Saturday, August 16, 2014

पुराणातली वांगी

ह्यावर्षे गणपती कोणता घ्यायचा हे ठरविण्यासाठी म्हणून मी सगळ्या दुकानांमधे जाऊन बघत होते आणि एका ठिकाणी ही मूर्ती दिसली.


आता तुम्ही म्हणाल ह्यात काय आहे, अगदी नेहमी असते तशी साधी, सोज्वळ अशी ही मूर्ती आहे. नाही! ह्या मुर्तीमधे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की मला काय वेगळं दिसलं. गणपतीची बायको त्याचा पाय मांडीवर घेऊन चेपत बसली आहे असं ह्या मुर्तीचं स्वरूप आहे, आणि इथेच तर मोठी अडचण आहे!!!

का असं दाखवलं आहे कलाकाराने?? गणपतीची बायको ही सुध्दा देवीच एक रूप आहे, तिला सुद्धा दैवी शक्ती आहेत मग तिने का म्हणून पाय चेपायचे?

असं अजून एक उदाहरण आहे हे बघा

ह्यामधे तर देवी लक्ष्मी विष्णूदेवांचे पाय चेपत आहे देवी लक्ष्मी!!??!! पुराणापासून ते आजतागायत आणि पुढेही सगळ्यात शक्तीवान असणारी देवी म्हणजे लक्ष्मी! तिच्याशिवाय जगामधे कोणताच व्यवहार होऊ शकत नाही. तिचा वास असेल ते घर सर्वसुखसंपन्न असतं आणि तरी अशा शक्तीवान देवीने का म्हणून देवाचे पाय दाबायचे?

जो कोणी कलाकार आहे ही असली चित्रं किंवा मूर्ती बनविण्याच्या मागे त्याने काय विचार करून असं दर्शविलं असेल?? ह्यामागे असा विचार तर नसेल ना की, देवी आहे म्हणून काय झालं ती पण एक 'स्त्री'च आहे ना मग तिचं हे कर्तव्यच आहे!!

ग.दि.माडगुळकरांनी रचलेल्या गीतरामायणामधे एक गीत आहे, जेंव्हा राम आणि लक्ष्मण वनवासाला जायला निघतात तेंव्हा श्रीराम आपल्या पत्नीचा-सितेचा निरोप घ्यायला येतात तेंव्हा ती म्हणते,

निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सिता

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचें अखंड पूजन
हें आर्यांचें नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणितां?    

अरे?? हे आर्य नारी जीवन हे कोणी ठरवलं?? का म्हणून स्त्रीने पत्नी झाल्यावर आपल्या पतीची सेवाच करायची?? तिचं हेच कर्तव्य आहे हे ठरविणारे तुम्ही कोण?? ती एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्व आहे, तिला तिचं आयुष्य कसं व्यतित करायचं हे सांगणारे आणि तिला तसं वागायला भाग पाडणारे तुम्ही कोण?? देवालासुध्दा हा अधिकार नाही!!!

आपल्याकडे अगदी पूर्वकाळापासून पुरूषालाच महत्त्व दिलेलं आहे मग तो देव मानवी रूपामधे जन्मलेला असू देत नाहीतर ऋषीमुनी असू देत. प्रत्येक ठिकाणी त्याचं कर्तुत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. कोणत्या पोथी-पुराणामधे एखाद्या देवीच्या लहानपणीची गोष्ट दिलेली आहे? तेच तुम्ही श्रीकृष्ण किंवा राम घ्या, त्यांच्या बाळलिलांच्या सुरस कथा पिढ्यानपिढ्या गात आल्या आहेत. 

का म्हणून असा भेदभाव तोही देविदेवतांच्या काळापासून? नाही म्हणायला देवीला 'आदिशक्ती' 'आदिमाया' अशी गोड गोड विशेषणं दिली आहेत आणि असंही दाखवलं गेलं आहे की भगवान शंकर तिचंच ध्यान करत असतात.
पण तरीही अशी चित्रं, अशा कथांमधून सामान्य माणसाने काय बोध घेतला? तर स्त्री ही दुय्यम आहे. जर देवी असून ती देवाचे पाय चेपते तर दानवापेक्षाही क्रूर असणा-या पुरूषाचे, ज्याला देवाच्या नखाचीसुध्दा सर नाही, अशाचे पाय दाबायचे, सगळी सेवा करायची!!! आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की, अशा वागणूकीमुळे एक आई स्वतःच्या मुलीला असंच शिकवत आली गेल्या कित्येक पिढ्या की, तू तुझ्या पतीची सेवा करायची!!!

अरे हट्!! ह्या असल्या गोष्टी आता बास झाल्या. कोणतंही क्षेत्र घ्या स्त्री तिच्या कर्तुत्वाने पुरूषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे.

पुरे करा आता ही पुराणातली वांगी चघळणं!! बदला म्हणावं असली ही सडकी-कुजकी मानसिकता!!

Thursday, August 14, 2014

१५ ऑगस्ट प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!?!!

व्वाह! भारीच आहेत हे 'पोश्टर बॉईज'!!

होर्डिंगवर दिसणा-यांना आणि हे होर्डिंग/फ्लेक्स बनविणा-यांना १५ ऑगस्ट काय आहे आणि तो का साजरा(?) करायचा हे माहित तरी असेल काहो? आपण मारे त्यांच्यावर ताशेरे ओढतोय हा फोटो लाईक आणि शेयर करून पण त्यांना म्...हणा किंवा सिग्नल ला झेंडे विकणा-यांना म्हणा खरंच १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचं महत्त्व माहित आहे का? आपल्या देशामधे प्रत्येकच गोष्टीचा इव्हेंट होतोय हल्ली, तसा हा पण एक, अशीच ह्यांची समजूत असणार खात्री आहे माझी!!

सध्या व्हॉट्स अप ह्या मेसेजींग अ‍ॅपवर सुध्दा देशभक्तीचा पुळका येऊन प्रत्येकाने ग्रुपचे किंवा स्वतःचे फोटो म्हणून तिरंगा झेंड्याचा फोटो टाकला आहे आणि दुस-याने तसं करावं असं आव्हानही करत आहेत.पण मला सांगा, स्वातंत्र्यदिन हा काय 'व्हॅलेंटाईन डे' किंवा 'मदर्स डे' आहे का फक्त एक दिवस साजरा करायला आणि देशासाठी प्राण दिलेल्यांची आठवण काढून गाणे वाजवायला?? अरे आपल्या देशाचा अभिमान प्रत्येक क्षणी आपल्या वागण्या-बोलण्यातून झळकला पाहिजे!!

ते पण ठीक आहे मी म्हणेन एकवेळ पण, आपण भारतीय लोक परदेशी लोकांचं विशेषतः अमेरिकेतील लोकांचं जमेल तितकं अनुकरण करतो मग, त्यांना असलेला देशाचा अभिमान आपल्याला दिसत का नाही? ते लोक काहीही झालं तरी त्यांच्या देशाच्या झेंड्याचा अपमान होऊ देत नाहीत आणि करणा-याला जबर शिक्षा करतात आणि आपल्या देशात? आता १५ ऑगस्ट च्या एक आठवडा आधी भरभरून झेंड्यांची विक्री होईल आणि स्वातंत्र्यदिन संपला की तो एक कागदाचा कपटा होऊन रस्त्यांवर इतस्ततः पसरेल. मग त्यावर पाय देऊन आपणच चालत जाऊ आणि गाड्या नेऊन त्याची 'शान' मातीत मिसळवू!! ही आपली देशभक्ती आहे!! क्या बात है!! इसलिए मेरा देश महान है!!! जय भारतमाता! स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

ह्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांना असंच मातीत गाडून त्यावर आपल्या निर्लज्जपणाचे मनोरे उभारू!!!

संस्कृतीरक्षक

लग्न झाल्यावर मुलीच्या घरचं पाणीसुध्दा चालत नाही हो आम्हांला आणि जर सुनेच्या माहेरचं कोणी आलं तर आम्ही देतही नाही!

हो बरोबर वाचलं तुम्ही, विश्वास बसत नसेल तर परत एकदा वाचा!

आज साल२०१४ चालू आहे आणि तरी एका सुशिक्षित,सुसंस्कृत आणि सुखवस्तू घरात हा संवाद ऐकायला मिळाला.

एक आजोबा अगदी संस्कृती रक्षकाचा आव आणत सांगत होते.पुढे म्हटले आम्हांला आमच्या सुनेने नोकरी केलेलं सुध्दा चालत नाही.घरामधे कर्तबगार पुरूष असतांना बायकांना घराबाहेर पडायची गरजच काय म्हणतो मी!! आणि ह्यामुळेच गोल्डमेडल मिळवलेली त्यांची सुन आजही घरामधे भाक-या थापत बसली आहे.

