Saturday, April 4, 2020

#मुक्कामोस्टUK # UKFlowers


Amelanchier arborea जातीचं झाड माझ्या यूकेमधल्या घरासमोर आहे. आपला गुढीपाडवा असतो नं साधारण त्यादरम्यान ह्या झाडाला बहार येतो.
हिवाळ्यामधे अक्षरशः काटकुळ्या झालेल्या ह्या झाडाला वसंतऋतुमधे धुमारे फुटायला लागतात आणि बघता बघता अख्खं झाड पांढऱ्याशुभ्र फुलांनी डवरुन डोलायला लागतं 😍 😍
रोज सकाळी दिवानखाण्याच्या खिडकीचा पडदा बाजूला सारला की या मनमोहक झाडाचं सुखद दर्शन होतं आणि काही क्षण अगदी मंतरल्यासारखी मी त्याला बघत उभी राहते..
कधी सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याचं मनमुराद भिजणं चालू असतं तर कधी करड्या आकाशाच्या ढगाळ पार्श्वभूमीवर शांत संयमी योग्यासारखं ध्यानमग्न चित्त दिसतं..जसा जसा दिवस पुढे सरकतो तसं त्याचं रुप अधिकच उजळत जातं..माझ्या आॅफिसच्या रटाळ कामांधून डोकं वर काढून खिडकीतून सहज डोकवावं तर त्याचं वा-याच्या झुळकेसोबत डोलणं सुरु असतं..जेंव्हा सूर्य मावळतीकडे झुकतो तेंव्हा पुन्हा एकदा त्याला सोनेरी झळाळी येते..अहाहा काय सुरेख दिसतात त्याची सोनपिवळी फुलं तेंव्हा 😘 😘
जसजशी संध्याकाळ आसमंतात फुलायला लागते तशी या झाडाची फुलं अधिकच शुभ्र दिसायला लागतात..संध्याछाया गडद झाल्या की चांदण्यांचं झाडच जणू उभं राहतं माझ्या खिडकीमधे 😍 😍 दिवसाच्या कोणत्याही क्षणी मी त्याच्याकडे बघितलं तरी नवीनच पांढरा रंग दिमाखात मिरवतांना दिसतो..
ह्या झाडाच्या सुखद सहवासामुळेच माझा सक्तीचा बंदिवास देखील सुसह्य बनला आहे 😊 😊
#मुक्कामोस्टUK
#UKFlowers

No comments:

Post a Comment