Tuesday, January 17, 2012

सा.सू. - भाग ४


संध्याकाळी मी आणि रूमी भटकून आलो आणि दारातच थबकलो, दोघीपण समोर घडत असलेलं दृश्य आ वासून बघत आत आलो.काका चक्क काकूंशी भांडत होते, काकूसमोर उभे राहून हातवारे करत मोठठया आवाजात ओरडत होते!! आजपर्यंत मी काकांना साधं मान वर करून बोलतांना बघितलं नव्हतं आणि आज अचानक त्यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला होता!! विषय होता आज सकाळी झालेल्या तमाशाचा. काका आमची बाजू घेउन काकूंशी भांडत होते की, ’दुस-याच्या घरच्या पोरी आपल्या इथे पैसे देउन राहतायेत म्हणून तू वाट्टॆल ते करायला नको लाउस त्यांना. स्वत:च्या पोराला म्हटलं तर वळण नाहीये आणि परक्यांना शिक्षा देतीये.मी आतापर्यंत काहीच बोललो नाही पण हे असले प्रकार मला खपणार नाही!!! पुढच्या रविवारी असला तमाशा नकोय मला!!’
बाsपरे, काका आमच्याविषयी इतका चांगला विचार करतात?? मला तर मनामधे आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण काकूंची अवस्था पार वाईट झाली होती, त्या आता रडतील की उठून काकांना मारतील काहीच अंदाज येत नव्हता. जे काही असेल, जे घडत होतं ते आमच्यासाठी खुप चांगलं होत होतं, मी मनातून काकांना अगदी साष्टांग नमस्कार घातला पुढच्या रविवारची शिक्षा रद्द केल्याबद्दल.
काका थोडे शांत झाले आणि आमच्याकडे वळून म्हणाले की, ’रविवारची शिक्षा रद्द झाली आहे पण, कपडे धुण्यासाठीचा जो नियम आहे तो तसाच राहील.’ आणि बाहेर निघून गेले.

मला एक क्षण कळलंच नाही ते काय बोलले ते..सुन्न डोक्याने मी आत गेले. २ मिनीटानंतर नॉर्मल झाल्यावर डोक्यात आलं की काकू तर काकू पण काकासुद्धा काही कमी नाहीत.काय त्रास आहे यार, कुठुन बुद्धी झाली आणि इथे राहायला आलो.काकूंनी पार अडकवून टाकलयं ५ महिन्याचे पैसे घेउन.आत्ता कुठे दिवाळी जवळ आलीये, हे वर्ष कसंही करून ह्याच जेलमधे काढावं लागणार आहे उगाच विचार करून डोकं फोडण्यात अर्थ नाही, जाउ देत!

मला वाटलं काकू आज जेवायला देणार नाहीत पण, लकीली तसं काही झालं नाही.जेवणं स्मशान शांततेत पार पडले आणि तो मोस्ट हॅपनिंग डे फायनली संपला.

पुढे काही दिवसात हाफ इयरली एक्झाम आली.आणि पुन्हा माझ्या डोक्यात किडा वळवळला.रात्री अभ्यास तर करायचा होता पण काकूंचा लाईट पण वापरायचा नव्हता.मग मी ओम सुपर मार्केट मधून एक डझन मेणबत्त्या आणल्या आणि रात्री बरोब्बर ११वाजता लाईट बंद केला आणि मेणबत्त्या लावल्या.आम्ही दोघींनी अभ्यास सुरू केला. खरं तर इतकं हसू येत होतं पण अभ्यासावर लक्ष द्यायचं होतं आणि हसलो असतो तर बाहेर आवाज गेला असता आणि आमच्यावर तोफ डागली गेली असती :-p
दुस-या दिवशी आम्ही आठवणीने मेणबत्तीचा सगळा कचरा व्यवस्थित साफ केला आणि परिक्षेला गेलो.दोन दिवस आमचा हा सगळा उद्योग कोणालाही खबर न-लागता सुरू होता पण तिस-या दिवशी सकाळी खुप घाई झाली आणि पेपर झाल्यावर माझ्या लक्षात आलं की मी सकाळी मेणबत्तीचा पसारा आवरालाच नाही! ओह नोss आता काही खरं नाही, काकू आज चांगलीच खरडपट्टी काढतील.इतके दिवस जे सांभाळून घेतलं ते सगळे प्रयत्न माझ्या एका शुल्लक चुकीमुळे पाण्यात जाणार.
शिट यार, हाउ कॅन आय फरगेट इट यारर.
क्लासमेट्स भेटले, पण रूमी कुठे दिसेना, सगळे जण पेपर कसा गेला वगैरे बोलत होते पण माझं कशात लक्षच लागत नव्हतं,कॉलेजच्या एक्झामपेक्षा मोठया परिक्षेतून मला घरी गेल्यावर जायचं होतं,माझं तर धाबच दणाणलं होतं.
भितभितच मी घरी गेले, लकीली रूमी पण माझ्या मागेच आली, मी तिला आत गेल्यावर सांगणार होते पण काकूंनी दारातच आम्हांला पकडलं. आणि काकूंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला!
’रूममधे मेणबत्त्यांचा कसला कचरा करून ठेवलाय तुम्ही? मेणबत्त्या कशाला वापरल्या तुम्ही? रात्री लाईट कधी जात नाहीत आपल्याकडे,मग काय करत होतात तुम्ही मेणबत्तीचं??’ मी मनात म्हटलं, प्लॅनचेट करत होतो असं सांगावं, पण तो विचार मी लगेच झटकून टाकला आणि खरं-खरं सांगून टाकलं की, ’तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्री लाईट फक्त कामापुरता वापरला आणि ११ नंतर मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला, तुमचं विजबील जास्त नको यायला ह्याची काळजी आम्हीच घ्यायला हवी ना!’ मला वाटलं आता काकू काहितरी बडबड करतील पण, काकू काहीच बोलल्या नाही फक्त पाय आपटत आत निघून गेल्या!! मी आणि रूमी एकमेकींकडे बघायला लागलो की हे जे घडलं ते खरं होतं? काकू आम्हांला एका शब्दाने देखील बोलल्या नाही? ग्रेट :-D १,२ मिनीटे थांबून आम्ही जणू वाट बघितली त्या बाहेर येउन भांडण कंटिन्यू करण्याची पण त्या खरंच आल्या नाही तशा आम्ही दोघी आत गेलो आणि लगेच स्वच्छतेच्या कामाला लागलो. थोडया वेळाने काकूंनी जेवायला हाक मारली,जेवण करून आम्ही बाहेर पडलो.

त्या दिवसापासून एक गोष्ट मात्र घडली की काकूंनी आमच्याशी जेवढयास तेवढंच बोलायला सुरूवात केली, म्हणजे फक्त जेवायला त्या हाक मारू लागल्या.सुरूवातीला चांगलं वाटलं की चला घरात शांतता नांदतीये पण, एक-दोन दिवसांतच भिती वाटायली लागली की ही शांतता वादळापूर्वीची तर नसेल!  

पण ह्यवेळेस आमचं लक खरंच चांगलं होतं, कुठलंही वादळ न-झेलता आम्ही अगदी हसतमुखाने दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी गेलो :-)

क्रमश:



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


2 comments:

  1. Very interesting Priyanka...
    Waiting for next one.... :-)
    -Swati

    ReplyDelete