कधी एकदा त्या घराच्या बाहेर पडते असं झालं मला ही सगळी परिस्थिती ऐकल्यावर! मी तर विश्वासच ठेऊ नाही शकत की आजच्या ह्या प्रगत युगामधे अशी घरं अजुनही आहेत?? कधी समजणार आहे ह्या लोकांना की काही गोष्टी काळानुरूप बदलाव्याच लागतात तुमची इच्छा असू देत अथवा नसू देत!!

पण, मुलीच्या माहेरच्यांना अशी अमानुष वागणूक देण्याची पध्दत का निघाली असेल बरं? आधीच्या काळी तर पोरीचं लग्न करायचं म्हणजे आई-बापाला घरा-दारावर कर्ज घेऊन आहे नाही ती पुंजी वापरून करून द्यावं लागायचं.घरामधे जितक्या जास्त पोरी तितका त्यांच्या लग्नानंतर बाप कर्जबाजारी झालेला असायचा.बरं पोरींच्या सासरी जायचं म्हणजे मैलोनमैल प्रवास करायचा आणि तिथे पोहोचल्यावर काय तर साधं पाणी पण नाही मिळणार??!!!?? काय बरं पाप केलं आहे त्या बिचा-या बापाने म्हणून त्याला ही शिक्षा?

हे सगळं ऐकलं की हसायला येतं आणि कीव येते लोकांची जे असं काही मानत होते आणि तसं वागत होते.पण तो काळ वेगळा होता आणि आज २०१४ आहे.आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकूणच जगण्यात आणि प्रत्येकाच्या मानसिकतेत बराच फरक पडला आहे त्यामुळे मुलींच्या सासरी गेल्यावर पाणी प्यायचं नाही वगैरे असं कोणी मानत नसेल अशी माझी समजूत होती.पण! वरती सांगितलेल्या आजी-आजोबांचे वचन ऐकल्यावर माझा गैरसमज अगदी स्वच्छ पुसला गेला आहे!

धन्य धन्य ती संस्कृती आणि धन्य धन्य ते संस्कृतीरक्षक!!

Monday, August 11, 2014

पोश्टर बॉईज

काल पोश्टर बॉईज चित्रपट बघितला. चित्रपटाचा पहिला भाग ठीक-ठाक आहे म्हणजे जगन आबा,मास्तर आणि अर्जुन ह्या तिघांचे पोस्टर्स सगळ्या गावभर झळकल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काय वादळ निर्माण होतं ते दाखवलं आहे.मध्यांतरानंतर मात्र चित्रपटाला वेग येतो जेंव्हा ते तिघे झालेल्या अन्यायाविरोधात 'उपोषण' करायचं ठरवतात.

दिलीप प्रभावळकर ह्यांनी रंगविलेला आबा एकदम भारी आहे आणि बाकी सगळे कलाकार पण साजेसे आहेत.

मला नेमकं माहित नाही की हल्ली बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून घेतात की नाही ते निदान शहरांमधे किंवा टीव्ही, रेडियोवर ह्याबाबतीत कधी कोणती जाहिरात ऐकली,बघितल्याचं आठवत नाही.कदाचित हल्ली महागाई इतकी वाढली आहे की एक मुल होऊ देणं हे सुध्दा परवडेबल नाही असं वाटत असेल.असो, तर हा विषय चित्रपटासाठी का निवडला ते कळालं नाही, पण हो चित्रपटामधे शक्य तितका माल-मसाला, गाणी आणि पांचट नसणारे पण प्रसंगांनुरूप विनोद आहेत. ह्यामुळे कुटुंबासोबत बघता येईल असा चांगला चित्रपट आहे.

पुरूष नसबंदी ह्यासोबतच मुलगा/मुलगी भेद नको, सामान्य माणसांचा बळी सरकारी कामांसाठी कसा दिला जातो अशा विषयांवरही ह्या चित्रपटातून भाष्य करण्यात आलेलं आहे.श्रेयस तळपदे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक छोटंसं भाषणही ठोकलं आहे देव करो नि आपल्या राज्याला असा यंग, डायनामिक आणि जनतेचा विचार करणारा मुख्यमंत्री लवकरच मिळो

हां तर मंडळी तुम्हाला दोन तास निखळ मनोरंजन हवं असेल तर नक्कीच बघा पोश्टर बॉईज