Monday, May 3, 2021

#आठवणी_लहानपणाच्या - शिदोरी

  गेल्या महिन्यात १२ एप्रिलला युके मधे बहुतांश जागा खुल्या झाल्या 😃👏👏👏

मागच्या वर्षी उन्हाळा आणि 'कोरोना' हातात हात घालून आले, त्यामुळे घरातच डांबून राहावं लागलं 😖

यावर्षी तसं होऊ नये यासाठी आधीपासूनच तयारी करत करत शेवटी आम्हांला खुल्या हवेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात बाहेर पडायची मुभा मिळाली,अर्थात M-SD-S अनिवार्य आहेच!

जसा उन्हाळा सुरु झाला तसं सलग सुट्ट्यांचे दिवसही आपसूक आलेच. इथे ज्या काही सार्वजनिक सुट्ट्या असतात नं त्या शक्यतो शुक्रवारी किंवा सोमवारी असतात जेणेकरून तीन दिवस सलग मिळतात आणि फिरायला जाता येतं 💃

असाच एक बँक हाॅलिडे आम्हांला मिळाला आणि निदान एक दिवसाची सहल करावी म्हणून आम्ही चटकन पटकन प्लॅन बनवून तिकिटं बुक करुन टाकली! जितकी तिकिटं काढणं महत्वाची तितकाच जेवणाचा डबा काय न्यायचा याचाही विचार लग्गेच पक्का करुन टाकला!👍

हम्म, आता तुम्हांला वाटेल जेवणाचा डबा का नेणार आहे ही? युकेमधे बाहेर खायला मिळत नाही की काय 😳🤔

तर हो! निदान माझ्यासाठी तरी या देशामधे 'सहजासहजी' शुद्ध शाकाहारी जेवण मिळत नाही ☹️

मला इतके चिवित्र अनुभव आले एक-दोन ठिकाणी फिरायला गेल्यावर की मी अगदी पक्कं ठरवून टाकलं की, या देशात असेपर्यंत मला कुठेही बाहेर जायचं असेल, मग ते असं सहलीला असो वा कधी काळी आॅफिसला, तर स्वतःसाठी अगदी नाश्त्यापासून ते पार रात्रीच्या जेवणापर्यंतचे सगळे डबे सोबत न्यायचेच 🙄🤦

कारण एकतर मी सामिष अन्न म्हणजे अगदी अंडी सुद्धा खात नाही.त्यामुळे बाहेर पडल्यावर कुठेही गेलो तर माझ्यासाठी शुद्ध शाकाहारी खाणावळ शोधणं अशक्य म्हणजे केवळ अशक्य आहे!! आणि फक्त माझ्यापुरतं नाही तर इतरही माझ्या ओळखीतल्या लोकांना ही महत्वाची गोष्ट मी कायम सांगत असते, असो.

त्यामुळे आमच्या या सहलीसाठी सुद्धा मी दुपारचा डबा बनवून घ्यायचा ठरवला.कॅफेज सुरु झाल्यामुळे काॅफी बाहेरच घेऊया असं ठरलं(आॅफिसला जातांना मी काॅफीसुद्धा बनवून घेऊन जायचे🤭 😁)

सगळ्यात सोपा-सुटसुटीत आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मला धड जमणारा पदार्थ मी करायचा ठरवला - आलू-चीज-पराठा! रात्री थोडी तयारी करुन ठेवावी म्हणून बटाटे उकडून सगळं मिश्रण तयार करून ठेवलं. बाकी सामानाची तयारी करता करता अचानक आई बनवायची त्या धपाट्यांची आठवण झाली आणि माझं मन अलगद लहानपणाच्या त्या आठवणींमधे जाऊन बसलं 😍 आमचं कुटुंब मोठं त्यामुळे बाहेरगावी जायचं ठरलं की आईची खूप तारांबळ उडायची. एक ना अनेक गोष्टींची तयारी करावी लागायची आणि त्यात अत्यंत महत्वाचं काम म्हणजे सगळ्यांसाठी 'शिदोरी' बनवणे!

आम्ही मुख्यत्वेकरुन लाल परीने प्रवास करायचो.
तेंव्हा म्हणजे ९०-९५च्या दिवसांत बसमधे खाद्यपदार्थ विकायला येणारे विशेष लोक नसायचे आणि गाड्या पण पेशल धाबे बघून थांबत नसत. क्वचित काही गाड्या थांबायच्याही, पण बाहेरचे कोणतेच पदार्थ खायचे नाहीत असा आमच्या आई-बाबांचा दंडक होता! आणि ते योग्य होतं असं माझं आजही मत आहेच!

तर आम्हा ६-८माणसांकरता आई शिदोरी बनवून घ्यायची.निघायच्या एक दिवस आधी किंव्हा निघायच्या दिवशी अगदी मध्यरात्री उठून स्वयंपाकघरात तिचं काम सुरु व्हायचं!

घरी विरजन लावलेलं सायीचं घट्ट दही+वेगवेगळी पिठं+गव्हाचं पिठ+ओवा+मीठ यांचं मिश्रण करुन अगदी व्यवस्थित मळून त्यापासून चवदार असे धपाटे आई बनवायची 😋😋 त्यासोबत खायला/तोंडी लावायला आम्हा पोरांसाठी कैरीचं लोणचं आणि मोठ्यांसाठी हिरव्या मिरचीचा ठेचा असा एकूण मेन्यू असायचा. आणि हो कच्चा कांदा पण!
एकदा सगळ्यांना जितके हवेत तितके + १ = टोटल धपाटे, बनवून झाले की ते सगळे गार करुन व्यवस्थित एका कापडात बांधून त्यावर चटणी,लोणच्याची पाकिटं, छोटे कांदे ठेऊन ती सगळी शिदोरी दुस-या मोठ्या कापडात बांधून घेतली जायची. ही शिदोरी आणि पाण्याची कापडी पिशवी हे एका मोठ्या पिशवीत घेऊन, आम्हा पोरांपैकी कोणा एकाकडे ती पिशवी सांभाळायची मोठ्ठी जबाबदारी दिली जायची!

जर उन्हाळ्यात प्रवास करत असू तर काही ठिकाणी काकडी तेवढी विकत घ्यायचे बाबा मग काय जेवणाला बहार यायची, अहाहा 😘 ते सगळं आठवून पण तोंडाला पाणी सुटलं माझ्या 😋😋 जेवणाची वेळ झाली की, बाबा आम्हा सगळ्यांना पेपर प्लेट्स् किंवा कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे हातात द्यायचे आणि त्यावर मग आई प्रत्येकाला अर्धं/एक (जितकं धरता येईल हातात) त्यानुसार धपाटं आणि त्यावर लोणचं वाढायची आणि आमचं जेवण सुरु! खिडकीच्या बाहेर बघत, एकमेकांना चिडवत,त्रास देत मस्त पंगत चालायची आमची लाल परीच्या हिरव्यागार सीट्सवर बसून 😆😆

जेवण झालं की मग, पाण्याच्या कापडी पिशवीतलं गारगार पाणी बाबा काढून प्रत्येकाला द्यायचे. ते पाणी प्यायल्यावर, गाडीच्या तालावर डोलत डोलत अशी गाढ झोप लागायची नं, स्वर्गसुखच जणू!! जेंव्हा आम्ही मुलं शाळेच्या सहलीला जात असू तेंव्हा मात्र खास मेन्यू बनवून द्यायची आई - पु-या आणि बटाट्याची भाजी! मला आठवतं तसं बहुतांश मैत्रिणींच्या डब्यात पण साधारण हाच मेन्यू असायचा तेंव्हा 😄 पदार्थ एकच असला तरी प्रत्येकाच्या डब्यातला चाखला की वेगळी चव कळायची, सहलीच्या मजेत ती पण एक वेगळी मजा असायची 😁

मोठं झाल्यावर जसे आम्ही एकेकजण शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलो तेंव्हाही 'शिदोरी' चा हा शिरस्ता चालूच राहिला.
मी तर घराबाहेर पडल्यावर शिक्षण सुरु असतांनाच्या पाचही वर्षांमधे बेसनाचे लाडू-चिवडा आणि जितके दिवस अन्न टिकू शकतं तितक्या दिवसांचा पोळी-भाजीचा डबा घेऊनच निघायचे.
होस्टेलच्या दिवसांंमधे डब्याचं जेवण जेऊन शिसारी यायची आणि आईच्या शिदोरीची आठवण तीव्र व्हायची. असं वाटायचं कधी एकदा घरी जाऊन आईच्या हातचं जेवते😭
युकेला आल्यापासून आता परत एकदा तशीच अवस्था झाली आहे माझी! फरक इतकाच आहे की इथे डबा नाही तर मीच बनवलेलं जेवण खाऊन कंटाळा आला आहे मला 😰😭😭 कोण कुठला तो बकवास-उपटसुंभ कोरोना आलाय आपल्या पृथ्वीवर आणि मला घरी जाता येत नाहीए 😭
कोणाचं काय तर कोणाचं काय!🙄
असो!

तर अशी आहे शिदोरीची मजा मजा.
आठवणींच्या या सहलीतून फेरफटका मारून येईतो रात्रीचे बारा कधी वाजून गेले कळालंच नाही! आणि लक्षात आलं, उशीर झाला आहे - दुस-या दिवशी लवकर उठून पराठे बनवायचे आहेत! चला, आता पुढच्या ब्लाॅगमधे उरलेल्या गप्पा मारुया 😊 👋👋

No comments:

Post a Comment