आॅफिसचं काम करता करता दुपारी अचानक एक छानसं संगीत कानावर आलं आणि आपसूक नजर खिडकीतून बाहेर शोधायला लागली, कुठून येत असेल हा आवाज🤔 दोन-तीन मिनीटे सतत आवाज ऐकू आला तेंव्हा मी खिडकीपाशी येऊन शोधायला लागले की, असं भोंगा लावून एकच धून कोण बरं वाजवतंय?😃 आणि एक छोटी गाडी येतांना दिसली - तो होता आईस्क्रीम चा मिनी ट्रक 😊 लाल रंगाने सजवलेला आणि छानसं संगीत वाजवत फिरणारा 😊 थोड्या थोड्या अंतरावर तो आईस्क्रीमवाला ट्रक थांबवायचा आणि कोणी आलं नाही तर पुढे जायचा. आठवड्यातले ठरावीक २/३ दिवस या ट्रकची फेरी ठरलेली असते माझ्या भागामधे, पण कधी कोणा मुलांना घराबाहेर येऊन आईस्क्रीम विकत घेतांना बघितलं नाही मी.. पण या आईस्क्रीमच्या गाडीला बघितलं, की मला माझ्या लहानपणी दारासमोर येणाऱ्या आईस्क्रीमवाल्या काकांची आठवण हटकून आलीच! उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की भाजी विकणाऱ्यांपेक्षा इतर गोष्टी विकणारी माणसं आमच्या गल्लीमधे जास्त दिसायला लागायची. त्यात मग खेळण्या विकणारा गाडा यायचा तर कधी आईस्क्रीम-कुल्फिवाला. मला ती आईस्क्रीमची गाडी लक्षात राहण्याचं मुख्य कारण म्हणजे ओळीत मांडलेले स्टीलचे आईस्क्रीम खायचे कप्स आणि त्यात छोटासा स्टीलचा चमचा! एकूणच ती गाडी-ते आईस्क्रीमवाले काका हे इतर वस्तू विकणाऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं होतं म्हणून आकर्षक वाटायचं! ते काका नेहमी पांढरी गांधीटोपी-सदरा-दुटांगी धोतर असा पेहराव करायचे. त्यांच्या गाडीला ना छोटी घंटी अडकवलेली होती आणि त्याला दोरी बांधलेली असायची. ते काका एका हाताने गाडी ढकलायचे आणि दुस-या हाताने सतत ती घंटी वाजवायचे.बहुदा आकाशी-निळसर रंग दिलेला होता त्यांच्या गाडीला सगळीकडे आणि आईस्क्रीमचे ते स्टीलचे कप्स एका शोकेसमधे ओळीने मांडलेले असायचे.तर गाडीच्या मध्यभागी एक मोठा डबा होता ज्यामधे आईस्क्रीम असायचं.यासोबतच एक जर्मनचा मोठा वाडगा/Mug ठेवलेला असायचा ज्यामधे आईस्क्रीमचा स्कुप बनवतात नं, तो चमचा असायचा. कोणी आईस्क्रीम घ्यायला आलं की, ते काका गाडीच्या मधे असणारं आईस्क्रीमच्या डब्याचं, तिजोरीच्या दरवाज्यासारखं छोटुसं झाकण उचलून बाजूला करायचे आणि स्कुप बनवायचा चमचा त्यात घालून खाड-खुड आवाज करत एक गारगार-रंगीत आईस्क्रीमचा गोळा बाहेर काढून त्या स्टीलच्या कपामधे घालून द्यायचे 😍 आईस्क्रीम खाण्याची मजा तर वेगळी होतीच पण ही सगळी प्रक्रिया बघायला मला जास्त आवडायचं! खरं तर, त्या काकांकडून आम्ही क्वचितच कधी आईस्क्रीम विकत घेतलं असावं. कारण, माझी आई घरीच आईस्क्रीम बनवायची 😋😋 आईस्क्रीम बनवायचं आयताकृती भांडं होतं