Sunday, January 8, 2012

सा.सू. - भाग ३


सा.सू. - भाग २

एकदा मी आणि रूमी असच गप्पा मारत बसलो होतो आणि मधेच एक विनोद झाला तशा आम्ही दोघी जोरजोरात हसायला लागलो, काही सेकंदातच काकू आत धावत आल्या आणि म्हणाल्या, ’अगं, किती जोरात हसताय तुम्ही,काही वाटतं का तुम्हांला? (७)आमच्या घरात इतक्या जोरात हसण्याची परवानगी नाहीये!’ घ्या! काय बोलणार ह्यावर??!! आम्ही लगेच आमची तोंडं शिवली आणि डोकी पुस्तकात घालून काहितरी वाचत बसलो!

एकदा माझ्या कॉलेजचा ग्रुप आमच्या घरासमोरून पास होत होता, मी रूममधेच काहितरी आवरत बसले होते. तितक्यात कोणीतरी बाहेरून हाक मारली, मी बघितलं आणि खिडकीतून गप्पा मारायला सुरूवात केली. पाच-एक मिनीटं आम्ही बोललो आणि ते लोकं पुढे निघून गेले.मी मागे वळले तर समोर काकू! मी त्यांना विचारलं, ’काय झालं, काही काम होता का?’ तशा त्या जवळपास ओरडल्याच, ’तुला काही कळतं की नाही, असं घरामधून ओरडून बोलत असतात का? बाहेर जाउन बोलायला काय झालं होतं??’ मी फक्त सॉरी म्हणाले आणि घराबाहेर निघून गेले!

त्यानंतरही बरेच असे प्रसंग आले की जिथे नॉर्मल माणूस कधी साधं त्या प्रसंगावर बोलणार पण नाही पण आमच्या काकू त्यावरही वाद घालायच्या! त्यामुळे आम्ही दोघीही काकूंपासून थोडंसं लांबच राहायला लागलो, त्या कधी, कोणत्या कारणाने चिडतील हे सांगताच यायचं नाही.

पण कधी-कधी आमचं नशीब अगदी जोरावर असायचं आणि आम्हांला काकूंच्या पाकसिद्धीतुन अगदी चवदार पदार्थ खायला मिळायचे. असच, गणपतीच्या वेळेला काकूंनी आम्हांला उकडीचे मोदक खाऊ घातले होते, इतका स्वादीष्ट पदार्थ मी आजपर्यंत माझ्या आईच्या हातचा पण खाल्ला नव्हता. पण, खरंच चवदार स्वयंपाक हा काकूंचा बेस्ट पॉईंट होता आणि कदाचित त्यामुळेच आम्हांला त्या कितीही बोलल्या तरी ते पचवायची शक्ती मिळत होती ;-)

अशातच हिवाळा सुरू झाला..काकूंना स्वच्छतेचं फार वेड, कामवाली बाई काम करून गेली तरी त्या पुन्हा एकदा सगळं घर स्वच्छ करायच्या. मला तर खुप हसू यायचं पण, काकूंसमोर हसण्याची काय स्मितहास्य करण्याची सुद्धा हिंमत नव्हती माझी! आणि अशातच एक दिवस कामवाली बाई ८ दिवस येणार नसल्याच कळालं. आतापर्यंत काकूंनी कधीही जी सूचना दिली नव्हती म्हणजे आम्ही जी एक्सपेक्ट केली नव्हती ती आमच्यासमोर आली.काकूंनी फर्मान काढलं की,(८) रोज तुम्ही दोघींनी खोली स्वच्छ करूनच कॉलेजला जायच! नोss वे! काकू काय बोलत होत्या हे?? त्यांना त्या बाईने केलेलं काम पटत नव्हतं तर आम्ही केलेलं पटलं असतं का? जे काही असेल, आम्हांला त्या सूचनेचं सॉरी हुकमाची अंमलबजावणी करावीच लागणार होती. मग काय, आम्ही दोघींनी आलटून-पालटून कामं करायचं ठरवली, एका दिवशी तिने झाडून घ्यायचं आणि मी लादी पुसायची आणि दुस-या दिवशी मी झाडून घ्यायचं आणि तिने लादी पुसायची. असं करत करत आम्ही ८ दिवस पार पाडले आणि विशेष म्हणजे काकूंनी एकदाही कंप्लेंट केली नाही :-) :-) :-)

म्हणजे आम्ही दोघी पुढे जाउन काही नोकरी जरी करू शकलो नाही तरी हे काम अगदी व्यवस्थित करू ह्याची खात्री पटली ;-)        

इथे आल्यापासून आम्ही एका एका दिव्यातून जात होतो पण, आई-बाबा मात्र टेन्शन फ्री होते की, आपली मुलगी एका चांगल्या घरातल्या लोकांसोबत राहतीये, तिची अगदी सगळी व्यवस्था चांगली लागलीये वगैरे! पण म्हणतात ना, ज्याचा जळतं त्यालाच कळतं!

