं आहे'ची पावती दिल्यावर तर मी डब्बल खुश झाले आणि आणखीन एक लाडू फस्त केला(लाॅकडाऊन ने बहाल केलेला गुटगुटीतपणा कमी करायच्या ऐवजी?? ए गपे! दिवाळी आहे,चलता है 😁)
दिवाळी म्हटलं की आपल्या आप्तेष्टांना भेटणं-फराळाच्या गप्पा-खरेदी-फटाके अशी सगळी धम्माल असते. यावर्षी ते जरी होऊ नाही शकलं तरी व्हिडिओ काॅलवर मात्र सतत आमच्या गप्पा चालू आहेत त्यामुळे, अगदीच ओकीबोकी वाटत नाहीए ही दिवाळी 😌
बाकी तुमची दिवाळी कशी सुरु आहे, मजा करा-मस्त लाडू-चिवडा खा
तुम्हां सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊 🙏

No comments:

Post a Comment