आज बसमधे माझ्यासमोर एक मुलगी बसलेली होती.
नाकी-डोळी निटस, हलकासा मेक-अप केलेला, लांबसडक सिल्की केस, छान रंगसंगती असणारे कपडे, गळ्यामधे ऑफिसचं आय-कार्ड, हातामधे टच-स्क्रीनचा मोबाईल आणि कानामधे हेडफोन्स. हल्ली साधारण अशा मुली सगळीकडेच दिसतात त्यामुळे मी नजर दूसरीकडे वळवली.
इतक्यात कंडक्टर आला, मी माझा पास दाखवला आणि त्या मुलीने सुध्दा क्लच बाहेर काढायला हात हलवला आणि मला दिसलं तिचा डावा हात फक्त कोपरापर्यंतच होता! एक क्षण चर्र झालं मनामधे आणि मी तिला पुन्हा न्याहाळू लागले.
आतापर्यंत अगदी एखाद्या सामान्य मुलीसारखी दिसणारी ती, मला अचानक खूप वेगळी भासली.
आश्चर्य म्हणजे ती सगळी कामं इतकी सहजतेने करत होती की वाटत नव्हतं ती अधू आहे. मला खूप आवडली ती मुलगी, एकदम स्ट्रॉंग असावी असं वाटलं आणि स्वाभिमानी सुध्दा कारण, ती अपंगांसाठी राखीव असलेल्या सीटवर नाही तर जनरल सीटवर बसली होती
बस सिग्नलला थांबली तशी ती उठून उभी राहिली, तिचा स्टॉप आला असावा. ती निघून गेली पण माझे विचार मात्र अजूनही तिच्याभोवती फिरत होते.
अगदी दहा मिनिटांचा तो प्रवास पण, त्यामधे मला जणू खूप काही गोष्टी ती सांगून गेली.
जर तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीच गोष्ट तुम्हांला अशक्य नाही. शारीरीक अपंगत्वावर तुम्ही हरप्रकारे मात करू शकता फक्त तुम्हांला स्वतःवर विश्वास हवा. आणि हल्ली मेडीकल सायन्स इतकं पुढे गेलं आहे की अगदी कमी खर्चामधे तुम्ही कृत्रिम अवयव जोडून घेऊ शकता. बस्स! चाह है तो राह है!
विचार करतांना मला अचानक जाणीव झाली की, मी रोज देवाचे आभार मानायला हवेत खरं तर, त्याने मला सगळे अवयव अगदी व्यवस्थित दिले आहेत आणि अजूनही ते शाबूत आहेत! आणि आश्वर्य ह्याचंही वाटलं की, आपल्याकडे सगळं आहे तरीपण आपण आळशीपणा करतो. दैनंदीन जीवनामधे येणा-या प्रसंगांना सामोर जाण्याचं बळ नाही म्हणून रडत बसतो! थोडं लागलं-खूपलं, आजारी पडलं की हात-पाय गाळून बसतो. श्याs!
एखादा अवयव कमी असणा-या लोकांना किती त्रास होत असेल प्रत्येक गोष्ट करत असतांना, पण ते लोक त्यावर प्रयत्नपूर्वक मात करून पुढे जातात. मग आपण का रडतो? नो वे!
माझं तर ठरलं, एखादी गोष्ट मला करता येत नाही ह्यासाठी ह्यापुढे मी आता कधी रडणार नाही. जर कधी एनर्जी कमी पडली तर तिचा चेहरा डोळ्यासमोर आणेन अन स्वतःला बजावेन की, यू हॅव नो राईट टू क्राय, कमॉन गेट-अप अन गो!
Touching.. Very true...
ReplyDeleteधन्यवाद दर्शना :)
ReplyDelete