Thursday, February 28, 2013

ईssssss छीssssss

आज सकाळी ७ चा अलार्म बंद करून मी पाणी आणायला म्हणून किचन मधे गेले. सिंकजवळ ठेवलेल्या भांडयांच्या टबमधून पेला घ्यायला गेले आणि ईssssss छीssssss करत पळत बाहेर आले. माझा आवाज ऐकून दिवाणखान्यामधे झोपलेल्या दोनही रूममेट्स एकदमच जाग्या झाल्या आणि डोळे चोळत विचारायला लागल्या, ’क्या हुआ?’

जे मी काही क्षणांपूर्वी बघितलं होतं ते बघून माझी छाती अजुनही धडधडत होती त्यामुळे मला त्यांना धडपणे उत्तर पण देता येईना. मी म्हटलं, ’अरे वो सिंक में, वो छीssssss याक्स वो है!’ त्यांना कळेना, ’क्या है??’.

मी म्हटलं, ’छिपकलीssssss’ ते ऐकुन त्या दोघी एकदमच ओरडल्या ’अ‍ॅssssss’ ते ऐकुन बाकी रूम्समधून सगळ्याजणी धावत आल्या. ’क्या हुआ?क्या हुआ?क्या हुआ?’ मी काही बोलणार तेवढ्यात त्या दोघी म्हटल्या, ’सिंक में छिपकली है!’ बाकी सगळ्यांनी पण ईssssss चा सुर छेडला!

आम्ही सगळ्याजणी जरावेळाने शांत होऊन विचार करायला लागलो की आता करायचं तरी काय. ही पाल आता घालवायची कशी!

एकजण म्हटली, ’उसपे पानी डालते हैं.’ लगेच दूसरी म्हटली, ’अरे नहीं नहीं छिपकली पे पानी नहीं डालतें, कुछ और सोचना पडेगा’, आणि नखं खाऊ लागली. तोवर तिसरी म्हटली, ’अरे वो सिक्युरिटी गार्ड को बुलाते हैना’.
मला ती आयडिया ठीक वाटली म्हणून मी लगेच तिला सोबत घेतलं आणि आम्ही दोघीपण अगदी घाईघाईने २५ मजले उतरून अर्थात लिफ्टने खाली आलो. सिक्युरिटी गार्डपाशी गेल्यावर दोघी सोबतच ओरडलो, ’भैय्याsss छिपकलीsss’.
तो बिचारा जस्ट डयुटीवर आला होता, अजुन स्थिरस्थावरही झाला नव्हता आणि आम्ही हाक मारली तसा तो खुर्चीतून उडालाच फुटभर. घाबरून विचारायला लागला, ’क्या हुआ मैडम कहां है छिपकली? कहां है??’ मग मी म्हटलं, ’अरे यहां नही, ऊपर हमारे घरमें किचन के सिंक में गिरी है! आप जल्दी से चलो’. माझं बोलणं ऐकुन तो थोडा रिलॅक्स झाला आणि म्हटला, ’अरे मैडम ये तो हाऊस किपींग वालों का काम है, वो अभी आये नहीं. वो आने के बाद ऊनको भेज देता हूं आपका फ्लैट नंबर बता दीजीये.’ मी आणि रूमी दोघींनी एकमेकांकडे बघितलं आणि वाकडा चेहरा करत फ्लॅट नंबर सांगून वर निघालो.

घरामधे आलो तर बाकी सगळ्याजणी किचनमधे उभ्या होत्या. जाऊन बघितलं तर दिसलं एकीने हातामधे झाडू घेतला होता आणि अंगात आल्यासारखं तो ती झाडू फिरवत होती. मी विचारलं, ’क्या कर रही है ओय?’ ती म्हटली, ’अरे वो झाडू देखके डरेगी और उपर के तरफ भागेगी ना.’
मी तिच्या हातातला झाडू घेतला आणि म्हटलं, ’इससे अच्छा तो वो झाडू उसके थोडा पास रखो वो उसपे चढके उपर आ सकती है.’ हे ऐकून बाकीच्या म्हटल्या, ’हां ये ट्राय करते हैं’. मग मी हातात झाडू घेतला आणि भितभितच त्या पालीच्या जरा जवळ टेकवला. आम्ही सगळ्याजणी श्वास रोखून बघू लागलो पुढे काय होतंय ते. ती पाल काय हलायचं नाव घेईना. मी झाडू थोडा हलवला तशी ती पण हलली आणि अचानक वर यायचा प्रयत्न करू लागली ते बघून मला इतकी भिती वाटली की मी सरळ झाडूच सोडून दिला आणि ओरडत बाजूला झाले. मला भयानक भिती वाटली की ती पाल आता झाडूवरून चढत माझ्या हातावर येते की काय! गॉड कित्ती किळसवाणी दिसत होती ती पाल, याक्स!

मग एकीने शक्कल लढवली की तिथे आपण पेपर टाकू म्हणजे त्या पालीला वरती चढता येईल. तिने पेपर आणून टाकलासुध्दा पण ती पाल ढिम्म हलेना. आता काय करावं हा विचार करत आम्ही बघत होतो तिच्याकडे, सगळीकडे थोडी शांतता झालीये असं वाटून त्या पालीने कागदाकडे मोर्चा वळवला. आम्ही सगळ्याजणी बघू लागलो की, आता ती कशी वर येते पण हाय रे कर्मा! ती पाल नुसतीच त्या कागदावर जाऊन बसली पुढे सरकेचना! नीट बघितल्यावर लक्षात आलं, तो कागद टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या गुळगुळीत पुरवणीचा होता मग कसलं कप्पाळ ती पाल त्यावरून चढून वर येणार!

सकाळी उठल्यापासून आज हाच गोंधळ सुरू झाला होता आणि तासभर होऊनही संपत नव्हता. सगळ्यांची चहाची वेळ झालेली म्हणून एकीने चहा करायची तयारी सुरू केली. चहाचं आधण ठेऊन तिने दूध कपामधे काढण्यासाठी कप उचलला आणि पुन्हा एकदा किंकाळी आणि त्यापाठोपाठ काहीतरी फुटल्याचा आवाज झाला!
आम्ही परत सगळ्या धावत किचनमधे, बघतो तर काय जमिनीवर कप फुटलेला दिसत होता आणि बाजूलाच पालीची तुटलेली शेपटी!! मला वाटलं तिने हिम्मत करून पालीवर वार करत ’पाल’वॉर सुरू केली अन त्यात पालीच्या शेपटाचा बळी गेला.
पण तसं काही दिसत नव्हतं कारण पालबाई तर सिंकमधे त्या गुळगुळीत कागदाच्या तुकड्यावर आराम करत होत्या. मग झालं कसं हे म्हणून तिला विचारलं तर ती म्हटली, ’अरे मैने वो कप उठाया दूध डालने के लिये तो कुछ अजीबसा महसूस हुआ हाथ को इसलिये देखा तो वो पूंछ थी छिपकली की छीssssss औरे वो कप मेरे हाथ से गिर गया :( ’.
बिचा-या माझ्या रूमीची अवस्था इतकी वाईट झाली होती की तिला शेवटी आधार देत मी रूममधे आणून बसवलं.

बाकी सगळ्याजणी म्हणायला लागल्या,
’क्या यार ये छिपकली की क्या जरूरत है नेचर में. भगवान ने क्यों बनाया ऐसे भद्देसे प्राणी को.’
अरे ऐसे नहीं चलता, नेचर के साईकल में वो भी जीव जरूरी है.
’हां ठीक है लेकीन फिर हमारे घर में क्यों आयी वो, यहां तो जरूरत नहीं थी ना! सारा मूड खराब कर दिया सुबह का, अब ऑफिस जाने का मन हीं नहीं हो रहा :(’.

ऑफिसचं नाव ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे हो आपल्याला सुध्दा जायचं आहे ऑफिसला. मग मी अजुनच प्रयत्नपूर्वक विचार करू लागले त्या पालीचा बंदोबस्त करण्याचे आणि दारावरची बेल वाजली. आता ह्या वेळेला कोण आलं म्हणून दार उघडलं तर समोर हाऊस किपींगचा माणूस दिसला. मगासच्या गोंधळामधे आम्ही विसरूनच गेलो होतो की खाली सांगून आलोय म्हणून.

