आपण दूर गेलेलो असलो पण आपल्यातला संवाद संपला नसला तर नातं टिकतं- ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील आत्याबाई.
संवाद या शब्दाचा खरा अर्थ मला माहित नाही पण आतापर्यंत हेच माहितीये की जेंव्हा आपण आपल्या मनातलं कोणाशी तरी बोलतो आणि त्याला ते उमगतं, नेमकं कळतं आणि ती व्यक्ती त्याला प्रतिसाद देते तेंव्हा संवाद साधला जातो..एरव्ही आपण बडबड करतो, गप्पा मारतो कधी स्व:तशीच कधी दुस-यांशी, पण या सगळ्यांपेक्षा संवाद वेगळाच असतो..
शब्द तेच असतात पण भाव वेगळा असतो, त्यातुन उमलणारा विचार नवा असतो कधी आपल्याला अंतर्मुख करणारा तर कधी मनातली सगळी जळमटं दूर करणारा असतो..
पण, कधीही, चला बरं आता आपण एकमेकांशी ’संवाद’ साधूया म्हणून तो जमत नाही, सहज बोलता-बोलता सुरू होतो आणि संपल्यावर एक प्रकारची शांतता मनात भरून उरते.या संवादासाठी नेहमीच शब्दांची आवश्यकता असते असं ही नाही, कधी कधी नरजेतून, मायेच्या स्पर्शातून तर कधी नुसतं एकमेकांजवळ मूकबसून सुध्दा संवाद साधला जातो.कधी तर अनोळखी असणा-या व्यक्तीशी दोन-चार शब्द बोलण्यातून सुध्दा संवाद सुरू होतो तर कधी अगदी आपलं म्हणवणारं माणूस संवाद न-साधू शकल्यामुळे कधी आपल्यापासून दुरावतं हे कळतच नाही..
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment