Tuesday, June 24, 2014

किंमत

परवा एका कार्यक्रमाला गेले होते,घरगुतीच होता,पण लग्न झाल्यावर हजेरी लावायचा तसा पहिलाच प्रसंग.अलिखित नियमानुसार भरजरी साडी घालायचीच होती त्यामुळे, सगळा जामानिमा करून मी पैठणी नेसून त्यावर साजेसे असलेले दागिने घालून गेले.

कार्यक्रम सुरू झाला,माझ्यासारख्या बघ्यांची संख्या बरीच होती म्हणून गप्पा चालू झाल्या.माझ्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या ब-याच जणी होत्या.गप्पांमधे साहजिकच साडी कुठे घेतली,कोणी दिली वगैरे वरून चर्चा समस्त भारतीय स्त्रीवर्गाच्या जिव्हाळ्याच्या म्हणजेच दागिन्यांच्या विषयावर आली! मला विचारणा झाली मी घातलेले दागिने किती तोळ्याचे वगैरे..मी माझ्या सवयीप्रमाणे काहीही आव न-आणता सांगितलं 'खोटे आहेत'.मी तर सहजच बोलले पण त्या दोन शब्दांनी ऐकणा-यांच्या डोक्यावर घणाघाती वार केल्यासारखं झालं!! चक्क खोटे दागिने??? अगं तुझ्या माहेरच्यांनी,सासरच्यांनी काही दागिने नाही घातले तुझ्या अंगावर?? हे ऐकून मी दचकलेच आणि कसंबसं उत्तर देऊन तिथून निघून गेले.

दिवसभर तोच विषय डोक्यात घोळत राहिला.माझ्या दागिन्यांबद्दलची त्यांची प्रतिक्रिया इतकी भयंकर होती की जणू काही मी काहीतरी पाप केलं होतं खोटे दागिने घालून!

अचानक मला आईसोबत झालेला संवाद आठवला.माझं लग्न ठरलं तेंव्हा आई मागे लागली होती की अगं, आता लग्न आहे तुझं तेंव्हा आता तरी दागिने घे.पण, माझं आपलं एकच,नको गं आई मला काही हौस नाहीये ते सोन्याचे दागिने घालायची आणि सांभाळणार कोण गं त्यांना! नको करूस तू उगाच खर्च! तरी आईने, जे काही जुजबी दागिने असतात ते माझ्या अंगावर लग्नामधे घातले आणि सासरी पण माझा हाच सूर असल्यामुळे त्यांनीही आईचाच कित्ता गिरवला.

बरं लग्न झाल्यावरही माझे सगळे दागिने मी सासूबाईंकडे ठेवले आणि प्रत्येक साडीला शोभून दिसेल अशी वेगळी ट्रेडिशनल,आर्टिफिशीयल ज्वेलरी घेतली.

पण त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाने माझे डोळे खाड्कन उघडले आणि आईचं म्हणणं न-ऐकल्याचा जबरदस्त फटका मला बसला! मात्र एक गोष्ट जी आजवर मला समजली नव्हती ती चांगलीच कळाली! आपल्या देशामधे सोन्याची इतकी मागणी आजही का आहे ते कळालं.म्हणजे, सरकारने सोन्यावर जास्त कर आकारला तरी मागणी काही कमी झालेली नाही कारण, आजही अजूनही लोक अंगावर किती किलो सोनं आहे ह्यावरूनच तुमची किंमत ठरवतात!!

भलेही तुम्ही उच्चशिक्षित असू दे,तुमच्या मालकिची गाडी,मोठ्या शहरामधे फ्लॅट असू देत,लठ्ठ पगाराची नोकरी असू देत किंवा हि-याचे ढीगभर दागिने असू देत पण छे! जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने नाहीत तर तुम्ही कफल्लकच! तुमची किंमत शून्यच!!

पण हे काही आजच्या काळातलं दुखणं नाही अगदी पुराणकाळापासून चालत आलेलं आहे.चातुर्मासाच्या पुस्तकामधे श्रावणातल्या प्रत्येक दिवसाची कहानी दिलेली आहे त्यात मी एक गोष्ट वाचली होती.एक भाऊ आपल्या गरीब बहिणीला विचारतही नसतो पण जेंव्हा ती त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते त्यानंतर तो तिची विचारपूस करतो आणि तिला घरी जेवायला बोलावतो.पण ती बहिण तिच्या अंगावरच्या दागिन्यांना ताटासमोर मांडते आणि न-जेवता निघून जाते! काय ना माणसापेक्षासुध्दा तो पिवळा धातू किती महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे!

हूssह!
बापरे! खूपच गहन की काय विचार केला मी त्या एवढ्याशा प्रसंगावर! पण आता मला चांगलंच समजलं आहे त्यामुळे आता मी ठरवलं आहे आणि नव-याला सुध्दा निटच समजावून सांगितलं आहे की, ह्यावर्षी निदान एक किलो तरी सोनं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच! उगाच कोणी आपली किंमत कमी नको समजायला!!! हूं!!

No comments:

Post a Comment