मग काय, मी लगेच त्या माणसासाठी दार उघडलं आणि त्याला किचनमधे घेऊन आले. पाल दाखवली सिंकमधली तसं त्याने तो पेपर उचलायचा प्रयत्न केला पण त्या पालीने परत सिंकमधे उडी मारली. मी अशी वैतागले. त्या पालीला सिंक फारच आवडलं होतं वाटतं आमचं!! पण मग त्या माणसाने हाताने पालीला उचललं आणि प्लास्टीकच्या पिशवीमधे बंद करून घेऊन गेला.हुश्श!!!!!!!

काय बरं वाटलं ती पाल नजरेसमोरून दूर झाल्यावर, गॉड! इतकासा तो जीव पण आम्हां पाच-सहा जणींच्या तोंडचं पाणी पळवलं होतं तिने गेले तीन तास!

हूsह संपला एकदाचा तो ’पाली’चा मॉर्निंग शो असं म्हणत आम्ही सर्वजणी भराभर आवरायला लागलो.

Wednesday, February 20, 2013

फॅमिली ड्रामा



नावावरून काय वाटतं तुम्हाला ह्या नाटकामधे काय असेल?

मी जेंव्हा पेपरमधे बघितलं तेंव्हा मलाही कल्पना नव्हती, पण सुकन्या कुलकर्णी आहे म्हणून म्हटलं बघावं. लकीली नाटकाचं अगदी पुढच्या रांगेतलं तिकीट मिळालं.

पडदा उघडला आणि एका २बीएचके घराचं सुरेख नेपथ्य समोर दिसलं. पहिल्या सीनमधेच घराची गृहीणी म्हणजे सुकन्या कुलकर्णी समोर आली आणि नाटकाला सुरूवात झाली...

हे नाटक अतिशय छान आणि अर्थपूर्ण वाटलं मला. गोष्ट खुप साधी आहे पण त्यामधून वेगवेगळ्या नात्यांचे संबंध अगदी सहजतेने उलगडून दाखवले आहेत.

बघतांना वाटतं हे सगळं खरंच असं घडत असतं आपल्यासोबत किंवा आजूबाजूला पण आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. कधी-कधी अचानकपणे लक्षात येतं पण त्याला म्हणावं तितकं महत्त्व आपण देत नाही. एकुणच नातेसंबंध मग ते नवरा-बायको, आई-मुलगा किंवा मुलगा-वडील यांमधील असू देत खुप नाजूक असतात आणि एखाद्या हलक्या धक्क्यानेही उध्वस्त होऊ शकतात. जर नात्यांना निटसा वेळ हवा तेंव्हा दिला नाही तर ती कायमची दुरावू शकतात.

हम्म हे सगळं थोडंसं जड वाटला ना? पण नाटकामधे ते इतक्या हलक्या-फुलक्या प्रसंगांनी फुलवलं आहे ना की, आपण कधी त्या सगळ्यांमधे गुंतून जातो कळतचं नाही.

अव्दैत दादरकरची ही कथा आहे. जेंव्हा त्याला आपण स्टेजवर बघतो आणि कळतं की अरे हा तर अगदी यंग आहे म्हणजे आयुष्यातले काही पावसाळेच बघितलेला. पण खरंच त्याचं ह्यामुळेच कौतुक वाटतं की त्याने एका मुलाच्या, आईच्या, वडीलांच्या आणि नाटकामधे असलेल्या पात्रांच्या दृष्टीकोनातून किती व्यवस्थित विचार केला आहे. त्यांच्या जागी उभं राहून त्यांच्या नेमक्या भावना काय असतील ह्याचा चपखल विचार करून आपल्यासमोर मांडलं आहे. सिम्पली सुपर्ब.

बाकी नाटकामधे बाबांची भूमिका करणारे अजित भुरे ह्यांची आवाजाची फेक आणि एकुणच अभिनय अगदी टिपीकल बाबांसारखा आहे.सुकन्या कुलकर्णी तर बेस्टच वाटली मला  :)

ती एका प्रसंगामधे अगदी प्रसंगावधान राखुन वागणारी कर्तव्यदक्ष गृहीणी असते तर दुस-याच क्षणी हळवी होणारी आई. कुठे अगदी लहान मुलीला लाजवेल अशी क्युट,इनोसंट असते तर कुठे नवरा कितीही चूक असला तरी त्याला बरोबर म्हणणारी आणि त्याचं सगळं अगदी आज्ञाधारकपणे ऐकणारी पत्नी असते.

तिचं काम सगळ्यात जबरदस्त आहे नो डाऊट आणि हॅट्स ऑफ टू हर.

अव्दैत दादरकर, अजित भुरे तसंच बाकीच्या कलाकारांचाही अभिनय अतिशय चांगला आहे आणि सगळ्यांचं टायमिंग सुध्दा अगदी भारी जमलंय. अव्दैतचा उस्फुर्त अभिनय आणि सुकन्या कुलकर्णीची जुगलबंदी मजा आणते नाटकामधे  :D

एकुणच हे नाटक बघितल्यावर खुप छान रिलॅक्स फील झालं. तुम्हांला सुध्दा हा अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य बघा येत्या वीकांताला :)

Monday, February 18, 2013

माझिया भावजींना रीत कळेना!



प्रशांत दामले आणि कविता लाड ह्या जोडीचं सध्या रंगमंचावर असणारं नाटक म्हणजे 'माझिया भावजींना रीत कळेना'!

मुंबईमधे आल्यावर नाटक बघायचा योग पुन्हा एकदा जुळून आला आणि हे नाटक बघायला मी अगदी उत्साहाने गेले. संतोष पवार ह्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. एकुण पाच पात्रांना घेऊन त्यांनी हे दोन अंकी नाटक बसवलेलं आहे. स्वतः संतोष पवार यांनी देखील ह्यामधे भूमिका केली आहे.

नाटकाला सुरूवात होते ती कविता लाड-संतोष पवार ह्या जोडीच्या....अं मी तुम्हांला नाटकाची स्टोरी सांगू का? नको...नको

तर नाटकामधे एका कुटुंबाची मजा-मजा दाखवली आहे. म्हणजे नवरा-बायको ह्यांच्या टुकीच्या संसारामधे मेव्हणा कसा त्रास देत असतो तरी बहिणीला त्याचा किती पुळका असतो वगैरे वगैरे... लोणचे-पापड विकून संसार चालविणा-या ह्या जोडप्याच्या जीवनात अचानक एके दिवशी 'भावजी' येऊन ठेपतात आणि तिथून सगळं चित्र बदलतं. हे भावजी म्हणजे प्रशांत दामले..आणि पुढे होणारी सगळी धमाल तुम्ही प्रत्यक्ष नाटकामधेच एंजॉय करू शकता*

* जर तुम्हांला प्रशांत दामले अतिशय आवडत असेल तरच तुम्ही हे नाटक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून बघू शकता.

संतोष पवार ह्यांचं दिग्दर्शन आहे म्हणून असेल किंवा खरं जे काही असेल पण सगळ्या पात्रांचा अभिनय अगदी अंगावर येतो.
नाटकामधे तुम्हांला मोठ्याने बोलावं लागतं पण प्रत्येक शब्द ओरडून बोलणं अपेक्षित नाहीये ज्याचा इथे पदोपदी प्रत्यय येतो
बरं नुसतं हातवारे करून जमू शकतं ना, तरी अंगविक्षेप का करावे? काही वेळेला ते आवश्यक असतात नाटकामधे पण अहो वाक्यागणिक करायची काय गरज आहे

पहिला अंक बघून झाला तेंव्हा वाटलं ह्या नाटकामधे स्टोरी काय आहे? काय सुरू आहे स्टेजवर?

अभिनय म्हटलं तर प्रशांत दामले आणि संतोष पवार ह्यांना अगदी विनासायास त्यांची पात्रं वठविता आली आहेत. कविता लाड ह्यांना थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागले आहेत गाणं म्हणण्याचे. बाकी त्यांना सुध्दा नाटकामधे काम करण्याचा अनुभव असल्यामुळे अभिनयासाठी वेगळं काही करावं असं विशेष नाही ह्या पात्रामधे.

दुस-या अंकामधे अगदी शेवटच्या पंधरा मिनिटांपूर्वीपर्यंत असाच धिंगाणा सुरू राहतो आणि नाटक असंच काहीही खुलासा न-करता संपणार की काय हे वाटायला लागल्यावर मग कुठे एकदाचं ते रहस्य ओपन होतं, हुश्श!

नाटकासाठी विषय चांगला घेतला आहे पण अगदी शेवटच्या मिनीटापर्यंत तो विषय कुठूनच ओपन होत नाही त्यामुळे समोर होणा-या सगळ्या प्रकाराचा शीण येतो. पहिल्या अंकामधे विनोद आणि अंगविक्षेप पहिल्यांदा बघत असल्याने हसू येतं पण दूस-या अंकामधे तेच सुरू झाल्यावर हसण्याची इच्छा राहत नाही

असो, ह्या नाटकामुळे प्रशांत दामले यांनी 'लोकांना हसविण्याचं' त्यांचं ध्येय कायम राखत नवीन नाटकाची एन्ट्री मराठी रंगभूमीवर करवली आहे. बघू आता हे नाटक कोणते विक्रम प्रस्थापिक करते.

Wednesday, February 13, 2013

जीव तीळ-तीळ तुटतो...



आज ऑफिसमधे आल्यावर पहिलं मेल दिसलं ते 'टॅक्स कंप्युटेशन शीट फॉर २०१२-२०१३'!

सगळं बाजूला टाकून आधी त्यामधे केलेली आकडेमोड बघितली आणि माझं मन ज्या भितीने ग्रासलं होतं ते खरं निघालं
मला येत्या दोन महिन्यांमधे पेंडींग टॅक्सच्या नावाखाली मोठा दणका बसणार आहे

ही आकडेमोड प्रत्येक कंपनीमधे वेगळ्या प्रकारे केली जाते असं का? कारण जर मी ही माहिती एखाद्या सी.ए. कडून तपासून घेतली तर तो मला काहीतरी वेगळंच सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यातरी बुध्दीच्या बाहेरच्या आहेत पण सध्या तरी एकच कळत होतं की माझे पैसे पुन्हा एकदा टॅक्स नावाच्या भस्मासूराच्या पोटात जाणार आहेत

माझ्यासारखीच माझ्या काही सहका-यांची अवस्था झाली होती. कदाचित तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल, घेत असाल. किती निर्विकार असते ती आकडेमोड पण त्याला बघून मात्र माझा जीव तीळ-तीळ तुटतो

का? का? का म्हणून फक्त आम्हा नोकरी करणा-यांवर हा अन्याय
आम्हांला पगार देतांनाच कर कापून घेतला जातो त्यामुळे काही करू पण शकत नाही.
एकवेळ हेही मान्य केलं की देशाचा विकास आम्ही हातभार लावल्याशिवाय होणार नाही. पण, आम्ही जो कर भरतो तो जातो कुठे तर
>> राजकारण्यांच्या पोटात
>> बिल्डर्स-कॉन्ट्रॅक्टर्स च्या खिशात
आणि मोठमोठ्या बिझिनेसमनच्या घशात!

आमच्यासाठी त्याचा कितपत उपयोग केला जातो? टक्केवरी अगदीच एखादा टक्का असेल किंवा त्यापेक्षाही कमीच!

जेंव्हा बघावं तेंव्हा प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत असतात. बरं भाव वाढत असतील, त्याची खरी कारणं जी काही असतील, तर मग त्या प्रमाणात आमचा पगारपण वाढवा ना. पण पगार वाढून कितीसा उपयोग होईल म्हणा कारण आता तर म्हणे टॅक्स स्लॅबमधे पण बदल होणार आहे म्हणजे फरक पडणार नाहीच

निवडणूका आल्या की अगदी गल्लीतल्या गुंडापासून ते दिल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळ्यांना प्रचारासाठी लाखोनी पैसा लागतो तो येतो कुठून - तर आम्ही दिलेल्या टॅक्समधून.

परदेश दौरे करणा-या ढीगभर नेत्यांचा प्रवासखर्च आणि सगळे शानशौक पूर्ण होतात कशातून - तर आम्ही दिलेल्या टॅक्समधून.

कधीतरी पेपरामधे कोणत्या तरी नेत्याचा पगार वाचन्यात आला होता त्याचा पगार अगदी सामान्य नोकरदाराइतकाच होता पण त्याची संपत्ती मात्र एखाद्या कोट्याधीशाला लाजवील इतकी होती हे सगळं कुठून येतं मग??

मला एक प्रश्न असाही पडतो की जर सरकार ह्या लोकांना पगार देते तर त्यांचा पण टॅक्स कट होतो काहो?

कर भरायची तारीख जवळ आली की सगळ्या मिडीयामधून बिझिनेस असणा-या लोकांना कर भरण्याचं आव्हान केलं जातं. त्यातले किती टक्के लोक खरंच कर भरतात? इनफॅक्ट आम्ही नोकरदार ज्या कंपन्यांमधे काम करतो त्या कंपन्या सुध्दा जितका भरायला हवा तितका कर भरतात का?

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एखादा अर्थतज्ञ देऊ शकेल आणि आपली करभरणा व्यवस्था कशी चांगली आहे हे कागदोपत्री असणा-या आकडयांमधून दाखवूनही देईल पण जोवर मला प्रत्यय येणार नाही तोवर ह्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवायचा कसा

असा काहीतरी नियम करायला पाहिजे सरकारने किंवा हुशार अर्थतज्ञांनी की, फक्त नेत्यांनी आणि कोट्याधीश बिझनेस असणा-यांनी कर भरायचा.

आता तुम्ही म्हणाल ते लोक पैसे कुठुन आणणार तर तो त्यांचा प्रश्न आहे. नेत्यांना सरकार दरबारी पगार मिळेल पण त्यातूनही 'कर' वजा केलेला असेल आणि बाकी पैसे त्यांनी त्यांचे कुठूनही उभे करावेत!
तर नियमावली अशी असायला हवी की,
>> नेता/बिझनेसमन आणि त्याच्या कुटुंबातील जवळच्या सगळ्यांनी ज्यापण सेवा वापरल्या त्या प्रत्येकाला कर लागू.
>> ते जिथे जातील त्या रस्तासाठीचा कर.
>> जिथे राहतील त्या ठिकाणासाठीचा कर.
>> ज्या वस्तू खरेदी करतील. म्हणजे अगदी टूथपेस्टपासून ते अन्नधान्य-कपडयांपर्यंत आणि सोनं-नाणं ते मुलांच्या शिक्षणापर्यंत सगळ्या गोष्टी त्या सगळ्यांवर कर.
>> बिझनेससाठी लागणा-या सगळ्या गोष्टींवर कर

पण काहीही झालं तरी नोकरदारांकडून मात्र काही कर घ्यायचा नाही.

येत्या फिस्कल इयर मधे ही आयडीया अमलात आणायला काय हरकत आहे मी म्हणते

Friday, February 8, 2013

थेट भेट - कालाघोडा आर्टस फेस्टीव्हल २०१३

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही फेब्रुवारी सुरू झाल्यावर 'काला-घोडा फेस्टीव्हल' कधी सुरू होणार हे बघतांना कळालं की ते ३ तारखेला सुरू होणार आहे. मग मागच्या रविवारी कॅमेरा घेऊन मी थेट भेट घ्यायला गेले काला घोडाची.

काला-घोडा असोसिएशन ने हे फेस्टीव्हल १९९९ पासून सुरू केलं. हे फेस्टीव्हल म्हणजे प्रतिथयश तसेच हौशी-नवशे कलाकार यांसाठी कला सादर करण्याचं मोठ्ठं व्यासपीठ आणि तुमच्या-आमच्या सारख्या कलाप्रेमींसाठी पर्वणी :-)
एकुण १०-११ दिवस चालणारा हा सोहळा अगदी भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला असतो सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ११ पर्यंत!

चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, नाटक, साहित्य, संगीत, मूर्तिकला अशा कलेच्या विविध दालनांचा ह्यामधे समावेश आहे. आपल्या देशातील काना-कोप-यातून तसेच जगभरातून कलाकार तसेच प्रेक्षक ह्या सोहळ्याचा आनंद लुटायला येतात.

चर्चगेट किंवा सी.एस.टी. स्टेशनपासून अगदी दहा रूपयांमधे तुम्ही 'काला-घोडा फेस्टीव्हल' ला पोहोचू शकता.

सगळ्यांसाठी फ्री एन्ट्री आहे बरंका..तर आल्यावर लगेचच तुम्हांला छोट्या-मोठ्या आकारातील वेगवेगळ्या विषयावरील ऑब्जेक्ट्स ठेवलेले दिसतील. ह्या वर्षीचा विषय आहे 'इलेक्ट्रॉनिक वेस्ट'.

रोजच्या जीवनात आपल्याला जे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न छळतात त्यांसाठी ह्या कलाकारांनी काहीतरी वेगळं उत्तर शोधून ते कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर इथे मांडलेलं दिसतं.

ह्या सगळ्या गोष्टी बघून झालं की आजूबाजूला थोडी नजर फिरवा तिथेच तुम्हांला भरपूर स्टॉल्स दिसतील. ह्या स्टॉल्स मधे भरपूर कलात्मक गोष्टी विकायला ठेवलेल्या असतात. जितक्या त्या आकर्षक तितक्याच अव्वाच्या सव्वा किमतीच्या असतात पण ठीके जे लोक दर्दी आहेत ते खरेदी करतातही..
पुढे 'स्ट्रीट' म्हणून एक कॅटेगिरी अशी आहे ज्यामधे वेगवेगळे कलाकार त्यांची कला रस्त्यावर सादर करतात. ह्यावेळेस डोंबा-याचा खेळ आणि कठपुतली आहेत. तसंच वेगवेगळे रॉक-सॉफ्ट बँन्ड्स सुध्दा परफॉर्म करतात.

जसा कलाप्रेमींसाठी हा पंचपक्वानांचा बेत असतो तशीच पोटपुजेची सुध्दा सोय भारी केलेली आहे इथे :-)
एकुण ६ वेगवेगळ्या ठिकाणी नृत्य, नाटक, साहित्यावरील चर्चा, संगीताचे लाईव्ह प्रोग्रॅम्स सुरू असतात. ह्यावेळेस उषा उथुप ह्यांचा कार्यक्रम होता ३ तारखेला. याआधी सोनू निगम, शान ह्यांसारख्या कलाकारांनी देखील लाईव्ह परफॉर्मनसेस दिले आहेत.
एकुण काय अगदी धमाल असते ह्या फेस्टीव्हल मधे.
चला आता सफर घडवून आणते तुम्हांला ह्यावर्षीच्या फेस्टीव्हल मधल्या स्ट्रीट कॅटेगिरीमधून :)
































 

Saturday, February 2, 2013

जिभेचे चोंचले - चटपटा पराठा


आज अगदी कंटाळा आला भाजी-पोळी करायचा आणि विकांत असल्याने फ्रिजमधल्या भाज्यासुध्दा संपल्या होत्या. थोडी शोधाशोध केली तर कोथिंबीर तेवढी सापडली. थोडंसं डोकं चालवलं आणि तय्यार झाला चटपटा पराठा :)

तर साहित्य असं आहे

  • कोथिंबीर - १/२ जुडी (किंवा फ्रिजमधे जितकी उरलेली असेल तितकी) ;)
  • गव्हाचं पीठ - मोठे ३ चमचे
  • दही - १२५ ग्रॅम
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा ओवा
  • १ चमचा तिखट
  • १ चमचा तीळ
  • १ चमचा हळद
  • ११/२ चमचा मीठ

आता कृती अशी आहे हं

कोथिंबीर स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्या. गव्हाचं पीठ घेऊन त्यामधे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरती दिलेले सर्व मसाले घाला. आवश्यक तितकं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या. दही घातल्यामुळे कदाचित थोडी पातळ होऊ शकते कणीक पण तरीही थोडं जास्त पीठ घालून व्यवस्थित गोळे बनवता येतील असं मळून घ्या. साधारण मध्यम आकाराचे गोळे बनवा आणि नेहमी पोळी जशी लाटतो तसे पराठे लाटून घ्या. पोळी भाजण्यासाठीचा तवा किंवा नॉन-स्टीक पॅन वापरून पराठा भाजून घ्या.
पराठा भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तेल लावा म्हणजे खमंग टेस्ट येईल आणि पराठे पटापट तयार होतील :)
 
तर तय्यार झालेले पराठे असे दिसतील


आता हे गरमा-गरम पराठे लिंबाच्या आंबट-गोड लोणच्यासोबत किंवा कांद्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता आणि जर खूप जास्त भूक लागली असेल तर तसेच गपागप हाणा, क्योंकी ये चटपटा परांठा है ;)