Sunday, July 21, 2013

’नवरा’ एक खोज - भाग २

काही दिवसातच वधू-वरसूचक मंडळाकडून स्थळांची यादी आली ती बाबांनी नीट वर्गवारी करून काही मुलांच्या पालकांना संपर्क केला, त्यातल्या अर्ध्या लोकांनी उत्तरच दिलं नाही, १/४ लोकांनी प्रतिउत्तर दिलं तर त्यातले काही आई-बाबांना आणि तायांना पटले नाही म्हणून तितके वगळले आणि शेवटी उरले फक्त दोनच हास्य त्यातला मला एकच ठिक वाटला Big smile
मी एकाला भेटायला तयार आहे म्हटलं आणि पुन्हा एकदा आमच्या घरवाल्यांमधे वारं संचारलं.लगेच मग त्या मुलाच्या घरी बोलून वगैरे तारीख ठरली माझ्या पहिल्या-वहिल्या कांदे-पोहे कार्यक्रमाची.मी पण एकदम खुश झाले,माझा पहिला कांदे-पोहे कार्यक्रम काय भूषणावह गोष्ट आहे ना Cool
असो, तर भेटण्याचा दिवस ठरला, मी, आई-बाबा आणि जिजू असे चौघेजण त्यांच्या घरी जायला निघालो. माझ्या बहिणीने मला अगदी सिनेमातल्या नटीसारखं रंगवलं होतं.
गाडीमधे कोणी जास्त काही बोलत नव्हतं, मी पण विचार करत होते की मी काय बोलणार होते त्या मुलाशी? त्याच्या कामाविषयी की आवडी-निवडी बद्दल की अजुन काही? श्या..नुसते प्रश्नच येत होते डोक्यात, काही ठरत नव्हतं.
इतक्यात आम्ही त्यांच्या घराजवळ पोहोचलो, गाडीतून उतरतांना मला अचानक पोटात खड्डा पडला असं वाटलं आणि कपाळावर घामाचे दोन थेंब जाणवले, मला टेन्शन आलं होतं घाबरगुंडी मी सगळ्यांच्या मागे चालत होते, दारातून आत जातांना मला शेजारी प्राजक्ताचं फुल दिसलं आणि एकदम प्रसन्न वाटलं मग मी बिनधास्त आत गेले.
दारात त्या मुलाचे वडील उभे होते, आत गेल्यावर हॉलमधे बाकी सगळी मंडळी बसलेली होती, बसायची व्यवस्था थोडी विचित्र वाटली मला पण, त्यामुळे मला कळेना कुठे बसावं, त्या मुलासमोर बसावं की माझ्या बाबांजवळ शेवटी मी सरळ त्या मुलासमोरच जाउन बसले, विचार आला, वेगळं जाउन बोलण्यापेक्षा असं समोरासमोरच विचारावं.
मग नमस्कार-चमत्कार झाले, दोन्ही कुटुंबांची ओळख झाली आणि मग त्या मुलाच्या वडिलांनी माझ्याकडे बघून पहिला प्रश्न विचारला.
काका : मुंबईमधे कुठे राहतेस?
मी : ....
काका : ऑफिसला कशी लोकल ने जातेस का?
मी : ....
काका : तुझं शिक्षण काय झालंय? ( हा प्रश्न ऎकला आणि एकदम मला ह्या आधी जे घडलं होतं ती प्रश्नावली समोर दिसली पण पुढचा प्रश्न वेगळा होता हास्य )
काका : तिकडे कोणाकडे राहतेस?
मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत तो मुलगा मला प्रश्न विचारायला लागला, तू कोणत्या टेक्नॉलॉजी मधे काम करतेस?
त्याचा प्रश्न संपत नाही की लगेच त्याची आई म्हणाली, तुम्हाला दोघांना बोलायला वेगळा वेळ दिला जाणार आहे, आता मोठयांना बोलून घेऊ देत, थांब जरा Angry
बापरे, मी तर घाबरलेच त्या काकूंचं ते वाक्य ऎकून, मला कल्पना आली की आता ह्या आपल्यावर बॉम्ब टाकणार आणि खरंच सुरू झालं.
