धूक्यातून जाणारी वाट..हिरवागार निसर्ग..पाउलवाटेवर खळाळत जाणारे छोटे झरे...हे सगळं जर अनुभवायचं असेल तर राजमाची ला जरूर भेट द्या..
मला ट्रेक करायला खूप आवडतं..आणि अगदी भर पावसाळ्यात मला राजमाची ला जायची संधी मिळाली..
राजमाची ला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत..एक तुंगर्ली गावातून आहे आणि दुसरा कर्जत हून..जर तुम्ही सराईत ट्रेकर नसाल तर हा रस्ता अगदी योग्य आहे तुमच्यासाठी..
जाताना आम्ही तुंगर्ली च्या रस्त्याने निघालो..सुरुवातीचा १-२किमी चा रस्ता सोडला तर पुढे पूर्ण वाट ढगातून जाते..१६किमी चा हा पूर्णा रस्ता आहे..
निसर्ग बघत बघत, पाउस अंगावर झेलत आम्ही चालायला सुरूवात केली..प्रत्येक झ-या जवळ थांबून पाणी खेळावं की समोर दिसणारं दृष्य डोळ्यात सामाउन घ्यावा हेच कळत नव्हतं...
क्षणा क्षणाला नवीन काहितरी दिसत होतं..अचानक खूप काळे ढग समोर यायचे तर दुस-या डोंगरावर उन दिसायचं...
हे सगळं बघत बघत आम्ही पुढे चालत होतो आणि एका वळणावर आम्हाला निसर्गाचा एक चमत्कार दिसला..
आजपर्यंत सगळ्यांनी फक्त वॉटर फॉल बघितला आहे पण आम्ही पाणी वर उडताना बघितला!!
वा-याचा वेग इतका जास्त होता की डोंगरावरून पाणी खाली पडुच शकत नव्हतं..
खूप मजा आली ते बघताना..
हा रस्ता बर्यापैकी सपाट आहे त्यामुळे पटापट पुढे चालता येतं..
जितका जास्त पाउस पडला असेल तितके मोठे धबधबे बघायला मिळतात..आणि मोठे ओहोळ सुद्धा..
आम्ही मग मजल-दरमजल करत असेच पुढे जात होतो आणि एके ठिकाणी आम्हाला कोणत्या रस्त्याने जावं हे कळत नव्हतं..
आम्हाला कधी इतकं चालायची सवय नाही त्यामुळे १०किमी झाल्यावर सगळ्यांना थकवा आला पण एकमेकांना आधार देत देत आम्ही पुढे जात होतो..
पण जेंव्हा रस्ता समजेना तेंव्हा काहिजण म्हणाले चला परत जाउ,
इथून पुढे उगाचच कुठे भटकलो तर बाहेर येणं खूप अवघड होईल..
दुसरा विचार हा पण आला की इतक्या दूर आलो आहोत तर असं अर्ध्या वाटेवरून परत नाही फिरायचं, बघू, रस्ता चुकलो तर चुकलो पण जायचच!!
आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला..सारखा पाउस सुरू असल्यामुळे खूप चिखल झाला होता सगळीकडे..तरीही वाट काढत..एकमेकांना आधार देत..मधेच कुठेतरी फोटो काढत काढत आम्ही जात होतो..
अचानक आम्हाला खूप जोरात पाण्याचा आवाज यायला लागला..आम्ही पुढे जात होतो तर तो आवाज आणखीनच वाढला..थोड्याच वेळात आमच्या समोर एक खूप मोठा ओढा आम्हाला दिसला..
पाणी जास्त खोल नाहीये त्या ओढयाला पण वेग खूप आहे पाण्याला..
हा शेवटचा टप्पा राजमाची च्या रस्त्यावरचा..
ओढा ओलांडलात की अगदी अर्ध्या तासात तुम्ही राजमची ला पोहचता..
आम्ही सगळ्यांनी ओढा ओलांडला आणि अगदी हायसं वाटलं की चला आता अजून थोडाच वेळ आणि आपण ठरवलेल्या ठिकाणी पोहचणार..
थोड्याच वेळात आम्ही सपाट जागेवर आलो आणि समोरचा देखावा बघून डोळ्याचे पारणे फिटले..
3 मोठे मोठे धबधबे कोसळत होते..पांढरं शुभ्रं पाणी खळखळ आवाज करत वाहत होतं..
दाट धुकं पसरलं होतं..धुकं कसलं ढगच होते ते..हे ३ धबधबे बघितल्यावर इतक्या सगळ्या कष्टाचं चीझ झाल्यासारखं वाटलं..
खूप खोल दरी आहे समोर आणि त्यात ढगांचा लपंडाव सुरू होता..
पाउस सुरू झाला आणि आम्ही सगळे चिंब भिजत भिजत एका टपरीवर आलो..गरमा गरम मक्याचं कणिस तिथे मिळालं आम्हाला..मग काय अगदी सगळे तुटून पडलो त्यावर..
राजमाची ला एकदा पोहोचलो की तिथे राहायची व्यवस्था खूप स्वस्तात आणि मस्त होते..
तिथे उंबरे नावाचे लोक राहतात ज्यांचे साधारण 20 घरं आहेत..तेच तुमची खाण्या,पिण्याची व्यवस्था करतात..
आम्ही पण असच एका काकांकडे राहायला गेलो..घर तर एकदम जुन्या पद्धतीचं बांधलेलं पण खूप उबदार होतं..वीज (इलेक्ट्रीसिटी), मोबाइल असे प्रकार तिथे चालत नाहीत..पाणी आहे कारण पावसाळ्यात सारखा पाउसच पडत असतो..
आम्ही खूप थकलो होतो आणि त्या काकानी आम्हाला मस्त भाकरी,पिठलं जेवायला दिलं..चुलिवरची खरपूस भाजलेली भाकरी आणि पिठलं मिळायला नशीब लागतं..
राजमाची ला २ गड आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन..कालभैरवाचं मंदीर आहे जिथून दोन्ही गडांसाठी रस्ते जातात..
श्रीवर्धन उजवीकडे आहे आणि मनोरंजन डावीकडे..
दुस-या दिवशी सकाळी आम्ही निघालो गड बघण्या करता..गडाचा रस्ता बर्यापैकी कठीण आहे आणि वा-याचा वेग खूप जास्त असल्याने वरती जायला खूप त्रास होतो..
वरती चढताना एकच विचार सगळ्यांच्या डोक्यात येत होता..आज चढायला निदान रस्ता तरी आहे..ज्या काळात हा गड बांधला असेल तेंव्हा लोक घोड्यांवर कसे येत असतील..खरंच शिवाजी महाराज खूप ग्रेट होते..
गडावर जातांना सगळीकडे लुसलुशित गवत दिसत होतं..हिरव्या रंगाचे इतके शेड्स मी आजपर्यंत कधीच बघितले नव्हते..
अगदी ढग हातात घेऊन पाउस कसा पडतो ते गडावर पोहचल्यावर आम्हाला बघायला मिळाला..खूप मजा आली..
गड बघून झल्यावर आम्ही परतीचा प्रवास कर्जत च्या रस्त्याने करायचा ठरवला..
आमच्या सगळ्यांकडे ओझं बरच होतं आणि रस्त्याचा अजिबात अंदाज नव्हता..
गावक-यांना विचारून तर निघालो पण जेंव्हा खरोखर त्या रस्त्याने उतरत होतो तेंव्हा खूप वाट लागली..खरा ट्रेक कशाला म्हणतात ते कळत होतं...
सगळीकडे चिखलामुळे निसरडॆ झालेले दगड आणि त्यातून जाणार्या वाटा..कुठे कुठे तर माणूस जेम तेम एक पाय ठेऊ शकेल एव्हढाच रस्ता होता..
कुठे काटेरी झाडं डोळ्यासमोर येत होते तर कुठे पाय घसरत होता..पण मजा पण तितकीच येत होती..असं करत करत आम्ही पुन्हा एकदा एका ओढयाजवळ आलो..जो शेवटचा टप्पा होता खाली उतरतांनाचा..मनसोक्त पाण्यात खेळलो..उडया मारल्या..खूप मजा केली आणि शेवटच्या टप्प्यावरचा प्रवास सुरू केला...
शारीरिक थकवा खूप आला होता पण मन खूप ताजंतवानं झालं होतं..
खूप खूप मजा करून आम्ही मुंबईला परत आलो..
दुस-या दिवशी रस्त्यावरून चालताना सुद्धा भास होत होते की वरती कुठेतरी डोंगर दिसेल..झरा दिसेल..आपण धूक्यातून चालतोय..
रोजच्या धका-धकीच्या जीवनाला कुठेतरी एक स्वल्पविराम देऊन राजमाची ला भेट देऊन याच..
chk out here nature's wonder : http://www.youtube.com/watch?v=R5IA5_Uj4vI
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.