Thursday, August 13, 2015

एच.आर.

सकाळी धावत-पळत आॅफिस बस पकडावी आणि आत पाय ठेवावा तर सगळी जनता खिडकी पकडून शेजारच्या सिटवर बॅग ठेउन मस्त झोपलेली असते.खरंच झोपतात की नाही माहित नाही पण बसायला जागा हवी म्हणून उठवलं तरी ढिम्म हलत नाहीत.

बरं ठीके तुम्हाला नाही द्यायची जागा ओके पण खिडकी तरी उघडी ठेऊ शकतात ना..ते पण नाही!! बसचं दार बंद, सगळ्या खिडक्या बंद आणि बसमधे ४० माणसं निदान सगळ्यांना प्राणवायू मिळेल इतका वारा तर आत येऊ देत!! पण हा विचार करेल कोण??

एकतर शेवटचा स्टाॅप असल्यामुळे जागा धड मिळत नाही त्यातही खिडकी बंद असा संताप येतो ना X-( पण काय करणार सकाळी सकाळी उगाच चिडचिड करण्यात काय अर्थ म्हणून गप्प बसावं लागतं X-(

आजपण काही वेगळी परिस्थिती नव्हती पण मी ठरवलं होतं काहीही झालं तरी पुढच्या सिटवर बसायचं.बसमधून आत गेल्या गेल्या माझी तेज नजर एका चांगल्या सिटवर खिळली मी लगेच तिकडे मोर्चा वळवला.अामची (खडूस)एच.आर. तिथे बसली म्हणजे झोपली होती.

३ माणसं आरामात बसू शकतात अशा ठिकाणी ही एक बाई आणि बाकी सगळं तिचं सामान बसलं होतं.माझ्या डोक्यात तिडीक गेली वाटलं तिचं सामान उचलून बाहेर फेकून द्यावं पण मी पडले एक निष्पाप,साधी-सरळ एम्पाॅली आणि ती आमची 'एच.आर.'!! अशी गोची असल्यामुळे तसं करायला माझे हात धजावले नाहीत :(

मग तिला हाक मारून जागं करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून बघितला पण छे!

शेवटी थरथरत्या हाताने मी तिच्या दोन्ही बॅग्स उचलून वर ठेऊन दिल्या आणि तिच्यापासून थोडं लांब पण व्यवस्थित बसले :)

त्या क्षणी अख्ख जग जिंकल्याचा आनंद झाला मला,आजवर कोणी जे करू शकलं नव्हतं ते आज मी करुन दाखवलं होतं, यशस्वीपणे :) :) :)

आज पाहिल्यांदाच मला इतक्या पुढच्या रांगेत बसायला मिळालं होतं नाहीतर बहुतेक वेळा असंच होतं की अगदी शेवटच्या रांगेत जागा मिळते आणि बसल्यापासून जो डिस्को-डान्स चालू होतो तो पार आॅफिसपर्यंत! महानगरपालिकेने केलेले महान रस्ते आणि आमच्या बसचा 'मायकेल शुमाकर' चालक यांच्या कृपेने हा व्यायाम आम्हाला घडतो :-/

पण आज मात्र काहीतरी वेगळं घडत होतं आणि ह्याच आनंदात मी अगदी सुखात आॅफिसला पोहोचले.

No comments:

Post a Comment