ट्रेलर जेंव्हा बघितलं ना तेंव्हाच ठरवलं होतं की हा सिनेमा बघायचाच!!
दिग्दर्शक समीर विद्वांस आणि कलाकार मुक्ता बर्वे, अंकुश चौधरी,वंदना गुप्ते आणि विद्याधर जोशी अशी दिग्गज मंडळी जेंव्हा एकत्र येत आहेत तेंव्हा नक्कीच काहीतरी दर्जेदार बघायला मिळणार ही खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणेच झालं.
अतिशय साध्या माणसांची अगदी साधी पण ह्रदयाला भिडणारी गोष्ट आहे ही.
चित्रपटाची कथा मंजिरी आणि अमित ह्या नवविवाहित जोडप्याच्या अवती-भवती फिरते.मुंबईच्या चाळीमधलं जीवन, त्यात मंजिरीची होणारी फरफट आणि ते बघून अमितची होणारी चिडचिड हे सगळं अतिशय योग्यरीत्या दाखवलं आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाकरता स्वतःचं घर मुंबई सारख्या ठिकाणी असणं हे खरंच अत्यंत अवघड स्वप्न आहे पण, जर जिद्द असेल आणि अविरत कष्ट करायची तयारी असेल तर हे अशक्य वाटणारं स्वप्नसुध्दा सत्यात उतरवता येतं हेच ह्या चित्रपटातून आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे.
मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी ह्या दोघांचा अभिनय अप्रतिम आहे.चेह-यावरचे,डोळ्यातले हावभाव इतके बोलके आहेत की संवादाचीसुद्धा गरज नाही पडत.
नरीमन पाॅईंटला फेसाळलेला समुद्र बघून उत्साहात बोलणारी मंजिरी, सास-याच्या 'चहा'ची अवेळी आलेली डिमांड न-नाकारता पण चेह-यावर स्पष्ट नाराजी दाखविणारी मंजिरी, बाळाची चाहूल लागल्यावर अमितला पहिल्यांदा सांगताना डोळ्यात हजारो स्वप्न असणारी मंजिरी आणि पतसंस्थेत झालेल्या घोळाने त्यांच्या स्वप्नाचा झालेला चुराडा कणखरपणे झेलणारी मंजिरी..एक कसलेला कलाकारच ह्या सगळ्या छटा इतक्या ताकदीने पण तितक्याच सहजतेने आपल्यासमोर मांडू शकतो.
मुक्ता बर्वे च्या तोडीस-तोड अभिनय अंकुश चौधरींचा आहे.दोघांची आॅन-स्क्रीन केमिस्ट्री अगदी भारी आहे. :)
ह्या दोन महत्त्वाच्या पात्रांव्यतिरिक्त अजून एका कलाकाराचा अभिनय आपल्या मनावर ठसा उमटवून जातो ते म्हणजे विद्याधर जोशी! आयुष्यात कुठलीच स्वप्न बघायचा प्रयत्नही न-केलेला एक माणूस आणि मुलाने स्वप्नपूर्ती साठी केलेली धडपड बघून विरघळेला बाप अप्रतिमरीत्या उभा केला आहे.
वंदना गुप्तेजींचा सहज-सुंदर अभिनय ह्या चित्राला पूर्णत्व देणारा आहे.
सगळ्यात जास्त कौतुक करायला हवं ते दिग्दर्शकाचं.प्रत्येक प्रसंग, त्यासाठीचे संवाद, कलाकारांचे हावभाव, प्रसंगासाठी निवडलेली जागा अगदी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे.सुरुवातीपासून शेवटापर्यंत पूर्ण कथेला व्यवस्थित बांधलंय..एकदम बाप सिनेमा बनवलाय
Tuesday, August 18, 2015
Saturday, August 15, 2015
गोची
हां तर मंडळी आज आपल्या देशाचा हॅप्पी बड्डे आहे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बरंका :)
तर बघा आजपासनू चालू झालाय श्रावण महिना!!
साजिरा-गोजिरा श्रावण आला..ऊन-पावसाचा खेळ घेउन आला वगैरे ठीक आहे पण हाच गोजिरा श्रावण एका खास वर्गाची गोची करणार आहे दरवर्षीप्रमाणे :D
गोची कशी तर आता काही लोकांना महिनाभर..'महिनाभर' बरंका! हं म्हणजे पार श्रावण संपेपर्यंत.. सामिष म्हणजे नाॅन-व्हेज खाता येणार नाही!!!
'हम्म', 'होना यार', 'कटकट ए चा***' - ऐकू आले का तुम्हाला हे दु:खद सुस्कारे ;)
काल नाॅन-व्हेज खायचा शेवटचा दिवस म्हणून पोट फुटेस्तोवर खाल्लं पण समाधान होत नाही हो, नाॅन-व्हेज चीजही ऐसी है जो खाए वही जानता है इसकी जादू..हम्म कळ्ळं बरं!
बहुतेक जणांच्या घरामधे ह्या महिन्यामधे सामिष अन्न शिजवलं जात नाही आणि मग 'आई' किंवा क्वचित काही घरात 'बायको'ने सांगितलं म्हणून ह्या गोष्टीचं पालन करायचं अवघड-अशक्यप्राय असं काम काहीजणांच्या नशिबी येतं..कित्ती कित्ती ते कष्ट :p
मग अशी जनता अगदी रोज न-चुकता जेवणाच्या वेळी ह्या दु:खाची उजळणी करत उगाच काहीतरी व्हेज पाला चघळत वेळ मारून नेते!!
पण काही कमजोर दिल असतात जे हा विरह सहन करु न-शकल्यामुळे 'एखादा दिवस चालतं रे', 'बाहेर चालतं रे', 'आॅफिसमधे खाल्लेलं आई/बायकोला जाऊन कोण सांगणार आहे','आपण अजून लहान अाहे रे चालतं आपल्याला' अशा विविध क्लुप्त्या लढवत एखादा दिवस हात मारतातच!!
गम्मत आहे की नाही :D म्हणजे बघा, ह्या बहाद्दरांना कुठलंही कारण जरी दिलं म्हणजे सायंटिफिक वगैरे तरी काही फरक पडत नाही मग कशाला ते आज्ञाधारक बनून उगाच श्रावण पाळण्याचा आव आणायचा :|
मी असं ऎकलंय की जर उपवास केला आणि तुमच्या मनात नुसती उपवासाच्या पदार्थाव्यतिरीक्त काही वेगळं खायची इच्छा जरी झाली नं तरी उपवास मोडतो म्हणे मग इथे तर नाॅन-व्हेज खाण्याची गोष्ट अाहे!!
नाही तुम्हाला इच्छा तर जाऊ देत ना कशाला उगाच मन मारायचं.जमत नसेल श्रावण पाळायला तर ठेवा ना हिम्मत तुम्हाला शपथा घालणा-यांना स्पष्टपणे सांगण्याची!! पण तिथेच तर गोम आहे सगळी :D सांगूही शकत नाही आणि खायची इच्छाही मारु शकत नाही :)
तर अशा कात्रीत सापडलेल्यांनो आणि न-सापडलेल्यांनो तुम्हा सर्वांना ह्या साजि-या-गोजि-या श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा :) :) :)
Friday, August 14, 2015
पावसाळा
यार हा पावसाळा इतका सुंदर का असतो आणि आॅफिस इतकं बोरिंग!!
आज तर मौसम लाजवाब आहे :) असं वाटतं की मस्त भटकायला जावं रानोमाळ..दूरपर्यंत फक्त हिरवाई आणि हलकासा पाऊस..कानाशी खेळणा-या वा-याचा हलकासा आवाज पण बाकी सगळीकडे शांतता भरून राहिलेली..डोंगरांवर धुक्याची दाटी..जमिनीवर हिरव्या रंगाच्या असंख्य छटा कदाचित कलर पॅलेटमध्ये मधे इतके शेड्स आपल्याला बनवता पण येणार नाहीत..
डोळे अधीर होऊन सगळा नजारा पित आहेत आणि शरीर अगदी पिसासारखं हलकं झालंय..रोजच्या कोलाहलापेक्षा खूप दूर पण निसर्गाच्या खूप जवळ..आतपर्यंत तो निसर्ग, ती हिरवाई, तो पाऊस हलके हलके झिरपत राहतो..
Thursday, August 13, 2015
एच.आर.
सकाळी धावत-पळत आॅफिस बस पकडावी आणि आत पाय ठेवावा तर सगळी जनता खिडकी पकडून शेजारच्या सिटवर बॅग ठेउन मस्त झोपलेली असते.खरंच झोपतात की नाही माहित नाही पण बसायला जागा हवी म्हणून उठवलं तरी ढिम्म हलत नाहीत.
बरं ठीके तुम्हाला नाही द्यायची जागा ओके पण खिडकी तरी उघडी ठेऊ शकतात ना..ते पण नाही!! बसचं दार बंद, सगळ्या खिडक्या बंद आणि बसमधे ४० माणसं निदान सगळ्यांना प्राणवायू मिळेल इतका वारा तर आत येऊ देत!! पण हा विचार करेल कोण??
एकतर शेवटचा स्टाॅप असल्यामुळे जागा धड मिळत नाही त्यातही खिडकी बंद असा संताप येतो ना X-( पण काय करणार सकाळी सकाळी उगाच चिडचिड करण्यात काय अर्थ म्हणून गप्प बसावं लागतं X-(
आजपण काही वेगळी परिस्थिती नव्हती पण मी ठरवलं होतं काहीही झालं तरी पुढच्या सिटवर बसायचं.बसमधून आत गेल्या गेल्या माझी तेज नजर एका चांगल्या सिटवर खिळली मी लगेच तिकडे मोर्चा वळवला.अामची (खडूस)एच.आर. तिथे बसली म्हणजे झोपली होती.
३ माणसं आरामात बसू शकतात अशा ठिकाणी ही एक बाई आणि बाकी सगळं तिचं सामान बसलं होतं.माझ्या डोक्यात तिडीक गेली वाटलं तिचं सामान उचलून बाहेर फेकून द्यावं पण मी पडले एक निष्पाप,साधी-सरळ एम्पाॅली आणि ती आमची 'एच.आर.'!! अशी गोची असल्यामुळे तसं करायला माझे हात धजावले नाहीत :(
मग तिला हाक मारून जागं करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून बघितला पण छे!
शेवटी थरथरत्या हाताने मी तिच्या दोन्ही बॅग्स उचलून वर ठेऊन दिल्या आणि तिच्यापासून थोडं लांब पण व्यवस्थित बसले :)
त्या क्षणी अख्ख जग जिंकल्याचा आनंद झाला मला,आजवर कोणी जे करू शकलं नव्हतं ते आज मी करुन दाखवलं होतं, यशस्वीपणे :) :) :)
आज पाहिल्यांदाच मला इतक्या पुढच्या रांगेत बसायला मिळालं होतं नाहीतर बहुतेक वेळा असंच होतं की अगदी शेवटच्या रांगेत जागा मिळते आणि बसल्यापासून जो डिस्को-डान्स चालू होतो तो पार आॅफिसपर्यंत! महानगरपालिकेने केलेले महान रस्ते आणि आमच्या बसचा 'मायकेल शुमाकर' चालक यांच्या कृपेने हा व्यायाम आम्हाला घडतो :-/
पण आज मात्र काहीतरी वेगळं घडत होतं आणि ह्याच आनंदात मी अगदी सुखात आॅफिसला पोहोचले.
Wednesday, August 5, 2015
आराधना
काल 'आराधना' बघितला..पहिल्यांदा :) प्रत्येक प्रसंग, संवाद, शर्मिला टागोरचा इनोसंट चेहरा, तिचा आय मेक-अप, गुलाबी गुलाबी गालांचा राजेश खन्ना :) :) सगळंच किती नाजूक सालस सभ्य :) कुठेही कोणत्याच हावभावांचा अतिरेक नाही अगदी शर्मिला टागोरवर झालेला अतिप्रसंगही!! आताच्या काळातले सिनेमे बघून असेल कदाचित पण मला प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की हिरोइनवर प्रत्येक माणूस हात साफ करायचा प्रयत्न करणार पण तसा एकच प्रसंग होता आणि तोही अगदी सभ्यपणे दाखवलेला..अगदी हिरोइनचा पदरही ढळू न-देता,खूप कौतुक वाटलं ते बघून :) आरडा-ओरडा नाही,उगाचच जड संवाद नाही,भडक रंग नाहीत..डोळ्याला आणि मनालाही कुठल्याच प्रकारची इजा होणार नाही इतका छान सिनेमा. हिरोइनचे वडील मरतात तो प्रसंग किंवा ती गर्भार असतांनाचं एकाकीपण..सगळी सगळी गोष्टच फार नाजुकतेने हाताळळेली अाहे..हॅट्स आॅफ टू दी व्होल टीम आॅफ आराधना :) :)
Sunday, August 2, 2015
मुहूर्त
आज फ्रेंडशिप डे आहे.सकाळपासून मला पुष्कळ मेसेजेस आले, तुम्हाला पण आले असतील नं..तर एक मजा म्हणून हा दिवस साजरा करायला काहीच हरकत नाही,नाहीतरी सेलेब्रेट करायला आपल्याला हल्ली कोणतंही कारण चालतं काय..
शाळेत असतांना खुप धमाल यायची ह्या दिवशी :) सगळ्या मैत्रिणी एकमेकींना फ्रेंडशिप बॅंण्डस बांधायचो.कधी स्वत: बनवलेले असायचे तर कधी विकत आणलेले..
हा रविवार संपल्यानंतर कोणाच्या हातावर किती दिवस किती बॅंण्डस टिकतात ह्याची पण नोंद ठेवली जायची :)
साधारण १०वी नंतर ब-याच जणींचे मार्ग वेगळे झाले..पुढे मग करियर, लग्न आपसुक ह्या गोष्टी घडत राहिल्या पण फेसबुकने सगळ्यांना एकत्र आणलं :) :)
खरं तर सच्च्या मित्राला असं सांगावं नाही लागत की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस ते..एकमेकांना ते व्यवस्थित माहित असतं आणि मग वर्ष वर्ष जरी भेट नाही झाली तरी एखाद्या वादळी रात्री फक्त एका 'हॅलो' मधे तिला/त्याला सगळं कळून जातं..मग लटका राग बाहेर पडतो..एकमेकांची खिल्ली उडवली जाते..शाळा-कॉलेजच्या-आॅफिसच्या दिवसांधले खमंग किस्से बाहेर येतात..भौतिक अंतर पुसल्या जातं आणि जणू एकमेकांसमोर बसून गप्पा चालू आहेत ह्या अावेशात किती वेळ निघून जातो कळत पण नाही..काही वेळाने गप्पांचा पूर ओसरला की 'ह्या वेळेस नक्की भेटू',असं वचन एकमेकांना देत फोन ठेवला जातो..
ह्या एका फोनमुळे पुढचे कित्येक महिने पुरेल इतकी उर्जा मनाला मिळते आणि प्रत्यक्ष भेट ...तशीच राहून जाते.. :)
असा मित्र/मैत्रिण तुम्हाला असेल नं..आणि कित्येक दिवसात फोनपण झाला नसेल..मग आज नक्की बोला मुहूर्त चांगला आहे :) :) :)
Happy friendships day 2 allll
Subscribe to:
Posts (Atom)