Wednesday, August 7, 2013

’नवरा’ एक खोज - भाग ३

गाडीमधे बसल्या बसल्या मी माझी नाराजी आणि निर्णय व्यवस्थित पणे मांडला आणि अशा त-हेने माझा पहिला-वहिला कांदे-पोहे कार्यक्रम पार पडला 


घरी आल्यावर, घडलेल्या प्रसंगाची चर्चा सुरू झाली. आता त्यात ताईपण सामील झाली होती, बाबा आणि जिजू म्हणत होते की घरचं सगळं चांगलं आहे, मुलगा पण व्यवस्थित आहे तर मग काय हरकत आहे?
मी म्हटलं, जर तो माणूस २४ तास फक्त कामाबद्दल विचार करत असेल तर मला नाही ते पटत. माणसाला स्वत:चं पण काहीतरी लाइफ हवं, काहीतरी विरंगुळा हवा, दोन मित्र-मैत्रिणी हवेत, कामासाठी आपण आहोत की आपल्या गरजेसाठी काम आहे? पु.लं. म्हणतात त्याप्रमाणे पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. माझं मत हे आहे की मी अतीकाम करणार्या सोबत नाही अ‍ॅड्जेस्ट करू शकणार.
आई म्हणाली की, अगं आत्ता तो एकटा आहे त्यामुळे इतकं काम करत असेल, उद्या लग्न झालं की मग घालेल हळू हळू लक्ष सगळ्या गोष्टींमधे.
ताई पुढे आली न म्हणाली की, लग्नानंतर कोणतीही व्यक्ती पूर्णत: बदलू नाही शकत, जर आज त्याला दिवसाचे २० तास काम करायची सवय आहे तर पुढे जाउन फार तर तो एखादा तास कमी काम करेल पण पूर्णपणे तो बदलेल ही अपेक्षा चुकीची आहे तसंच (मला) इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायला लावणं पण चुकीचं आहे..ताईचं म्हणणं सगळ्यांना पटलं आणि माझ्या निर्णयाला मान्यता मिळाली Big smile
त्यानंतर काही दिवस शांततेत गेले मग पुन्हा वधु-वर मंडळाचा नवीन अंक आला की वाचन सुरू, त्यातून पुन्हा काही मुलांची यादी निघाली, त्यांना संपर्क केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यातल्या अर्ध्या लोकांनीच उत्तर पाठवलं. मग ऑफीस मधून आल्यावर रोज़ मी एक एक मुलाची माहिती वाचून ठरवत होते काय करायचं ते, सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा मला त्यातला एकही मुलगा पटला नाही..एखाद्याचं वय खूप जास्त वाटत होतं तर कोणाचं शिक्षण कमी..कोणी चेह-यावरून आणि दिलेल्या माहितीवरून अती-गंभीर तर कोणी प्रकृतीने अती सुधृड!
मी एका गोष्टीने मात्र थक्क झाले की, ह्या सगळ्या प्रोफाइल्स मधे एक गोष्ट समान होती. एकाही मुलाचा फोटो लग्नासाठी स्थळ म्हणून पाठवण्यालायक नव्हता.
म्हणजे कोणी बोटीवर बसून समुद्राकडे बघतांनाचा फोटो पाठवला होता तर कोणी एका अगडबंब घंटेसोबत उभं राहून फोटो काढला होता..
कोणी झाडाखाली उभा राहून सावलीमधे काढलेला फोटो ज्यामधे त्या मुलाच्या चेह-यावर अंधार आहे असा फोटो दिलेला तर एकाने कॉलेजच्या आयडी-कार्डवरचा फोटो विथ शिक्का टाकलेला होता Drunk
कोणी घरच्या अंगणात उभा राहून मळकट्ट-कळकट्ट जीन्स आणि टी-शर्ट विथ स्लिपर्स घालून फोटो काढून पाठवला होता तर कोणी पिकनिकला घोड्यावर बसून काढलेला फोटो दिला होता Crazy
सगळ्यात चमत्कारिक गोष्ट ही होती की, एका मुलाने एका बोटीमाधे बसून (पूर्वीच्या काळी, जत्रेत काही वस्तू ठेऊन त्यासोबत फोटो काढायची पद्धत होती ना तसा) फोटो काढला होता, तो बघून तर हसावं की रडावं हे कळेना आम्हांला, आम्ही त्याला दुसरा फोटो पाठव म्हणून सांगितलं तर त्याने आधी पाठवलेल्या फोटोला क्रॉप केलं आणि फक्त चेहरा दिसेल इतकाच फोटो पाठवला
हे सगळे फोटो बघितल्यावर माझी खूप चिडचिड झाली. मुलीचे फोटो ह्या लोकांना कसे लागतात तर साडीमधे, फुल्ल मेकअप करून, अगदी स्टुडिओ मधे पाच एक हजार वाया घालवून काढलेले आणि मुलांचे फोटो बघा. साधं फेसबूक च्या प्रोफाइल ला फोटो टाकायचा झाला तर हे लोक काय काय करून अगदी चांगल्यातला चांगला फोटो टाकतात आणि लग्नासाठी प्रोफाइल पाठवायचं म्हटलं तर असले फोटो Angry
जर मुलीने तिचे जीन्स मधले, नदीकाठचे किंव्हा पिकनिक ला काढलेले फोटो पाठवले असते तर बघणा-यांनी तिच्या आई-वडिलांचा लगेच उद्धार केला असता आणि फोटो बघुनच नकार कळवला असता.
साधा विचार पण करता येत नाही का ह्या मूलांना आपण काय करतोय ह्याचा, का फक्त मुलाकडची बाजू म्हणून सगळं क्षम्य असतं!
निदान मला तरी नाही पटत, जर मुलीकडून काही अपेक्षा असतील तर मुलाकडून पण तितक्याच अपेक्षा असतात!
माझे हे सगळे विचार ऎकून माझ्या आई-बाबाना आणखिनच टेन्शन आलं पण माझी अपेक्षा काही अवाजवी नाहीये, निदान फोटो तरी चांगला पाठवावा ना मुलाने मग पुढचा विचार करू शकतो आपण Sick
हूह...ह्या महिन्याची यादी अशीच निकालात निघाली...आता पुन्हा पूढचा अंक येईपर्यंत डोक्याला शांतता Party

4 comments:

  1. hahaha....
    Even being a fashion photographer, I do not really have an idea about shooting those sort of photos. Things suddenly start looking cheesy!

    ReplyDelete
  2. Exactly describe kela aahe, boys che photo asech astaat with biodata!

    ReplyDelete