Tuesday, December 29, 2015

अक्कल

गेले काहि दिवस माझ्या आॅफिस आवारामधे कुत्र्याची ४-५ पिल्लं हिंडत आहेत. मी जमेल तसं त्यांना खायला घालते. काल असंच मी त्यांच्यासाठी कॅन्टीनमधून दूध आणलं आणि ताटली मधे प्यायला ठेवलं. तीनही पिल्लांनी चटचट आवाज करत दूध संपवलं म्हणून मी अजून दिलं पण त्यातल्या एकानेच तितकं संपवलं आणि मी परत ताटलीमधे दूध ओतेपर्यंत तिघेही तिथून बाजूला झाले आणि खेळायच्या पवित्र्यामधे माझ्याकडे बघत शेपूट हलवत उभे राहिले :)

एव्हढासा जीव आहे त्यांचा पण त्यांना पण कळतं की जितकं पोटाला गरजेचं आहे तितकचं खावं. मी असं पण ऐकलंय की सिंहाचं पोट भरलेलं असेल तर समोरून सावज जरी गेलं तरी तो काहिही करत नाही. बहुतेक तरी एक मानवप्राणी सोडला तर बाकी सगळ्यांना कळतं की पोटाला आवश्यक तितकचं अन्न खावं!!

विरोधाभास बघा, माणसाला अन्नाची चव कळते, बाकी प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी आहे त्यामुळे एकावेळी किती खावं-काय खावं हेही कळतं पण नाही आम्हाला अन्न वाया घालवायचंच असतं!!
अगदी रोज न-चुकता आमच्या कॅन्टीनमधे किलोने अन्न वाया गेलेलं दिसतं.आमच्या इथे काही स्वस्तात वगैरे जेवण मिळत नाही पण तरी लोक ताट ओसंडून जाइपर्यंत वाढून घेतात आणि मग नाही आवडलं किंवा पोट भरलं की सरळ ताट नेऊन टाकतात.

आॅफिस कॅन्टीन असू देत किंवा हाॅटेल, ताटातलं अन्न टाकून देण्याबाबत परिस्थिती सारखीच आहे!!

लग्न समारंभ किंवा आॅफिस पार्टी असेल तर मग काय विचारायलाच नको! अगदी भरजरी कपडे,दागदागिने घालून नटून-थटून आलेलं पब्लिक कधी न-मिळाल्यासारखं खायला घेतात आणि ताटात अन्न टाकून देतात. तुम्ही ह्याकरता बुफे पद्धत ठेवा नाहीतर वाढपी, लोक कशालाच जुमानत नाहीत!!

ह्यावर उपाय म्हणून असेल कदाचित पण पुण्यातल्या जुन्या काही हाॅटेलांमधे मी एक पाटी वाचली आहे-'ताटात अन्न टाकल्यास जादा पैसे आकारण्यात येतील', ह्या नियमाचं पालन खरंच कितपत काटेकोरपणे केलं जातं माहित नाही :(

मला कळत नाही की नेमकं काय कारण असू शकतं असं अन्न वाया घालवण्यामागे? तुम्ही पैसे देऊन अन्न विकत घेता म्हणून तुम्हाला ते फेकून देण्याचा हक्क मिळतो का? की अन्न फेकणं ही मोठी मर्दानगीची गोष्ट आहे??

हल्ली फेसबुकवर बरेच फोटोज येतात ज्यामधे, अन्न बनवायला किती प्रक्रिया करावी लागते आणि किती सहजतेने ते फेकलं जातं, ह्याबाबतीत जागरूकता करायचा प्रयत्न केला गेला आहे. लोक सवयीप्रमाणे ती पोस्ट पण न-वाचता किंवा नुसतंच बघून लगेच आपापल्या वाॅलवर शेअर करतात पण प्रत्यक्षात जेवतांना कितपत त्यांच्या लक्षात राहतं देव जाणे!!

मी जेंव्हा स्वयंपाक करायला शिकले तेंव्हा त्यात किती कष्ट असतात ह्याची जाणिव झाली आणि ताटात अन्न न-टाकण्याची लहानपणापासून असलेली सवय किती महत्त्वाची आहे हे जाणवलं.मुळात जेवायला घेतांना ताटामधे अन्न कमीच वाढून घेतलं की, चव आवडली नाही म्हणून फेकून देण्याची वेळच येणार नाही ना!!

माझी ही पोस्ट वाचून लाईक-शेअर नाही केलं तरी चालेल पण शक्यतो प्रत्यक्षात अन्नाची नासाडी करू नका आणि दुस-यांनाही करण्यापासून परावृत्त करा.

No comments:

Post a Comment