मेस चा डबा - हे शब्द ऐकले की नेमकं कसं वाटतं हो तुम्हाला 😃
कॉलेज च्या दिवसातला बहुतांश लोकांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा, क्वचित माझ्यासारखीला भीती घालणारा तर काही जणांच्या सुखद आठवणी जागवणारा असेल ना 😁
मी कॉलेज ला असताना पेयिंग-गेस्ट म्हणून राहिले सगळीकडे, त्यामुळे स्वयंपाक घराचा पर्याय नव्हता आणि डबा नामक प्रकरण माझ्या आयुष्यात शिरलं!
पहिल्या वर्षी ज्या काकूंकडे राहिले त्या डबे पण करून द्यायच्या म्हणून मी त्यांच्याचकडे सुरुवात केली. आईच्या हातची चव काय असते याची जाणीव काही दिवसातच झाली आणि ताटात वाढलेल्या अन्नाची 'किंमत' पण कळायला लागली!
पहिल्या वर्षी सगळंच नवीन होतं, त्यामुळे 'मेस' किंव्हा 'डबा' या सतत बदलाव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत हे कळायला अंमळ उशीरच लागला. पण, दुसऱ्या वर्षीपासून मात्र, 'शोध नव्या डब्याचा' हे एक काम दर ३-४ महिन्यांनी अंगावर आदळायला लागलं!
माझी रूम पार्टनर उत्तर भारतीय होती, त्यामुळे तिला तर डब्यातलं जेवण असं का असतं? हा प्रश्न अगदी शिक्षण पूर्ण करून घरी जाईपर्यंत सतत छळायचा, बिचारी 😥
दर दोन दिवसांनी पाणीदार बटाटा भाजी आणि दर शनिवारी पाव-भाजी हे खाऊन खाऊन मला बटाटा आणि पाव-भाजी ची इतकी शिसारी बसली होती की, डबा बंद केल्यावर निदान एखादा वर्ष तरी मी त्या भाज्यांकडे पाठ फिरवली होती 😕
वरण किंव्हा आमटी हा प्रकार इतका पाणीदार असूनही डब्यातून अज्जीबात सांडत नाही, ही जादू/कला डबेवाल्याना कशी काय साधते, खरंच मला कायम आश्चर्य वाटायचं!
पोळी/ चपाती/ फुलके इतके पातळ/ ट्रान्स्परन्ट लाटता येणं, हेही एक जगावेगळं स्किल म्हणायला पाहिजे!
एकदा माझी आई आली होती रूमवर आणि तिला माझा डबा खाऊन बघायची दुर्बुद्धी सुचली, मी मागवला मग अजून एक डबा. त्या दिवशी मेसवाल्या काकूंनी 'मेथीचे थेपले' दिले होते. आईने डबा उघडला आणि थेपला बघून म्हणाली,' अगं, हे काय? एकच थेपला दिलाय तुझ्या मेसवालीने डब्यात??' मग मी तिला गम्मत दाखवली - एकाला एक असे ४ थेपले कसे चिटकवलेले होते ते वेगळे करून दाखवले आणि ती जादू बघून आई आणि मी, जे हसत सुटलो ते अजूनही हा प्रसंग आठवला तरी हसत बसतो 😂
पण आईला वाईटही वाटलं, पोरीला असं विचित्र जेवण जेवावं लागतं म्हणून! तरी माझी अवस्था बरीच बरी होती, असं म्हणावं लागेल इतर मुलांपेक्षा!
या मेस वाल्यांचे काही नियम मात्र मला कधीच कळाले नाहीत, जसं की, रविवारी एकच वेळ डबा!
हा जो काही अन्याय हॉस्टेल च्या पोरांवर हे मेस वाले करतात ना, त्यासाठी खरंच त्यांना न्यायालयात खेचलं पाहिजे! अरे परीक्षा सुरु असताना कुठे जायचं रात्रीचं जेवण हुडकायला??
एक वेळ ती बटाट्याची भाजी चालेल पण डबा नाही, हे असहनीय होतं!
सुकी, ओली, पातळ - बटाटा+ वाट्टेल ती भाजी मिक्स = हाच मेनू वर्षानुवर्षे, अगदी कोणताही डबा लावला तरी खावा लागणे याचा अर्थ लक्षात येतोय ना - काय एकी आहे बघा मेसवाल्यांमधे, काय हिम्मत कोणाची नवीन मेनू खाऊ घालेल तर!! खात्री आहे मला, आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मेस चा मेनू 'बटाटामय'च असणार!
