Saturday, August 16, 2014

पुराणातली वांगी

ह्यावर्षे गणपती कोणता घ्यायचा हे ठरविण्यासाठी म्हणून मी सगळ्या दुकानांमधे जाऊन बघत होते आणि एका ठिकाणी ही मूर्ती दिसली.


आता तुम्ही म्हणाल ह्यात काय आहे, अगदी नेहमी असते तशी साधी, सोज्वळ अशी ही मूर्ती आहे. नाही! ह्या मुर्तीमधे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की मला काय वेगळं दिसलं. गणपतीची बायको त्याचा पाय मांडीवर घेऊन चेपत बसली आहे असं ह्या मुर्तीचं स्वरूप आहे, आणि इथेच तर मोठी अडचण आहे!!!

का असं दाखवलं आहे कलाकाराने?? गणपतीची बायको ही सुध्दा देवीच एक रूप आहे, तिला सुद्धा दैवी शक्ती आहेत मग तिने का म्हणून पाय चेपायचे?

असं अजून एक उदाहरण आहे हे बघा

ह्यामधे तर देवी लक्ष्मी विष्णूदेवांचे पाय चेपत आहे देवी लक्ष्मी!!??!! पुराणापासून ते आजतागायत आणि पुढेही सगळ्यात शक्तीवान असणारी देवी म्हणजे लक्ष्मी! तिच्याशिवाय जगामधे कोणताच व्यवहार होऊ शकत नाही. तिचा वास असेल ते घर सर्वसुखसंपन्न असतं आणि तरी अशा शक्तीवान देवीने का म्हणून देवाचे पाय दाबायचे?

जो कोणी कलाकार आहे ही असली चित्रं किंवा मूर्ती बनविण्याच्या मागे त्याने काय विचार करून असं दर्शविलं असेल?? ह्यामागे असा विचार तर नसेल ना की, देवी आहे म्हणून काय झालं ती पण एक 'स्त्री'च आहे ना मग तिचं हे कर्तव्यच आहे!!

ग.दि.माडगुळकरांनी रचलेल्या गीतरामायणामधे एक गीत आहे, जेंव्हा राम आणि लक्ष्मण वनवासाला जायला निघतात तेंव्हा श्रीराम आपल्या पत्नीचा-सितेचा निरोप घ्यायला येतात तेंव्हा ती म्हणते,

निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सिता

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचें अखंड पूजन
हें आर्यांचें नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणितां?    

अरे?? हे आर्य नारी जीवन हे कोणी ठरवलं?? का म्हणून स्त्रीने पत्नी झाल्यावर आपल्या पतीची सेवाच करायची?? तिचं हेच कर्तव्य आहे हे ठरविणारे तुम्ही कोण?? ती एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्व आहे, तिला तिचं आयुष्य कसं व्यतित करायचं हे सांगणारे आणि तिला तसं वागायला भाग पाडणारे तुम्ही कोण?? देवालासुध्दा हा अधिकार नाही!!!

आपल्याकडे अगदी पूर्वकाळापासून पुरूषालाच महत्त्व दिलेलं आहे मग तो देव मानवी रूपामधे जन्मलेला असू देत नाहीतर ऋषीमुनी असू देत. प्रत्येक ठिकाणी त्याचं कर्तुत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. कोणत्या पोथी-पुराणामधे एखाद्या देवीच्या लहानपणीची गोष्ट दिलेली आहे? तेच तुम्ही श्रीकृष्ण किंवा राम घ्या, त्यांच्या बाळलिलांच्या सुरस कथा पिढ्यानपिढ्या गात आल्या आहेत. 

का म्हणून असा भेदभाव तोही देविदेवतांच्या काळापासून? नाही म्हणायला देवीला 'आदिशक्ती' 'आदिमाया' अशी गोड गोड विशेषणं दिली आहेत आणि असंही दाखवलं गेलं आहे की भगवान शंकर तिचंच ध्यान करत असतात.
पण तरीही अशी चित्रं, अशा कथांमधून सामान्य माणसाने काय बोध घेतला? तर स्त्री ही दुय्यम आहे. जर देवी असून ती देवाचे पाय चेपते तर दानवापेक्षाही क्रूर असणा-या पुरूषाचे, ज्याला देवाच्या नखाचीसुध्दा सर नाही, अशाचे पाय दाबायचे, सगळी सेवा करायची!!! आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की, अशा वागणूकीमुळे एक आई स्वतःच्या मुलीला असंच शिकवत आली गेल्या कित्येक पिढ्या की, तू तुझ्या पतीची सेवा करायची!!!

अरे हट्!! ह्या असल्या गोष्टी आता बास झाल्या. कोणतंही क्षेत्र घ्या स्त्री तिच्या कर्तुत्वाने पुरूषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे.

पुरे करा आता ही पुराणातली वांगी चघळणं!! बदला म्हणावं असली ही सडकी-कुजकी मानसिकता!!

1 comment:

  1. If you will read Devdutt Pattnaik's "7 Secrets of Vishnu" you will get the answer! :)

    ReplyDelete