#Stonehenge बँक हाॅलिडेचा मुहूर्त गाठून आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीतली पहिली सफर 'Stonehenge' ला करायची ठरवली. Stonehenge हे एक दगडांचं मंदिर म्हणून संबोधलं जातं. सूर्य भ्रमणाच्या नुसार याची रचना सुमारे ५०००वर्षांपूर्वी केली असावी असं म्हणतात. Salisbury या गावी जाऊन पुढे Stonehenge ला जायला वेगळ्या बसेस अाहेत. या ठिकाणी पोहोचायला वेगवेगळे पर्याय आहेत, जसं की तुम्ही लंडनहून टुअर बसने जाऊ शकता किंवा स्वतःच्या गाडीने जाऊ शकता नाहीतर ट्रेन्स आहेतच. आमच्या गावापासून Salisbury जरा आडवाटेला असल्यामुळे आम्हांला मजल-दरमजल करत तीन वेगवेगळ्या ट्रेन्सने जावं लागलं, मज्जा आली (पण परतीच्या वेळेस पार भुस्काट पडलं 🤪) बरं, एक महत्वाची गोष्ट - अशा कोणत्याही ठिकाणी जायच्या आधी तिकिटं बुक करणं अत्यंत गरजेचं असतं! विशेषतः कोरोनोत्तर काळात तर युके मधल्या बहुतांश ठिकाणी आगावू तिकिट काढलं तरंच प्रवेश देणं सुरू आहे. English heritage संस्था Stonehenge आणि अशा ४०० ऐतिहासिकदृष्टया महत्वाच्या ठिकाणांची व्यवस्था बघते. त्यांच्या वेबसाईट वर अशा ठिकाणांची तिकिटं विकत मिळतात. तसंच, Salisbury गावापासून मुख्य ठिकाणी जाण्या-येण्यासाठीच्या बसचं तिकिट सुद्धा असंच वेबसाईट वरुन विकत घेता येतं. या नियमानुसार आम्ही प्रवासाच्या अथपासून ते इतिपर्यंत सगळ्या बाबींसाठी तिकिटं काढून मगच प्रस्थान केलं! Salisbury ला आम्ही पोहोचलो आणि स्टेशनबाहेर येऊन Stonehenge ला घेऊन जाणा-या बसमधे चढून तिकिटं तपासून घेतली. समोर ठेवलेले हेड-फोन्स उचलले आणि बसच्या माडीवर जाऊन बसलो. इथे टुअरच्या बसेस किंवा एकूणच ज्या बस असतात नं, त्यांच्या काचा एकदम चकचकीत स्वच्छ आणि भल्या-मोठ्या असतात. त्यामुळे कुठेही बसलं तरी बाहेरचं जग न्याहाळायला सोपं जातं. आमच्या सीटसमोर एक आॅडिओ प्लेअर लावला होता त्याला हेडफोन्स लावून आम्ही स्थानापन्न झालो. पाच-एक मिनीटांमधे बस भरली आणि निघाली. तसा त्या हेडफोन्समधून आवाज आला, 'Welcome to Stonehenge tour..', आणि बस जसजशी वळणं घेत निघाली तशी त्या रस्त्यावरची वेगवेगळी ठिकाणं काय आहेत, किती वर्षांपूर्वीची आहेत ही माहिती कळायला लागली. शहराचा भाग मागे टाकत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो आणि काही अंतरानंतर उंच-खोल अशा डोंगराळ भागात वसलेली टुमदार घरं दिसायला लागली, ती बाई आम्हांला माहिती सांगत होती. गाव मागे पडला आणि दुतर्फा हिरवीगार कुरणं दिसायला लागली 😍
