एका दिवशी वाडेश्वरला मी माझ्या ग्रुपची वाट बघत उभी होते,करायला विशेष काही नव्हतं म्हणून सहजच इकडे-तिकडे नजर टाकली तर फुटपाथवर एक वेगळंच दृश्य दिसलं..
एक वयस्क जोडपं बसलेलं होतं..अंगावर ठिगळं लावलेले बेताचे कपडे..हाता-पायाची हाडं-काडं झालेली..कित्येक दिवसात अंगाला पाणी न-लावल्यामुळे काळवंडलेले चेहरे पण तरीही त्यावर हास्य होतं नजर चमकत होती आणि त्याचं कारण होतं त्यांच्याजवळ असलेलं एक छोटं वर्षा-दीड वर्षाचं बाळ
ते बाळ सुध्दा मळक्या कपडयात होतं, कदाचित त्यांच्यासारख्याच कोणा भिकारणीचं असावं आणि कदाचित ते आजी-आजोबा त्याचं बेबीसिटींग करत होते.
त्या आजोबांनी एक पाव त्यांच्या प्लास्टीकच्या पिशवीतून काढला आणि त्याचा मोठा तुकडा त्या बाळाच्या हातात दिला,उरलेल्या तुकडयाचे दोन भाग करून एक आजीला दिला आणि एक स्वतः खायला घेतला.ते बाळ हातात तो तुकडा घेऊन खात होतं आणि त्या दोन्ही म्हाता-यांच्या चेह-यावर त्याचा आनंद दिसत होता.थोडया वेळाने त्या बाळाचं खाऊन झालं तसं त्या आजोबांनी त्याला पाणी प्यायला एक प्लास्टीकची बाटली काढली, ते बाळ पण भारी होतं, त्याने बाटलीचं झाकण उघडून व्यवस्थित पाणी प्यायलं.पोटपूजा झाल्यावर ते बाळ धडपडत उठलं आणि चालायचा प्रयत्न करू लागलं.तो आजीपासून दोन-चार पावलं पुढे जाऊन माघे फिरायचा अन पुन्हा आजीपर्यंत यायचा मधेच त्याचा तोल जाऊन तो पडायला लागला की ती आजी पुढे होऊन त्याला धरायची आणि ते बाळ खुदकन हसायचं आणि ते दोघेपण..मधेच ती आजी त्या बाळाच्या चेह-यावर हात फिरवून कानामागे बोटं मोडत होती..
हा सगळा कार्यक्रम बराच वेळ असाच सुरू होता..तिघांच्या चेह-यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता..मी तर अक्षरशः भान हरपून त्यांचा हा खेळ बघण्यात दंग झाले होते..त्या बाळलीलांमुळे काही क्षणांपुरतं का होईना त्या दोन म्हाता-या जीवांना आयुष्यात आनंद मिळत होता..
कसं ना,बाळ भिका-याचं असू देत नाही तर श्रीमंताचं त्याच्या निरागसतेत कुठेही काहीच फरक नसतो.देवाघरचं ते फुल त्याच्या सहवासातल्या सगळ्यांना सारखाच आनंद देतं..
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment