Sunday, July 25, 2021

#आठवणी_लहानपणाच्या - शिकेकाई रविवार

  मेरे घने, लंबे बालोंका राज है..लाॅकडाऊन 😜

लहानपणी बाॅयकट/मश्रूमकट मिरवणारी मी आज चांगले एक-हात लांब केस सांभाळते आहे यावर माझा काय माझ्या आईचा ही विश्वास बसत नाहीए😄

लाॅकडाऊन आणि एकूणच बाहेर गेल्यावर मास्क काढायचाच नाही, या आता लागलेल्या सवयीमुळे, निदान गेल्या १५महिन्यांतमी केसांना कात्री लावलीच नाही!

दोन वेळेस केशकर्तनालयात जायची अपाॅईंमेंट घेतली पण कोरोनाभितीने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करायला भाग पाडलं!!

आता जर ते जमत नसेल तर केसांची व्यवस्थित निगा राखणं हे ओघानेच आलं!त्यासाठी मग शँम्पू हा आजतागायत वापरत आलेला पर्याय होताच, पण केसगळती सुद्धा आंदण आली होती. कधी इतके लांब केस मी वाढवलेच नाही ना त्यामुळे 'केसगळती' या वैश्विक प्रश्नाकडे मी गांभीर्याने बघितलंच नव्हतं!

पण केसांची काळजी घेणं हे काय दिव्य असू शकतं याचि प्रचिती आता मला हळू हळू यायला लागली होती! 

म्हणून मग जरा प्रयोग करुन बघायचे ठरवले-सर्वप्रथम कमीत कमी केमिकल्स वाला शँम्पू शोधायचा प्रयत्न केला, काही पर्याय सापडले पण मग नुसत्या शँम्पूने भागत न्हवतं, त्यासाठी त्या कंपनीच्या 'हेअर-स्पेशल पॅक'ची अख्खी पेटी उचलावी लागत होती, जे खिशाला अंमळ जड जायला लागलं! 

मग केस धुवायचे साबण वापरून बघितले, त्याने काही दिवस फरक वाटत आहे असं वाटेपर्यंत परत पहिले पाढे पंचावन्न!

मग म्हटलं हे सगळं बास झालं!शेवटी अॅमेझाॅनला मी शिकेकाई शोधायला सुरूवात केली,ती तर सापडलीच पण त्यासोबत ब्राम्ही, आवळा, रिठा काय न काय सापडलं😍फिर देर किस बातकी? लग्गेच सगळं आॅर्डर केलं!

मी लहान असतांना आमच्या घरात शिकेकाई हा एकमेव प्रकार केस धुवायला वापरला जायचा.प्रत्येक रविवार हा 'शिकेकाई' रविवार ठरलेला असायचा.माझ्या आईचे आणि बहिणीचे केस लांबसडक होते. आई स्वतःच्या केसांपेक्षा ताईच्या केसांची फार काळजी घ्यायची.केसांना तेल लावून चापून-चोपून वेणी घालणं हे जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं आणि महत्प्रयासाचं काम असायचं केसांना स्वच्छ ठेवणं.

शँम्पूने केस धुवायची पद्धत फार नंतर सुरु झाली खरं आमच्या घरात, कारण केस धुवायला शिकेकाईच वापरतात हेच माहीत होतं आम्हाला तेंव्हा.
तर माझी आई शिकेकाईची पावडर बनवून घ्यायची. म्हणजे जसं वर्षभराचं सामान-सुमान घरात भरून ठेवलं जायचं तसंच, वर्षभर पुरेल इतकी शिकेकाई ही दळून आणली जायची.तेंव्हा बाजारामधे शिकेकाईच्या वाळलेल्या शेंगा मिळायच्या, आताचं मला माहीत नाही.

