Monday, February 18, 2013

माझिया भावजींना रीत कळेना!



प्रशांत दामले आणि कविता लाड ह्या जोडीचं सध्या रंगमंचावर असणारं नाटक म्हणजे 'माझिया भावजींना रीत कळेना'!

मुंबईमधे आल्यावर नाटक बघायचा योग पुन्हा एकदा जुळून आला आणि हे नाटक बघायला मी अगदी उत्साहाने गेले. संतोष पवार ह्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. एकुण पाच पात्रांना घेऊन त्यांनी हे दोन अंकी नाटक बसवलेलं आहे. स्वतः संतोष पवार यांनी देखील ह्यामधे भूमिका केली आहे.

नाटकाला सुरूवात होते ती कविता लाड-संतोष पवार ह्या जोडीच्या....अं मी तुम्हांला नाटकाची स्टोरी सांगू का? नको...नको

तर नाटकामधे एका कुटुंबाची मजा-मजा दाखवली आहे. म्हणजे नवरा-बायको ह्यांच्या टुकीच्या संसारामधे मेव्हणा कसा त्रास देत असतो तरी बहिणीला त्याचा किती पुळका असतो वगैरे वगैरे... लोणचे-पापड विकून संसार चालविणा-या ह्या जोडप्याच्या जीवनात अचानक एके दिवशी 'भावजी' येऊन ठेपतात आणि तिथून सगळं चित्र बदलतं. हे भावजी म्हणजे प्रशांत दामले..आणि पुढे होणारी सगळी धमाल तुम्ही प्रत्यक्ष नाटकामधेच एंजॉय करू शकता*

* जर तुम्हांला प्रशांत दामले अतिशय आवडत असेल तरच तुम्ही हे नाटक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून बघू शकता.

संतोष पवार ह्यांचं दिग्दर्शन आहे म्हणून असेल किंवा खरं जे काही असेल पण सगळ्या पात्रांचा अभिनय अगदी अंगावर येतो.
नाटकामधे तुम्हांला मोठ्याने बोलावं लागतं पण प्रत्येक शब्द ओरडून बोलणं अपेक्षित नाहीये ज्याचा इथे पदोपदी प्रत्यय येतो
बरं नुसतं हातवारे करून जमू शकतं ना, तरी अंगविक्षेप का करावे? काही वेळेला ते आवश्यक असतात नाटकामधे पण अहो वाक्यागणिक करायची काय गरज आहे

पहिला अंक बघून झाला तेंव्हा वाटलं ह्या नाटकामधे स्टोरी काय आहे? काय सुरू आहे स्टेजवर?

अभिनय म्हटलं तर प्रशांत दामले आणि संतोष पवार ह्यांना अगदी विनासायास त्यांची पात्रं वठविता आली आहेत. कविता लाड ह्यांना थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागले आहेत गाणं म्हणण्याचे. बाकी त्यांना सुध्दा नाटकामधे काम करण्याचा अनुभव असल्यामुळे अभिनयासाठी वेगळं काही करावं असं विशेष नाही ह्या पात्रामधे.

दुस-या अंकामधे अगदी शेवटच्या पंधरा मिनिटांपूर्वीपर्यंत असाच धिंगाणा सुरू राहतो आणि नाटक असंच काहीही खुलासा न-करता संपणार की काय हे वाटायला लागल्यावर मग कुठे एकदाचं ते रहस्य ओपन होतं, हुश्श!

नाटकासाठी विषय चांगला घेतला आहे पण अगदी शेवटच्या मिनीटापर्यंत तो विषय कुठूनच ओपन होत नाही त्यामुळे समोर होणा-या सगळ्या प्रकाराचा शीण येतो. पहिल्या अंकामधे विनोद आणि अंगविक्षेप पहिल्यांदा बघत असल्याने हसू येतं पण दूस-या अंकामधे तेच सुरू झाल्यावर हसण्याची इच्छा राहत नाही

असो, ह्या नाटकामुळे प्रशांत दामले यांनी 'लोकांना हसविण्याचं' त्यांचं ध्येय कायम राखत नवीन नाटकाची एन्ट्री मराठी रंगभूमीवर करवली आहे. बघू आता हे नाटक कोणते विक्रम प्रस्थापिक करते.

No comments:

Post a Comment