ऑफिसमधलं काम पटापटा आवरलं आणि दादरला जाउन मी अगदी धावत-पळत गाडी पकडली..गाडी सुरू झाली...एका जागी स्थिर झाले अन गाडीच्या वेगासोबत माझे विचार धावायला लागले...आज आमच्या घरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचा म्हणजे माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे, आज तो ३ वर्षांचा पूर्ण झाला...विचार करतांना मी पार त्या दिवसापाशी जाउन थांबले जेंव्हा माझ्या बहिणीने आम्हांला फोन करून, ती आई होणार असल्याची गोड बातमी कळवली होती...कित्ती उडया मारल्या होत्या मी आणि माझ्या भावाने..आई,बाबांच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रुच आले होते...ही बातमी कळाली आणि मग काय, सगळीकडे एकच धमाल सुरू झाली..जो तो आपापल्या परीने, असलेल्या-नसलेल्या अनुभवानुसार ताईला उपदेश करू लागला..आजीने सांगितलं, ’पपई अजिबात खाऊ नकोस हो पोरी’ तर मावशी म्हणाली, ’जास्त ओझं उचलू नकोस गं’...कुठे ताईच्या सासूबाई म्हणाल्या की, ’सकाळ-संध्याकाळ चालायचा व्यायाम कर हो’..आणि आई तर तिला छोटया-मोठया गोष्टी वेळोवेळी सांगतच होती..आणि डॉक्टर ने तर तिला भली-मोठी यादीच दिली होती काय खायचं, काय नाही खायचं, कोणते व्यायाम करायचे वगैरे वगैरे...
इकडे आम्ही भावंडं रोज विचार करायचो की येणारं बाळ कोण असणार, मुलगी की मुलगा? मुलगी असेल तर तिचं आमच्या घरात जंगी स्वागत झालं असतं कारण आमच्या घरात स्त्री-पार्टी एकदम श्ट्रॉंग आहे ;) ..हां आणि मुलगा जरी झाला असता तरी काही हरकत नव्हती..खरंतर आमच्या घरात आता लहान बाळ येणार हा विचारच पुरेसा होता..दिवस अगदी भराभर जात होते...म्हणता म्ह्णता ताईचं डोहाळजेवण येउन ठेपलं..ताईच्या माहेर-सासरकडच्या सगळ्या बायका, ताईच्या मैत्रिणी जमल्या, ताईला एकदम मस्त सजवलं होतं, तिच्यासाठी फुलांनी सजविलेला धनुष्य-बाण आणला होता, गाणी सुरू होती, अगदी हसत-खेळत हा सोहळा पार पडला.
त्यानंतर एका दिवशी मी ताईसोबत दवाखान्यात गेले होते तिची आणि बाळाची तब्येत दाखवायला आणि त्यायोगे मला एक अप्रतिम क्षण अनुभवण्याचं भाग्य लाभलं..डॉक्टरांनी ताईची तपासणी सुरू केली आणि कसल्याशा यंत्रातुन आम्हांला बाळाच्या हृदयाचे ठोके ऎकु यायला लागले...त्या क्षणी मी आजपर्यंत ऎकलेलं सगळं संगीत फिकं वाटलं...कितीतरी वेळ मी भारावून ते सगळं ऎकत होते आणि त्या दिवशी पुन्हा एकदा मी त्या निसर्गनिर्मात्या पुढे नतमस्तक झाले..
एक एक करत दिवस जवळ येत होते...आमची उत्सुकता ताणली जात होती आणि ताईची तगमग बघवत नव्हती...शेवटी तो दिवस उगवला, ताईला दवाखान्यात दाखल केलं..डॉक्टरांची धावपळ सुरू झाली आणि आई,बाबा,जिजू ह्यांचं टेन्शन वाढायला लागलं...’सगळं व्यवस्थित होउ दे रे गणपति बाप्पा’, म्हणून आई मनोमन प्रार्थना करत होती आणि थोडयाच वेळात डॉक्टर बाहेर आले; आई,बाबा,जिजू ह्या सगळ्यांना त्यांनी ’मुलगा’ झाला ही गोड बातमी दिली आणि आम्ही सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला...लगेचच नर्सने एक छोटुसं, अगदी गुलाबी-गुलाबी गोरं बाळ ताईच्या हातात दिलं...तो क्षण आम्ही सर्वांनी आपापल्या डोळ्याच्या कॅमेरात टिपून ह्रद्यात जतन करून ठेवला...