बसच्या दोन्ही बाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवाकंच निसर्ग दिसत होता. मधेच कुठेतरी पिवळ्या फुलांनी डवरलेली शेतं दिसली आणि मला तर अगदी धावत त्या फुलांना बिलगायला जायची इच्छा झाली 😄 फार सुरेख दृश्य होतं ते, खरंच! अर्ध्या तासाच्या या निसर्गरम्य सफरीनंतर आम्ही मुख्य ठिकाणच्या बस थांब्यावर उतरलो.तिथे पोहोचतांना माझी नजर सारखी त्या दगडांच्या मंदिराला शोधत होती पण तसं काहीचं दिसलं नाही! घनदाट झाडांचा जणू कडेकोट पहारा लावलेला मात्र दिसत होता. बसमधून उतरलो तर तिथे असणाऱ्या माणसाने आम्हांला visitor centre ला जाऊन तिकिटं घ्यायला सांगितली. त्याबरहुकुम आम्ही दोघे चालत निघालो.अजूनही माझं शोधकार्य सुरूच होतं पण अं हं, इल्ले! काही दिसत नव्हतं 🤓 तिकिट खिडकीवर आम्ही ईमेल मधे मिळालेला तिकिटाचा कोड सांगून प्रिंटेड तिकिट घेतलं.मुख्य ठिकाण तिथून अर्ध्या मैल अंतरावर आहे तर, तुम्ही चालत जाऊ शकता किंवा शटल बसने जाऊ शकता अशी माहीती मिळाली. तिकिटं घेऊन आम्ही जरा तो परिसर न्याहाळला. तिथे एक भली-मोठी शिळा ठेवलेली होती(१), BC(म्हणजे Before Corona हो!) तिला हलवायच्या स्पर्धा व्हायच्या म्हणे! जास्त नाही अगदीच ९९-१०० माणसं लागतात ती शिळा हलवायला 😜😂 मी आपलं दुरुनच फोटो काढले! तिथेच पलीकडे, दगडांचं हे मंदिर बांधायच्या वेळी लोक कसे राहत असतील, याचा जो काही शोध संशोधकांनी लावला त्यानुसार, काही झोपड्यांचे नमुने उभे केलेले आहेत, तिथे फेरफटका मारून आलो. मुख्य ठिकाणी जायची उत्सुकता होती पण पोटातले कावळे टाहोs फोडत होते म्हणून आधी पोटोबा मग दगडोबा 😜 असं ठरलं. लगेच डबा उघडला आणि चीज-आलू पराठा पोटभर खाऊन घेतला. आता पुढे कितीही वेळ लागला तरी बेहत्तर!👍 मग मात्र आम्ही धावत जाऊन 'शटल' मधे बसलो आणि Stonehenge कडे कूच केली! बसमधून उतरून त्या दगडांच्या मंदिरावर डोळे खिळवत आम्ही आपसूक चालायला लागलो.😃😃😃 Sarsen आणि Bluestone अशा दोन प्रकारच्या दगडांच्या शिळा वापरून या मंदिराची रचना केली आहे. Sarsen दगडाच्या एकेक शिळेचं वजन ३०टन आहे😳, तर उंची जमिनीच्या वर ७मीटर आणि जमिनीखाली २-१/५मीटर आहे. तसंच Bluestone दगडाच्या एकेक शिळेचं वजन ३टन आहे😰! यातले Sarsen दगड हे २४किमो वरुन आणले गेले तर Bluestone दगडांची आयात २४०किमी वरुन नदीतुन केली गेली! या एकूणच मंदिराची रचना टप्प्या टप्प्यांमधे केली गेली असावी असं संशोधनाअंती कळालं, काळ असावा BC 3000 - BC 2200 (कोरोना नाही हो, Before Christ)😜 मुख्य ठिकाण ज्याला avenue म्हणतात ते जरी मंदिर म्हणून संबोधलं जात असलं तरी, त्या परिसरात जवळजवळ ३०० छोट-छोटे डोंगर आहेत, ज्यामधे त्याकाळच्या 'अति-महत्वाच्या' व्यक्तींना पुरलं आहे! अशा व्यक्तींचे अवशेष आणि त्यासोबतच काही दागिने,मातीची भांडी पण सापडली आहेत.हे सगळं तिथे असणाऱ्या संग्रहालयामधे बघायला मिळतं. ज्या ठिकाणाहून आम्ही बघायला सुरूवात केली तिथे एक भली मोठी ओबडधोबड शिळा उभी दिसली. ती शिळा Sarsen या प्रकारच्या दगडाची आहे आणि २०मी व्यास असलेली आहे. ह्या शिळेला खूप महत्व आहे. कारण उन्हाळ्यामधे सर्वात मोठ्या दिवसाचा सूर्य या शिळेमागून उगवतो आणि त्याची किरणं या मंदिराच्या मध्यभागी पडतात.