काकू : जेवणाचं काय काय करतेस?
मी: ऑफीस मधे जेवते दुपारचं आणि संध्याकाळी जिथे राहते त्या काकूंकडे...
त्या म्हणाल्या अगं जेवणातलं काय काय बनवतेस?? श्या..मी जीभ चावली आणि म्हणाले की, करता तर येतं सगळं पण सध्या प्रॅक्टीस कमी झाली आहे कारण पीजीच्या काकू गॅस वापरु देत नाहीत..
त्यांच्या कपाळावर उठलेली अठी मला व्यवस्थित दिसली, पण मी जास्त विचार नाही केला कारण पुढचा प्रश्न कान देऊन ऎकायचा होता ना wink
काकू : ऑफीस मधून घरी किती वाजता येतेस?
काकू : ऑफीस किती दिवस असतं?
काकू : शनिवार, रविवार काय करतेस?
काकू : मुंबईहून आई-बाबाना भेटायला किती वेळा घरी जातेस??? (मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारला, हे असले प्रश्न कोणी कांदे-पोहे कार्यक्रमात विचारतात काहो??, काय माहीत बाबा विचारतही असतील माझा तर पहिलाच म्हणजे तसा दुसरा प्रसंग होता ना)
मी काय बापडी उत्तरं देत होते निमूटपणे...
पुढे त्यांनी विचारलं, नेहमी पंजाबी ड्रेसच वापरतेस की साडीपण घालते....मला हसावं की रडावं कळत नव्हतं..मी सांगून टाकलं, मी नेहमीच जीन्स घालते, कधीतरी पंजाबी ड्रेस आणि साडी शेवटची कधी घातली ते आठवत नाही.
आता पुढचा प्रश्न सुईमधे दोरा ओवता येतो का, शिवणकाम, भरतकाम येतं का यापैकी एक असणार अशी माझी खात्री झाली होती पण आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं उत्तर ऎकल्यावर पुढे काही विचारलच नाही
हूश्श..सुटले
पुढच्याच क्षणी त्या काकू त्यांच्या मुलाला म्हणाल्या की तुम्ही दोघे समोरच्या खोलीत जाउन बोला..
मी त्या मुलाच्या मागे खोलीत गेले आणि आम्ही बसलो..
मला वाटलं तो पहिले बोलेल आणि त्याला वाटलं मी, पण कोणीच बोलेना..मी विचार केला तो मुलगा आहे तर त्याने सुरूवात करावी आणि त्याने काय विचार केला माहीत नाही..
विचित्र शांततेत एखादा मिनिट गेल्यावर मीच विचारलं त्याला तू यू.एस. मधे कुठे राहतोस?
..त्याचं उत्तर
मी: कुठे राहतोस?
तो: ..त्याने खाली कुठेतरी बघत उत्तर दिलं
मी: कोणत्या टेक्नॉलॉजी मधे काम करतोस?
तो: ..पुन्हा खाली बघूनच त्याने उत्तर दिलं..
मी: तुझ्या आवडी-निवडी काय आहेत? वीकएंड ला काय करतोस?
..तो खाली बघुनच बोलत होता म्हणून मी तिकडे वळून बघितलं की तिथे आहे तरी काय, पण काहीच नव्हतं, मला वाटलं मी खूप विचित्र दिसतीये म्हणून तो मला बघायचं टाळतोय की काय, मला काही कळेना Stare
पण, तो बोलत होता, मला ना माझं काम खूप आवडतं, मी दिवस-रात्र काम करू शकतो, अगदी मला खाण्या-पिण्याची सुध्दा शुद्ध राहत नाही, नवीन टेक्नॉलॉजीस, नवीन अ‍ॅप्लिकेशन्स, नवीन क्लाइंट्स, नवीन प्रॉजेक्ट्स सगळं कित्ती एक्साइटिंग असतं ना आणि कधी जर प्रॉब्लेम आला तर मला अगदी आनंद होतो की चला आता काहीतरी डोकं लावायला मिळेल.
मी कधीच थकत नाही काम करतांना उलट मला असे चॅलेंजेस आल्यावर एनर्जी मिळते आणि मी वीकएंड्स ला घरून काम करतो कारण तिथे बाहेर फिरायला जायचं तर सगळं प्लॅनिंग वगैरे करावं लागतं ज्यासाठी मला वेळ नसतो.
पण, हो मी एकदा बाहेर गेलेलो माझ्या ऑफीसच्या लोकांसोबत पण मला बोर झालं तिथे, ते लोक खेळत होते, पण मला काही इच्छा नाही झाली, माझा उगाच वेळ वाया गेला म्हणून मग मी पुन्हा कधी गेलो नाही त्यांच्यासोबत!
तो एका दमात हे सगळं बोलला मी तर त्याच्याकडे अवाक् होऊन बघतच राहीले..
मी ह्यापुढे काय बोलणार होते...त्याचं कामाबद्दलचं प्रेम ऎकून माझा चांगलाच मूड ऑफ झाला!
मग त्याने प्रश्न विचारला मला, तू किती तास काम करतेस?
आता मला त्याच्याकडे बघून बोलायची अजिबात इच्छाच नव्हती पण त्याने काहीतरी विचारलं म्हणून मी सांगितलं की मी फक्त जितके तास आवश्यक आहे तितकंच काम करते!
तो : कोणत्या टेक्नॉलॉजी मधे काम करतेस तू?
मी : .... उदास सुरात उत्तर.
तो : तू किती लोकांची टीम हॅंडल करतेस?
मी : ....
ह्यापुढचा प्रश्न येणार तेवढ्यात काकूंचा आवाज आला म्हणून मी वर बघितलं तर त्या म्हणाल्या, ' आता पुरे तुमच्या गप्पा, थोडं खाऊन घ्या', असं म्हणत त्यांनी फराळाचं ताट आमच्यासमोर धरलं, कांदे-पोहे सोडून बाकी सगळं काही होतं त्यात. चिवडा-फरसाण पासून ते पार गुलाब-जामून पर्यंत Crazy मी ते बघितलं आणि फक्त एक छोटी खोब-याची वडी उचलली. लगेच त्या म्हणाल्या की, अगं घेना, काही जाड नाही होणार तू हे खाल्लस तर!
मला त्यावेळी माझा राग कंट्रोल करून स्मितहास्य करावं लागलं, जे अतिशय अवघड काम होतं!!
नंतर आम्ही पुन्हा आत जाउन बसलो, मी आईकडे बघून माझी रिअ‍ॅक्शन सांगितली आणि तिचा पण चेहरा पडला. त्यानंतर त्या काकूंनी त्यांचा बंगला आम्हाला दाखवला आणि त्यांच्या श्रीमंतीचं कौतुक ऎकत ऎकत आम्ही एकदाचे त्या घरातून बाहेर पडलो.
गाडीमधे बसल्या बसल्या मी माझी नाराजी आणि निर्णय व्यवस्थित पणे मांडला आणि अशा त-हेने माझा पहिला-वहिला कांदे-पोहे कार्यक्रम पार पडला

Monday, July 15, 2013

’नवरा’ एक खोज - भाग १

वधू-वरसूचक मंडळात माझा फॉर्म जाउन पोहचायच्या आत आमच्या नातेवाईकांमधे ही बातमी अगदी वणव्यासारखी पसरली. दोघी बहिणींच्या सासरकडची मंडळी देखील ह्या कार्यात हातभार लावण्यासाठी सरसावली आणि जवळपास सगळ्याच दिशांमधून विविध ’योग्य’ वरांची माहिती माझ्या आई-बाबा,तायांना फोन अथवा प्रत्यक्ष भॆटीतून मिळू लागली.
