Monday, June 15, 2020

Monday? Allday bluess

सोमवारी सकाळी आॅफिस आहे याssर! अशी कंटाळवाणी पण आर्त हाक आपल्यापैकी बहुतांश लोकांनी मारली असेल, कदाचित अजूनही मारत असाल..पण मला आधी असं कधी वाटलं नव्हतं!

भारतामधे असतांना आॅफिसला जातांना मला कधी कंटाळा आला आहे, असं विशेष आठवत नाही याची मुख्य दोन कारणं - एक म्हणजे आवडीचं काम आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझे कलिग्ज किंवा टीम मधली लोकं!

ट्रॅफिकच्या कटकटीतून वाट तुडवत आॅफिसला पोहोचल्यावर सगळ्यांना हाय-हॅलो करायचं किंवा काॅफी-ब्रेक घेऊन वीकेंड ला काय-काय केलं या गप्पांमुळे शीण लगेच पळून जायचा 😊 कामाला हात घातला की मग कधी काही अडलं की कोणा सहका-याशी त्याबाबत चर्चा केली की प्रश्न सोडवायला मदत व्हायची.

एकत्र ट्रेनिग्स करणं, नविन टेक्नॉलॉजी बद्दल चर्चा करणं, क्वचित कोणाकडून तिच्या/ त्याच्या टेक्नॉलॉजी मधल्या मजा मजा समजून घेऊन पटकन क्रॅश कोर्स करुन घेणं अशा छान वातावरणात आॅफिसचा दिवस आपोआप सरायचा..

माझ्या नशिबाने मला पहिल्या नोकरीपासूनच छान माणसं कलिग्स म्हणून भेटत गेली. त्यातली काहीजण तर जीवाभावाची कधी झाली तेही कळलं नाही 😊

'काम एके काम' असा खाक्या कधीच नव्हता माझ्या एकाही आॅफिसमधे त्यामुळे पावसाळ्यात सहली काढणं, ट्रेकला जाणं यासोबतच दिवाळी-नाताळ सारखे सण साजरे करणं अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडायचं 😊

माझ्या एका आॅफिसमधे तर महिन्यातून एका शुक्रवारी एक तास वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही. अगदी अंताक्षरी पासून ते टीम बिल्डिंग अॅक्टीव्हीटीज पर्यंत सगळं असायचं 👏👏इतकी धमाल यायची ना 😁

बड्डे सेलिब्रेशन तर आम्हा 'आय.टी.' कामगारांचा राष्ट्रीय सणच आहे जो दर महिन्याला साजरा व्हायचा 😁 😁

कधी कोणी नोकरी सोडून जाणार असेल तर त्याला छानसा छोटेखानी निरोप समारंभ करणं हाही एक फार वेगळा क्वचित हृदय प्रसंग असायचा.

चहा-काॅफी-जेवणाचे ब्रेक्स घेतांना ग्रुपमधल्या सगळ्यांची कामं झाली आहेत नं, नाहीतर थांबूया तिचं/त्याचं काम होऊ देत इतक्या आपुलकिने सगळे वागायचे.

प्रोजेक्टची कामं-टेन्शन्स, अप्रेजल्स त्यानंतरचे रुसवे-फुगवे, मॅनेजर्स बद्दलचे हेवे-दावे, अॅवाॅर्ड्स एक ना अनेक गोष्टी घडत असायच्या आणि आॅफिस मधेही जिवंतपणा जाणवत राहायचा..

यूके मधे नोकरीला लागल्यापासून या सगळ्या आनंदाला मी जणू पारखीच झाले पण कोरोना मुळे तर हा आनंद आता आॅफिसच्या दिवसातून ख-या अर्थाने हद्दपारच झाला आहे 😩

'घरुन काम करता आलं तर किती बरं होईल', असं कधीकाळी मनात येऊन हसीन सपने बघितलेली मी, आज तीन महिने आणि कदाचित यापुढे कायमच घरुन काम करावं लागणार आहे या विचाराने शिणून जाते 😞

व्हिडिओ-आॅडिओ काॅल्स होतात पण फक्त कामानिमित्त! ना हवा-पाण्याच्या गप्पा ना कुठल्या अॅक्टिव्हीटीज! ना काॅफी ब्रेक्स ना जेवणानंतरची आॅफिसभोवतीची प्रदक्षिणा!!

एकट्यानेच लॅपटाॅप समोर बसून कंटाळवाणे ट्रेनिंग्ज पूर्ण करा नी नविन टेक्नॉलॉजी समजावून घ्या 😒

ना शुक्रवारची उत्सुकता उरली आहे ना वीकेंड/लाॅन्ग वीकेंडचं कौतुक 😭

श्शी याssर! आॅफिस आताशा अतिशय कंटाळवाणं झालं आहे खरंच!!

No comments:

Post a Comment