त्यातल्या त्यात एक बरं होतं की, मित्र-मैत्रिणी एखादी नवीन मेस सापडली की लगेच तिथून मिळणाऱ्या डब्याबद्दल अहवाल सादर करायचे, म्हणजे मग आपण घेत असलेला डबा आणि तो डबा यात फरक आहे की नाही हे तपासायला जरा सोपं व्हायचं, तरी ते काम कठीणच होतं म्हणा, पण नवीन डबा लावला की निदान काही दिवस जरा बरे जायचे पोटाचे आणि जिभेचेही 😆
माझ्या शिक्षणाच्या ५ वर्षांपैकी ४-४.३० वर्षं मला या ना त्या मेस चे डबे खाऊन खाऊन जिभेला वेगवेगळी चव अजूनही कळते, हा विश्वासच मावळल्यासारखा झाला होता 😭
म्हणून मी शेवटचे काही दिवस कॉलेज च्या कॅन्टीन मधून जेवावं हा आणखीन एक खोल खड्ड्यात जाणारा निर्णय घेतला!
सुरुवातीला चवीत झालेला बदल जरा बरा वाटला पोटाला पण, रोज तेच?! बटाटा, बटाटा आणि बटाटाच!
मग कॉलेज च्या बाहेर एक सरदारजी uncle यायचे त्यांच्याकडचे पदार्थ खाऊन बघितले पण, डोळ्यासमोर दिसणारी 'स्वछता' बघून ते जेवण घश्याखाली उतरेना! मेस च्या डब्यात निदान दृष्टी आड सृष्टी तरी होती!
असो, तर असेच रडत-खडत कॉलेज चे उरले सुरले दिवस ढकलले!
शिक्षण संपलं - एक महत्वाचा टप्पा पार करून नोकरीसाठी मी मुंबई ला रवाना झाले. ते शहर तर माझ्यासाठी अगदीच नवीन होतं त्यामुळे परत एकदा पहिले पाढे ५५! आणि मी पेयिंग गेस्ट म्हणून दाखल! ज्या काकूंकडे राहायचे अर्थात त्यांचाच डबा लावला. पण मेस पेक्षा बरंच बरं जेवण होतं, त्यांच्या हाताला चव होती!
५ वर्षांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने आता ना पोटाने तक्रार केली ना जिभेने आठवण करून दिली!
डब्याच्या भरोशे मग नोकरीची ४ वर्षं पण सरली, मात्र शरीराच्या तक्रारी जोरदार मुसंडी मारून वर आल्या!
तेव्हा मात्र कानाला खडा लावला की आता नो मोर डबा!
मग मी स्वतः स्वयंपाक करायला शिकले - अर्धं कच्चं अर्धं शिजलेलं बनवत, नवनवे शोध लावत कसाबसा स्वतः पुरता डबा बनवता यायला लागला. यथावकाश लग्न झालं आणि 'स्वयंपाक' हा नेमका कसा, किती प्रमाणात, गोडा आणि गरम मसाल्यातला फरक करत करत अजूनही शिकतेच आहे 😉
पण!
आता बास!
I NEED A BREAK!!
UK ला आल्यापासून तिन्ही-त्रिकाळ काय बनवायचं, हा विचार करून करून माझा मेंदू झीजला अक्षरशः 😖
म्हणून आता परत एकदा मी 'डबा' लावायची हिम्मत करणार आहे 👹👹
कारण, आज काय स्वयंपाक करायचा हा प्रश्न झोप पूर्ण व्हायच्या आतच डोक्यात घोळायला लागतो. उठल्यावर पण फ्रिज मधे भाज्या आहेत का आणि कितपत आहेत हे तपासा मग त्या धुवा, चिरून घ्या, शिजवा!
बरं इथे आमच्या गावात ठराविक ४च भाज्या मिळतात आणि या देशातल्या भाज्या काही मला करता येत नाहीत💁 त्यामुळे पर्याय अजूनच कमी!
बरं नुसती भाजी करून भागतंय थोडीच! त्याला पोळी नाहीतर भाकरी करावीच लागते 😏 दुपारी जी भाजी केली ती संध्याकाळी नको असते, मग परत तेच चक्र! धुवा-चिरा-शिजवा-पोळी लाटा, गर्रर्रर्र!!!!
म्हणून आता ठरलं! डबा झिंदाबाद!
डबा लावला की कसं जास्त विचार करायची गरजच नाही, फक्त दिलेल्या पर्यायातून काय हवं ते निवडा आणि ऑर्डर करा.आला डबा की मस्त जेवण करा,अहाहा!
आयतं जेवण मिळणं म्हणजे निव्वळ सुख हो सुख!
हो पण मला तुमच्या शुभेच्छांची अत्यंत गरज आहे हं ह्या दिव्यातून जाण्यासाठी, नक्की मदत करा!
आणि हो तोंडी लावायला जरा तुमच्या मेस चे अनुभव पण येऊ देत की!
#मुक्कामपोस्टUK
Friday, July 9, 2021
#मुक्कामपोस्टUK - डबा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment