ट्रेलर जेंव्हा बघितलं ना तेंव्हाच ठरवलं होतं की हा सिनेमा बघायचाच!!
दिग्दर्शक समीर विद्वांस आणि कलाकार मुक्ता बर्वे, अंकुश चौधरी,वंदना गुप्ते आणि विद्याधर जोशी अशी दिग्गज मंडळी जेंव्हा एकत्र येत आहेत तेंव्हा नक्कीच काहीतरी दर्जेदार बघायला मिळणार ही खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणेच झालं.
अतिशय साध्या माणसांची अगदी साधी पण ह्रदयाला भिडणारी गोष्ट आहे ही.
चित्रपटाची कथा मंजिरी आणि अमित ह्या नवविवाहित जोडप्याच्या अवती-भवती फिरते.मुंबईच्या चाळीमधलं जीवन, त्यात मंजिरीची होणारी फरफट आणि ते बघून अमितची होणारी चिडचिड हे सगळं अतिशय योग्यरीत्या दाखवलं आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाकरता स्वतःचं घर मुंबई सारख्या ठिकाणी असणं हे खरंच अत्यंत अवघड स्वप्न आहे पण, जर जिद्द असेल आणि अविरत कष्ट करायची तयारी असेल तर हे अशक्य वाटणारं स्वप्नसुध्दा सत्यात उतरवता येतं हेच ह्या चित्रपटातून आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे.
मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी ह्या दोघांचा अभिनय अप्रतिम आहे.चेह-यावरचे,डोळ्यातले हावभाव इतके बोलके आहेत की संवादाचीसुद्धा गरज नाही पडत.
नरीमन पाॅईंटला फेसाळलेला समुद्र बघून उत्साहात बोलणारी मंजिरी, सास-याच्या 'चहा'ची अवेळी आलेली डिमांड न-नाकारता पण चेह-यावर स्पष्ट नाराजी दाखविणारी मंजिरी, बाळाची चाहूल लागल्यावर अमितला पहिल्यांदा सांगताना डोळ्यात हजारो स्वप्न असणारी मंजिरी आणि पतसंस्थेत झालेल्या घोळाने त्यांच्या स्वप्नाचा झालेला चुराडा कणखरपणे झेलणारी मंजिरी..एक कसलेला कलाकारच ह्या सगळ्या छटा इतक्या ताकदीने पण तितक्याच सहजतेने आपल्यासमोर मांडू शकतो.
मुक्ता बर्वे च्या तोडीस-तोड अभिनय अंकुश चौधरींचा आहे.दोघांची आॅन-स्क्रीन केमिस्ट्री अगदी भारी आहे. :)
ह्या दोन महत्त्वाच्या पात्रांव्यतिरिक्त अजून एका कलाकाराचा अभिनय आपल्या मनावर ठसा उमटवून जातो ते म्हणजे विद्याधर जोशी! आयुष्यात कुठलीच स्वप्न बघायचा प्रयत्नही न-केलेला एक माणूस आणि मुलाने स्वप्नपूर्ती साठी केलेली धडपड बघून विरघळेला बाप अप्रतिमरीत्या उभा केला आहे.
वंदना गुप्तेजींचा सहज-सुंदर अभिनय ह्या चित्राला पूर्णत्व देणारा आहे.
सगळ्यात जास्त कौतुक करायला हवं ते दिग्दर्शकाचं.प्रत्येक प्रसंग, त्यासाठीचे संवाद, कलाकारांचे हावभाव, प्रसंगासाठी निवडलेली जागा अगदी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे.सुरुवातीपासून शेवटापर्यंत पूर्ण कथेला व्यवस्थित बांधलंय..एकदम बाप सिनेमा बनवलाय
No comments:
Post a Comment