Tuesday, April 28, 2020

#आठवणीलहानपणाच्या # उन्हाळी कामं - भाग १

करोनाकृपेने सध्या आपण सगळे घरातच आहोत त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी अंमळ लवकरच चालू झाली म्हणायला हरकत नाही 😊
आमच्या फॅमिली व्हाॅट्सग्रुपला आईने काही दिवसांपूर्वी केलेल्या हातशेवयांचा फोटो टाकला आणि झर्रकन लहानपणात पोहोचले 😄 😄
उन्हाळी कामं करणं हा अगदी धामधुमीचा कार्यक्रम असायचा आमच्याकडे. आमच्या वार्षिक परिक्षेचं वेळापत्रक जाहिर झाल्या झाल्या, आईचं उन्हाळयामधे करायच्या कामांचं वेळापत्रक आकार घ्यायला लागायचं. आमचं तेव्हा ७/८ माणसांचं कोअर कुटुंब + मामा,मावशी,आत्या त्यांची पोरंटोरं आणि येणारे-जाणारे नातेवाईक मिळून चांगलं भरभक्कम एक्स्टेण्डेड कुटुंब होतं. त्यानुसार किती किलो शेवया, उडदाचे पापड, डाळींचे वडे/सांडगे, गव्हाच्या चिकाच्या कुरडया(२ प्रकार), बटाट्याचे चिप्स, पळीचे साबुदाणा पापड, लोणची, मसाले आणि बरंच काही(कमाल १५ जिन्नस बरं) किती प्रमाणात करायचं ते ठरायचं. त्यानंतर ठरायची क्रमवारी, आधी उडदाचे पापड की शेवया मग काय सांडगे की उपासासाठी लागणारे चिप्स आणि साबुदाणा पापड.
पण ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो मे महिना चालू व्हायच्या आतच वाळवून पूर्ण व्हायला हव्या नाहीतर, वारा-वावधान येऊन सगळं एकतर उडून जाईल किंवा धूळीने माखल्या जाईल. ही यादी तयार झाली की मग यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची यादी बनवली जायची म्हणजे उडदाची दाळ,मुगाची डाळ, काळीमिरी,बटाटे अन साबुदाणा अन काय न काय.. हा झाला पूर्वतयारीचा एक भाग!
दुस-या भागाची जबाबदारी बाबांची - एकीकडे यादीनुसार सामान घेऊन येणे आणि दुसरीकडे ही वाळवणं करायला ज्यावर टाकायची त्या जाजमांची तयारी करणे. त्यासाठी पदार्थानुसार वेगवेगळं साहित्य वापरलं जायचं, कधी आईच्या जुन्या साड्या असायच्या किंवा पातळसर प्लास्टिक किंवा सुती रुमाल आणि झाकायला म्हणून ओढण्या किंवा प्लास्टिक.याइतकंच महत्वाचं म्हणजे अंथरलेलं कापड उडून नको जायला म्हणून विटांचे छोटे-मोठे तुकडे किंवा दगड! सगळं वाळवण गच्चीत केलं जायचं, त्यासाठी मग गच्ची पण स्वच्छ धुतली जायची.
हुश्श!!
वाचतांना कदाचित सोपं वाटत असेल पण फुलप्रूफ प्लॅनिंग लागतं हं या सगळ्या सोपस्कारांना पार पाडायला!!
तर पूर्वतयारी व्यवस्थित झाली की मग आई तिच्या मैत्रीणींच्या ग्रुपमधे कळवायची आणि ठरलेल्या दिवसानुसार सगळ्याजणी कोणा एकीच्या घरी एकत्र येऊन कामाचा श्रीगणेशा करायच्या. फळीवरच्या शेवया असतील तर जरा गमतीशीरच प्रकार असायचा. आपण 'सि-साॅ' खेळतांना खालच्या बाजूला असलो की जशी पोझिशन होते तशा अँगलमधे एक फळी ठेवलेली असायची त्याला खालून धान्य भरलेल्या डब्याचा टेकू दिलेला असायचा आणि त्यावर एक काकू बसून हाताने तो शेवया बनवायच्या पिठाचा गोळा गोल गोल फिरवत बारीक नाजूक तार काढायच्या. ती तार लांबवत लांबवत मग त्या फळीवरुन खाली लोंबकळायला लागायची आणि दुस-या काकू ती तोडून त्याच खोलीत दुस-या कोपऱ्यात दोन खिडक्या किंवा कशाच्या तरी आधारे आडव्या ठेवलेल्या काठीवर वाळत घालायच्या.वर भर्र फिरणाऱ्या फॅनच्या वा-यात हे वाळवण सुकत राहायचं.
