Saturday, April 3, 2021
टूथपेस्टची गोळी
काही महिन्यांपूर्वी मी बांबू टूथब्रश बद्दल माझा अनुभव मांडला होता.आज आता मी टूथपेस्टच्या गोळी बद्दल सांगणार आहे.😁
काय? टूथपेस्टची गोळी?? 😳
टूथपेस्टची पण गोळी काढली की काय तुम्ही आता 🤔
वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल नं 😜
तर आता टूथपेस्ट ची पण गोळी मिळते आणि चवीला, वापरायला एकदम सोप्पी! यापेक्षा महत्वाचा फायदा हा आहे की या गोळ्यांचा वापर केल्याने पर्यावरणाला जरा कमी धक्का बसतो👍
आधी या गोळीविषयी सांगते - आपण लिमलेटच्या गोळ्या खायचो नं तशीच पण जरा लहान आकाराची असते ही गोळी. दात घासायचे असतील तेंव्हा एक गोळी तोंडात टाकून दाताने फोडायची आणि धुतलेला ब्रश तोंडात घालून दात घासायला सुरूवात करायची, छानसा फेस तयार होतो आणि कळतही नाही की आपण टूथपेस्ट नाही तर गोळीने दात घासतोय 😁
या गोळ्या शक्यतो कागदाच्या पुड्यात किंवा काचेच्या बाटलीमधे मिळतात.किंमत पण अवाजवी नाही आणि लहान मुलं सोडली तर सर्व वयोगटाला वापरायला हरकत नाही 😃👏
एका पाकिटात १००-१२५ गोळ्या मिळतात त्यामुळे रोजच्या वापरातल्या टूथपेस्ट इतकंच याही पुरतील☝️
याचा वापर का करावा याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की, नेहमीची टूथपेस्ट ज्या खोक्यामधे येते त्यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होते!
ती कशी काय ब्वा?😕
टूथपेस्ट ज्यामधे मिळते ते खोकं फक्त सुंदर पॅकेजिंग करुन ग्राहक आकर्षित करण्याकरता वापरलं जातं, त्याचा उपयोग शून्य आहे पण त्याचं उपद्रव मूल्य कैक पटीने जास्त आहे!
टूथपेस्टची ट्यूब ही चांगली दणकट असते, तिला नुसतं जरी एखाद्या साच्यामधे अडकवून ने-आण केलं तरी विशेष नुकसान होणार नाही. पण एका कंपनीने आकर्षक वेष्टनाची टूम काढली आणि सगळ्यांनी तोच मूर्खपणा सुरु केला!
कदाचित तुमच्या लक्षातही आलं नसेल पण, आपण टूथपेस्ट खोक्यातून बाहेर काढून ते खोकं लगेच कचरा पेटीत भिरकावतो!
(हं आता काही कलाकार लोक त्यातून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवतही असतील पण ती संख्या नगण्य आहे!)🙄
ते खोकं कचरापेटीतून जातं कच-याच्या मोठ्या ढिगामधे आणि नंतर जर त्या वेष्टनाला पुनर्प्रक्रिया(रिसायकल) करायची प्रणाली अस्तित्वात असेल तरच नवं रुप मिळतं, नाहीतर ते खोकं पडून राहतं तिथेच, वर्षानुवर्षं!!🤦
भारतामधे काही कंपन्या आहेतही हे काम करणाऱ्या पण, त्यांचा आवाका वाढेपर्यंत आपण कितीतरी टन खोक्यांचा कचरा बनवलेला असेल!!
गुगलबाबा म्हणतो एकट्या अमेरिकेमधे वर्षाला ९वर९पूज्य (९,०००,०००,०००) इतके टूथपेस्टचे खोके कच-यात फेकले जातात!!!🤯🤯🤯🤯
यावर उपाय काय तर १)कंपन्यांनी खोकेविरहीत टूथपेस्ट बनवायला हवी २)जागोजागी अशा वस्तू पुनर्प्रक्रिया(रिसायकल) होऊ शकेल अशी व्यवस्था असायला हवी.
