Tuesday, August 27, 2013

’नवरा’ एक खोज - भाग ५

पी.एच.डी स्पेशल कांदा-पोहे कार्यक्रमानंतर माझ्या घरातल्या सगळ्या मामी-मावशी,आत्या,आजी-
आजोबा,चुलत-मालत अगदी सगळ्यांना कळालं की आमच्या घरात 'यंदा कर्तव्य आहे' Yes 3
मग काय घरी भेटायला येणारा जो-तो मला उपदेशाचे डोस आय मीन मार्गदर्शन करू लागला अगदी माझ्या मामाची इयत्ता ९वी मधे शिकणारी मुलगी सुध्दा मला म्हणाली की,'तुला जो मनापासून आवडेल ना त्याच्याशीच लग्न कर.तो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे!' मी तर बघतच बसले तिच्याकडे Dash 1
काय ना हल्लीची मुलं, सरकारने मान्य केलेल्या वयाच्या आधीच कित्ती सुजाण होतात.मला तर इयत्ता ९वी मधे काही कळतही नव्हतं,असो.
तर असे घरातून, दारातून, शेजा-या-पाजा-यांकडून 'मुलगा कसा शोधावा' इथपासून ते 'सासरी गेल्यावर मुलीने कसं वागावं' इथपर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने मार्गदर्शन करणं सुरू झालं होतं.
स्थळ शोधणे मोहीम जोरदारपणे सुरू होतीच अशातच एक स्थळ आलं,घरच्यांना ठीक वाटलं म्हणून मला चेक करायला सांगितलं,मी भेटण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला.
ठरलेल्या दिवशी मी अन बाबा त्यांच्या घरी जायला निघालो.रस्ता माहीत नसल्यामुळे ते लोक अर्ध्या वाटेत आम्हांला न्यायला आले होते.घरी पोहोचेपर्यंत जेवायची वेळ झाली होती म्हणून त्या काकूंनी आम्हांला जेवायलाच वाढलं.जेवण सुध्दा अगदी सणा-सुदीचं गोडाचं केलेलं होतं.जेवणानंतर त्या काकांनी मगई पान हातावर ठेवलं अन ते खाऊन होत नाही की लगेच समोर आईस्क्रीमने भरलेल्या डिशेस!!
मी तर थक्कच झाले ते सगळं आदरातिथ्य बघून!!
जेवतांना सगळ्यांची ओळख झाली होती नंतर मग मी आणि तो मुलगा वेगळं बोलायला म्हणून एका खोलीत गेलो.त्या मुलाने त्याच्या अपेक्षा नीट मांडल्या अन माझं म्हणणं पण अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं.थोडक्यात महत्त्वाची माहिती एकमेकांना देऊन आम्ही बाहेर येऊन बसलो.ती सगळी मंडळी खुप साधी अन चांगली वाटली.पुन्हा एकदा चहा-पाणी होऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला,दोन दिवसांनी कळवितो असं त्यांनी सांगितलं अन आम्हांला अर्ध्या वाटेत त्यांच्या कारमधून ड्रॉप केलं उन्हाची वेळ होती म्हणून!
मी तर विचारातच पडले, इतकी साधी-सरळ माणसं पण असू शकतात मुलाकडची मंडळी? ग्रेट यारss Biggrin
ह्या विचारांसरशी सुखद गारव्याची लहर स्पर्शून गेल्याचा भास त्या टळटळत्या उन्हातही मला झाला Smile
दोन दिवसांनी त्यांनी फोन करून 'योग नाही' असा निरोप दिला, माशी कुठे शिंकली होती कोणास ठाऊक!!
आलेला पहिलाच 'नकार' पचवायला थोडं जड गेलं मला Cray 2
स्वतःशी विचार सुरू झाला,कुठे अन काय बरं चुकलं असेल? आपण बोललो त्यात तर काही चुकलं नाही ना? काय माहित काय कारण आहे ते.विचारावं का त्या मुलाला तसं?नाही नको,बाबा रागावतील अन असं विचारणं योग्य आहे का?
काही कळत नव्हतं म्हणून मी ताईला फोन केला अन माझ्या डोक्यातले सगळे विचार तिच्यासमोर मांडले.तिला एकूण परिस्थितीची कल्पना होतीच ती लगेच म्हणाली की,'त्या मुलाने तुला नकार का दिला ह्याचं खरं कारण तर आपल्याला कळू शकणार नाही पण हे मात्र नक्की की तुझ्यामधे काही कमी आहे म्हणूनच त्याने असं केलं हे मात्र समजू नकोस.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीने पूर्णच असते पण म्हणून कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांसाठी योग्य असतील असं जरूरी नाहीये.त्यामुळे तू उगाच मूड ऑफ करून घेऊ नकोस आपण तुझ्यासाठी पुन्हा एखादा चांगला मुलगा शोधू,डोन्ट वरी Smile '
ते ऐकून माझ्या डोक्यावरचं टेन्शन एकदम पळूनच गेलं Yahoo