शिकेकाईच्या या शेंगा, रिठा, नागरमोथा, आवळा असे बरेच जिन्नस एकत्र करुन कांडप केंद्रावरून दळून आणून, ती भुकटी(पावडर) एखाद्या डब्यात साठवून ठेवली जायची.मग प्रत्येक रविवारी सकाळी एकीकडे चहाचं आधण ठेवलेलं असायचं आणि दुसरीकडे एका भांड्यामधे दोन-तीन चमचे शिकेकाई पावडर + पाणी असं मिश्रण उकळत असायचं. जसं जसं पाणी उकळायचं तसा एक वेगळा, किंचित गोडुस पण उग्र सुगंध घरात पसरायला लागायचा आणि जितकं पाणी सुरूवातीला घातलं त्याच्या निम्मं झालं की शिकेकाई तय्यार झाली हे समजायचं.
मग ते कढत मिश्रण गाळणीने गाळून एका भांड्यात काढून ठेवायचं. केस धुतांना त्यात गरजेइतकं पाणी घालून केस धुवायचे आणि भलेही तेल निघायचं नाही पूर्णपणे, पण केसांची मूळं, त्वचा स्वच्छ व्हायची आणि केसांना तेलमिश्रित शिकेकाईचा वेगळाच सुगंध लगडायचा 😊😘 आमच्या आईचे केस इतके सुंदर,काळेभोर आणि लांबसडक होते की आमच्या पैकी कोणा एकीला ते विंचरायला मदत करावी लागायची.माझे केस तेंव्हा भलेही छोटुसे होते पण मला आईचे केस विंचरायला फार आवडायचं.

काहि वर्षांत ताई होस्टेल ला रहायला गेली, तिथे शिकेकाईचं कौतुक करायला जमेना, नंतर तिने केसही कापले. मग तर शिकेकाई वापरणारा एक मुख्य दावेदारच संपुष्टात आला, त्यामुळे आईने सुद्धा शिकेकाई बनवून घ्यायचा घाट घातला नाही.

तोवर शँम्पूच्या छोट्या पाऊचेस ने वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून घरात चंचूप्रवेश केला. तुम्हांला आठवत असेल तर, क्लिनिक प्लस या शँम्पूच्या छोट्या पुड्या रविवारच्या पेपरमधल्या जाहिरातीत चिटकवलेल्या असायच्या.

माझे केस लहान असल्याने एक छोटी पुडी बहुदा ५०पैसे किंमत असावी, पुरायची. शँम्पूने केस पटकन धुतले जायचे आणि एकदम मऊसूत व्हायचे, असलं भारी वाटायचं नं 😍

शिकेकाईसाठी 'करावी' लागणारी एकूणच 'मेहनत' बघता, शँम्पू सर्वार्थाने उजवा वाटायला लागला आणि शिकेकाईची पिछेहाट होत-होत शँम्पू घरात स्थिरावला.आईने सुद्धा शँम्पूची कास धरत केसांना जरा तेलयुक्त दुनियेतून क्वचित मोकळीक द्यायला सुरूवात केली😄

  शँम्पू मधे नंतर कित्ती कित्ती प्रकार निघाले.वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या लाटेत उडी घेत अगदी 'आयर्वेदीक' शँम्पूपण बाजारात आणले!त्यातच काही काळ शिकेकाई हा साबण ही ब-यापैकी लोकप्रिय झाला होता.

 तसं जरी झालं असलं तरी, बरीच वर्षं क्लीनिक प्लस हाच ब्रँड आमच्या घरात वापरला जायचा. पुढे मग बाजारात येणारे नवनवे पर्याय वापरायला सुरूवात झाली, क्वचितप्रसंगी शिकेकाईची बाजारात मिळणारी तयार पावडरही आईने वापरून बघितली. पण शेवटी आईने स्वतः जिन्नस गोळा करुन कांडप केंद्रातून तयार करुन आणलेल्या शिकेकाईची सर कोणालाच आली नाही, येऊही शकत नाही!!

आज शिकेकाईच्या उकळत्या वाफांच्या उग्र-गोडुस सुगंधाने या सगळ्या आठवणी जाग्या केल्या 😍

  मार्केटमधले चिक्कार शँम्पू आणि कंडिशनर्स आजतागायत वापरले होते पण शिकेकाई वापरली नं, की असं वाटतं,आई तिच्या हाताने माझ्या केसांची अगदी छान काळजी घेत आहे

  #आठवणी_लहानपणाच्या_शिकेकाई_रविवार
#शिकेकाई

No comments:

Post a Comment