आज पुण्यात कोसळणा-या पावसाने रस्त्यांना नद्यांचं रूप दिलंय. अशा पावसामधे सुखात घरी बसून वाफाळेल्या काॅफीचा सुगंध अनुभवण्याच्या ऐवजी मी हिंजेवाडी मधून निघून थेट स्वारगेटला पोहोचले वेळ अर्थातच दोन तास लागला आणि त्यामुळे एक गम्मत झाली.
एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स आॅफिसमधे मला एक चेक जमा करायचा होता पण उशीर झाला. थोडा नाही तर तब्बल एक तास उशीर झाला. मुसळधार पाऊस कोसळतच होता पण त्यातून वाट काढत एकदाची आत पोहोचले. रिसेप्शन काऊंटरला पोहोचले तेंव्हा नखशिखांत भिजलेली होते.
तिथे एक मॅडम बसल्या होत्या May I Help You? असा गोंडस सवाल करणारा बोर्ड घेउन. मी त्यांना माझा चेक दाखवणार तितक्यात त्यांनी नजरही वर न-करता मला सांगितलं काउंटर बंद झाला आहे मी चेक घेणार नाही. मी त्यांना विनंती केली पण त्यांनी तोंड फुगवून परत तेच वाक्य माझ्यावर फेकलं!!
मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली की मी कित्त्ती दुरूssन आले होते तेही अशा पावसात पण अंहं बाई एकदम ढिम्म!!
मग माझा सौजन्यपूर्ण आवाज चढला आणि पुढच्या काऊंटर कडे वळून इथे मुख्य साहेब कोण म्हणून विचारलं तर त्यांनी मला विचारलं की काय काम आहे. मग मी चेक दाखवून 'जमा करून घेता का प्लीज' असं विनवलं. त्यांनी एका दुस-या मॅडमला विचारलं आणि मला सोपा पर्याय दिला. पाचएक मिनिटात माझं काम झालं पण :)
पण तितक्यात एका माणसाचा आवाज आला तोही माझ्यासारखा एक लाचार कस्टमर होता एल.आय.सी. चा आणि त्यालाही असंच 'वेळ संपली.उद्या या' उत्तर तोंडावर मारलं गेलं होतं. त्याने आवाज चढवल्यावर मगासच्याच मॅडम ज्यांनी मला मदत केली त्यांनी त्यालाही मदत केली.
एल.आय.सी. च्या आॅफिसमधे मला कायम असाच विचित्र अनुभव आला आहे आजवर!! कायम तुच्छतेने बोलणारे लोक, काहिही मदत मागितली तरी को-या चेह-याने आणि निर्लज्जपणे छापील उत्तरं तोंडावर मारणार.म्हणजे समोरचा माणूस मूर्ख आहे आणि त्याला मदत न-करणं हेच त्यांचं तिथल्या खुर्चीवर बसून करायचं एकमेव काम आहे!!
त्यामुळेच आज माझं काम झालं तेंव्हा मी ठरवलं आणि ब्रँच मॅनेजरला भेटायला गेले.त्या माणसाला मी फक्त इतकंच सांगायला गेले होते की समोरच्या माणसाचं निदान आधी ऐकून घ्या आणि मग तुमचे नियम सांगा ना, तर तो माणूस लगेच आवाज चढवून ओरडायलाच लागला. मग लक्षात आलं की ह्या माणसाशी बोलण्यात अजिब्बातच अर्थ नाही!!
ह्या लोकांना फीडबॅक चा अर्थच नाही समजत काय करणार,असो,शेवटी मी तिथून बाहेर पडले मला मदत केलेल्या मॅडमना मोठ्ठं थँक्यू म्हणून :)
अशा प्रसंगांमुळे सरकारी आणि खाजगी संस्थाकडून मिळणा-या सेवेबाबतचा फरक परत एकदा तीव्रतेने जाणवला :(
No comments:
Post a Comment