हे दोनही उपाय आपल्या देशात जेंव्हा अमलात आणले जातील तेंव्हा जातील, पण तोवर आपण आपल्या परीने काही करु शकतो का? या प्रश्नाचं उत्तर निदान मला तरी या टूथपेस्टच्या गोळ्यांमधे दिसतं.
एक गमतीदार माहिती म्हणून सांगते, आईसलँड मधे राहणाऱ्या लोकांनी खोकेविरहीत टूथपेस्टच हवी, असा आग्रह धरून तिथल्या सरकारला आणि कंपन्यांना कार्यप्रणालीत बदल करायलाच लावला! त्या देशामधे आता वेष्टनविरहीतच टूथपेस्ट मिळते!😃👏
म्हणजे बघा, लोकांनी जर आग्रह केला तर सरकार आणि गब्बर काॅर्पोरेट्स पण मुठीत नाक धरुन वागू शकतात🤫! असो!
मी जसं आधी म्हणाले तसं या टूथपेस्ट आणि खोक्यामुळे प्रचंड प्रदूषण होतं.
मुळात टूथपेस्टची ट्यूब अजून पुनर्प्रक्रिया(रिसायकल) होत नाही पूर्णपणे तिथे या खोक्यांची पुनर्प्रक्रिया (रिसायकल) करेल कोण??
बरं ते खोकं काही साधं-सुधं फक्त पुठ्ठ्याचं नसतं! त्यावर प्लास्टिकचं आवरण असतं, त्यावर जी अक्षरं छापलेली असतात त्यासाठी शाई वापरलेली असते, एक ना अनेक १००गोष्टी आहेत ज्यामुळे खोके आणि टूथपेस्टचं विघटन करुन नविन रुप(रिप्रोसेसिंग) देणं जिकिरीचं आहे!
मला काय वाटतं, आपण सामान्य माणसं जर पर्यावरणाच्या बाबतीत सजग झालो आणि छोट्या - छोट्या सवयींमधे बदल करु शकलो तर, निश्चितच सरकार पर्यंत या गोष्टी पोहोचतील आणि सरकारी धोरणं बदलायला चालना मिळू शकेल 🙂
प्रत्येक देशाचं सरकार याबाबतीत काही ना काही नक्कीच करत आहे. जसं आता यूकेच्या सरकारने जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या कंपन्यांना ताकीद दिली आहे की प्रदूषण होईल अशा गोष्टी बनवायच्या नाहीत!
हा विषय खूप मोठा आहे पण, या लेखाच्या अनुषंगाने एक उदाहरण द्यायचं म्हणजे 'कोलगेट' सारख्या कंपनीने नुकतीच एक नविन टूथपेस्ट बाजारात आणली जिच्यावर खोक्यासकट पुनर्प्रक्रिया(रिसायकल)होऊ शकते!
तशी पुनर्प्रक्रिया(रिसायकलिंग) प्रणाली पण त्यांनी इथे उभी केली आहे. तसंच, युके सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या पुनर्प्रक्रिया(रिसायकलिंग)प्रणालीमधे पण या दोन गोष्टी पुनर्प्रक्रिया केल्या जाऊ शकतात.
भारतामधे कोलगेटने ही टूथपेस्ट अजून तरी बाजारात उतरवली नाही, पण आज ना उद्या येईल अशी आशा करुया 😃👍
तोवर जर तुम्हांला टूथपेस्टची गोळी चाखून बघायची असेल तर अॅमेझाॅनला बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
कसं आहे नं, आपल्यापैकी प्रत्येकजणच झाड लावून त्याला मोठं करु शकत नाही, तेंव्हा अशा छोट्या गोष्टी आणि सवयींमधे बदल करुन जर आपण 'कचरा' कमी करु शकलो तर निदान खारीचा वाटा उचलल्याचं समाधान तर मिळेल 😍
#saveenvironment
#notoothpastebox
#notoplastic
बांबू टूथब्रश पोस्ट : http://maziblogbhoomi.blogspot.com/2021/01/notoplastictoothbrush.html
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment