दरम्यानच्या काळात आई-बाबा मोठ्या बहिणीकडे काही दिवसांसाठी हवापालटाकरता गेले
होते आणि त्याच वेळेला माझी माहिती अंकामधे येणार होती, आमच्या हातात पुस्तक
पडायच्या आधीच पुन्हा एकदा प्रोफाइल्स चा पाउस पडला.
बाबांनी ह्यावेळेला प्रथम येणा-यास प्रथम संधी असा नियम लाउन एका मुलाचं
प्रोफाइल मला बघायला सांगितलं, खूप दिवसानंतर इतका व्यवस्थित फोटो असलेलं हे
प्रोफाइल मला सगळ्या अर्थाने चांगलं वाटलं.पण एक अडचण होती की आई-बाबा घरी नाहीत तर मग कांदे-पोहे कार्यक्रम करायचा कसा? कोणीतरी मोठं माणूस हवं ना. ह्यावर लगेच माझ्या मामाश्रींनी तोडगा काढला, तो आणि माझी मावशी ह्यांनी विडा उचलला आणि कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याची हमी आई-बाबांना दिली
आमच्याकडची सगळी व्यवस्था लावल्यावर बाबांनी मुलाकडच्यांना कळवलं, तारीख ठरली.
मावशी आणि मामा सकाळीच घरी आले, सगळं घर आम्ही व्यवस्थित लाउन ठेवलं होतच आईने सांगितल्याप्रमाणे.
मावशीने आल्यावर फ्रिज बघितला आणि म्हणाली अगं कांदे-पोहे करायचे तर मिरची, कोथिंबीर, कांदा काहीच नाही, असं कसं?
मी म्हणाले, ’अगं ते लोक लग्नाचं जेवण करून येणार आहेत तर आपण फराळाचं देऊ ना त्यांना, पोहे कशाला करायचे?’
ती म्हणाली, ’असं कसं? ते लोक काय म्हणतील आपल्याला, हे नाही चालणार, तू आत्ता लगेच जा आणि सगळं सामान घेऊन ये!’
मी काय करणार, अडला हरी....मग गेले बाहेर आणि घेऊन आले सगळं
मावशीने पोहे, चहा करण्याची पूर्वतयारी करून ठेवली. मग मामा मला म्हणाला की तू काय साडी घालणारेस का? मी एकदम उडालेच, मी म्हटलं नाही रे, मी साधा पंजाबी ड्रेस घालणार आहे, बाबा म्हणाले चालेल म्हणून, मग दोघेपण काही बोलले नाही. मनात म्हटलं, बरं झालं बाबांचं नाव घेतलं नाहीतर दोघांनी गळ घालून मला साडी नेसायलाच लावली असती!
आम्ही सगळे तयार होऊन त्यांची वाट बघत बसलो, ते अगदी वेळेत घरी पोहोचले.
मावशीने मला आतमधेच थांबायची ताकीद दिली होती, म्हणाली ते लोक आल्यावर मी पाणी नेऊन देणार मग तू पोहे घेऊन ये, मुलीने आधीच बाहेर येऊन बसायचं नसतं..मी काय बोलणार, माझी तर अडकित्यातली सुपारी झाली होती त्यामुळे थांबले आतच
ठरल्याप्रमाणे मावशीने मला पोहे ठेवलेल्या ताटल्यांचा ट्रे घेऊन बाहेर यायला सांगितला. मी बाहेर पाउल ठेवलं आणि मामाने माझं एकदम भरभरून कौतुक करतच ओळख करून दिली, मी एकेएकाला पोहे देत होते त्यामुळे मला मुलाला पण व्यवस्थित बघता आलं, नंतर मी जागेवर बसले.
अतिशयोक्ती वाटेल पण, पोहे दिल्यावर सगळी मंडळी फक्त खात होती १० मिनीटे, कोणीच बोललं नाही! मी, मामा, मावशी आणि माझा भाउ एकमेकांकडे बघून नजरेनेच विचारत होतो काय प्रकार आहे हा? तितक्यात एका काकांची प्लेट रिकामी झाली तसं माझ्या मावशीने अजुन एक राउंड पोहे दिले, तरिपण तीच अवस्था
एकदाचे झाले सगळयांचे पोहे खाऊन आणि त्यांनी प्लेट्स खाली ठेवल्या मग त्या मुलाचे वडील बोलले, त्यांनी सगळ्या कुटुंबाची ओळख करून दिली,प्रथम त्यानी स्वत:ची ओळख करून दिली पीएचडी इन <विषय>, मुलाची आई एम.ए., मग मुलगा पीएचडी इन <विषय>, मग त्याचे सख्खे काका पीएचडी इन <विषय>, काकू अन त्यांची एक छोटी मुलगी.
फक्त शेवटी ज्या दोघींची ओळख करून दिली त्याच पीएचडी नव्हत्या.
त्याचे वडील सांगत होते की माझी मोठी मुलगी पण पीएचडीच आहे आणि जावई सुद्धा.
माझ्या मुलीने पीएचडी केल्यावर तिचं लगेच लग्नं झालं आणि तिला लग्नानंतर एका ठिकाणहून नोकरीचा कॉल आला त्यामुळे मुलीसाठी आमचे जावाईबापू तिच्या नोकरीच्या गावी शिफ्ट झाले, फारच चांगली मंडळी आहेत तिच्या सासरकडची.
अचानक माझ्याकडे बघून त्यांनी प्रश्न विचारला, तू कधी करणारेस पीएचडी?
मी एक क्षण विचार केला आणि सांगितलं की, माझं अजुन काही तसं ठरलं नाहीये, आधी लग्नाचं पार पडू देत मग मी विचार करेन, दोन्ही गोष्टी एकत्र आल्यातर सगळाच गोंधळ होईल म्हणून एक-एक करणार. (माझं उत्तर त्यांना पटलं असावं असं मला वाटलं.)
मग त्या मुलाच्या आईने माझ्याकडे मोर्चा वळवला आणि पुन्हा एकदा कुठे राहतेस पासून जी प्रश्नावली सुरू झाली ती पार स्वयंपाकातलं काय येतं ह्या प्रश्नावरच थांबली! मी अगदी सराईतासारखी उत्तरं दिली त्या सगळ्या प्रश्नांना आणि पुढच्या मा-यासाठी सज्ज झाले. आता होती मुलाची पाळी, त्याने सुरू केलं,
तो : कोणत्या कंपनी मधे काम करतेस?
मी : ....
(लकिली हा मुलगा माझ्याकडेच बघून बोलत होता )
तो : ऑफीस मधून कुठे बाहेरच्या देशात जाण्याची संधी मिळेल का?
(तो मुलगा यू.एस. ला राहत होता म्हणून कदाचित हा प्रश्न विचारला असेल)
मी : .....
तो :लग्नानंतर एक्झॅक्टली तू कधी पीएचडी करशील?
मी : अजुन लग्न ठरलं नाहीये त्यामुळे मी अजुन तरी लग्नानंतर काय न कधी करेन ह्याचा विचार केलेला नाही, त्यामुळे नक्की तारीख नाही सांगता येणार.
अचानक त्याचे वडील म्हणाले की, आमचा मुलगा प्लॅनिंग करूनच सगळ्या गोष्टी करतो.तो फरच वक्तशीर आहे,त्याचं दिवसाचं सगळं शेडयुल ठरलेलं असतं किती वाजता काय करायचं ते, मला वाटतं प्रत्येकाने असंच असायला हवं म्हणजे आपलं आयुष्य आपल्या हातात राहतं.
हे ऐकून मला एकदम तो दिल चाहता है मधला, सोनाली कुलकर्णी चा बॉयफ्रेंड आठवला, त्याला पण असंच घडयाळानुसार चालायची सवय असते (आय होप ही इझ नॉट लाइक दॅट)
तो: लग्नानंतर तुला कुठे राहायला आवडेल?
मे:(हा प्रश्न मला पहिल्यांदाच विचारला गेला )माझं असं काही नाहीये,मी आय.टी. मधे आहे त्यामुळे जिथे जॉब असेल त्या शहरात मी राहायला तयार आहे.
त्याची आई,बाबा दोघे एकदाच: तू लग्नानंतर जॉब करणारेस??
मी काही बोलणार त्या आधीच माझा मामा: हो, आमची मुलगी लग्नानंतर घरी नाही बसून राहू शकत, ती जॉब करणार. हल्लीच्या मुली खूप स्मार्ट आहेत हो, नोकरी,घर सगळं सांभाळतात.
त्याचे बाबा: अहो पण हल्ली ब-याच कंपन्या घरून पण काम करू देतात म्हणजे काय आहे की कामाचं काम करून होतं आणि घरामधे वेळ पण देता येतो, काय रे (मुलाला उद्देशून),
मग तो मुलगा म्हणाला होना, मागच्याच महिन्यात माझ्या मित्राच्या बायकोने असाच एक जॉब धरला आहे, तू पण तसा करू शाकतेस.
मला काही कळेना, ह्या लोकांना काय अपेक्षित आहे होणा-या सुनेकडून? तिने पी.एच.डी करून घरी भाकरी थापाव्या?? स्वत: च्या मुलीचं पी.एच.डी वाया जाऊ नये म्हणून जावयाला तडजोड करायला लावली आणि सून आणून तिला घरी बसवणार
मला अजिबात पटत नव्हतं, पण आत्ता लगेच नकार दर्शवावा की नाही हे मला कळेना, मी विचार केला, बाबांना सगळं सांगेन आणि मग ठरवेन.
पुढे मी त्या मुलाला काही प्रश्नं विचारले कुठे राहतोस, एकटा राहतोस तर जेवणाचं कसं करतोस, आवडी-निवडी आहेत का, काय आहेत वगैरे वगैरे ...माझ्या नशीबाने त्याने व्यवस्थित उत्तरं दिली.
मग माझ्या मामाने त्याला धूम्रपान,मद्यपान आणि मांसाहाराबद्दल विचारलं तसं त्याच्या चेह-यावरचे भाव एकदम बदलले आणि तो जवळपास ओराडलाच, नाही मला असल्या कोणत्याच वाईट सवयी नाहीत उगाच काहीबाही शंका काढू नका
माझा मामा तर चक्रावलाच, त्याने तर साधा प्रश्न विचारला होता, शंका कोणी घेतली? असो..
पुढे कोणीच काही प्रश्नं विचारले नाही आणि ती मंडळी चहा घेऊन निघून गेली.
कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला त्यामुळे मामा आणि मावशी खुश होते पण मी मात्र खट्टु झाले, मला वाटलेलं हा मुलगा सगळ्या अर्थाने चांगला होता पण माझ्या नोकरी आणि पी.एच.डीबद्दल त्यांनी जी काही मतं मांडली त्यावरून मला नव्हती इच्छा त्या मुलासोबत पुढे जाण्याची.
थोड्या वेळाने आई चा फोन आला आणि मी सगळा वृतांत सांगायला सुरूवात केली...
:)
ReplyDelete:) :)
Delete