Thursday, May 3, 2012

अमेरिका - अनिल अवचट



पुस्तक हातात घेतल्यावर पहिलं वाक्य दिसलं ते म्हणजे, ’नशीब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणा-या भारतातल्या (तरूण) भाग्यविधात्यांना..काळजीपूर्वक.

एक क्षण विचार आला हे पुस्तक नेमकं कशाबद्दल सांगणारं आहे? अमेरिकेचं प्रवासवर्णन की वर दिलेल्या वाक्याप्रमाणे तिथे जायची इच्छा असणा-यांसाठी मार्गदर्शक पुस्तिका?? कळेलच म्हणून पुढे वाचायला सुरूवात केली आणि ’सुरूवात’ ह्या प्रस्तावनेत लेखकाने स्पष्ट केलं हे पुस्तक काय आहे आणि पुढे काय-काय वाचायला मिळणार आहे...हे ना प्रवासवर्णन आहे ना मार्गदर्शकपुस्तिका....हे आहे लेखकाने अमेरिकेत बघितलेल्या,अनुभवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन.

लेखकाला ’आयोवा इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रॅम’ अंतर्गत साडेतीन महिन्यांकरता अमेरिकेत जायची संधी मिळाली त्यादरम्यान आलेले अनुभव, भेटलेल्या व्यक्ती ह्या सगळ्यांचं वर्णन वीस प्रकरणांमधे मांडलेलं आहे..अर्थात हा आकडा मोठा वाटत असला तरी एकदा पुस्तक हातात घेतल्यावर ते वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्याचं एकच कारण म्हणजे अनिल अवचट यांची लेखन शैली. त्यांचं निरीक्षण जबरदस्त आहे हे वाचायला लागल्यावर लक्षात येतंच पण, आपल्यापैकी ब-याच जणांना माहित असलेल्या ’अमेरिके’बद्दल च्या गोष्टी देखील त्यांच्या शब्दांतून वाचतांना अजिबात रटाळ वाटत नाहीत. आपल्या घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती अशी फिरून आल्यावर आपल्याशी गप्पा मारतांना जसे एक-एक प्रसंग सांगेल अगदी त्या पध्दतीने अवचट ह्यांनी आपल्यासमोर त्यांचं हे अनुभवाचं बाड उघडलं आहे.

सुरूवातीला त्यांच्यावर दडपण आलं होतं कारण राहणीमान साधं, इंग्रजीचा थोडा प्रॉब्लेम ह्यामुळे अमेरिकेसारख्या ठिकाणी सुरूवातीचे काही दिवस त्यांना जरा बुजल्यासारखं झालं पण जसजशी इतर कवी-लेखकांशी ओळख होत गेली, वातावरणाशी जुळवून घेता आलं तसे ते बिनधास्त झाले.

भारतातून गेल्यावर प्रत्येकाला तिथले रस्ते, स्वच्छता, हिरवीगार झाडं ह्या गोष्टी अगदी वेगळ्या विश्वात नेउन ठेवतात त्याप्रमाणे लेखकाचेही डोळे सुरूवातीला दिपून गेले होते. मोठे रस्ते, सगळीकडे भरधाव वेगाने जाणा-या गाडया, मोठमोठे मॉल्स, विविध वंशाची दिसणारी यंत्रवत माणसं ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन इतकं सुंदर केलं आहे की आपणच लेखकासोबत सगळीकडॆ फिरतोय असं वाटायला लागतं.

पुस्तकात सुरूवातीला, ज्या गोष्टी अगदी साध्या पण, अमेरिकन्सच्या लाईफमधे अविभाज्य घटक बनलेल्या आहेत अशांचं विश्लेषण केलेले आहे जसं शॉपिंग, टी.व्ही., व्यसनं आणि कौटुंबिक प्रश्न. तसंच, भटकंतीप्रिय अमेरिकन्सचं आणि ह्या वेडाचा फायदा घेउन जिथे शक्य असेल तिथे टूरिस्ट स्पॉट बनवलेल्या विविध स्थळांचं अगदी हुबेहुब वर्णन केलेलं आहे.

पुढे, अमेरिकेसारख्या संपन्न देशात रोज तयार होणा-या शेकडो टन कच-याबद्दल आणि सुंदरता, स्वच्छता राखण्याच्या अट्टहासामुळे जवळपासच्या छोटया देशांची जी निसर्गहानी केली जाते ह्याबद्दलचं रहस्य उलगडलं आहे, वाचून मन अगदी खिन्न होतं आणि फक्त वरतून सुंदर दिसणा-या अमेरिकेचा एक वेगळाच चेहरा आपल्यासमोर उघडा पडतो.

यानंतर लेखकाने आयोवा कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांबद्दल तसेच जगभरातल्या कवी-लेखकांबद्दल झालेल्या ओळखीतल्या गमती-जमती, किस्से सांगितले आहेत. त्यांच्या ग्रुपमधे आफ्रिकन, मंगोलियन, युरोपियन्स, पाकिस्तानी यांसारखे ब-याच देशातुन आलेले कवी-लेखक होते. त्यांसोबत असतांना लेखकाच्या असं लक्षात आलं की, भारत सोडला तर इतर देशांमधे पुस्तक काय साधा लेख प्रसिध्द करणं किती अवघड आहे. खुद्द अमेरिमधे तर लोक आपलं एखादं पुस्तक प्रसिध्द करण्याकरता वर्षानुवर्षे कशी वाट बघतात तसंच जर एखाद्याचं प्रसिध्द झालं तर तो स्वत:च्या जन्माचं सार्थक झालं असं समजतो, काय ना मोठया देशातलं सगळंच विचित्र!!

ह्या सगळ्या गोष्टी वाचतांनाच लेखकाने, त्यांना अमेरिकेत भेटलेल्या विविध मराठी कुटुंबाबद्दल तसंच झालेल्या नवनविन ओळखीवजा नात्यांबद्दल सांगितलं आहे, कोणी अमेरिकेत कायमचे स्थायिक झालेले तर कोणी फक्त शिक्षणासाठी काही वर्षांकरता तिथे स्थिरावलेले. प्रत्येकाच्या मनामधे भारतातून कोणीतरी आलंय हे बघून निर्माण होणारी एकच भावना, माझ्या देशातलं, मातीतलं आणि भाषेचं असणारं माणूस आज भेटलं. पण ह्याबरोबरच मराठी कुटुंबांमधे निर्माण झालेल्या न्यू-जनरेशन प्रॉब्लेम्सबद्दल पण सांगितलं आहे. जन्म इथला पण तिकडे स्थलांतरीत झालेल्या लोकांना भारताचा ओढा आणि त्यांच्या मुलांना मात्र भारताचा तिटकारा ह्या तिढ्यात वावरणारी मंडळी बघून लेखकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि रागही आला पण, कुठेतरी आपणही असेच वागलो ह्या जाणिवेने त्यांना ओशाळल्यासारखं झालं आहे.

अमेरिकेचं बोलावणं आलं तेंव्हा लेखकाने काही गोष्टी तिकडे गेल्यावर करायच्या ठरवल्या होत्या जसं की, ड्रग डिअॅकडिक्शन सेंटर्सला भेट देउन तिथे असणा-या गोष्टींचा इथे भारतातल्या त्यांच्या मुक्तांगण संस्थेसाठी काही उपयोग करता आला तर तसंच स्थलांतरित मेक्सिकन मजुरांची माहिती घ्यायची.सुरूवातीच्या काही दिवसात तिथलं सगळं समजल्यावर त्यांनी ह्या गोष्टींबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करायला सुरूवात केली.त्यांच्या ग्रुपला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मदत करायला एक-एक माणूस नेमलेला असायचा जो त्या-त्या कवी-लेखकाची व्यवस्थित माहिती करून त्यांना हव्या असलेल्या विषयाबद्दल सर्व प्रकारे मदत करू शकणारा किंवा त्यात काम केलेला असायचा.त्यामुळे ह्या गोष्टींबद्दल माहिती मिळवायला लेखकाला अतिशय सोपं गेलं.मेक्सिकन शेतमजुरांच्या तसंच सर्व प्रकारच्या स्थलांतरित कामगारांचे प्रश्न अमेरिकेसमोर धिटपणाने उभे करणा-या सीझर शॅवेझ ह्या गांधीवादी आचार-विचार अमलात आणणा-या नेत्याला भेटायची त्यांची इच्छा मात्र काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही.ह्या कामगारांविषयी माहिती घेतांना लेखक मेक्सिकोला भेट द्यायला मुद्दाम गेले पण तिथे सर्व प्रकारे अतिशय दयनीय अवस्था आहे.नुसतं वाचलं किंवा ऐकलं तरी कोणाला खरं वाटणार नाही की अमेरिकेसारख्या संपन्न देशाच्या एका सीमेवर असाही एखादा प्रदेश असू शकतो जिथे स्वच्छता तर खूप दूरची गोष्ट आहे पण साधं पिण्यालायक पाणी मिळणं पण अवघड आहे.खरं तर ह्या लोकांवर ही वेळ अमेरिकेमुळेच आली आहे हे वाचल्यावर आपल्याला धक्का बसल्याशिवाय राह्त नाही.जीवनासाठी आवश्यक गोष्टीसुध्दा उपलब्ध नसल्याने तिथले लोक अमेरिकेकडॆ काहितरी काम मिळेल ह्या आशेने धाव घेतात पण, अशा असहाय लोकांना सिमेवर ठग कसे लुटतात आणि माणसांची तस्करी कशी चालते हे वाचल्यावर अंगावर काटा उभा राहतो...

असा हा, अमेरिकेत आल्यावर कुतूहलातून सुरू झालेला प्रवास तिथली सामाजिक वेगवेगळी वैशिष्टयं दाखवत शेवटी एक भयाण सत्य सांगून संपतो.

3 comments: