Friday, November 27, 2020

#खाण्यासाठी_जन्म_आपुला #हिवाळास्पेशल : पौष्टिक हलवा

 

#खाण्यासाठी_जन्म_आपुला
हिवाळा आल्याची चाहूल जशी बोच-या हवेतून होते तशीच ती बाजारामधे टोपली टोपलीतून सजवलेल्या लालचुटूक, लांबसडक गाजरांना बघून होते 😃
हे जे गाजर असतं नं त्याला खरी चव असते😋👌
डोळ्यांना सुखावणारा लालसर-गुलाबी रंग आणि गोडुस चव असलेली ही गाजरं बाजारात मिळायला लागली रे लागली की मी किलो-किलो खरेदी करते. कारण हिवाळ्याचे ३-४ महिनेच यांचा आस्वाद घेता येतो,नाहीतर वर्षभर ती शेंदरी-बेचव गाजरं बघून खायची इच्छाच मरून जाते!
असो, तर हे गोड-गोजिरे गाजरं बाजारातून आणल्यावर पहिला पदार्थ काय बनतो तर 'पौष्टिक हलवा', येस्स!
आज मी तुम्हांला माझ्या या खास पदार्थाची 'सिक्रेट' रेसिपी सांगणार आहे बरं 😄
तर तुम्हांला आवडेल तितकी गाजरं घ्या म्हणजे मी तरी किमान किलोभर घेते. ती स्वच्छ धुवून-पुसून घ्या आणि त्याचा छानसा कीस/खीस करुन घ्या. यासोबतच गाजराइतकाच महत्वाचा घटक किंबहुना गाजरापेक्षा जास्त जीवनसत्त्व असणारा घटक म्हणजे बीटरुट घ्या.
एक किलो गाजरासाठी बीटरुट जे वजनात साधारण १५०-२००-२५०ग्रॅ असेल असं घ्या, त्याचाही कीस/खीस बनवून घ्या. हे झाले पदार्थ बनवायला लागणारे दोन मुख्य घटक. आता तुम्ही ज्या भांड्यात गाजराचा हलवा करता ते घ्या..
हां हां हां थांबा!नाॅन-स्टीक पॅन अज्जिबात वापरायचं नाही बरं 👊
तर गॅसवर भांडं ठेवा आणि मोठ्या चमच्याने ३-४ चमचे तूप घालून ते वितळू द्या. तुपाचा सुगंध दरवळायला लागला की मग त्यात गाजराचा आणि त्यावर बीटाचा कीस/खीस घालून त्याला व्यवस्थित एकत्र करुन घ्या. भांड्यावर झाकण ठेवा आणि तूप-गाजर-बीट यांचं मिश्रण वाफेवर मस्तपैकी शिजू द्या.
डोन्ट-वरी आपण अधूनमधून झाकण उघडून ते मिश्रण एकत्र करत राहणार आहोत पण आत्ताच ठेवलंय ना, जरा होऊ देत पाच मिनिटं.
तर आता आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे. किलोभर गाजराच्या कीसासाठी अर्धा लीटर दूध तापवायला दुस-या भांड्यात ठेवायचं.
इकडे 'धीमी आँच'पे हलव्याचं मिश्रण छान तयार होतंय.
झाकण उघडून बघा, कसा मस्त बीटाचा रंग घेऊन गाजराचा कीस लालचूटूक्क झाला आहे आणि तूपमिश्रित सुगंध घ्राणेंद्रियाला तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थाची चुणूक देतोय 😘 हां पुरे पुरे - नैवेद्य दाखवायचा आहे म्हटलं आधी देवाला😏 मग तुमच्या पोटोबाला!
तर साधारण १५मिनीटात गाजर-बीटाचा कीस तुपात वाफवून मस्त मऊसर तयार होतो, आता त्यात मगाशी तापत ठेवलेलं दूध घालायचं. दूध जितकं आहे तितकं सगळं नका घालू हं, जरा अंदाज घेत घेत पण पौष्टिक हलवा शिजायला मदत होईल इतपत घालायचं. म्हणजे बघा गाजर-बीटाचा खीस आहे नं त्याच्या साधारण अर्धा इंच वर येईल इतपत दूध घालायचं.
हां आता या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित हलवून एकत्रित करायचं. परत एकदा झाकण ठेवत पुढच्या तयारीला लागायचं.
या पौष्टिक हलव्यामधे एक साखर सोडली तर बाकी सगळ्या जिन्नसांचा वापर अगदी सढळ हाताने + आवडीनुसार तुम्ही करु शकता. आता सुकामेवा चा नंबर - चला आता प्रत्येकी एक मूठ काजू-बदाम-अक्रोड(हो अक्रोड अतिशय महत्वाचा घटक आहे) घ्या आणि त्याची जाडसर पूड करुन घ्या. आता तुम्ही म्हणाल, काप का नको? पूड का करायची?
बीटरुट असल्यामुळे या पोष्टिक हलव्याचा रंग अगदी गडद लाल होतो त्यात मग बदाम-काजूचे काप फारच बेरंगी लाल दिसतात, कसं वाटेल मग ते खातांना 😒 आणि आक्रोड जरासे तुरट(मला तरी त्यांची चव तुरटच वाटते) लागतात त्यामुळे त्याचे नुसते तुकडे नकोच म्हणून सोप्पा उपाय आहे पूड 😁
हां झाली का पूड करुन,चला आता झाकण उघडून बघा बरं हलवा कितपत शिजला ते? हां दूध आता ब-यापैकी आटलं आहे, परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करा आणि झाकण ठेवा. आता साखरेचा नंबर, तर या हलव्यामधे साखर अगदी कमीतकमी घालायची. म्हणजे बघा जर एक किलो गाजर+२५०ग्रॅ बीटरुट असेल तर २००ग्रॅ साखर पुरेशी आहे. कारण मुळात गाजर असतात गोड त्यात परत बीटरुट शिजलं की त्याचाही गोडवा उतरतो त्यामुळे अगदी कमी साखर जरी घातली तरी अतिशय स्वादिष्ट बनतो पौष्टिक हलवा 😊
खूप झाल्या गप्पा, झाकण उघडलं तर अहाहा वाफेवर स्वार होऊन हलव्याचा सुगंध 'मी तय्यार आहे' ची वर्दी देत आला 😊 तरी एकदा निरखून बघा दूध कुठे दिसत नाही नं भांड्यात? हां म्हणजे हलवा छानपैकी शिजला बरं 😊 त्यात आता साखर घाला आणि हलवून घ्या. पदार्थाच्या उष्णतेने साखर लगेच वितळायला लागेल. परत एकदा सगळं मिश्रण एकत्र करा आणि साखर विरघळून हलवा तयार होईतो जरा दम धरा 😜
१०मिनीटांमधे साखरपाक विरघळून हलव्याला चकाकी यायला लागेल. एकदा का सगळा पाक त्या मिश्रणात मिसळला की हलवा छान तयार होईल, भांड्यापासून थोडा वेगळा व्हायला सुरूवात होईल. आता तुमच्या आवडीनुसार अजून पाच मिनीटं त्या मिश्रणाला हलवून ड्राय करु शकता किंवा आत्ताच गॅस बंद केला तरी चालेल👍
१०मिनीटं मिश्रण निवलं की त्यात मगाशी केलेली ती काजू-बदाम-अक्रोडची जाडसर पूड घालून मिक्स करुन घ्या. आता एका वाटीमधे त्यातला दोन-तीन चमचे पौष्टिक हलवा घ्या त्यावर काजू-बदाम लावून जरा सजावट करा आणि देवाला चाखायला द्या🙏
त्यानंतर कुटुंबियांसाठी आणि स्वतःसाठी पौष्टिक हलव्याच्या वाट्या भरून घ्या आणि सुगंधी-चविष्ट-स्वादिष्ट अशा पौष्टिक हलव्याची लज्जत अनुभवा 😋👌👌👌
माझ्या घरी हिवाळ्यात पहिला हा पदार्थ बनतो, तुमच्याकडे काय बनवतात?
#हिवाळास्पेशल
#पौष्टिकहलवा
#गावरानगाजरcravings
#खाण्यासाठी_जन्म_आपुला

No comments:

Post a Comment