Monday, August 12, 2013

नवरा एक खोज - भाग ४

दरम्यानच्या काळात आई-बाबा मोठ्या बहिणीकडे काही दिवसांसाठी हवापालटाकरता गेले होते आणि त्याच वेळेला माझी माहिती अंकामधे येणार होती, आमच्या हातात पुस्तक पडायच्या आधीच पुन्हा एकदा प्रोफाइल्स चा पाउस पडला.
बाबांनी ह्यावेळेला प्रथम येणा-यास प्रथम संधी असा नियम लाउन एका मुलाचं प्रोफाइल मला बघायला सांगितलं, खूप दिवसानंतर इतका व्यवस्थित फोटो असलेलं हे प्रोफाइल मला सगळ्या अर्थाने चांगलं वाटलं.
पण एक अडचण होती की आई-बाबा घरी नाहीत तर मग कांदे-पोहे कार्यक्रम करायचा कसा? कोणीतरी मोठं माणूस हवं ना. ह्यावर लगेच माझ्या मामाश्रींनी तोडगा काढला, तो आणि माझी मावशी ह्यांनी विडा उचलला आणि कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याची हमी आई-बाबांना दिली हास्य
आमच्याकडची सगळी व्यवस्था लावल्यावर बाबांनी मुलाकडच्यांना कळवलं, तारीख ठरली.
मावशी आणि मामा सकाळीच घरी आले, सगळं घर आम्ही व्यवस्थित लाउन ठेवलं होतच आईने सांगितल्याप्रमाणे.
मावशीने आल्यावर फ्रिज बघितला आणि म्हणाली अगं कांदे-पोहे करायचे तर मिरची, कोथिंबीर, कांदा काहीच नाही, असं कसं?
मी म्हणाले, ’अगं ते लोक लग्नाचं जेवण करून येणार आहेत तर आपण फराळाचं देऊ ना त्यांना, पोहे कशाला करायचे?’
ती म्हणाली, ’असं कसं? ते लोक काय म्हणतील आपल्याला, हे नाही चालणार, तू आत्ता लगेच जा आणि सगळं सामान घेऊन ये!’
मी काय करणार, अडला हरी....मग गेले बाहेर आणि घेऊन आले सगळं Stare
मावशीने पोहे, चहा करण्याची पूर्वतयारी करून ठेवली. मग मामा मला म्हणाला की तू काय साडी घालणारेस का? मी एकदम उडालेच, मी म्हटलं नाही रे, मी साधा पंजाबी ड्रेस घालणार आहे, बाबा म्हणाले चालेल म्हणून, मग दोघेपण काही बोलले नाही. मनात म्हटलं, बरं झालं बाबांचं नाव घेतलं नाहीतर दोघांनी गळ घालून मला साडी नेसायलाच लावली असती!
आम्ही सगळे तयार होऊन त्यांची वाट बघत बसलो, ते अगदी वेळेत घरी पोहोचले.
मावशीने मला आतमधेच थांबायची ताकीद दिली होती, म्हणाली ते लोक आल्यावर मी पाणी नेऊन देणार मग तू पोहे घेऊन ये, मुलीने आधीच बाहेर येऊन बसायचं नसतं..मी काय बोलणार, माझी तर अडकित्यातली सुपारी झाली होती त्यामुळे थांबले आतच Stare
ठरल्याप्रमाणे मावशीने मला पोहे ठेवलेल्या ताटल्यांचा ट्रे घेऊन बाहेर यायला सांगितला. मी बाहेर पाउल ठेवलं आणि मामाने माझं एकदम भरभरून कौतुक करतच ओळख करून दिली, मी एकेएकाला पोहे देत होते त्यामुळे मला मुलाला पण व्यवस्थित बघता आलं, नंतर मी जागेवर बसले.
अतिशयोक्ती वाटेल पण, पोहे दिल्यावर सगळी मंडळी फक्त खात होती १० मिनीटे, कोणीच बोललं नाही! मी, मामा, मावशी आणि माझा भाउ एकमेकांकडे बघून नजरेनेच विचारत होतो काय प्रकार आहे हा? तितक्यात एका काकांची प्लेट रिकामी झाली तसं माझ्या मावशीने अजुन एक राउंड पोहे दिले, तरिपण तीच अवस्था
एकदाचे झाले सगळयांचे पोहे खाऊन आणि त्यांनी प्लेट्स खाली ठेवल्या मग त्या मुलाचे वडील बोलले, त्यांनी सगळ्या कुटुंबाची ओळख करून दिली,प्रथम त्यानी स्वत:ची ओळख करून दिली पीएचडी इन <विषय>, मुलाची आई एम.ए., मग मुलगा पीएचडी इन <विषय>, मग त्याचे सख्खे काका पीएचडी इन <विषय>, काकू अन त्यांची एक छोटी मुलगी.
फक्त शेवटी ज्या दोघींची ओळख करून दिली त्याच पीएचडी नव्हत्या.
त्याचे वडील सांगत होते की माझी मोठी मुलगी पण पीएचडीच आहे आणि जावई सुद्धा.
माझ्या मुलीने पीएचडी केल्यावर तिचं लगेच लग्नं झालं आणि तिला लग्नानंतर एका ठिकाणहून नोकरीचा कॉल आला त्यामुळे मुलीसाठी आमचे जावाईबापू तिच्या नोकरीच्या गावी शिफ्ट झाले, फारच चांगली मंडळी आहेत तिच्या सासरकडची.
अचानक माझ्याकडे बघून त्यांनी प्रश्न विचारला, तू कधी करणारेस पीएचडी?
मी एक क्षण विचार केला आणि सांगितलं की, माझं अजुन काही तसं ठरलं नाहीये, आधी लग्नाचं पार पडू देत मग मी विचार करेन, दोन्ही गोष्टी एकत्र आल्यातर सगळाच गोंधळ होईल म्हणून एक-एक करणार. (माझं उत्तर त्यांना पटलं असावं असं मला वाटलं.)
मग त्या मुलाच्या आईने माझ्याकडे मोर्चा वळवला आणि पुन्हा एकदा कुठे राहतेस पासून जी प्रश्नावली सुरू झाली ती पार स्वयंपाकातलं काय येतं ह्या प्रश्नावरच थांबली! मी अगदी सराईतासारखी उत्तरं दिली त्या सगळ्या प्रश्नांना आणि पुढच्या मा-यासाठी सज्ज झाले. आता होती मुलाची पाळी, त्याने सुरू केलं,
तो : कोणत्या कंपनी मधे काम करतेस?
मी : ....
(लकिली हा मुलगा माझ्याकडेच बघून बोलत होता हास्य )
तो : ऑफीस मधून कुठे बाहेरच्या देशात जाण्याची संधी मिळेल का?
(तो मुलगा यू.एस. ला राहत होता म्हणून कदाचित हा प्रश्न विचारला असेल)
मी : .....
तो :लग्नानंतर एक्झॅक्टली तू कधी पीएचडी करशील?
मी : अजुन लग्न ठरलं नाहीये त्यामुळे मी अजुन तरी लग्नानंतर काय न कधी करेन ह्याचा विचार केलेला नाही, त्यामुळे नक्की तारीख नाही सांगता येणार.
अचानक त्याचे वडील म्हणाले की, आमचा मुलगा प्लॅनिंग करूनच सगळ्या गोष्टी करतो.तो फरच वक्तशीर आहे,त्याचं दिवसाचं सगळं शेडयुल ठरलेलं असतं किती वाजता काय करायचं ते, मला वाटतं प्रत्येकाने असंच असायला हवं म्हणजे आपलं आयुष्य आपल्या हातात राहतं.
हे ऐकून मला एकदम तो दिल चाहता है मधला, सोनाली कुलकर्णी चा बॉयफ्रेंड आठवला, त्याला पण असंच घडयाळानुसार चालायची सवय असते wink (आय होप ही इझ नॉट लाइक दॅट)
तो: लग्नानंतर तुला कुठे राहायला आवडेल?
मे:(हा प्रश्न मला पहिल्यांदाच विचारला गेला हास्य )माझं असं काही नाहीये,मी आय.टी. मधे आहे त्यामुळे जिथे जॉब असेल त्या शहरात मी राहायला तयार आहे.
त्याची आई,बाबा दोघे एकदाच: तू लग्नानंतर जॉब करणारेस??
मी काही बोलणार त्या आधीच माझा मामा: हो, आमची मुलगी लग्नानंतर घरी नाही बसून राहू शकत, ती जॉब करणार. हल्लीच्या मुली खूप स्मार्ट आहेत हो, नोकरी,घर सगळं सांभाळतात.
त्याचे बाबा: अहो पण हल्ली ब-याच कंपन्या घरून पण काम करू देतात म्हणजे काय आहे की कामाचं काम करून होतं आणि घरामधे वेळ पण देता येतो, काय रे (मुलाला उद्देशून),
मग तो मुलगा म्हणाला होना, मागच्याच महिन्यात माझ्या मित्राच्या बायकोने असाच एक जॉब धरला आहे, तू पण तसा करू शाकतेस.
मला काही कळेना, ह्या लोकांना काय अपेक्षित आहे होणा-या सुनेकडून? तिने पी.एच.डी करून घरी भाकरी थापाव्या?? स्वत: च्या मुलीचं पी.एच.डी वाया जाऊ नये म्हणून जावयाला तडजोड करायला लावली आणि सून आणून तिला घरी बसवणार Angry
मला अजिबात पटत नव्हतं, पण आत्ता लगेच नकार दर्शवावा की नाही हे मला कळेना, मी विचार केला, बाबांना सगळं सांगेन आणि मग ठरवेन.
पुढे मी त्या मुलाला काही प्रश्नं विचारले कुठे राहतोस, एकटा राहतोस तर जेवणाचं कसं करतोस, आवडी-निवडी आहेत का, काय आहेत वगैरे वगैरे ...माझ्या नशीबाने त्याने व्यवस्थित उत्तरं दिली.
मग माझ्या मामाने त्याला धूम्रपान,मद्यपान आणि मांसाहाराबद्दल विचारलं तसं त्याच्या चेह-यावरचे भाव एकदम बदलले आणि तो जवळपास ओराडलाच, नाही मला असल्या कोणत्याच वाईट सवयी नाहीत उगाच काहीबाही शंका काढू नका angery
माझा मामा तर चक्रावलाच, त्याने तर साधा प्रश्न विचारला होता, शंका कोणी घेतली? असो..
पुढे कोणीच काही प्रश्नं विचारले नाही आणि ती मंडळी चहा घेऊन निघून गेली.
कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला त्यामुळे मामा आणि मावशी खुश होते पण मी मात्र खट्टु झाले, मला वाटलेलं हा मुलगा सगळ्या अर्थाने चांगला होता पण माझ्या नोकरी आणि पी.एच.डीबद्दल त्यांनी जी काही मतं मांडली त्यावरून मला नव्हती इच्छा त्या मुलासोबत पुढे जाण्याची.
थोड्या वेळाने आई चा फोन आला आणि मी सगळा वृतांत सांगायला सुरूवात केली...