तर असे हसत-खेळत(?) दिवस चालले होते आणि एक दिवस माझ्या रूमीला काय दुर्बुद्धी झाली काय माहित, रविवारच्या सकाळी तिने बाथरूममधून यायला थोडासा उशीर केला.काकूंच्या तीक्ष्ण नजरेतून तीची ही कृती सुटली नाही आणि महत्त्वाच्या एका सूचनेचं उल्लंघन केल्याबद्दल काकूंनी आम्हांला चक्क शिक्षा सुनवली!! माझ्या रूमीने सकाळी कपडे धुतले होते आणि काकूंना ते कळालं होतं त्यामुळे आम्हांला दोघींना पुढच्या (९)रविवारपासून बाहेरच्या हौदावर फक्त सकाळीच कपडे धुण्याची शिक्षा ठोठावली गेली होती :’-( बाहेरच्या हौदावर कपडे धुवायचे आणि तेही सकाळच्या थंडीमधे??!! ह्या विचारानेच मला हुडहुडी भरली होती पण, पर्याय नव्हता. काकूंनी आकाशवाणी केली होती आणि तिचं पालन करणं आम्हा दोघींना क्रमप्राप्त होतं!! मला त्या क्षणी स्वत:ची सगळ्यात जास्त कीव आली, आयुष्यात अगदी पहिल्यांदाच!!

रविवारची सकाळ इतकी छान सुरू झाल्यावर जेवणाची इच्छा दोघींना पण उरली नव्हती पण पुन्हा काकूंचे बोलणे खाण्यापेक्षा आम्ही जेवण घेणं पसंत केलं. दुपारी मी आवरून घेतलं आणि रूममधे आले तर माझी रूमी गुढघ्यात डोकं खुपसून बसली होती, मला कळालचं नाही ती अशी का बसली आहे ते, जवळ जाउन बघितलं तर ती एकदम मला बिलगली आणि तोंड दाबून रडायलाच लागली.मला काहीच समजेना की हिला एकाएकी रडायला काय झालं! बरं असं माझ्यासमोर कोणीतरी पहिल्यांदाच रडत होतं त्यामुळे तिला कसं सावरावं हेही मला सुचेना..ह्या विचारांमधे १-२मिनीटे गेली आणि तिचा पूर थोडा ओसरला.मग, मीहि भानावर आले अन तिला विचारलं, ’क्या हुआ?? रो क्यों रही है तू?? तबियत ठीक नहीं है क्या?? या पापा की याद आ रही है??’ तसं ती म्हणाली, ’नहीं रे, आय अ‍ॅम सॉरी आज मेरी वजेह से तुझे भी सजा मिली, मै सुभा कैसे भूल गयी पता नहीं, आय अ‍ॅम रियली सॉरी!’

हुश्श! हे कारण होतं होय, मी कसली घाबरले होते! मी तिच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाले, ’डोन्ट वरी यार, हम दोनो एक टीम है, खुशी और गम दोनो मिलबाटकर मनायेंगे, नेक्स्ट संडे तू सिर्फ मजा देख. और अब टेन्शन मत ले आज का संडे अभी बाकी है, चल घुमने चलते है’. ती मस्त हसली, मला पण हलकं वाटलं आणि आम्ही घराबाहेर पडलो.

आठवडा अगदी शांततेत पार पडला, कदाचित ह्या वीकचा सूचनांचा / नियमांचा आणि शिक्षेचाही कोटा फुल होता म्हणूनच. रविवार उगवला, मी मुद्दामच सक्काळी ६ वाजते उठले, धाडधाड आवाज करत आवरलं. रूमीपण लगेच उठली आणि आमच्या ’मिशन कपडे धुणे @ हौद’ साठी तयार झाली. आम्ही दाराबाहेर आलो सगळं सामान घेउन आणि थंडीची एक लहर अगदी पूर्ण अंगातून पास झाली, एक क्षण दोघीपण शहारलो पण, पुन्हा निश्चय केला आणि हौदावर पोहोचलो.मी लगेच मोठमोठयाने गाणे म्हणायला सुरूवात केली आणि रूमी ने कपडे आपटायला. फूल-टू धिंगाणा करत आम्ही तासभर अगदी व्यवस्थित कपडे धुतले. आजूबाजूला राहणारी सगळी जनता एकदा तरी डोकावून गेली आमचं काय सुरू आहे हे बघण्याकरता.आमच्या घरातले तर सगळे जागे झालेच होते पण, वरती राहणारी बि-हाडं सुद्धा बॅल्कनीत येउन आमचा टाइमपास एन्जॉय करत होती. सगळं झाल्यावर आम्ही विजयी मुद्रेने घरात प्रवेश केला आणि समोरच लालबुंद झालेल्या काकूंना बघून थबकलो.पण, लगेच लक्षात आलं की आज तर आपण त्यांनी दिलेल्या सुचनेचं तंतोतंत पालन केलं आहे मग का घाबरायचं, उलट, आम्ही छाती बाहेर काढून त्यांच्यासमोरून आत गेलो :-) :-)

आत जाउन दोघी अगदी पोट धरून हसायला लागलो पण सायलेन्ट मोड मधे ;-)
त्या दिवशी आम्ही दोघी एकदम खुश होतो आणि काकू हुप्प ;-)
 
क्रमश: 


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

No comments:

Post a Comment