Sunday, August 30, 2009

आवडलेल्या कविता - २

कृतज्ञता

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले तडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शंतवे कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाउन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकुळ फार झला
आणि पुसिलेच त्याने डाक्टरला
''आता दादा, मरणार काय मी हो?''
तोच लागे अश्रुची धार वाहो!

ह्रदय हलूणी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतावुन जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.

आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
"नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!

भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!" बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचणे डाक्टराने.

-

कवी : गिरीष

12 comments:

  1. रडु आवरत नाही ही कविता वाचताना

    ReplyDelete
  2. ही कविता मी बर्याच दिवासा पासुन शोधत होतो. आपल्या कडुन मिळाली आभार. अजुन एक कविता मी शोधत आहे ती .... क्षणो क्षणी पळे उठे परी बळे मिळाल्यास नक्की पोस्ट करा
    आमच्या आभ्यासतील या कविता होत्या
    सुभाष थोरात चाळीसगांव ९९२३४२६४६४

    ReplyDelete
    Replies
    1. क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
      चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
      किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
      तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

      म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
      तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
      करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
      करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

      अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
      कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
      तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
      क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

      निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
      म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
      उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
      वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

      म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
      म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
      नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
      स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

      असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
      म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
      जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
      नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

      मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
      केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
      चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
      निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

      ना.वा.टिळक

      Delete
    2. Aniket Deshmukh कविता इथे दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.

      Delete
  3. ही कविता शाळेत असतांना खूप घोकली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वाह, छान. comment केल्याबद्दल धन्यवाद :)

      Delete
  4. मला हिंदवंदना ही कवि चंद्रशेखर यांची कविता हवी आहे.कृपया पोस्ट करावी.
    Adv. Vishnu Bhope Aurangabad
    Dt.9-1-2021 vdbhope@yahoo.com

    ReplyDelete
  5. आमचे आजोबा "गोविंदराव देशमुख, राजगुरूनगर" आम्हाला 8-10 मुलांना एकत्र बसवून आमच्या लहानपणी म्हणजे साधारण 25-30 वर्षांपूर्वी या अनेक कविता (क्षणोक्षणी पडे, पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा,...) आमच्याकडून घोकून घेत असत. आजही त्या तश्याच आमच्या मनावर ठळक कोरून ठेवल्या आहेत..

    ReplyDelete
    Replies
    1. किती छान आठवण :) comment केल्याबद्दल धन्यवाद :)

      Delete
  6. व लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आमचे वडील आम्हाला कविता म्हणून दाखवीत असत

    ReplyDelete
  7. बालपण परत, आठवले सगळ्या कविता तोंडपाठ, असायच्या पहिला तास कविता व पहाडे म्हणायचा असे किती रम्य बालपण होते कालाय तस्मै नम शैलजा पंडित मुंबई

    ReplyDelete