बस्स!! ठरलं आता, मी काहिहि झालं तरी आज पाणी-पुरी खाणार ह्या विचाराने ’एलको’ मधे गेले आणि टोकन घेउन पाणी-पुरीवाल्या स्टॉलच्या समोर उभी राहिले पण, पहिली पुरी हातात घेतली आणि एखाद्दा चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून १३ एप्रिल २०११ च्या वर्तमानपत्रात आलेली ती किळसवाणी आणि धक्कादायक बातमी समोर आली आणि मी ती पुरी तिथेच टाकुन काढता पाय घेतला!!
हे असं आज तिस-यांदा होत होतं. कोण कुठला तो विक्षिप्त माणुस, त्याने इतका गलिच्छ प्रकार केला आणि मी आज दीड महिना झाला पाणी-पुरीच्या सुखाला मुकले!! आमची आई अगदी नेहमी आम्हांला सांगायची की, बाहेर पाणी-पुरी खात नका जाउ हो, ते लोक कसलंही पाणी वापरतात, दुस-या लोकांनी वापरलेल्याच प्लेटस घाणेरडया पाण्यात धुउन काय देतात आणि कहर म्हणजे त्या लोकांचा अवतार तर असा असतो की कित्येक दिवसात आंघोळ केली आहे अस वाटतच नाही, पण ऎकणार ते आम्ही कसले!!
मला अजुन आठवतं, उन्हाळयाच्या सुट्टीत मामा, मावशी कोणाच्याही गावाला गेलो तरी आम्ही एकदम टेस्टी पाणी-पुरी कुठे मिळते हे शोधत शोधत कमीत-कमी ३ पाणी-पुरीवाल्यांकडे जाउन पाणी-पुरी खायचो. पुण्याला कधी मनमीत चाटवाल्या कडे ’मिनरल वॉटर’ पाणी-पुरी तर कधी नागपुरला सिता-बर्डीमधे स्पेशल पाणी-पुरी खायचो आणि शाळा-कॉलेज जवळच्या चाटवाल्याकडे तर रोजच हजेरी असायची!!
तर असं जोपर्यंत पोटात काही दुखत नाही किंवा आजारी पडत नाही तोपर्यंत बाहेर पाणी-पुरी खाण्याचा मोह काही केल्या सुटत नव्हता पण, त्या एका दुष्ट आत्म्याने आम्हां सगळ्यांचे डोळे अगदी एका क्षणात उघडले!!!
ती बातमी आल्यानंतर सामान्य माणसांना धक्का बसला पण त्याही प्रसंगी काहि राजकीय पक्षांनी त्या माणसासकट इतर पाणी-पुरी चे ठेले असणा-या निर्दोश लोकांना त्रास दिला, अगदी आठ दिवस हे नाटक सुरू होतं. पण, ज्या मुंबई मधे बॉम्बस्फोट झाल्याच्या दुस-या दिवसापासुन सुरळीत व्यवहार सुरू होतात तिथे इतक्या छोटया गोष्टीचा परिणाम आठ दिवस राहिला हेच खुप होतं आणि मग काय लगेच पुन्हा एकदा सगळे पाणी-पुरी वाले आपापले ठेले घेउन समाजकार्य करायला सज्ज झाले!!!
आणि मी मात्र अजुनही माझ्या मनाला ह्या धक्क्यातुन सावरण्यासाठी समजावत राहिले!!
No comments:
Post a Comment