Wednesday, July 20, 2011

माझी शाळा

औरंगाबाद मधे प्रसिध्द असणारी शारदा मंदिर कन्या प्रशाला ही आमची शाळा. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारक गोविंदभाई श्रॉफ ह्यांनी स्थापन केलेल्या श्री.सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा अविभाज्य घटक असणारी आमची ही शाळा.
आज कित्येक वर्षांनंतर मला शाळेत जाण्याचा योग आला.
मी ह्या शाळेमधे ५ वी पासुन १० वी पर्यंत शिकले.

शाळेमधे पाउल ठेवलं आणि सगळ्या जुन्या आठवणी माझ्या डोक्यात पिंगा घालू लागल्या.शाळेचं पटांगण सगळ्यात पहिले दिसलं, जिथे आम्ही सगळ्या मुली रोज आपापल्या वर्गानुसार उभ्या राहायचो...मग भागवत मॅडम किंवा जहागिरदार मॅडम समोर यायच्या आणि प्रार्थना, त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग प्रतिज्ञा व्हायची. त्यानंतर मग एखादया मुलीला किंवा एखादया ग्रुपला स्पर्धेत मिळालेल्या यशाचं कौतुक, त्यांना सगळ्यांना स्टेजवर बोलावून केलं जायचं.



त्यानंतर भागवत मॅडम आम्हां सगळ्या मुलींचे गणवेश तपासायच्या.भागवत मॅडम इतक्या कडक होत्या की आम्ही त्यांचं नाव जरी ऎकलं तरी सगळ्यांची बोबडी वळायची.जसा आम्हांला त्यांचा धाक होता तसाच आमच्या शाळेच्या परिसरातल्या सगळ्या मुलांना देखील होता.त्यामुळे आम्ही मुली मात्र सुरक्षित होतो.शाळेत असतांना आम्हांला कोणताही सोन्याचा दागिना घालण्याची परवानगी नव्हती, पुन्हा वेणी जर घातली असेल तर वेण्या, त्याच्या रिबिन्स,शाळेचा गणवेश, बुट अगदी सगळं व्यवस्थित आहे की नाही हेदेखील भागवत मॅडम तपासायच्या. पण, जर कधी शाळेत जायला उशीर झाला तर मात्र शिक्षा ठरलेलीच, तेंव्हा ती शिक्षा जरी त्रासदायक वाटली तरीहि आज त्या गोष्टिचा ऑफिस ला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी वेळेत पोहोचवण्यात मोठा वाटा आहे.
आत गेल्यावर मला एक-एक वर्ग दिसू लागले.आमचा ९ वी चा वर्ग खाली तळमजल्यावर होता, ( त्याच वर्गात आम्ही ७ वी मधे असतांना बसायचो )..आत एक नजर टाकली आणि मी,माझ्या मैत्रिणी कोणत्या बाकावर बसत होतो, काय काय मजा केली हे सगळं आठवलं.
त्यानंतर मी गेले स्टाफ-रूम मधे, तिथे दारात एक क्षण मी अडखळले कारण लहानपणी कधीहि आम्हांला आतमधे जाण्याआधी, ’मॅडम, आत येउ का’, असं विचारावं लागायचं. आज मी सरळ आत जाउ शकले, बघितलं तर, काही मॅडम नविन दिसत होत्या पण,सगळ्या मावशी जुन्याच होत्या.मावशी नेहमीप्रमाणे सगळ्या मॅडमसाठी चहा बनवण्यात दंग होत्या मी त्यांना हाक मारली तर त्यांनी मला ओळखलं, मला  तर इतका आनंद झाला; ह्या मावशी सगळ्यांच्या विशेष आवडीच्या कारण कोणताही तास संपल्याची अथवा मधली सुटी किंवा शाळा सुटल्याची सुचना घंटा वाजवून देण्याचं अत्यंत मोलाचं काम ह्या करत होत्या आणि अजुनही करत आहेत.

त्यानंतर मी मोर्चा वळवला वर्गांकडे, माझ्यावेळेस असणा-या माझ्या मॅडमना शोधण्याकरता. एक एक वर्ग बघत-बघत लहानपणचे दिवस आठवत मी सगळ्यात आधी वळले आमच्या चित्रकलेच्या वर्गाकडे.शाळेमधे एक खास वर्गच चित्रकलेसाठी ठेवलेला आहे, जेंव्हा पण आमचा चित्रकलेचा तास असायचा तेंव्हा आम्ही सर्व मुली आपापलं चित्रकलेचं साहित्य घेउन एका रांगेत त्या वर्गात जाउन बसायचो. तो वर्ग सगळ्यात वेगळा, तिथे ठेवलेले बाक ड्रॉईंग करतांना व्यवस्थित बसता येईल असे बनविलेले होते, त्यातच सगळं साहित्य निट रचून ठेवता येईल असे खण होते आणि चित्र काढतांना एकमेकांना धक्का लागणार नाही अशा पध्दतीत ते ठेवलेले होते.ह्या वर्गामधे सगळ्या मुलींनी काढलेली विविध विषयांवरची अगदी सुंदर चित्र लावलेली होती, दिवाळीला मुलींनी बनविलेले आकाश-कंदिल ही लावलेले असायचे.ह्यातच मला आठवली माझी वर्गमैत्रिण नेहा राणा, चित्रकलेच्या मॅडमची आवडती विदयार्थिनी, अतिशय उत्तम चित्र काढणारी, अगदी शांत अशी मुलगी.

त्या वर्गातुन बाहेर पडले तर समोरच बचतगटाच्या मॅडम दिसल्या.ह्या मॅडम दर महिन्याला आम्हां सगळ्या मुलींना ठराविक रक्कम पोस्टात ठेवायला सांगायच्या.ते पैसे जरी आई-बाबांनी दिलेले असायचे तरी, त्या वयापासुन कुठेतरी बचतीची सवय आमच्या मधे शाळेने रूजवली.

पुढे एका वर्गात दिसल्या माझ्या वन ऑफ दि फेवरेट्स डांगे मॅडम.ह्या मॅडम नाही तर सगळ्या मुलींची बेस्ट फ्रेंड.त्यांनी आम्हांला गणित शिकवलं फक्त पुस्तकातलं नाही तर शाळेच्या बाहेर असणा-या जगाचं सुध्दा!! मला अजुन आठवतं, १० वीत असतांना एक तास आमचा ऑफ होता, तेंव्हा डांगे मॅडम खास आमच्याशी गप्पा मारायला आल्या होत्या..पुढे कॉलेजमधे गेल्यावर मुली कशा बदलतात आणि छोटया-छोटया गोष्टींवरून देखील चांगल्या मैत्रिणींमधे कसे वाद होतात ह्याचे मजेदार किस्से सांगितले तसच, मुलं कधीही मदत करायला तयार असतात आणि कदाचित चान्स ही मारून जातात या आणि अशा ब-याच बिषयांवर चर्चा करून त्यांनी आम्हांला पुढे येणा-या प्रसंगांची तोंडओळख करून दिली होती.

त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारून मी पुढच्या मॅडम च्या शोधात निघाले.

लगेच मला दिसल्या सराफ मॅडम. ह्या मॅडमनी मला ख-या अर्थाने घडवलं.लहानपणी मी भरपूर कथाकथन,वक्तृत्व स्पर्धांमधे भाग घ्यायचे तेंव्हा प्रत्येक वेळेस सराफ मॅडमनी माझी तयारी करून घेतली.सादरीकरण कसं करायचं, उच्चार किती अस्खलित असायला हवेत अशा बारिक-सारीक गोष्टींवर त्यांनी खुप भर दिला.त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळेच जवळपास प्रत्येक स्पर्धेत मला माझ्या शाळेसाठी १ला नंबर घेता आला.फक्त अशा स्पर्धांसाठीच नाही तर ७ वी स्कॉलरशिप साठी देखील त्यांनी आम्हां मुलींची खुप छान तयारी करून घेतली.कधी जर आमचा तास ऑफ असेल तर मॅडम आम्हांला त्यांच्या लहानपणच्या गमती-जमती सांगायच्या, तर कधी अशीच एखादी छानशी गोष्ट सांगायच्या.

सराफ मॅडम आणि धामणगावकर मॅडम
नंतर मी भेटले धामणगावकर मॅडमना.ह्या मॅडम म्हणजे माझी अजुन एक मैत्रिणच.माझ्या घराजवळच त्या रहात असल्याने, कधी-कधी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जाउन गप्पा मारत बसायचे.त्यांच्या वडिलांनी घरात एक छोटं ग्रंथालयच तयार केलं होतं, त्यामुळे मला अगदी कधीहि एखादं छान पुस्तक वाचायला मिळायचं.ह्या मॅडम आम्हांला विज्ञान शिकवायच्या.खरं तर, ती एक गंमतच होती.म्हणजे आधी आमच्या  वर्गासाठी दुस-या मॅडम नेमलेल्या होत्या विज्ञान विषयासाठी, शालेय वर्ष सुरू झालं तसे त्यांचे तासही सुरू झाले पण, आमच्या वर्गातल्या कोणत्याच मुलीला त्यांनी शिकवलेलं कळत नव्हतं आणि पटतंही नव्हतं.मग, आम्ही सगळ्या जणींनी एका कागदावर सह्या केल्या आणि आम्हांला ह्या मॅडम ऎवजी धामणगावकर मॅडम हव्या अशी विनंती मुख्याध्यापिकांना केली आणि मॅडम नी ती मान्यही केली आणि धामणगावकर मॅडमनी आम्हांला शिकवायला सुरूवात केली. आज हा प्रसंग आठवून आम्ही दोघी अगदी पोट धरून हसलो.

शाळेत असणा-या सगळ्याच गोष्टी एक-एक करून मला आठवत होत्या.त्यातच आठवण झाली ’पूर्णानंद समोसा’ ची, आमच्या शाळेच्या मागच्या बाजुला हे दुकान होतं, मधली सुटी झाली की, कधीतरी आम्ही मैत्रिणी तिथे जाउन समोसा खायचो.शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा सुटली की हमखास आम्ही तिथेच पळायचो.तिथे मिळणा-या त्या गरम-गरम, खरपुस समोसा ची चव अजुनही आठवते...


गप्पांच्या ओघात कितीतरी असेच प्रसंग समोर आले.

शाळेत दर वर्षी काही स्पर्धा घेतल्या जायच्या.भित्तीपत्रक बनविणे, सुंदर आणि स्वच्छ वर्ग, फॅन्सी ड्रेस वगैरे. ९ वी मधे असतांना आम्हांला शिवाजी महाराजांवर भित्तीपत्रक बनवायचं होतं.मी आणि माझ्या ३-४ मैत्रिणी एकीच्या घरी बसून त्यावर काम करत होतो.बरीच मेहनत घेउन सगळं साहित्य गोळा करून आम्ही तो अंक बनविला होता आणि आमचा नंबर ही आला होता. १० वी मधे असतांना सुंदर आणि स्वच्छ वर्ग स्पर्धेत देखील सगळ्या मुलींनी अगदी मन लावून वर्ग स्वच्छ केला आणि सजवला होता, त्यातही आम्हांला बक्षिस मिळालं होतं.

शाळेमधे अजुन एक धमाल गोष्ट असायची सरस्वती पुजा. श्रावणात गौरी ज्या दिवशी जेवतात त्या दिवशी आमच्या शाळेत सरस्वती पुजा व्हायची.त्या पुजेसाठी सजावट करण्यात, प्रसाद वाटप करण्यात एक वेगळाच आनंद मिळाय़चा.सगळ्या मॅडम अगदी छान तयार होउन यायच्या,मग त्यातली एक जण पुजा सांगायची, आरती व्हायची...अगदी सगळी धमालच...

ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच प्रत्येक मॅडमची असणारी विशिष्ट सवय किंवा लकब ह्यावर गाडी घसरली. आम्हांला इतिहास शिकवायला एक मॅडम होत्या, त्या रोज अगदी न-चुकता केसात एक फुल माळून यायच्या, तर हिंदी शिकवणा-या एक मॅडम डाव्या हाताने लिहायच्या पण त्यांच्या अक्षरासारखं हस्ताक्षर मी आजतागायत बघितलं नाही.मराठी शिकवायला एक मॅडम होत्या त्या मराठी कविता अगदी इतक्या समरसून शिकवायच्या की आम्हांला मराठी विषयाचा कधिहि अभ्यास करावा लागला नाही.संस्कृत च्या मॅडम तर संस्कृतसारखा अवघड विषय अगदी सोपा करून आमच्या कडून इतका व्यवस्थित करून घ्यायच्या की अगदी बोर्डाच्या परिक्षेत देखील कधी टेन्शन आलं नाही. आणि सगळ्यात भारी होत्या आमच्या प्रयोगशाळेच्या मॅडम, त्या प्रत्येक प्रॅक्टिकल च्या वेळी ’एकच’ इतकं ’भारी वाक्य’ बोलायच्या की आम्ही सगळ्या मुली एक क्षणभर स्तब्ध होत असू.

हा तर झाला सगळा गमतीचा भाग पण, आज जेंव्हा मी माझ्या शालेय जीवनाकडे बघते तेंव्हा खरंच मी खुप भाग्यवान आहे हे मला जाणवतं.शारदा मंदिर सारख्या शाळेत आणि भागवत मॅडम, सराफ मॅडम, धामणगांवकर मॅडम, डांगे मॅडम यांच्या हाताखाली मी तयार झाले.त्यांनी सांगितलेल्या, शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिकवलेल्या गोष्टी आज मला कितीतरी उपयोगी पडत आहेत.छोटया वाटणा-या त्या गोष्टींची बिजं शाळेत आमच्या कोवळ्या मनात रोवली गेली आणि आज त्यांचं झालेलं झाड कुठे एखादा अवघड निर्णय घ्यायला मदत करतं तर कुठे आत्मविश्वासाने उभं राहायला हातभार लावतं...

सगळ्यांशी बोलल्यावर एक मात्र जाणवलं की त्या कुठेतरी खुप चिंतीत आहेत.माझ्याशी बोलतांना त्या म्हणत होत्या की,’तुमच्या बॅच सारखी बॅच नंतर आलीच नाही’, हे ऎकुन एक क्षण बरं वाटलं पण, लगेचच कळालं की त्या असं का म्हणत आहेत.आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांनीच मुलांच्या डोळ्याला झापडं लावली आहेत त्यामुळे कोणीहि साहित्य वाचन, नाटक,वक्तृत्व,चित्रकला ह्या गोष्टींकडे बघायला देखील तयार नाही आणि जर मॅडमनी फोर्स केला तर मन लावून मेहनत घेण्याची तयारीही नाही.शाळेची लायब्ररी समृद्ध असुनही कोणीच त्या पुस्तकांवरची धुळ झटकायला तयार नाही!!    

हे सगळं ऎकल्यावर मला तर खुप वाईट वाटलं की, आजकालची मुलं किती दुर्दैवी आहेत, त्यांच्यापासुन शालेय जीवनातला आनंदच हिरावून घेतला जातोय पण, त्यांना किंवा त्यांच्या पालकांनादेखील ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. कदाचित ती जाणीव त्यांना होइपर्यंत उशीर झालेला असेल.

असो.....आज शाळेत गेल्यामुळे माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ मी पुन्हा एकदा स्पर्शुन आले....

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

17 comments:

  1. Priyanka, khup chan lihila ahes, shalechya saglya athawani tajya jhalya. Aaplya aayushyatle saglyat mahattwache diwas... shalet kharya arthane apan wadhlo, ghadlo, pudhchya aayushyasathi tayar jhalo, ek ek changli saway aaplyat rujawli geli. Tu agdi chotya chotya ani majeshir athawani pan ithe sahaj ani sundar bhashet namud kelya ahes, kahi wachtanna dole panawle tar kahi wachtanna khudkan hasu ala... wishesht: science lab chya madam chi majja :P
    Asach chan lihit ja :) Keep it up.

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद दर्शना :D

    ReplyDelete
  3. khup chan lihil aahes priyanka.. vachalyavar mala majhya shalet jaun aalysarkha vatal... :-)
    Swati

    ReplyDelete
  4. धन्यवाद स्वाती :)

    ReplyDelete
  5. छान जमुन आला आहे लेख.. एकदम अस्खलित कि काय म्हणतात तशा लेखिकेप्रमाणे :P
    एकुण सादरीकरन मस्त आहे, म्हणजे शाळेतल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचल्यावर त्याच्याशी निगडीत प्रसंग/अनुभव सांगणं... आवडलं आपल्याला !!..
    आणि तुमच्या शाळेत चक्कर मारुन यायला पण आवडलं !!
    असच लिहीत राहा.

    ReplyDelete
  6. तसं तर आमची कन्या शाळा आहे पण, ठीक आहे ह्या निमित्ताने विक्रम तुलाही माझी शाळा बघता आली ;-)
    खूप धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल :-)

    ReplyDelete
  7. ती "कन्या" शाळा आहे म्हणुनच तर चक्कर मारायला आवडलं... :p

    ReplyDelete
  8. त्यांच्यापासुन शालेय जीवनातला आनंदच हिरावून घेतला जातोय पण, त्यांना किंवा त्यांच्या पालकांनादेखील ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. कदाचित ती जाणीव त्यांना होइपर्यंत उशीर झालेला असेल.

    +1

    शब्दाशब्दांशी सहमत आहे.
    लेख अतिशय छान जमला आहे व मनातून आलेला आहे हे वाचताना जानवतं!

    ReplyDelete
  9. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  10. छान लिहिले आहे... फोटो पण मस्त आहेत. या निबांधाला (लेखाला) १५ पैकी १५ मार्क :)

    - अक्षय

    ReplyDelete
  11. धन्यवाद अक्षय सर :)

    ReplyDelete
  12. KHARACH ,mi mazya shalet gelo ,nantar kalae aapan office made blog vacto aahot ,mast ,keep it up

    ReplyDelete
  13. Khup khup chan diwas hote te, mi pan tyach shalet hote, majhya pan veles bhagwat madam,Saraf madam, jahagirdar madam, ganu madam hya saglya parichayachya wachun khup khup bar watla asa watla aaj parat lahan jhale mi...ani algae dolyat ashru aale, watla ki parat he Sagal ayushya jasa chya tasa jagu shakto ka aapn ?

    ReplyDelete