आमच्याकडे. त्याला खाच होती, ज्यात झाकण सरकवून घट्ट बसवावं लागायचं जेणेकरून बर्फ पडणार/साचणार नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागली की लगेच ते भांडं माळ्यावरुन खाली उतरायचं आणि आईस्क्रीमचं सगळं साहित्य गोळा केलं जायचं. मग कधी पिस्ता कधी टुटी-फ्रुटी तर कधी आंबा असे वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे आईस्क्रीम बनवले जायचे. दूध आटवणे मग त्यात योग्य प्रमाणात साखर,खायचा रंग, सुका-मेवा..असे आवश्यक तितके + प्रत्येकाच्या आवडीनुसार जिन्नस एकत्र करुन आईस्क्रीमचं मिश्रण त्या भांड्यात ओतून, ते भांडं एकदम सील-बंद करून डीप फ्रिजमधे ठेवलं जायचं! मग सुरु व्हायची प्रतिक्षा!! दर तासाने कोणी न कोणी ते भांडं उघडून बघायचा प्रयत्न करायचो आणि मग आई रागवायची 😜 सरतेशेवटी चांगले १०-१२तास वाट बघितल्यावर मस्त आईस्क्रीम तयार झालेलं असायचं 😘 😘 चव चाखायची म्हणून अर्थातच चढाओढ असायची आमच्यात😄 मग एकजण त्या डब्याचं झाकण सावकाश बाजूला करुन, अगदी कोपऱ्यातला थोडासा टवका चमच्याने काढून चाखून बघायचा, हम्म अगदी चविष्ट गारेगार चव जिभेला शहारत जायची 😘 लगेच घरातल्या सगळ्यांसाठी वाट्या घेऊन त्यात प्रत्येकाला एक एक स्लॅब कापून दिला जायचा आणि सर्वजण त्या घरी बनवलेल्या चविष्ट आईसक्रीमची मजा लुटायचे 😍 फार छान दिवस होते ते 😘 😘 तसं बघितलं तर, आईस्क्रीम बनवणं हे मुख्यत्वे आईचं काम असायचं, आम्ही लुडबूड करायचो, पण, ती फक्त चव घेण्यासाठीच 😄 आईस्क्रीम इतकाच जिव्हाळ्याचा विषय होता 'रसना'! मला त्या रसनाच्या जाहिराती अजूनही अगदी ठळक आठवतात 😄 रसनाचं पाकिट आणायचं, एक मोठं भांडं(जे दुधाचं नसेल) ते घेऊन त्यात माठातलं गारेगार पाणी टाकायचं,किलो-किलो साखर टाकायची आणि रसनाच्या पाकीटातलं त्यात मिसळून ढवळsssत बसायचंsss एकदा का साखर विरघळली की छान सुगंधी आणि पिवळ्या रंगाचं-आंबा फ्लेव्हरचं रसना तय्यार व्हायचं! मग ते काचेच्या ग्लासमधे ओतायचं आणि एक एक घोट घेत त्याचा आनंद अनुभवायचा, मला आत्तासुद्धा रसनाची चव आठवते 😘 रसना बनवणं हे काम मात्र हटकून आम्हां पोरांचं असायचं. त्यात नंतर नंतर तर किती काय काय फ्लेव्हर्स आले, पण मला आंबाच आवडायचं. याच 'रसना' ला आम्ही आमच्या कल्पक बालबुध्दीने वेगवेगळ्या साच्यात टाकून त्याला नविन रूपं द्यायचा केविलवाणा प्रयत्न केल्याचं आता आठवलं तर हसू आवरत नाही 😄 'बर्फाचा गोळा' हे प्रकरण अस्वच्छतेच्या कारणामुळे आम्हा सगळ्यांसाठी वर्ज्य होतं. मग आम्ही काय शक्कल लढवली, तर रसना एका स्टीलच्या ग्लासात/वाटीत भरून त्यात चमचा ठेऊन फ्रिजमधे ठेवायचं आणि दोन-तीन तासाने बाहेर काढलं की त्याचा झालेला असायचा बर्फ! 