😃 तसंच वर्षातला सगळ्यात लहान दिवस जेंव्हा असतो तेंव्हा दोन शिळांच्या मधून सूर्यास्त दिसतो. हे सोहळे बघायला जगभरातून लोक तिथे जातात. या मंदिराची रचना करतांना ३० दगड उभारून त्यावर ३०आडवे दगड ठेऊन गोलाकार रचना केली असावी पण काळाचे घाव सोसत, माणसांच्या हेळसांडपणाचा त्रास सहन करत करत बरेचसे दगड पडले, बांधकामासाठी नेण्यात आले! जर (२) या शिळेचा फोटो बघितला तर ती ओबडधोबड दिसते पण, मुख्य मंदिराच्या शिळा साधारण आयताकृती आकाराच्या आहेत. म्हणजे Sarsen दगडाच्या शिळांना घासून-तासून मग उभं केलं गेलं. त्यावर ज्या आडव्या शिळा आहेत त्याही अशाच तासून योग्य आकाराच्या बनवून मग ठेवल्या गेल्या. काही शिळांवर उंचवटे पण दिसतात. हे सगळं अशा काळातलं बांधकाम आहे जेंव्हा धातूंचा शोध माणसाला लागायचा होता. त्यामुळे, फक्त दगडांच्या आधारे ही कलाकुसर केली गेली. जी हत्यारं त्या लोकांनी वापरली त्यातली काही सापडली आहेत उत्खननात. बाहेरच्या बाजूने Sarsen दगडांच्या शिळा आहेत तर आतल्या बाजूला Bluestone दगडाच्या शिळा रोवलेल्या आहेत.Bluestone => दुर्दैवाने ही सगळी रचना अंमळ दुरूनच बघावी लागते कारण, ज्या ठिकाणी हे मंदिर उभारलं आहे ती जागा लोकांच्या जाण्या-येण्याने, हात लावण्याने इतक्या वर्षांत खराब होत चालली आहे.तसंच, सध्या कोरोनाच्या भितीने नव्या भिंती उभारल्या आहेतच S-D च्या! असो, तर १९४०-५० मधे या मंदिराच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलं आणि ज्या दगडांची झीज जास्त झाली आहे त्यांना काँक्रिटचं लिंपण केलं गेलं. एका उभ्या दगडाच्या शिळेला ते स्पष्ट दिसतंही! या संपूर्ण रचनेला बघत-बघत त्याची माहिती घेत घेत कधी आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली कळालंच नाही. जरा जवळ जाऊन बघता आलं असतं तर अजून छान वाटलं असतं, असं मात्र सारखं वाटत राहिलं! पण ठीक आहे, अशा वास्तूंना जपण्यासाठी दुरूनच बघावं, हेही खरं! जगप्रसिद्ध अशा एका तरी ठिकाणाला भेट देता आली याचा आनंद मात्र नक्कीच मिळाला!😃👏💃 जशी प्रदक्षिणा पूर्ण झाली तसे आम्ही 'शटल' कडे धावलो आणि स्टेशन ला नेणाऱ्या बसच्या थांब्यावर येऊन उभे राहिलो. पाच-एक मिनिटांत बस आली, माडीवरच्या सीट्सवर आम्ही विसावलो आणि जो धुवांधार पाऊस आला म्हणून सांगू 😄 बापरे!! आम्ही फार नशीबवान ठरलो नाहीतर, त्या पावसात ना कुठे आडोसा मिळाला असता ना धड काही बघता आलं असतं!😤 (गळका मेला युकेचा पाऊस 😖) परतीच्या प्रवासातही मगासची ती बाई माहिती द्यायला लागली आणि ते मी मगाशी म्हणाले नं ३०० डोंगरासारखे उंचवटे आहेत ते आम्हांला दिसले! पुढे गावातल्या आणखीन काही ठिकांणांची माहिती मिळाली आणि स्टेशन आल्यावर आमची सफर संपली! तर अशा प्रकारे एका दिवसाची आमची सहल छान झाली 😊 #मुक्कामपोस्टUK #travel_blog_stonehenge #Stonehenge
No comments:
Post a Comment