Wednesday, August 7, 2013

’नवरा’ एक खोज - भाग ३

गाडीमधे बसल्या बसल्या मी माझी नाराजी आणि निर्णय व्यवस्थित पणे मांडला आणि अशा त-हेने माझा पहिला-वहिला कांदे-पोहे कार्यक्रम पार पडला 


घरी आल्यावर, घडलेल्या प्रसंगाची चर्चा सुरू झाली. आता त्यात ताईपण सामील झाली होती, बाबा आणि जिजू म्हणत होते की घरचं सगळं चांगलं आहे, मुलगा पण व्यवस्थित आहे तर मग काय हरकत आहे?
मी म्हटलं, जर तो माणूस २४ तास फक्त कामाबद्दल विचार करत असेल तर मला नाही ते पटत. माणसाला स्वत:चं पण काहीतरी लाइफ हवं, काहीतरी विरंगुळा हवा, दोन मित्र-मैत्रिणी हवेत, कामासाठी आपण आहोत की आपल्या गरजेसाठी काम आहे? पु.लं. म्हणतात त्याप्रमाणे पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. माझं मत हे आहे की मी अतीकाम करणार्या सोबत नाही अ‍ॅड्जेस्ट करू शकणार.
आई म्हणाली की, अगं आत्ता तो एकटा आहे त्यामुळे इतकं काम करत असेल, उद्या लग्न झालं की मग घालेल हळू हळू लक्ष सगळ्या गोष्टींमधे.
ताई पुढे आली न म्हणाली की, लग्नानंतर कोणतीही व्यक्ती पूर्णत: बदलू नाही शकत, जर आज त्याला दिवसाचे २० तास काम करायची सवय आहे तर पुढे जाउन फार तर तो एखादा तास कमी काम करेल पण पूर्णपणे तो बदलेल ही अपेक्षा चुकीची आहे तसंच (मला) इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायला लावणं पण चुकीचं आहे..ताईचं म्हणणं सगळ्यांना पटलं आणि माझ्या निर्णयाला मान्यता मिळाली Big smile
त्यानंतर काही दिवस शांततेत गेले मग पुन्हा वधु-वर मंडळाचा नवीन अंक आला की वाचन सुरू, त्यातून पुन्हा काही मुलांची यादी निघाली, त्यांना संपर्क केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यातल्या अर्ध्या लोकांनीच उत्तर पाठवलं. मग ऑफीस मधून आल्यावर रोज़ मी एक एक मुलाची माहिती वाचून ठरवत होते काय करायचं ते, सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा मला त्यातला एकही मुलगा पटला नाही..एखाद्याचं वय खूप जास्त वाटत होतं तर कोणाचं शिक्षण कमी..कोणी चेह-यावरून आणि दिलेल्या माहितीवरून अती-गंभीर तर कोणी प्रकृतीने अती सुधृड!
मी एका गोष्टीने मात्र थक्क झाले की, ह्या सगळ्या प्रोफाइल्स मधे एक गोष्ट समान होती. एकाही मुलाचा फोटो लग्नासाठी स्थळ म्हणून पाठवण्यालायक नव्हता.
म्हणजे कोणी बोटीवर बसून समुद्राकडे बघतांनाचा फोटो पाठवला होता तर कोणी एका अगडबंब घंटेसोबत उभं राहून फोटो काढला होता..
कोणी झाडाखाली उभा राहून सावलीमधे काढलेला फोटो ज्यामधे त्या मुलाच्या चेह-यावर अंधार आहे असा फोटो दिलेला तर एकाने कॉलेजच्या आयडी-कार्डवरचा फोटो विथ शिक्का टाकलेला होता Drunk
कोणी घरच्या अंगणात उभा राहून मळकट्ट-कळकट्ट जीन्स आणि टी-शर्ट विथ स्लिपर्स घालून फोटो काढून पाठवला होता तर कोणी पिकनिकला घोड्यावर बसून काढलेला फोटो दिला होता Crazy
सगळ्यात चमत्कारिक गोष्ट ही होती की, एका मुलाने एका बोटीमाधे बसून (पूर्वीच्या काळी, जत्रेत काही वस्तू ठेऊन त्यासोबत फोटो काढायची पद्धत होती ना तसा) फोटो काढला होता, तो बघून तर हसावं की रडावं हे कळेना आम्हांला, आम्ही त्याला दुसरा फोटो पाठव म्हणून सांगितलं तर त्याने आधी पाठवलेल्या फोटोला क्रॉप केलं आणि फक्त चेहरा दिसेल इतकाच फोटो पाठवला
हे सगळे फोटो बघितल्यावर माझी खूप चिडचिड झाली. मुलीचे फोटो ह्या लोकांना कसे लागतात तर साडीमधे, फुल्ल मेकअप करून, अगदी स्टुडिओ मधे पाच एक हजार वाया घालवून काढलेले आणि मुलांचे फोटो बघा. साधं फेसबूक च्या प्रोफाइल ला फोटो टाकायचा झाला तर हे लोक काय काय करून अगदी चांगल्यातला चांगला फोटो टाकतात आणि लग्नासाठी प्रोफाइल पाठवायचं म्हटलं तर असले फोटो Angry
जर मुलीने तिचे जीन्स मधले, नदीकाठचे किंव्हा पिकनिक ला काढलेले फोटो पाठवले असते तर बघणा-यांनी तिच्या आई-वडिलांचा लगेच उद्धार केला असता आणि फोटो बघुनच नकार कळवला असता.
साधा विचार पण करता येत नाही का ह्या मूलांना आपण काय करतोय ह्याचा, का फक्त मुलाकडची बाजू म्हणून सगळं क्षम्य असतं!
निदान मला तरी नाही पटत, जर मुलीकडून काही अपेक्षा असतील तर मुलाकडून पण तितक्याच अपेक्षा असतात!
माझे हे सगळे विचार ऎकून माझ्या आई-बाबाना आणखिनच टेन्शन आलं पण माझी अपेक्षा काही अवाजवी नाहीये, निदान फोटो तरी चांगला पाठवावा ना मुलाने मग पुढचा विचार करू शकतो आपण Sick
हूह...ह्या महिन्याची यादी अशीच निकालात निघाली...आता पुन्हा पूढचा अंक येईपर्यंत डोक्याला शांतता Party