Saturday, June 19, 2021

#मुक्कामपोस्टUK - मराठी ईबुक्स अॅप

  युके मधे आहे तोवर नविन मराठी पुस्तक हातात घेऊन वाचायला मिळणं माझ्यासाठी तरी 'अशक्य', 'दुर्मिळ', 'दुरापास्त' होऊन बसलं आहे पुष्कळ प्रयत्न करूनही!

शेवटी दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून मी किंडल ला जवळ केलं, थोड्या दिवसांत 'बुकगंगा'चा ई-बुक प्लॅटफॉर्म सापडला आणि नुकतंच 'राजहंस'च्या मोबाईल अॅपचा अनुभव आला. या तीनही कंपन्यांच्या अॅपवर पुस्तक वाचनाचा जो अनुभव मला आला, तो तुमच्या समोर मांडणार आहे. जर तुम्हांला या अॅप्समधले काही वेगळे पर्याय सापडले असतील, तर ते मला नक्की सांगा जेणेकरून मला ते वापरता येतील आणि ई-बुक वाचन जरा सुसह्य करता येईल!

अॅमेझाॅन किंडल अॅप
फायदे : पुष्कळ मराठी ई-पुस्तकं उपलब्ध आहेत. सहज डाउनलोड करुन चाळू शकता. विकत घ्यायची इच्छा झाली तर एका क्लिकवर विकत घ्या, लगेचच ते तुमच्या लायब्ररी सेक्शन मधे दाखल होतं. वाचायला सुरूवात केल्यावर तुम्हांला जर फाॅन्ट मधे बदल करायचा असेल तर पर्याय आहे. तसेच, पुस्तकाचं पान काळ्या, पिवळसर, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगाचं करूनही वाचन सुखावह करु शकता.
जर तुम्हांला पुस्तकाच्या पानाचा आकार बदलायचा असेल, अक्षरं लहान-मोठी करायची असतील तर तेही सहज करता येतं. आणि हे सगळे बदल सेव्ह करुन टेंपलेट बनवून वापरता येतात. वाचतांना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून लाईट अॅडजेस्ट करायचा पर्याय पण आहे.
या सर्वांपेक्षा महत्वाचा पर्याय म्हणजे, ज्या पानावर तुम्ही वाचन थांबवून अॅप बंद केलंत किंवा दुस-या पुस्तकाकडे वळलात तर पुढच्या वेळेस त्याच पानावर ते उघडतं. बुकमार्क करायची कटकट नाही की शेवटचं पान कोणतं वाचलं बरं मी? म्हणून पानं उलटंत बसायची भानगड नाही!!
तोटे : पुष्कळ मराठी शब्द नीट छापलेले नाहीत, त्यामुळे रसभंग होतो आणि जेवतांना दाताखाली खडा आल्याने जसा त्रास होतो ना तसं वाटायला लागतं! मराठी ई-बुक्स कै च्या कैच महाग आहेत!!!

बुकगंगा अॅप
फायदे : लायब्ररी मधे पुस्तक डाऊनलोड केलं की ते अगदी छान रांगेत कपाटात जाऊन बसतं. मग हवं ते पुस्तक उघडायचं आणि वाचायचं. बुकमार्क करायची सोय आहे. स्वच्छ प्रकाशात हातात घेऊन पुस्तक वाचते आहे असा अनुभव येतो. एकही शब्द चुकीचा छापलेला सापडला नाही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांमधे! ई-बुक्सची किंमत अॅमेझाॅन पेक्षा कैक पटीने कमी आणि सवलती भरपूर!
तोटे : बुकगंगाचं पुस्तक चाळायला किंवा शोधायला वेगळं अॅप वापरावं लागतं आणि पुस्तक वाचायला वेगळं. एकाच अॅप मधे हे काम केलं असतं तर मी १००/१०० गुण दिले असते! अर्थात त्यांच्या वेबसाईट वरुन पुस्तक विकत घेऊन, मग तुम्ही लायब्ररी अॅप मधे डाऊनलोड करून पण वाचू शकता.

राजहंस प्रकाशन मोबाईल अॅप
तोटे : बुकमार्कचा कोणताच पर्याय नाही त्यामुळे पुस्तक बंद करतांना कोणत्या क्रमांकाच्या पानावर आहोत ते लक्षात ठेवावं लागतं. जरी लक्षात ठेवलं तरी पुढच्या वेळेस ते पान शोधायला बरेच कष्ट/पानं उलटत/स्वाईप राईट करत बसावे लागतात. अॅमेझाॅन सारखंच बरेचसे शब्द विचित्र छापलेले आहेत, मागचा पुढचा शब्द वाचून आपल्याला अंदाज बांधावा लागतो, पण विचका होतोच! खूप कमी पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध केले आहेत, विशेषतः जुन्या प्रसिद्ध पुस्तकांच्या ई-बुक्स आवृत्ती नाहीतच! नविन पुस्तकांसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
फायदे : अॅमेझाॅन सारखंच एकाच अॅपमधे पुस्तक बघून लगेच विकत घ्यायची सोय आहे. सवलती पण ठीकठाक असतात.

पण मोबाईल अॅपचा सगळ्यात मोठ्ठा तोटा हा आहे की, नव्या-को-या पुस्तकाचा जो सुगंध विशेषतः राजहंस प्रकाशनाचं पुस्तक असेल तर अहाहा! घेता येत नाही 😭😭😭😭😭😭 म्हणूनही मला छापील पुस्तकं हवी आहेत हातात घेऊन वाचायला, अनुभवायला आणि छातीशी कवटाळून पहुडायला 😍 😍

तर, या तीनही अॅप्सपैकी मला 'बुकगंगा'चं लायब्ररी अॅप सगळ्यात जास्तं आवडलं.

अगदीच पुस्तक नाही पण निदान डोळ्यांना पुस्तकाचा भास करवणारं अॅप वाटतं, मला ते!

तुमचा या अॅप्सबद्दलचा अनुभव काय आहे मंडळी, नक्की सांगा.

#मराठी_ईबुक्स_अॅप
#मुक्कामपोस्टUK

No comments:

Post a Comment