तसं बघायला गेलं तर शेवया करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे, एक म्हणजे असं फळीवर बसून करु शकतो किंवा फळीवर हाताने फिरवायचं मशीन ठोकून पण अशाच प्रकारे शेवया करतात आणि जर अगदीच कमी प्रमाणात करायचं असेल तर अगदी तळहातावर पण शेवया बनवल्या जातात त्याला 'हातशेवया' म्हणतात,असो.
तर,मी शाळेतून आल्यावर आईच्या शोधार्थ बाहेर पडले की एखाद्या घरामधे आईसकट सगळ्या जणी असं काहीतरी चम्मतग काम करत आहेत हे बघून भारी वाटायचं 😄 😄 मला पण फळीवर बसून तसं करायची इच्छा व्हायची पण, 'लहान मुलांसाठी नसतं ते' ची नेहमीची सबब आडवी यायची.
एखादा आठवडा शेवयांचा असा जंगी कृतीशील कार्यक्रम पार पडला की क्वचित कोणाच्या घरी पापड लाटण्याचं रणशिंग फुंकलं जायचं. मग सगळ्या बायका त्या काकूंच्या घरी स्वतःचं पोळपाट-लाटणंरुपी शस्त्र घेऊन आssक्रमण करायला सज्ज व्हायच्या. ह्या सैन्याला 'पापडाची लाटी' स्वरुपातील छोटे छोटे गोळे दिले जायचे ज्यावर उभे-आडवे प्रहार करत पातळसर पापड लाटायच्या लढाईला तोंड फुटायचं!!
आम्ही तिघी बहिणी म्हणून आईने प्रत्येकीसाठी ह्या लाढाईला लागणारं खास पोळपाट-लाटणं सुद्धा घेऊन ठेवलं होतं 😊 😊
बाकी या लढाईमधे आम्हां मावळ्यांना सहभाग घ्यायला मुभा असायची पण बहुतांश मावळे हे फक्त 'पापड लाटी' पोटात टाकायच्या कामगिरी वरंच असायचे 😜
ह्या लाट्या पण महा बिलंदर बरं! जास्त प्रमाणात पोटात गेल्या की एकत्र येऊन त्याच युद्ध पुकारायच्या!! मग काय मावळ्याला पळता भुई थोडी व्हायची आणि परत,'कध्धीच खाणार नाही', अशी त्या उन्हाळ्यापुरती शपथ घेतली जायची 😁 😁
बटाट्याचे चिप्स करणे हा देखील जोरदार कार्यक्रम असायचा. त्यासाठी आठवडी बाजारातून किलोचा एक असे काही किलो ते पार पोतंभर बटाटे आणले जायचे. त्यांना स्वच्छ धुऊन ठेवायचं काम आमच्यापैकी एक-दोन जण करायचे.आई किंवा बाबा नाहीतर ताई मग त्यातला एक- एक बटाटा घेऊन खिसणीने त्याच्या चकत्या/चिप्स् पाडायला सुरुवात करायचे. हे चिप्स् मात्र एखाद्या मोठ्या भांड्यात मिठाच्या पाण्यात खिसणी ठेऊन करावे लागायचे जेणेकरून ते काळसर होणार नाहीत.
त्या भांड्याची थ्रेशहोल्ड व्हॅल्यू टच झाली की त्यातले चिप्स जायचे पाणी उकळत ठेवलेल्या भल्यामोठया भांड्यात, ज्यामधे ते व्यवस्थितरित्या शिजवले जायचे. जसजसे चिप्स शिजून तयार होतील तसतसे ते एका टोपलीमधे किंवा भांड्यामधे भरुन आम्हा चिल्लरपार्टीला 'गच्चीवर वाळत घालायला घेऊन जा', सांगितलं जायचं. मग ते गरम झालेलं भांडं त्या वाफाळत्या चिप्ससकट सांभाळत नेऊन गच्चीत ठेवायचं. ही कामगिरी पार पडल्यावर यापेक्षा जोखमीची कामगिरी असायची ते गरमागरम चिप्स वाळत घालणे! एका हातातून दुस-या हातात असे झेलत झेलत ते गरम चिप्स वाळत घालावे लागायचे तेही पटापट कारण, आईने तोवर खाली दुसरी टोपली भरून ठेवलेलीच असायची!
चिप्स बनवायचा कार्यक्रम अगदी सकाळीच चालू झालेला असायचा पण त्यातले एकेक टप्पे पार करत करत पार दुपार व्हायची. त्यामुळे गच्चीवर हातात गरम चिप्स्चं भांडं आणि डोक्यावर तळपणारा सूर्य यात अशी काही तारांबळ उडायची की विचारता सोय नाही!
हां पण त्यातल्या त्यात दिलासा देणारी एक गोष्ट व्हायची ती म्हणजे उकडलेल्या वाफाळत्या चिप्स् ला वाळत घालण्याऐवजी पोटाकडे वळवण्याचं काम पण चालायचं अधूनमधून 😜 जाम भारी लागतात हं तसे चिप्स 😋😋
पदार्थांच्या या धबडग्यात एकदाचा नंबर लागायचा खारोड्यांचा. बाजरीच्या कण्या काढून, त्या तेल, तिखट-मीठ घालून शिजवायच्या. त्यानंतर बसायचा पाट असतो नं त्यावर किंवा एखाद्या फळीला तेल लावून त्या कण्यांचे छोटे वडे किंवा गोळे एकसारख्या अंतरावर घालायचे आणि उन्हात वाळवायला ठेऊन द्यायचे. हा झाला वाळवणाचा प्रकार पण ह्यातल्या अर्ध्या कण्या बाजूला काढून, आई त्यावर लसणाची खमंग फोडणी करुन वर बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि तेल घालून खायला द्यायची, काय चविष्ट लागतो हा पदार्थ अहाहा 😋😋👌
कोणताही पदार्थ असो, त्यासाठी वेळ आणि अंग मेहनत प्रचंड लागायची. असाच एक पदार्थ म्हणजे - गव्हाच्या चिकाच्या कुरडया! नाव वाचता क्षणी तो विचित्र आंबट वास घुमला असेल नं नाकात 😨 हा पदार्थ करण्याचं धनुष्य फक्त आई-बाबाच उचलायचे, एकतर तो चिक शिजवायला मेहनत फार आणि नंतर त्या यंत्रातून कुरडया पाडण्याचे कष्ट अपार! त्यामुळे, आम्ही आपलं नंतर तळलेली कुरडयाई फक्त आमरसात बुडवून खायला मदत करायचो 😜
बाकी,जसा रानमेवा असतो नं तसाच खारोड्या आणि गव्हाच्या चिकाच्या तीळ घालून केलेल्या कुरडया हा खास उन्हाळीमेवा बरं का.तुम्ही हे पदार्थ दिवसाच्या कोणत्याही प्रहरी नुसते खाऊ शकता किंवा अगदीच इच्छा झाली तर थोड्या तेलात खारोड्या आणि शेंगदाणे खमंग भाजून घ्या आणि कांद्यासोबत आस्वाद घ्या 😋👌
यथावकाश एकामागून एक सगळे पदार्थ बनवले जायचे आणि वाळवणं आटोपून डब्यामधे भरून ठेवायला सुरूवात व्हायची तोवर मे महिना येऊन ठेपलेलाच असायचा. सगळे जिन्नस ज्या प्रमाणात असतील त्यानुसार मोठे-छोटे, जर्मन(धातू)-स्टील-पितळीचे डबे माळ्यावरुन खाली जमिनीवर अवतरायचे. त्यातल्या सगळ्यात मोठ्या डब्यामधे गोलाकार केलेल्या शेवया अगदी अलगद विराजमान व्हायच्या. शिजवतांना, खातांना भलेही त्या तुटणारच असतात पण ठेवतांना मात्र कशा गोलाकारच ठेवायला हव्या 😊 एखाद्या डब्यात मग खळखळाट करत चिप्स् येऊन पडायचे तर कुठे कुरडईची कुरकुर ऐकू यायची. आणखीन कुठल्या डब्यात पापड स्थिरावत असायचे तर दुस-या डब्यात साबुदाण्याच्या पापडांचा नंबर लागायचा. एक,दोन करता करता अख्खं स्वयंपाकघर भरून जायचं त्या डब्यांनी!! मग प्रत्येकावर स्टिकर चिकटवून नामकरण केलं जायचं.
आणि अशाप्रकारे उन्हाळी कामांची पहिली लढाई यशस्वीरित्या जिंकल्याच्या समाधानात त्या सगळ्या डब्यांवरुन माझी आई अतिशय प्रेमाने नजर फिरवायची आणि तुडुंब भरलेल्या डब्यांची रवानगी माळ्यावर केली जायची 👏👏👏👏

No comments:

Post a Comment