Thursday, June 3, 2021

Happy Bicycle day

  Happy Bicycle day 😃🚴 सायकल ही तुम्हां-आम्हां प्रत्येकाच्या आयुष्याचा विशेषतः लहानपणाचा अविभाज्य भाग असते, हो की नाही 😊👏👏
मला आठवतं, आम्ही राहायचो त्या भागात एक सायकलचं दुकान होतंं तिथे ५०पैसे, १रु. तास या हिशोबाने सायकल भाडेतत्वावर मिळायची.छोट्यांसाठी एकदम छोटी, त्याहून मोठ्या म्हणजे ७-८ वर्षांच्या मुलांसाठी त्याहून थोडी मोठी आणि १०वर्षांच्या मुलांसाठी अजून मोठ्ठी सायकल असायची.

ती सायकल आणली की, तासभर गल्लीमधे इकडून-तिकडून नुसत्या फे-या मारायच्या आणि एक तास वस्सूल करायचा 😝 बरं, या सायकल साठी घरातल्या भावंडासकट, गल्लीतली मंडळी पण वाटेकरी असायचीच. मग काय सायकल कोणी किती वेळा चालवली यावरून भांडणं पण व्हायचीच 😂😂

धम्माल! धम्माल नुसती!

तेंव्हापासून जी सायकलची आणि माझी गट्टी जमली, ती पुढे बरीच वर्षं अगदी लग्नानंतरही सुरु राहिली.लग्नाच्या वाढदिवसाला काय हवंय,यावर मी 'सायकल' दे म्हणाले नव-याला,यावरून तर माझं सायकलबद्दलचं प्रेम तुम्हांला लक्षात येईलच 🤭ही माझी ३री सायकल आहे.

मला शाळेत जायला सायकल तशी जरा उशीरा मिळाली म्हणजे हायस्कूल ला गेल्यावर मिळाली. पण तोवर बहिणीच्या, मैत्रिणींच्या सायकल्स दामटणे यावर मी माझी हौस भागवून घ्यायचे.

असंच एकदा, आमचा ७वी स्काॅलरशीपचा क्लास संपला आणि मी मैत्रीणीची सायकल खेळायला घेतली, तिनेही एका मित्राची सायकल घेतली आणि आमच्या घिरट्या सुरु झाल्या. कोण जास्त जोरात चालवतं या नादात कसं कुणास ठाऊक पण माझ्या सायकलचं पुढचं चाक आणि तिच्या सायकलचं मागचं चाक एकमेकांना घासले आणि धड्डाम करुन दोघीही डांबरी रस्त्यावर पडलो!!! 😖😰 मी डाव्या हातावर पडले आणि जोरदार कळ आली! नशीब मैत्रिणीला जास्त लागलं नाही पण, माझा हात मात्र गडबडला! हातावर लग्गेच सूज चढायला लागली 🤪आमच्या ट्यूशनच्या मॅडमनी ते बघितलं आणि लगोलग मला घरी सोडलं, बिचाऱ्या त्यांना पण इतकं टेन्शन आलं होतं!
घरी गेल्यावर आईने माझा टंब सुजलेला हात बघितला आणि डोक्याला हात लावला🤦
लगेच बाबांना बोलावलं आणि आम्ही सरळ दवाखान्यात. मग काय तपासणी, एक्स-रे आणि सर्जरी करुन भलं-मोठ्ठं प्लास्टर लाऊन मी डावा हात गळ्यात बांधून एकदम्म तय्यार!
खरं तर, बाबा मला त्यावर्षी वाढदिवसाला सायकल घेणारचं होते बरंका, पण आमचा उत्साह नडला आणि हात गळ्यात बांधून घेतला!!😟

यथावकाश प्लास्टर निघालं, हात बराच बरा झाला आणि काही महिन्यांतच मला माझी माझी स्वतःची पहिली रेंजर सायकल मिळाली 😊 😊 इतकी सुंदर सायकल होती नं माझी! एकदम दणकट, जाडजूड टायर्स असलेली आणि मुख्य म्हणजे खाली पडले जरी, तरी एक पाय अडकून राहिल अशी रचना असलेली! थोडक्यात काय तर 'लेडीज' सायकल नव्हती ती 😝

सायकल मिळाल्यावर तर मला आकाशच ठेंगणं झालं 😍 कोणतंही काम असेल की, मी लग्गेच सायकलला टांग मारून निघणार 🚴
शाळेत जायला-यायला, ट्युशन्स ला अर्थातच सायकल वर जायला सुरूवात केली. आई-बाबांना धाकधूक वाटायची पण नंतर माझा तसा अॅक्सिडेंट कधीच झाला नाही 😎

माझ्या रेंजरवर बसल्यावर मस्त वारा कानात शिरायचा आणि मी जोरजोरात सायकल हाणत रस्ता कापत पुढे जायचे! या नादात माझ्या हाताला घट्टे पडायला लागले होते पण ते बघून तर अजूनच चेव चढायचा 😄 😜 आई म्हणायची, काय हात झाले आहेत तुझे अगं, कोणी म्हणेल का पोरीचे हात आहेत म्हणून 😄
मी शाळेत असतांना तशीही टाॅमबाॅय सारखीच राहत होते, त्यामुळे आईने असं म्हणल्यावर तर भारीच वाटायचं 😄 😂
११-१२वीला सायन्स घेतलं, मग काय पहाटे पाच ला क्लास कर, काॅलेजचे प्रॅक्टिकल्स कर, एक ना दोन १०० गोष्टी, मग नाईलाजाने सायकल ला बाजूला करुन गाडी हाताशी घेतली. मात्र, उच्च शिक्षणाला पुण्यनगरीत पाऊल ठेवलं आणि परत माझी सखी, माझी रेंजर सायकल नव्या रुपात माझ्यासोबत हिंडायला सज्ज झाली!

पुण्यातल्या गर्दीतून सायकल चालवणं, हे काय दिव्य आहे हे लक्षात आल्यावर मात्र जरा धास्तावले, पण तरी जमवलं! फार दमछाक व्हायची हे मात्र नक्की😤
काॅलेज संपलं, मुंबईला नोकरी लागली तेंव्हा परत एकदा माझी आणि सायकलची ताटातूट झाली 😭
त्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी जेंव्हा पुण्यात आले, लग्न करुन, तेंव्हा सगळ्यात आधी सायकल घेतली.
पुन्हा एकदा जुन्या मैत्रिणीशी सूर जुळवत, वा-याच्या साथीने माझं सायकल चालवणं सुरु झालं ते मग निदान ६वर्षं सुरु राहिलं!
युकेला येतांना बिचाऱ्या सायकल ला जड अंत:करणाने कसाबसा निरोप दिला😔

इथेही घेऊया का सायकल🤔 हा विचार मनांत चमकलाच पण इथली थंडी आडवी आली आणि तो विचार मी पुसूनच टाकला!

एक मात्र नक्की, जेंव्हा केंव्हा परत घरी जाईन, तेंव्हा मी पुन्हा एकदा नविन सायकल घेईन आणि 'मै और मेरी साईकल, अक्सर ये बातें करतें हैं', म्हणत वा-यासोबत गाणी गात मज्जा करायला बाहेर पडू 😍 😍

No comments:

Post a Comment