Monday, May 23, 2011

!! प्रतिज्ञा !!


सकाळी ऑफिसला जाताना एका शाळेत सुरू असलेली प्रतिज्ञा ऎकू आली आणि मी नकळत माझ्या शाळेत पोहोचले!!
रोज शाळेत आल्यावर प्रार्थना झाली की, आम्ही सगळे विद्दार्थी छातीवर उजवा हात ठेउन प्रतिज्ञा म्हणायचो..
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत....किती भाबडं जग असतं ना शाळेचं..बाई सांगतात म्हणून आपण रोज किती तरी वर्षं प्रतिज्ञा म्हणालो, त्या वेळेला ह्या सगळया वाक्यांचा अर्थ कितपत कळाला माहित नाही पण, आज इतक्या वर्षांनंतर मला ही प्रतिज्ञा एका वेगळ्याचं अर्थाचं दर्शन देउन गेली!!
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत (तरीहि आम्हांला प्रांतियवाद प्रिय आहे.पण, असंही आहे की आमच्या देशात घुसून आमच्याच लोकांना मारणा-याला मात्र आम्ही एखाद्या व्ही.आय.पी पेक्षा जास्त चांगली वागणूक देतो.) माझ्या देशावर माझे प्रेम आहे.(म्हणून तर कुठेतरी आम्हांला फक्त आमचे हक्कच दिसतात आणि देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे आम्ही विसरत चाललो आहे!!) माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.(ह्याचा प्रत्यय म्हणून की काय आपल्याच देशातील जनता ज्या ज्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देते तेथे आपल्या अस्वच्छतेचा नमूना प्रदर्शित करते.) त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.मी माझ्या पालकांचा, गुरूजनांचा आणि वडिलधा-या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.(दुर्दैवाने आज म्हाता-या आई-वडिलांचा भार कोणालाच सहन होत नाही आणि त्यांची रवानगी वृध्दाश्रमात होते.गुरूजनांचं भाग्य तर काय बोलावं, शाळेत असतानाच मुलं त्यांच्याबद्दल आदराने बोलत नाहीत). माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.(म्हणूनच सगळे नेते एकमेकांत चढाओढ लागल्या सारखे एकापेक्षा एक असे घॊटाळे करून जनतेचे रक्त शोषत आहेत!!) त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.(खरंच????!!!!)

कधीकाळी आपल्या देशातून सोन्याचा धुर निघायचा असं ऎकलं होतं, ती गोष्ट आजही खरी आहे.आजही सोन्याचा धुर निघतोय पण त्याला कुठेतरी काळा रंग प्राप्त झाला आहे!! शाळेत असतांना आपला देश कोणकोणत्या धान्य, खनिजे अशा गोष्टींबाबत जगात कोणत्या क्रमांकावर आहे हे शिकलो होतो पण आज आपला देश लोकसंख्येत पहिला क्रमांक पटकाविण्याच्या तयारीत दिसतोय आणि आपल्या राजकारण्यांपैकी एकाने आत्ताच जगातील दुस-या क्रमांकाचा भ्रष्टाचारी म्हणून उच्च पद प्राप्त केलं आहे!!

काळानूसार ही प्रतिज्ञा शालेय पाठयपुस्तकांतून बदलायला हवी की कुठेतरी आपण ही प्रतिज्ञा फक्त शाळेपुरती न ठेवता शाळेबाहेरच्या जगात ती आमलात आणयला हवी!!?!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

1 comment:

  1. खरंच????!!!!neeed to think...on..we can do some thing...better!!!

    ReplyDelete