युट्युबला बघितलेल्या रेसिपी व्हिडिओज नंतर मला काही मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. स्वयंपाकात निष्णात असलेल्या जाणकारांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी शंकानिरसन करावं ही विनंती आहे. १) कोथिंबीर धुवून न-घेता वापरली तर त्यातून जास्त सत्व मिळतं का? २) धने(ज्यांना हा शब्द चूक वाटत असेल किंवा समजला नसेल त्यांनी 'धणे' वाचावा) पूड घातल्यावर परत 'बारीक चिरलेली कोथिंबीर' का घालतात? धन्यांपासूनच कोथिंबीर उगवते ना? तरी दोन वेगळ्या रुपात वापरल्यास काही वेगळा फायदा होतो का शरीराला? ३) कोणतीही भाजी (नाॅन-व्हेज पदार्थ नाही, भाजीच हो)'आलं-लसूण-कांदा-टोमॅटो' (आ.ल.कां.टो) यांचं गरगट वापरुन शिजवली तरच चवदार बनते का? (माझ्या माहेरी-सासरी क्वचितच एखाद्या भाजीचं इतकं कौतुक केलेलं मी बघितलंय हो 😢) अगदी फुलगोबी/फ्लाॅवर च्या भाजीतही लसूण घालायचा असतो का? ४) बिर्याणी करतांना तेलात तूप/ तुपात तेल का घालतात? ५) आ.ल.कां.टो शिजवतांना त्यातून तेल सुटलं पाहिजे इतपत शिजवा, तर मग त्यात काही सत्व उरतं काहो? की फक्त चव चांगली हवी हाच एकमेव निकष असतो पदार्थाचा? ६) पालेभाजी करायच्या आधी धुवून घ्यावी आणि मग चिरावी(हो आमच्यात तरी भाजी चिरतातच कारण गवत कापतात किंवा बोट कापतं) आणि शिजवतांना पण झाकण ठेवावं असं मला आईने शिकवलं. पण, बहुतेक ठिकाणी चिरलेल्या पालेभाजीला आंघोळ घालायची प्रथा दिसते मग बरोबर पद्धत कोणती? ७) हो आणि ते गव्हाच्या पिठात बचकभर मीठ टाकून कणीक मळणे हे कोडं आजतागायत मला उलगडलेलं नाहीए! म्हणजे किती मीठ खायचं ते? पोळीत मीठ-भाजीत मीठ-वरण/आमटी असेल त्यात मीठ-चटणी/कोशिंबीर असली त्यातही मीठ??? आता उरलं सुरलं पाण्यातही घाला मीठ, त्यालाच का अळणी ठेवायचं ना! तुम्हांला माहित आहे की नाही माहीत नाही पण, दूध+मीठ खायचं नसतं त्यामुळे त्वचा रोग होतो असं डाॅक्टर सांगतात. ते चहा-पोळी साॅरी 'चपाती' खाणा-यांना कदाचित माहित नसेल नं, म्हणून फक्त माहिती दिली. ८) तेलात मोहरी टाकून ती तडतडली की मगच बाकी जिन्नस म्हणजे जिरे वगैरे टाकायचे असं असतं ना की त्या सिक्वेन्स ला काही अर्थ नाही? म्हणजे तेलात मोहरी-मेथी दाणे-जिरे असं सगळं एकत्रच टाकलेलं दिसलं. बहुतेक तरी मोहरीला फुटायला वेळ लागतो पण जिरे लवकर फुटतात नं, मग ती अर्धी फुटलेली/कच्ची मोहरी झेपते का पोटाला? मला तर बाई फार फार गोंधळायला झालंय युट्युबच्या एक्स्पर्ट शेफ्स च्या रेसिपीज बघून आणि त्यांनी दिलेलं अगाध ज्ञान ऐकून! म्हणून विचार केला तुम्हांला विचारून बघुया 😊
No comments:
Post a Comment