Tuesday, June 12, 2012

सरसगड

येस्स फायनली जून सुरू झाला :)
आमच्या ऑफिसमधल्या हौशी ट्रेकर्स ग्रुपने ह्या वेळेस आतापर्यंत न-बघितलेल्या अशा काही जागा निवडल्या आणि सगळी तयारी करून आम्ही ३० जण ९ जून रोजी पावसाळी ट्रेकच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकसाठी सज्ज झालो.

सरसगड सर करून जाण्याचा मनसुबा करून आम्ही सगळे 'आयटी'तले मावळे बसने पाली गावाला निघालो,सुरूवातीला सगळीकडे स्वच्छ ऊन होतं पुढे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेला लागलो तसे थोडेसे काळेढग आकाशात दिसायला लागले तसं आम्हांला जरा बरं वाटलं..पुढे पाली गावाकडे वळलो आणि पाऊस सुरू झाला अगदी जोरात आम्ही सगळेजण एकच गिल्ला करत चलाsss आला एकदाचा पाऊस म्हणून खुश झालो पण पुढे पालीला पोहोचल्यावर कळलं की तो पाऊस फक्त मागच्या रस्त्यावरच पडला इथे अजुनही ऊनच दिसत होतं.

आमच्या म्होरक्याला सुध्दा आजच्या ट्रेकचा रस्ता माहित नव्हता मग तिथे गावात थोडी चौकशी केली आणि आम्हा मावळ्यांच्या तुकडया निर्देशिलेल्या मार्गाकडे कूच करू लागल्या.


मंदिरापासूनच जवळच एका पाऊलवाटेने सरसगडासाठी वाट जाते तिथे येऊन आम्ही थांबलो. म्होरक्या आणि अजुन एक-दोन जण पुढे जाऊन थोडा अंदाज घेऊ लागले.रस्ता तर दिसत नव्हता पण व्यवस्थित अशी पाऊलवाट दिसली जिने आमची वानरसेना पुढे सरकू लागली.बरीच मंडळी अगदी पहिल्यांदाच 'ट्रेक' असतं तरी काय हे आजमावयाला आलेली होती त्यामुळे त्यांनी लगेच आपापले कॅमेरे काढून फोटोसेशन सुरू केलं.थोडयाच अंतरावर सरसगडाचं दर्शन झालं.


निघालो तेंव्हा ऊन जाणवत होतं पण आकाशात काळे ढगही दिसत होते,लवकरच पाऊस येईल ह्या आशेवर आम्ही पुढे सरकत होतो.पण थोडं अंतर चाललो अन लक्षात आलं की ही वाट आता संपली आणि पुढे सगळी काटेरी झाडं-झुडंप आहेत,आता काय करावं बरं? परत आमचे अनुभवी ट्रेकर्स पुढे जाऊन कुठे काही रस्ता दिसतोय का ह्याची पाहणी करून आले आणि लक्षात आलं की आपण बहुतेक तरी चुकीचा रस्ता घेतलाय अन आता पुढे जर जायचं असेल तर ह्या झाडांमधूनच रस्ता काढणं आवश्यक आहे! मग काय, म्होरक्याने ललकारी दिली आणि आम्ही पुढे सरसावलो.एक-एक पाऊल टाकत, काटेरी झाडं बाजूला करत करत ओळीने पुढे जायला लागलो.तो पूर्ण रस्ता मातीचा निसरडा असा होता,चुकून जरी कोणाचा पाय घसरला तरी मागच्या सगळ्यांना आडवं पाडेल अशी भिती वाटत होती.निघालो तेंव्हा पाऊस नाही म्हणून नाराज झालेलो आम्ही आता, बरं झालं पाऊस पडला नाही,नाहीतर ह्या मातीत पाय रूतून बसले असते अन ना धड पुढे जाता आलं असतं ना धड माघे, म्हणून खुश होत होतो.

बराच वेळ तसं चालल्यानंतर पुढे मोठाले दगड दिसू लागले आणि काटेरी झाडं अगदी तुरळक झाली.त्या दगडांवरून चढत वरती जातांना एकेकाला आपापली सगळी शक्ती आणि युक्ती पणाला लावावी लागत होती.एकजण ज्या रस्त्याने जात होता दुसरा त्याच रस्त्याने येतांना घसरत होता त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची वाट शोधत वर यायचं ठरवलं आणि पहिला टप्पा पार पडला :)

सगळे मावळे पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यावर पुढची चढाई सुरू झाली.इतक्यात दोन-चार करत पावसाचे थेंब आमच्याभोवती फेर धरू लागले,त्यांच्यासोबत नाचत आम्ही पुढे निघालो.ह्या जागी येण्याचा पूर्वानुभव कोणालाही नसल्यामुळे आणि आमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच ट्रेकर्सचा ग्रुप सोबत नसल्यामुळे ज्याला सुचेल तसा रस्ता शोधून काढणे मोहिम करत आम्ही एका अशा टप्प्याला येऊन पोहोचलो जिथून सरसगड आम्हांला अगदी जवळून स्पष्ट दिसू लागला.गावातल्या कोणीतरी आम्हांला कल्पना दिली होती की गडाला वरती जायला पाय-या आहेत, त्या पाय-या आम्हांला आत इथून दिसू लागल्या :) एव्हाना आम्हांला सुरूवात करून दोन तास झाले होते,एकीकडे सगळ्यांना भूका लागल्या होत्या पण जेंव्हा पाय-या दिसल्या तसा पुन्हा सगळ्यांना हूरूप आला आणि आम्ही धावतच सुटलो आणि ह्या गडबडीत पुन्हा एकदा चुकीचा रस्ता निवडला.आता मोठाल्या दगडांसोबत मोठाली-काटेरी खोड असलेली झाडं पण होती वाटेत.आम्ही पुन्हा प्रयत्नांची शर्थ करत त्या दगडांवरून उडया मारत ,धडपडत पुढे जायला सुरूवात केली आणि ट्रेकचा ८५% रस्ता सर केला  :D


पाय-या सुरू होण्याआधी एक सपाट जागा लागते जिथे दगडामधे कोरलेली चौकोनी गुहेसारखी एक जागा आहे पण आतमधे काहीच नाहीये.ह्या जागेवरून खाली असणारं गाव,बल्लाळेश्वराचं मंदीर अशा सगळ्या गोष्टी अगदी छोटयाशा पण स्पष्ट दिसतात आणि वरती बघितलं तर सरसगडाचा एक मोठठा काळा पाषाण दिसतो.


मंदीरापासून उजवीकडे बघितलं तर एका नदीचं नागमोडी वळणाचं पात्र दिसतं.ह्या ठिकाणी वारा अगदी नाजूक अशी शीळ घालत कानाजवळून फिरत होता तर समोर डोंगरद-यांची रांग दिसत होती.आकाशात सूर्याचा लपंडाव सुरू होता आणि ऊन-सावल्यांचा मजेशीर खेळ दिसत होता,मधूनच एखादा काळा ढग वाकुल्या दाखवत इकडे-तिकडे पळत होता आणि पाऊस मात्र येत नव्हता..



घटकाभर तिथे विश्रांती घेऊन आम्ही उरलेला २५% भाग सर करायला सुरूवात केली.पाय-या दिसत होत्या त्यामुळे सगळ्यांना वाटलं चला आता पटापटा आपण वरती जाऊ शकतो पण आमचा हा भ्रम अगदी पहिल्या दोन पाय-या चढल्यावरच विरघळला कारण एक पायरी साधारण दीडफुट उंचीची आहे आणि पावसाच्या पाण्याने चांगलीच निसरडी झालेली.मग काय पुन्हा एकदा कूर्मगतीने आम्ही सगळे पाय-या चढून वरती आलो.



हूश्श!! आता गडाच्या साधारण अगदी वरच्या भागात आम्ही येऊन पोहोचलो.तिथे एक दगडी हौद दिसला एका चौथ-यावर तर थोडया उंचीवर एक साचलेल्या पाण्याचं तळं दिसलं.ह्या उंचीवरून खालंच सगळं अगदी ठिपक्यांइतकं लहान दिसू लागलं.जोरदार वारा सुरू होता अगदी इतका की माणूस उडून जाईल :)

आता पुढे कसं जायचं ह्याचा विचार आम्ही सगळे करत असतांनाच एक कुत्रा आमच्या थोडंसं पुढे येऊन उभा राहिला.जणू काही ह्या गडाचा गार्ड आणि गाईड असल्यासारखा.आम्ही निघायला सुरूवात केली आणि त्याने आम्हांला रस्त्याचं मार्गदर्शन करायला.मग काय आम्ही भराभर पुढे जायला लागलो.थोडयाच अंतरावर आम्हांला एक अडचण दिसली.साधारण ३फूट उंच अशी दगडाची नैसर्गिक भिंत होती आणि त्यावर चढण्याकरता अगदी एकच पाय ठेवता येईल असा पायरीवजा दगड.ते बघून पुन्हा एकदा विचार आला की,इथुन पुढे खरंच जायचं की नाही? आता इतकं वरती आलोय तर बास ना वरती नको जायला..पण आमचा कॅप्टन म्हणाला नाही! आता हत्ती गेला अन शेपूट राहिलंय अजिबात माघे फिरायचं नाही..चला आपण प्रयत्न करू,चढता येईलच. आणि काय आश्चर्य आमच्या सोबत असणा-या त्या गार्डने आम्हांला प्रात्यशिक करून दाखवलं!! मग आम्ही सगळेपण चढून वरती पोहोचलो.



येस्स्स्स..आलो एकदाचे सरसगडाला सर करून.
वरती गेल्यावर तिथे विशेष काहीही बघण्यासारखं नाही.एक छोटंसं शंकराचं देऊळ आहे आणि एक चबुतरा.त्या चबुत-याच्या अगदी समोर एक महादेवाच्या पिंडीसारखा डोंगर आहे.



तिथे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा एकदा खाली जायला निघालो.वरती येतांना जितकं कठीण वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त उतरणं अवघड आहे ह्याचा अंदाज अगदी पहिल्या क्षणालाच आला  :( पण आता पर्याय नव्हता, उतरावं तर लागणारच होतं आणि तेही वेळेत कारण पोटामधले कावळे ओरडून एकच कल्ला करत होते!मग काय घेतलं देवाचं नाव आणि केली सुरूवात.

दगडाची भिंत उतरून आल्यावर समोरचा रस्ता बघतांना एक मनोहारी दृश्य दिसलं अगदी दूरवरून मुसळधार पाऊस घोडदौड करत येतांना दिसला.आमची सगळी वानरसेना ती भिंत उतरून येईपर्यंत तर पावसाने आम्हांला गाठला.
त्या सहस्त्रजलधारांना झेलत सगळेजण पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागलो आणि म्होरक्याचा आवाज आला,अरे चला आपल्याला खालीपण उतरायचं आहे! भानावर येत लगेच सगळे पटापट उड्या मारत पुढे निघालो.दगडी पाय-या उतरून येत असतांना आमचा गार्ड अचानक थांबला निरखून बघितलं तर एक महाशय रस्ता ओलांडतांना दिसले.
समाधीस्थ असलेल्या ह्या खेकड्यानेच आमचा रस्ता अडवला होता



तर पुन्हा एकदा आम्ही त्या सपाट जागी येऊन पोहोचलो.पाऊस पडून गेल्यामुळे आता पुढे कोणत्या रस्ताने जावं ह्याचा विचार होत असतांनाच आम्हांला एक चांगला रस्ता दिसला आणि डोक्यात प्रकाश पडला की येतांना आपण हा रस्ता निवडला असता तर वरती येण्याचा वेळ वाचला असता आणि झाडा-झुडपातून वाट काढत येणंही वाचलं असतं

तर आता रस्ता स्पष्ट झाल्याने आम्ही टणाटण उडया मारत खाली जायला सुरूवात केली.अगदी ४०मिनीटातच आम्ही खाली आलो.
मग एक-एक तुकडी आधी मंदीर आणि पुढे फडके काकूंकडे जेवणासाठी म्हणून कूच करू लागली.
फडके काकूंनी अगदी गरम-गरम वरण-भात-भाजी-पोळी आणि शिरा असं चबिष्ट जेवण वाढलं आणि हाता-तोंडाची लढाई सुरू झाली.पोटभर जेवण करून आम्ही पार्किंगकडे वळलो आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली.

अशा त-हेने, प्रत्येकातली शक्ती आजमावणारा असा हा सरसगडाचा ह्या पावसाळी सिझनमधला पहिला ट्रेक पार पडला :)  

2 comments:

  1. खूप छान लेख आहे आणि सविस्तर .मग झाली न भ्रमंती व्यवस्थित ?

    ReplyDelete
  2. धन्यवाद अभिजीत, हो हो अगदी व्यवस्थित झाली भ्रमंती :-)

    ReplyDelete