Tuesday, June 3, 2014

माझी सवत

आमच्या लग्नाचे कौतुकाचे दिवस संपले म्हणजेच ऑफिस वगैरे रूटीन चालू झालं आणि माझ्या सवतीनं आमच्या संसारात प्रवेश केला!

सकाळ म्हणू नका,रात्र म्हणू नका सारखी आपली ती नव-याच्या जवळच! मी अजून तशी नवी नवरी होते पण जुनी व्हायच्या आतच त्या दोघांचं सुत जुळलं.

ऑफिसमधून घरी आल्यावर नव-यासोबत दिवसभरात काय झालं काय नाही हे बोलायला जावं तर नवरोबांचं लक्ष सगळं तिच्याकडेच!

मी एक-दोनदा प्रेमाने सांगून बघितलं पण माझे शब्द वा-यावरच.मग थोडंसं रागावून बघितलं पण छे! माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे नव-याला!! रूसले-फुगले तरी क्काही काही परिणाम झाला नाही मग शेवटी ब्रम्हास्त्र वापरायचं ठरवलं आणि अबोला धरला.मला खात्री होती की हे अस्त्र कधी निकामी जाणार नाही पण हाय रे कर्मा! माझा अबोला असेपर्यंत नव-याने विचारपूस केली पण मी पूर्ववत झाल्यावर परत पहिले पाढे पंच्चावन.

साम-दाम-दंड-भेद सगळं काही वापरून झालं पण कशाचाच उपयोग होईना.काय करू आणि तिला नव-यापासून वेगळं करू हा एकच विचार डोक्यात घुमू लागला पण उत्तर काही सापडेना.ह्यामुळे माझ्या सवतीला जे हवं होतं ते मात्र होऊ लागलं - आमच्यामधे वाद व्हायला लागले.कधी मी गप्प तर कधी तो गप्प,दिवस दिवस संभाषण होईना!

मला तिचं घरात असणं सहन होत नव्हतं पण नवरा काही तिला दूर करायला तयार होत नव्हता.माझी नुसती चिडचिड होऊ लागली पण तिकडे नव-याला त्याची जाणीवही नव्हती.तिच्याविरूद्ध बोललेला एक शब्दही त्याला खपत नव्हता.माझ्यापेक्षा त्याला तिचं महत्त्व जास्त वाटत होतं.सकाळी उठल्यापासून ते रात्री अगदी झोपतांना सुध्दा तीच जवळ, मी असले-नसले तरी काही फरक पडेनासा झाला.

हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागलं मग मात्र मी ह्या प्रश्नाचा तुकडा पाडायचा ठरवलं आणि नव-याला स्पष्टपणे विचारलं,

मी - तुला तुझ्या आयुष्यात ती हवी आहे की मी?
नवरा ( खवचटपणे ) - दोघीही!
मी - ते आता शक्य नाही. एकतर मी तरी ह्या घरात राहीन नाहीतर ती तरी, ठरव काय ते एकदाचं. मला असं रोज रोजचं मरण नकोय!
नवरा - हम्म विचार करावा लागेल.
मी - विचार करावा लागेल काय?? ठीक आहे! तू करत बस विचार मी ठरवलं आहे जर ती ह्या घरात राहणार असेल तर मी ही निघाले!!
नवरा - लगेच निघत आहेस की उद्या जाणार?
मी ह्यावर काही बोलूच शकले नाही आणि अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले! तो मात्र शांतपणे स्मीतहास्य करत माझ्याजवळ आला आणि माझ्या हातात एक छानसं गिफ्ट ठेवत म्हटला,' हे बघून ठरवं खरंच जायचं आहे की नाही ते'.

मला तर काही कळतंच नव्हतं हे सगळं काय चाललंय ते!
मी ते गिफ्ट उघडून बघितलं आणि त्यात एक नवा-कोरा टॅबलेट होता!  :)   :)


... आता आमच्याकडे सगळं आलबेल आहे.नवरा त्याच्या मोबाईलमधे आणि मी माझ्या टॅबमधे बिझी आहे :D

2 comments: