स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होते. ट्रेन लेट होणार म्हणून घोषणा झाली आणि काय करावं ह्या विचारात फलाटावर चक्कर मारायला निघाले. कोणी गप्पा मारत होतं, कोणी फोनवर काहीतरी करत होतं तर काही चेह-यांवर गाडी उशीरा येणार म्हणजे काय मोठ संकट ओढवलं आहे असे भाव होते.
मी फिरत फिरत एका बाकड्यावर टेकले आणि शेजारी एक कुटुंब येऊन बसलं. साधारण दोन वर्षाचा मुलगा त्याचे आई-बाबा असं तिघेजण होते ते. त्या बाईने मुलाला बाकावर बसवलं आणि तो उडी मारून उभा राहिला. त्याचे बाबा पकडायला जाणार इतक्यात तो उड्या मारत ट्रेन बघायला पुढे गेला. चपळाईने बाबाने त्याचा एक हात धरला तर तो मस्त टुणूक-टुणूक उड्या मारायला लागला. स्वत:चा हात सोडवून घेत आनंदाने टाळ्या पिटत गाणं म्हणायला लागला. अगदी मजेत त्याचं गाणं म्हणणं, स्वत:भोवती फेर धरून नाचणं सुरू होतं. पण ट्रेनचा आवाज आला की त्याचे छोटेसे डोळे अगदी भिरभिर शोधायचे आणि ट्रेन नजरेआड होईपर्यंत मान वळवून पार अंगाची कमान करून तो ट्रेनला बाय करत होता :)
ते बालक मस्ती करत होतं आणि त्याचे वडील वैतागले होते म्हणून त्यांनी त्याला कडेवर घेतलं. तसा तो जोरजोरात रडायला लागला, डोळ्यातून अगदी दोन-दोन धारा लागल्या, हात-पाय झाडायला लागला. ते बघून त्याच्या आईने त्याला स्वत:जवळ घेतलं पण पठ्ठा परत उडी मारून उभा राहिला. डोळ्यातलं पाणी रिव्हर्स झालेलं आणि चेह-यावर स्माईल बॅक :)
पायात स्प्रिंग लावल्यासारखं त्याचं फुदकनं परत सुरू झालं....
No comments:
Post a Comment