Saturday, April 6, 2013

घरघर...घर-घर


राहत्या घराचं फक्त अ‍ॅग्रीमेंट मागितलं म्हणून आमच्या घरमालकाने आम्हांला सरळ घराबाहेर जाण्याची धमकी दिली! त्या दिवसापासून आमच्या जिवाला घराचा घोर लागलाय :(

राहतं घर अगदी आम्हा सगळ्यांच्या सोयीचं, ऑफिस, भाजीमार्केट जवळ असणारं आहे. बरं एक-दोघी नाही चांगल्या सातजणी आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय पण आता हे सोडावं लागणार ह्या विचाराने घरी येण्याची इच्छाच जणू मेली आहे.

गेले काही दिवस फक्त एकच विचार डोक्यात फिरतोय आता कुठे जायचं रहायला! ज्या दिवशी भांडण झालं त्याच दिवसापासून सुरूवात केली नविन घर शोधायला पण मनासारखं घर मिळणं इतकं पण सोपं नाहीये ह्या मुंबई शहरामधे

रोज संध्याकाळी घरी आलो की आम्ही एक-एक ठिकाणी जाऊन घर बघतो. पहिल्या दिवशी एका १बीएचके मधे गेलो. तिथे चार मुली सध्या राहत आहेत ज्यांना आता सोडून जायचं आहे. त्या ठिकाणी गेलो आणि एकूण सगळं दृश्य बघून कधी एकदा बाहेर पडतो असं झालं मला आणि माझ्या रूममेटला.
घरामधे इतकं सामान, इतकं सामान भरलेलं दिसत होतं की अक्षरशः ते घर अंगावर पडेल की काय असं वाटत होतं. हॉलमधून आतल्या खोलीमधे जायला अगदी पाऊलवाट उरली होती. जिथे जागा दिसेल तिथे सामान कोंबलेलं होतं. गाद्या जमिनीवर अंथरलेल्या होत्या आणि त्यावर कपड्यांपासून ते खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी पसरलेल्या होत्या. ते बघून विचार आला ह्या पोरी झोपायला वापरतात गादी की सामान फेकायला?
स्वयंपाकघर आणि बाथरूम कडे पूर्ण नजर वळविण्याचे कष्ट न-घेताच त्याची कल्पना आली. घराचा अवतार बघून झाल्यावर तिथे
राहणा-या मुलीला आम्ही भाडं आणि इतर गोष्टी विचारायला म्हणून जाणार तर तिने जी रेकॉर्ड सुरू केली,'हम यहां पे चार लडकीयां रहती हैं, हमें यहांसे जाना नही था, दो साल साथ में ही रहना था लेकीन क्या करे मुझे कॉलेज आने-जाने में दिक्कत होती है, वो दूसरी दीदी को ऑफिस दूर हो गया है लेकीन जो तिसरी लडकी है ना वो यही रहना चाहती है लेकीन हम कोई नही रह सकते ना उसके साथ तो उसे भी जान पड रहा है औरे जो चौथी लडकी हैं ना उसकी शादी हो रही है तो हमें खाली करना पड रहा है लेकीन हमें यहां से जाना नही था....' आणि पुन्हा ती पहिल्या वाक्यावर येणार तितक्यात त्या घराच्या मालकीनबाई आत आल्या आणि आमची त्या फास्ट ट्रेनपासून सुटका झाली. मालकीनबाईंनी त्यांचा भाडं घेण्याचा हिशेब आम्हांला समजावून सांगितला आणि आम्ही तिथून एकदाचे बाहेर पडलो!
बघायला गेलं तर ती इमारत पाच वर्षांपूर्वीच बांधलेली आहे. पण, त्या फ्लॅटची अवस्था इतकी दयनीय करून टाकली होती त्या पोरींनी की, आम्हांला सहन झाली नाही कल्पना त्या जागेला घर म्हणून तिथे राहायला जावं हा विचार करायची. आम्ही अर्थातच तो विचार झटकून टाकला.
दूस-या दिवशी एका पीजी मधे गेलो. तिथेसुध्दा आमच्या सारख्याच मुली राहत होत्या. दोन जणींची जागा रिकामी होणार होती म्हणून बघायला गेलो तर काल बघितलेला फ्लॅटतरी बरा होता असं म्हणायची वेळ आली :( इतकं कसं कोणी अस्वच्छ राहू शकतं यार!!
ज्या खोलीमधे राहायचं, वावरायचं, रात्री येऊन पाठ टेकायची त्या ठिकाणी इतका पसारा का हवा? सकाळी उठून प्रसन्न वाटायच्या ऐवजी आजारी पडेल माणूस अशा ठिकाणी! मी तर फक्त एक नजर फिरवली आणि तिथून अगदी धावत बाहेर पडले. माझ्या रूममेटने बाकी सगळी चौकशी करून बाहेर आली. मी तिच्याकडे बघितलं आणि तिची प्रतिक्रिया मला कळाली.
तिथून पुढे आम्ही अजून एका पीजी ला भेट दिली तिथे तिनजणींसाठी जागा रिकामी होणार होती. त्या घरामधे गेलो आणि सगळ्या पहिले नाकामधे एक घाणेरडा वास भरला. आत गेल्यावर लक्षात आलं की ह्या पोरी घराला असलेल्या खिडक्या कधी उघडतच नाहीत. स्वयंपाकघरामधे एक्झॉस्ट फॅन आहे पण तोही बहुदा शोपिस असावा कारण कांदा-लसणाची फोडणी सुध्दा घरामधे फेर धरून नाचत होती. खोली बघायला गेली तर अहाहा काय ते दृश्य!
आत गेल्या गेल्या चप्पल-बुटांची चळत रचलेली दिसली. त्यावरून नजर हटवत वर बघितलं तर कपड्यांचं स्टँड दिसलं. त्यावर ओल्या कपड्यांचे बोळे बहुदा सुकायला टाकले होते. खोलीला तीन खिडक्या दिसत होत्या पण एकही उघडी नव्हती. फॅन आणि ए.सी. दोन्ही सुरू होतं पण हवा सुरू आहे असं जाणवतही नव्हतं. खोलीचं अवलोकन करून झाल्यावर त्या मुलीवर नजर गेली. ती एकदम खटाखट कपड्यांमधे उभी होती. जणू काही आत्ता पार्लरमधून मेक-अप करून बाहेर पडली आहे. तिला बघून विश्वास बसत नव्हता की तिच मुलगी ह्या उकिरड्यामधे राहते. आम्ही तिच्याशी कसंतरी बोललो आणि तिथून पळ काढला.
दोघीपण बाहेर येऊन भिंतीवर डोकं आपटत होतो की काय अवदसा सुचली आणि त्यादिवशी घरमालकाशी भांडलो. काय गरज होती ते अ‍ॅग्रीमेंट करायची, जर हट्ट धरला नसता तर आज हा दिवस बघावा लागला नसता