😄 😄 मग त्या पेला/वाटीला थोडावेळ तसंच ठेवायचं आणि ते वितळायला सुरूवात झाली की 'सुर्र-सुर्र' करत चाखून खायचं 😜 😁 😁 काय तरी उद्योग रे देवा! पण मज्जा यायची खूप 😄 😄 दुसरा प्रकार याहून भन्नाट! पेप्सी/पिप्सी म्हणून रंगीबेरंगी प्लॅस्टिकमधे कसलं तरी द्रव भरून त्याचा बर्फ बनवलेला एक प्रकार मिळायचा. आमच्या आईने पेप्सी बनवायला वापरतात तो प्लॅस्टिकचा रोल आणला. आणि आम्ही शास्त्रज्ञ लगेच त्या रोलचे एकसारखे तुकडे केले. कोणाला लहान-मोठी पेप्सी मिळाली म्हणून उगाच भांडण नको! मग प्रत्येक तुकड्याचं एक टोक मेणबत्तीच्या ज्योतीवर फिरवून घट्ट बंद करायचं आणि दुस-या बाजूने त्यात रसना टाकायचं आणि ती बाजू बंद करुन फ्रिजमधे रवानगी करायची की, तासाभरात बर्फ बनून फुगुन टंब झालेली पेप्सी तय्यार! ती घेऊन एका टोकाने फोडून सुं-सुं करत चोखत बसायचं की तासभर निश्चिंती! काय मस्त वेळ जायचा, वाह वा! बरं झालं तेंव्हा मोबाईल्स नव्हते😁 हां आणि एक कुल्फिवाला पण यायचा आमच्या गल्लीत. त्याच्या गाड्यावर पत्र्याचा मोठ्ठा डबा असायचा त्यावर लाल भडक्क रंगांचं कापड अंथरलेलं असायचं. कुल्फि घ्यायला पोरं गोळा झाले की तो माणूस प्रत्येकाला जितक्या पैश्याची/रूपयाची कुल्फि हवी असेल त्यानुसार ते कापड सरकवून बांबूच्या काड्या खोसलेले पत्र्याचेच कोन बाहेर काढायचा. ते सगळे कोन पाणी असलेल्या भांड्यात ठेवायचा. एक एक कोन बाहेर काढून दोन्ही हाताने त्यावर घुसळल्यासारखं करायचा आणि त्यात अडकवलेली काडी ओढून दाणेदार-मलई असलेली पांढरीशुभ्र कुल्फि समोर धरायचा! ती गारेगार कुल्फि दातांना झिणझिण्या आणायची 😜 मग कधी ऊसाचा रस विकणारा गाडा यायचा! आमच्या घरी सगळ्यांना ऊसाचा रस अतिशय आवडतो. असा गाडा दारासमोर आला की लगेच आम्ही मोठं भांडं घेऊन त्या काकांना सांगायचो 'स्पेशल' रस पाहिजे. मग त्या काकांनी जे भांडं लावलेलं असायचं ते स्वच्छ करुन घ्यायला सांगायचो, त्यात बर्फ नाही टाकायचा ही 'अतिमहत्वाची' सूचना द्यायचो! ते काका गाडीत ठेवलेल्या ऊसाच्या ढिगाऱ्यातून दोन मोठ्ठे ऊस काढायचे आणि लाकडी यंत्रात घालून डोक्यावरचं हँडल फिरवायचे. त्या ऊसाचा पार चोथा-चोथा होईतो पिळत बसायचे. आमच्या आर्डरपुरता रस निघाला की आम्ही आणलेल्या भांड्यात द्यायचे आणि आम्ही घरात येऊन तो रस 'रंग' बदलायच्या आत एकेकासाठी ग्लासात ओतून क्वचित कधी बर्फ टाकून घटाघट गट्टम करायचो! लहानपणीची ही रसवाल्या काकांना सूचना द्यायची सवय अजून गेली नाहीए हं माझी 😁 वाह! एक ना अनेक आठवणींची ही लड एकदा सुरु झाली नं, की खूप खास असं मनाच्या तळातून वर घेऊन येते 😍 I'm loving it!
No comments:
Post a Comment