Thursday, August 14, 2014

संस्कृतीरक्षक

लग्न झाल्यावर मुलीच्या घरचं पाणीसुध्दा चालत नाही हो आम्हांला आणि जर सुनेच्या माहेरचं कोणी आलं तर आम्ही देतही नाही!

हो बरोबर वाचलं तुम्ही, विश्वास बसत नसेल तर परत एकदा वाचा!

आज साल२०१४ चालू आहे आणि तरी एका सुशिक्षित,सुसंस्कृत आणि सुखवस्तू घरात हा संवाद ऐकायला मिळाला.

एक आजोबा अगदी संस्कृती रक्षकाचा आव आणत सांगत होते.पुढे म्हटले आम्हांला आमच्या सुनेने नोकरी केलेलं सुध्दा चालत नाही.घरामधे कर्तबगार पुरूष असतांना बायकांना घराबाहेर पडायची गरजच काय म्हणतो मी!! आणि ह्यामुळेच गोल्डमेडल मिळवलेली त्यांची सुन आजही घरामधे भाक-या थापत बसली आहे.

कधी एकदा त्या घराच्या बाहेर पडते असं झालं मला ही सगळी परिस्थिती ऐकल्यावर! मी तर विश्वासच ठेऊ नाही शकत की आजच्या ह्या प्रगत युगामधे अशी घरं अजुनही आहेत?? कधी समजणार आहे ह्या लोकांना की काही गोष्टी काळानुरूप बदलाव्याच लागतात तुमची इच्छा असू देत अथवा नसू देत!!

पण, मुलीच्या माहेरच्यांना अशी अमानुष वागणूक देण्याची पध्दत का निघाली असेल बरं? आधीच्या काळी तर पोरीचं लग्न करायचं म्हणजे आई-बापाला घरा-दारावर कर्ज घेऊन आहे नाही ती पुंजी वापरून करून द्यावं लागायचं.घरामधे जितक्या जास्त पोरी तितका त्यांच्या लग्नानंतर बाप कर्जबाजारी झालेला असायचा.बरं पोरींच्या सासरी जायचं म्हणजे मैलोनमैल प्रवास करायचा आणि तिथे पोहोचल्यावर काय तर साधं पाणी पण नाही मिळणार??!!!?? काय बरं पाप केलं आहे त्या बिचा-या बापाने म्हणून त्याला ही शिक्षा?

हे सगळं ऐकलं की हसायला येतं आणि कीव येते लोकांची जे असं काही मानत होते आणि तसं वागत होते.पण तो काळ वेगळा होता आणि आज २०१४ आहे.आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकूणच जगण्यात आणि प्रत्येकाच्या मानसिकतेत बराच फरक पडला आहे त्यामुळे मुलींच्या सासरी गेल्यावर पाणी प्यायचं नाही वगैरे असं कोणी मानत नसेल अशी माझी समजूत होती.पण! वरती सांगितलेल्या आजी-आजोबांचे वचन ऐकल्यावर माझा गैरसमज अगदी स्वच्छ पुसला गेला आहे!

धन्य धन्य ती संस्कृती आणि धन्य धन्य ते संस्कृतीरक्षक!!

No comments:

Post a Comment