Wednesday, July 27, 2011

खरंच असं का?


>> जेंव्हा घाई असते नेमकं तेंव्हाच लोकलसाठी तिकीटाच्या रांगेत आपला नंबर येउनही खिडकी बंद का होते??
>> कच्चून पाऊस पडत असतो, ऑफिस ला जायला उशीर झालेला असतो आणि एकही रिक्षावाला आपल्या हाकेला प्रतिसाद देत नाही, असं का?
>> आपल्यात गुण/कसब असूनही, आपल्यापेक्षा फक्त दिसण्यात सुंदर पण बुद्धीने माठ व्यक्तीला आपल्याआधी बढती मिळते ???
>> जेंव्हा अगदी मनापासून काहितरी चविष्ट खायची इच्छा असते नेमकं तेंव्हाच डब्यात ’नावडती’ भाजी येते, असं का :-(
>> सगळं व्यवस्थित प्लॅन करून ठेवावं आणि अगदी शनिवारी निघायच्या वेळेला माशी कुठेतरी शिंकते आणि भन्नाट विकेन्ड चा प्लॅन फूस्स होतो, का होतं असं??
>> ब-याच दिवसांपासून शोधत असलेलं पुस्तक घ्यायला जाण्याचा मुहुर्त साधावा,दुकानात जावं तर कळतं त्या पुस्तकाचं प्रकाशनच आता बंद झालंय!!!???
>> एखाद्या रविवारी मस्त उशीरा उठून, लोळत पेपर वाचल्यावर, आठवडयाची कामं उरकावी ह्या विचाराने बघावं तर नळाचं पाणीच गायब!!!, ऎसा क्यों???
>>कधी-कधी पूर्ण दिवस खुप छान जातो; बॉस,युझर कोणीच ऑफिस मधे कटकट करत नाही, तरीहि संध्याकाळी अगदी रिकामं-रिकामं, बोअर होतंय असं का वाटतं??
>>अगदी जवळच्या माणसाशी बोलतांना कधीतरी असं का वाटतं की आपले शब्द फक्त त्याच्या कानावर आदळत आहेत, त्याला आपण काय बोलतोय हे समजतच नाहीये!!??

>>पण,
कधीतरी एखादा माणूस मद्दपान करून भरधाव वेगात गाडी चालवून एखाद्या निष्पाप माणसाचा जीव घेतो, खरंच असं का होतं??
>>आपल्या समोर कित्येक वेळा काही आक्षेपार्ह गोष्टी घडत असतात, पण आपण कळत असूनही कानाडोळा करतो, आवाज उठवत नाही, असं का??
>>देवदर्शन करून परतत असतांनाच एखाद्या बसला अपघात होउन सगळे प्रवासी ठार होतात, असं का??  
>>कोण,कुठले दहशतवादी येतात आणि गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब लावून सामान्य माणसांचं जन-जीवन विस्कळीत करून जातात आणि एकजात सगळे राजकीय पक्ष अशा प्रसंगी फक्त आपली पोळी भाजून घेतात, देवा खरंच असं का??

>>आणि
नेहमी, आपल्या आवडत्या ठिकाणी किंवा आवडत्या व्यक्तीला भेटायला जातांना अंतर अगदी कमी भासतं अन परतीचा प्रवास इतका लांबलचक आणि कंटाळवाणा का होतो??

>>सगळ्यात विचित्र म्हणजे,
प्रत्येक वेळेस शारिरिक अथवा मानसिक जखमेवर ’काळ’ हे एकच औषध आहे, असं का??

असे कितीतरी प्रश्न तुम्हांला-मला-आपल्या सर्वांना कधी ना कधी पडले आहेत, पडत असतात, पण, प्रत्येक गोष्टी साठी उत्तर मिळतच नाही, मग एकच पर्याय उरतो; आपली बुध्दी असं एखादं छानसं, गोंडस उत्तर तयार करते की, आपलं मन लगेच ते उत्तर ऎकतं आणि तो प्रश्न तिथेच सोडून पुढे जायला तयार होतं!!!  

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

3 comments: