Wednesday, February 20, 2013

फॅमिली ड्रामा



नावावरून काय वाटतं तुम्हाला ह्या नाटकामधे काय असेल?

मी जेंव्हा पेपरमधे बघितलं तेंव्हा मलाही कल्पना नव्हती, पण सुकन्या कुलकर्णी आहे म्हणून म्हटलं बघावं. लकीली नाटकाचं अगदी पुढच्या रांगेतलं तिकीट मिळालं.

पडदा उघडला आणि एका २बीएचके घराचं सुरेख नेपथ्य समोर दिसलं. पहिल्या सीनमधेच घराची गृहीणी म्हणजे सुकन्या कुलकर्णी समोर आली आणि नाटकाला सुरूवात झाली...

हे नाटक अतिशय छान आणि अर्थपूर्ण वाटलं मला. गोष्ट खुप साधी आहे पण त्यामधून वेगवेगळ्या नात्यांचे संबंध अगदी सहजतेने उलगडून दाखवले आहेत.

बघतांना वाटतं हे सगळं खरंच असं घडत असतं आपल्यासोबत किंवा आजूबाजूला पण आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. कधी-कधी अचानकपणे लक्षात येतं पण त्याला म्हणावं तितकं महत्त्व आपण देत नाही. एकुणच नातेसंबंध मग ते नवरा-बायको, आई-मुलगा किंवा मुलगा-वडील यांमधील असू देत खुप नाजूक असतात आणि एखाद्या हलक्या धक्क्यानेही उध्वस्त होऊ शकतात. जर नात्यांना निटसा वेळ हवा तेंव्हा दिला नाही तर ती कायमची दुरावू शकतात.

हम्म हे सगळं थोडंसं जड वाटला ना? पण नाटकामधे ते इतक्या हलक्या-फुलक्या प्रसंगांनी फुलवलं आहे ना की, आपण कधी त्या सगळ्यांमधे गुंतून जातो कळतचं नाही.

अव्दैत दादरकरची ही कथा आहे. जेंव्हा त्याला आपण स्टेजवर बघतो आणि कळतं की अरे हा तर अगदी यंग आहे म्हणजे आयुष्यातले काही पावसाळेच बघितलेला. पण खरंच त्याचं ह्यामुळेच कौतुक वाटतं की त्याने एका मुलाच्या, आईच्या, वडीलांच्या आणि नाटकामधे असलेल्या पात्रांच्या दृष्टीकोनातून किती व्यवस्थित विचार केला आहे. त्यांच्या जागी उभं राहून त्यांच्या नेमक्या भावना काय असतील ह्याचा चपखल विचार करून आपल्यासमोर मांडलं आहे. सिम्पली सुपर्ब.

बाकी नाटकामधे बाबांची भूमिका करणारे अजित भुरे ह्यांची आवाजाची फेक आणि एकुणच अभिनय अगदी टिपीकल बाबांसारखा आहे.सुकन्या कुलकर्णी तर बेस्टच वाटली मला  :)

ती एका प्रसंगामधे अगदी प्रसंगावधान राखुन वागणारी कर्तव्यदक्ष गृहीणी असते तर दुस-याच क्षणी हळवी होणारी आई. कुठे अगदी लहान मुलीला लाजवेल अशी क्युट,इनोसंट असते तर कुठे नवरा कितीही चूक असला तरी त्याला बरोबर म्हणणारी आणि त्याचं सगळं अगदी आज्ञाधारकपणे ऐकणारी पत्नी असते.

तिचं काम सगळ्यात जबरदस्त आहे नो डाऊट आणि हॅट्स ऑफ टू हर.

अव्दैत दादरकर, अजित भुरे तसंच बाकीच्या कलाकारांचाही अभिनय अतिशय चांगला आहे आणि सगळ्यांचं टायमिंग सुध्दा अगदी भारी जमलंय. अव्दैतचा उस्फुर्त अभिनय आणि सुकन्या कुलकर्णीची जुगलबंदी मजा आणते नाटकामधे  :D

एकुणच हे नाटक बघितल्यावर खुप छान रिलॅक्स फील झालं. तुम्हांला सुध्दा हा अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य बघा येत्या वीकांताला :)

No comments:

Post a Comment