त्यानंतर दिवस पुन्हा एकदा वा-यासारखे भराभर उडायला लागले...बाळासाठी लागणारे सगळे तेलं, औषधी, घुटी, ताईसाठी लागणारी शेक-शेगडी ह्या सर्वांनी घरात एक वेगळाच वास दरवळू लागला...बाळाचं नाव काय ठेवायचं ह्याची चर्चा घरात सुरू झाली,प्रत्येकाला जे आवडेल, त्याला बघून जे सुचेल अशी बरीच नावं समोर आली...म्हणता म्हणता पिलूचं बारसं ठरलं आणि त्याचं नाव ठेवलं ’शौर्य’....
रोज पिलू वेगळं दिसायचं..१ महिन्याचा होइपर्यंत वाटत होतं तो ताईसारखा दिसतो, पुढे ३ महिन्यात वाटायला लागला तो जिजू सारखा दिसतो...दर वेळेला एका नविन रूपातच आमचा हा बाळकृष्ण आम्हांला दिसत होता.
सगळ्या घराच्या साक्षीने शौर्यची जिवनातली आगेकुच सुरू झाली...आम्ही सगळेजण त्याच्या योगाने पुन्हा एकदा स्व:तचं बालपण अनुभवू लागलो...शौर्यचे एक एक सोहळे अगदी आनंदात पार पडत होते, जावळ काढणे..मग १ला वाढदिवस...मस्त थाटामाटात सुरू होतं सगळं...
मला आठवतं शौर्य जेंव्हा १.५ वर्षांचा होता, सहज बोलता बोलता मी त्याला एक वस्तू आणायला सांगितली आणि तो आईच्या कडेवरून खाली उतरून ती वस्तू घेउन देखील आला...मी थक्कच झाले, आम्ही जे काही बोलतो त्याच्याशी, हे त्याला सगळं कळतं ह्याचं मला खरंच खुप आश्चर्य वाटलं!!
थोडयाच दिवसात आमचं हे लबाड वासरू चुरूचुरू बोलायला लागलं.त्याला आता आम्ही सगळे कोण, कुठे राहतो वगैरे माहित झालं होतं.त्याला ट्रेन भारी आवडते,जेंव्हापण मी त्याला भेटते किंवा फोन करते, तो एकदा तरी म्हणतो, ’माऊ, पक्कन पक्कन तयार हो, आपल्याला ट्रेन मधे बशुन मुंबईला जायच्चं’!!
शौर्यच्या रूपाने आमच्या बाबांना तर एक छोटू दोस्तच मिळाला होता..बाबांचं त्याच्याशिवाय आणि शौर्यचं त्याच्या ’आबां’शिवाय अजिबात पान हलत नव्हतं,बाबा त्याला कधी गाडीवरून तर कधी पायी फिरायला घेउन जायचे मग त्यायोगे चॉकलेटही मिळायचं हे आमच्या ढंपुला अगदी व्यवस्थित माहित झालं होतं...
जसे दिवस जात होते तसे आमच्या लिटील टायगरचे कारनामे गाजायला लागले, घरभर पळायला सुरूवात झाली, बडबडीला उधाण आलं, कुठे मधेच थोडंसं लागलं की रडून रडून घर डोक्यावर घ्यायची पद्धत सुरू झाली...एक ना अनेक कित्ती तरी आठवणी अशा एकापाठोपाठ येत राहिल्या...
आता पिलू ३ वर्षांचा पूर्ण झाला आहे...उद्यापासुन त्याची शाळा सुरू होणार आहे...आमच्या घरातली ही तिसरी पिढी आता ख-या अर्थाने ह्या जगात पाउल ठेवणार आहे, आई-बाबांचं बोट धरून नविन विश्वाची ओळख करून घेणार आहे...स्व:तचं नवं जग निर्माण करण्याकरता!!!
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
वा वा वा. छान छान. खूपच सुंदर लिहिलं आहे. अगदी सगळं डोळ्यासमोर उभं राहीलं आणि मी माझ्या पुतण्या/पुतणी आणि मुली बरोबर एन्जॉय केलेले दिवस आठवले. Tooo goooood flow अन वाक्य रचना पण छान आहे.दिलेल्या उपमा पण खूप छान आहेत. कीप इट अप. १ दिवस सगळ्या ब्लॉग्स चं १ छानसं पुस्तक प्रकाशित करू शकशिल इतका खजिना नक्कीच आहे तुझ्य़ाकडे. KEEP WRITING n BLOGGING.......
ReplyDeleteeakdam Bari!!!!
ReplyDelete>>कितीतरी वेळ मी भारावून ते सगळं ऎकत होते आणि त्या दिवशी पुन्हा एकदा मी त्या निसर्गनिर्मात्या पुढे नतमस्तक झाले..
ReplyDelete+१ मस्त लिहले आहेस.. छोटुलं तर एकदम मस्त :)
धन्यवाद शिरीष सर, किरण आणि राजे :)
ReplyDeleteliked the flow and rhythm of the article.. keep it up.. :)
ReplyDeleteThanks a lot Nikhil :-)
ReplyDelete