तिस-या दिवशी आम्ही ठरवलं की आज फ्लॅट बघूया. पीजी नकोच आपल्याला.

फ्लॅट बघायला गेलो तर एका ठिकाणी २बीएचके होता पण त्यामधे जागा इतकी कमी होती की स्वयंपाकघरामधे एकच माणूस एकावेळी काम करू शकेल आणि त्याचं भाडं म्हणाल तर ३५०००रू. फक्त आणि डिपॉझिट तर झिट आणणारा आकडा १,२५,०००रू. फक्त!! आम्ही लगेच दूस-या ठिकाणी बघायला बाहेर पडलो. तिथे जागा बरीच मोठी होती, घरमालकाने बरंच सामान पण ठेवलेलं होतं पण पुन्हा पैश्याचा प्रश्न आडवा आला. इथे तर भाडं ५०००रू ने अजून वाढलं :(
तिसरा बघायला गेलो तर तो रोडच्या इतक्या जवळ होता की वाटलं आता खिडकीतून उडी मारली तर लगेच रोडवर पोहोचता येईल. आणि एकूण जागा म्हणाल तर इतके काने-कोपरे काढले होते घराला आणि रचना इतकी बदललेली होती की नेमकी झोपायची खोली कोणती आणि दिवाणखाना कुठे हेच कळत नव्हतं. शेवटी गरगरायला लागलं म्हणून बाहेर पडलो पण घराचा प्रश्न अजूनही सुटला नाहीये आमचा :(

आजही संध्याकाळी आल्यावर तेच काम करायचं आहे...स्वतःचं घर घेणं हल्लीच्या काळी आवाक्याच्या बाहेर गेलंय. पण, आता भाडं भरूनसुध्दा घर घेणं किती अवघड आहे ह्याचा पदोपदी प्रत्यय येतोयं...कधी सुटणार आहे आमचा हा प्रश्न काय माहित :(

कोणी घर देता का प्लीज घर....................................................................................


       

2 comments:

  1. बापरे... हा इतका संघर्ष मुलगी स्पेसिफिक आहे का? मला बरंच पटकन आणि स्वस्तात घर मिळालं असं वाटू लागलंय आता! :-o

    ReplyDelete
    Replies
    1. आल्हाद मला वाटतं हा 'लक' स्पेसिफिक मुद्दा आहे :(

      Delete