मला तर इतकं आश्चर्य वाटलं, विचार आला, अचानक सगळ्या मुलींची लग्न झाली की काय, म्हणजे फक्त मी एकटीच राहिलीये म्हणून सगळ्यांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिला, हाक न मारताही
असो, तर माझे बाबा लगेच कामाला लागले, तसा तर बाबांना व्यवस्थित अनुभव होता ह्या गोष्टींचा माझ्या मोठया बहिणींच्या लग्नामुळे, मग बाबांनी माझ्यासाठी येणा-या स्थळांची माहिती व्यवस्थितपणे एका फाईल मधे ठेवायला सुरूवात केली. एक-एक प्रोफाईल वाचून त्याची पत्रिका जुळते की नाही, किती गुण जुळते हे सगळं बघून बाबा ठरवत होते की कोणत्या स्थळाला संपर्क करायचा. अस करत करत बाबांनी नातेवाईकांकडून आलेल्या सगळ्या प्रोफाईल्स ची विभागणी केली आणि योग्य ती कारवाई केली.
मी महिन्या-दोन महिन्यातून घरी चक्कर मारते तशी मी त्याही वेळी वीकेन्डला घरी गेले होते. घरी पोहोचल्यावर माझ्या भावाने सांगितलं की तुझ्यासाठी ह्यावेळेस एक सरप्राईज आहे, मला काही कळालं नाही आणि मी जास्त लक्ष पण दिलं नाही.
रविवारी सकाळी निवांत उठायचा विचार होता, पण आईने लवकर उठायला लावलं, मी जरा वैतागतच उठले! भाऊ पुन्हा समोर आला आणि म्हणाला, ’सरप्राईजsss आज तुला बघायला येणार आहेत!! हीहीहीही Party ’, मी पलंगावर ताडकन उठूनच बसले, हे कसलं सरप्राईज!! मला इतका राग आला, सरळ स्वयंपाकघरात जाउन मी आईला जरा चिडूनच विचारलं, ’हा काय प्रकार आहे??’
तसं आई अगदी शांतपणे म्हणाली, ’अगं, काही नाही, आपल्या ओळखीतल्या एकाने ह्या मुलाबद्दल सांगितलं, तर त्याचे आई-वडील आज तुला भेटायला येणार आहेत,एवढंच!’
मी, ’अरे, पण मला तुम्ही सांगितलं का नाही??, आणि मुलगा करतो काय, त्याचा फोटो कुठे आहे??’ आई, ’अगं, आज त्याचे आई-वडील फोटो घेउन येणार आहेत, मुलगा इथे नसतो म्हणून’.
श्याss काय बोअर आहे, रविवारच्या सकाळचा पार मूडच गेला माझा, म्हणजे मला त्या मुलाच्या आई-वडीलांना भेटण्यात काही प्रॉब्लेम आहे असं नव्हतं पण, असं अचानक ’पहिल्या’ कांदा-पोहे कार्यक्रमाला मला सामोरं जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं Stare
नंतर बाबा म्हणाले, ’तू साडी नेस आज’,
मी - ’बाबा, साडी काय हो, मी नाही नेसणार!’
आई - ’बरं बाई, एखादा चांगला पंजाबी सूट घाल, ठिक आहे.’
मी - ’नाही गं आई, प्लीज ना, तसंही तो मुलगा येत नाहीये, मग मी कुर्ती आणि जीन्स घालते’. लकीली आई रेडी झाली आणि बाबा पण काही म्हणाले नाही हास्य
ते लोक ४ वाजता येणार होते म्हणून आम्ही सगळी आवरा-सावर करून ठेवली आणि तयार होउन बसलो. आईने मला आतमधेच थांबायला सांगितलं होतं आणि आईच चहा आणि खायचं देणार होती. मला खुप बरं वाटलं की, माझा पहिलाच प्रसंग अगदी टीपीकल ’कांदा-पोहे’ नसणार आहे wink
ते लोक ठरलेल्या वेळेनुसार घरी आले, बाबांनी त्यांना बसवलं, ओळख वगैरे झाली, आईने पाणी नेउन दिलं आणि मला बाहेर येण्याची खुण केली. मी बाहेर येउन एका खुर्चीत बसले मग बाबांनी माझी ओळख करून दिली. मग त्यांनी मला एक-एक प्रश्न विचारायला सुरूवात केली.
प्रश्न क्र.१ : शाळा कुठली?
मी थोडी गोंधळले, पण उत्तर दिलं.
प्रश्न क्र.२ : मराठी, इंग्लीश की सेमी-इंग्लीश मिडीयम?
मला थोडं हसू आलं (मनातल्या मनात). मी उत्तर दिलं.
प्रश्न क्र.३ : १० वी ला किती मार्क मिळाले होते?
प्रश्न क्र.४ : १२ वी कुठे केलं?
प्रश्न क्र.५ : सायन्स होतं का?
प्रश्न क्र.६ : आयट्रिपलई ची परिक्षा दिली होती का? आयआयटी साठी प्रयत्न केला होता का?
प्रश्न क्र.७ : १२ वी ला बोर्डात नंबर वगैरे आला होता का?
प्रश्न क्र.८ : इंजिनीयरींग ला नंबर लागला नाही का?
प्रश्न.......
प्रश्न.............
प्रश्न................
आई ग!! मी तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत देत अगदी घामाघूम झाले! माझ्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधे पण इतके प्रश्न नव्हते विचारले गेले माझ्या शिक्षणाबद्दल
जेंव्हा प्रश्नांची ही सरबत्ती संपली त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी स्वत:च्या मुलाबाबत सांगायला सुरूवात केली..
आमचा मुलगा अमुक शाळेत संपूर्ण इंग्लीश मिडीयम मधे शिकला आणि १० वी बोर्डात तमुक क्रमांकाने चमकला!
पुढे १२ वी ला तो ह्या कॉलेजात गेला, त्याने आयट्रिपलई आणि आयआयटी ह्या परिक्षांची तयारी देखील केली आणि तो १२ वीला बोर्डात अमुक क्रमांकाने झळकला!!
त्याने कॉम्प्युटर इंजिनीयरींग केलं एका प्रसिद्ध कॉलेजमधून आणि आता एका ’आयटी’ फेमस शहरात दणकट पगाराची नोकरी करतो!!!
एका दमात त्यांनी ही माहिती पुरवली!!
मी, आई, बाबा सगळे त्यांच्याकडे बघतच बसलो, मला तर कळतच नव्हतं काय प्रकार सुरू आहे म्हणजे कांदा-पोहे कार्यक्रमात असंच होत असतं की हे काहितरी वेगळं घडत होतं, नो आइडिया यार माझी तर पहिलीच वेळ होती Sad
नंतर मग त्यांनी हळूच त्यांच्या मुलाचा फोटो काढला आणि बायकोच्या हातात दिला. त्यांनी तो अगदी कौतुकाने डोळेभरून बघितला आणि माझ्या आईच्या हातात दिला, आईने जस्ट बघितला आणि लगेच मला दिला.
मी तो फोटो बघताना विचार करत होते की ह्या मुलाचा मेंदू किती मजल्यांचा आहे? म्हणजे त्याच्या वडिलांनी इतकं वर्णन केलं त्याच्या बुध्दिमत्तेचं की मी त्याचा चेहरा बघायचं सोडून असं काहितरी शोधायचा प्रयत्न केला wink बाकी, फोटो ठिक होता.
पुढे पाच-एक मिनिटे औपचारिक बोलणं झालं आणि नमस्कार-चमत्कार करून ते जोडपं निघून गेलं. ते दिसेनासे होईपर्यंत मी आणि आईने कसाबसा धीर धरला आणि नंतर जे हसत सुटलो, ओ गॉड !!!
बाबा शेवटी रागावले आम्हाला, खरंतर त्यांना पण हसू येत होतं घडलेल्या प्रकाराबाबत पण ते योग्य वाटत नाही ना; मग आम्ही थोडया शांत झालो.
घडलेला प्रकार काय होता ह्याबद्दल जरा चर्चा केली आणि शेवटी ठरलं की, प्रत्यक्ष मुलगा भेटणार असेल तरंच इथुन पुढे कोणत्याही प्रोफाईल ला होकार दयायचा आणि हो त्याच्या अपेक्षांमधे कुठे मुलीचा बुध्यांक किती हवा हे दिलंय का हे पण बघायचं म्हणजे आजचा प्रकार पुन्हा घडायला नको Big smile
आणि हो, मी घरच्यांना बजावलं की, ’नो मोर सरप्राइजेस प्लीज

Monday, July 8, 2013

’नवरा’ एक खोज - पूर्वतयारी भाग २

पहिला जवळपास एक महिना ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्य़ात गेला की लग्न का करायचं, काय गरज आहे लग्नाची, सध्या जे लाईफ सुरू आहे त्यात काय वाईट आहे..नोकरी आहे, मित्र-मैत्रिणी आहेत, वीकेन्ड च शेडयूल एकदम सेट आहे, मग त्या नविन व्यक्तीसाठी जागा कुठे आहे माझ्या दिवसात? मला खरंच गरज आहे का पार्टनरची thinking
ताईशी बोलले, माझ्या लग्न झालेल्या मैत्रिणीशी बोलले त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की, तुमच्या लाईफमधे तुमचं असं कोणीतरी असणं ही एक खुप वेगळी आणि छान भावना आहे, रोज घरी आल्यावर तुमची वाट बघणारं तुमचं हक्काचं एखादं माणूस असणं खुप गरजेचं आहे, आज जरी सगळ्या गोष्टी सेट वाटत असल्या तरी कुठेतरी ह्या पलीकडे तुम्हांला वाटतं की, आपलंही घर,फॅमिली असावी..
पुन्हा काहीही झालं तरी माणूस एकटा नाही राहू शकत आणि आपल्या समाजामधे मुलगी जर बिनलग्नाची असेल तर तिला तर त्रास देतातच पण तिच्या आई-वडिलांना सुद्धा काही कमी मनस्ताप देत नाहीत, हे आणि असे सगळ्या टोकाचे विचार मला ऎकायला मिळत होते आणि माझा गोंधळ वाढतच होता घाबरगुंडी
हिय्या करून एका दिवशी मी स्वत: समोर बसले आणि प्रश्न विचारायला सुरूवात केली.
प्रश्न: मला भिती कशाची वाटतीये? लग्न ह्या इव्हेन्टची?
उत्तर: नाही.
प्रश्न: मग, लग्न करून नविन घरात गेल्यावर तिथे येणा-या जबाबदारीची?
उत्तर: नाही.
प्रश्न: बरं मग, रोज ऑफिस सांभाळून घरी स्वयंपाक करावा लागेल ह्याची? (हा प्रश्न विचारात घेणं भाग होतं, कारण मी गेले १० वर्ष घराबाहेर आहे, जिथे जाते तिथे पेईंग गेस्ट म्हणून राह्ते त्यामुळे स्वयंपाक येत जरी असला तरी प्रॅक्टीस नाहीये ना Sad )
उत्तर: ह्या अजिबात नाही!
प्रश्न: मग प्रॉब्लेम आहे कुठे????
उत्तर: बहुतेक मला भिती ही वाटतीये की, ज्या व्यक्तीसोबत माझं लग्न ठरेल त्याचा नी माझा स्वभाव जुळेल का? मला जे बरोबर वाटतं ते त्यालाही बरोबर वाटेल का? मी त्याच्या गोष्टी सहज अ‍ॅक्सेप्ट करू शकेन का? व्हॉट अबाउट कम्पॅटिबीलीटी?
तर हे होते प्रॉब्लेम्स!!
आतापर्यंत प्रश्नच सापडत नव्हता, आता लकीली सापडला तर मी खनपटीलाच बसले उत्तर शोधण्याच्या हास्य
मग बरीच चर्चासत्रं घडली पुन्हा एकदा घरच्यांशी, मित्र-मैत्रिणींशी आणि कुठेतरी मला थोडंसं उत्तर सापडलं...काहीही झालं तरी दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सोबत आल्यावर थोडं अ‍ॅडजेस्ट करावचं लागतं दोघांनासुद्धा सो नॉट टू वरी मच, पुढे जायला काही हरकत नाही.
मी स्वत: ला तयार केलं आणि बाबांना फोन करून माझ्या डोक्यात असलेल्या ’पार्टनरची’ अपेक्षा सांगितली, सगळे एकदम खुश झाले.
आता एकच अडचण होती, मुलीचे फोटो!!
आमच्या ताईबाईंनी तो प्रश्नदेखील चुटकीसरशी सोडवला, तिच्या तिथे राहणा-या एका फोटोग्राफर कडे माझ्या ’खास’ फोटोजसाठी वेळ ठरवली.
आदल्या दिवशी बसून मी आणि ताईने, मी कोणते कपडे घालून फोटो काढायचे हे सगळं ठरवलं. दुस-या दिवशी वेळ ठरवली होती ११ वाजताची पण, आमचं सगळं आवरून निघायला आम्हांला चांगलाच उशीर झाला आणि आम्ही तिथे पोहोचले दुपारी ३ वाजता!
पहिला फोटो साडीवर काढायचा म्हणून मी घरूनच तयार होउन गेले होते..आधीच उशीर झाला होता त्यामुळे गेल्या गेल्या फोटोग्राफर ने मला ’पोज’ द्यायला सांगितली.
आजपर्यंत माझे स्वत: चे चिक्कार फोटो काढले गेलेले आहेत ह्या ना त्या कारणामुळे, अगदी साडीमधे सुद्धा पण, आज जेंव्हा त्याने ’पोज’ द्यायला सांगितली, तेंव्हा मला इतकं हसू फुटलं की मला धड उभंदेखील राहता येईना. मला बघून ताईदेखील हसायला लागली. मी कसंबसं स्वत: ला शांत केलं आणि उभी राहिले. फोटोग्राफर म्हणाला ’स्माईल’ आणि मी पुन्हा एकदा जोरजोरात हसायला लागले, तसा तो म्हणतो, अहो, इतकी जास्त नकोय, थोडं नाजूक हसा ना, स्मितहास्य माहितीये ना angery त्याचा वैतागलेला आवाज आणि माझ्या ताईचे मोठे झालेले डोळे बघून मी कसंतरी ते स्मितहास्य दिलं आणि साडीतले फोटो झाले एकदाचे!
त्यानंतर च्या फोटोसाठी मी तयार होउन बाहेर आले तर स्टुडीओ मधे अचानक गर्दी दिसली, पासपोर्ट साठी फोटो काढायला येणा-यांची! २,४ लोकांचे फोटो काढून झाल्यावर माझा नंबर लागला पुन्हा एकदा मी शहाण्या मुलीसारखी स्मितहास्य देण्याच्या तयारीत असतांना समोर सगळी गर्दी माझ्याकडेच बघतीये हे बघून मात्र मला मेल्याहून मेल्यासारखं झालं Puzzled पण, काय करणार, पर्याय नव्हता, कसंबसं फोटोशूट आवरलं आणि आम्ही बाहेर पडलो.
ठरलेल्या दिवशी फोटो मिळाले, ते बघून माझ्या घरच्यांच्या चेह-यावर अगदी पूर्ण समाधान दिसलं. लगेच बाबांनी एक फोटो सिलेक्ट केला आणि वधु-वरसूचक मंडळाच्या फॉर्मसोबत तो पाठवून दिला!!!

क्रमशः

Monday, July 1, 2013

’नवरा’ एक खोज - पूर्वतयारी भाग १



माझं पोस्ट-ग्रॅज्युएशन झालं, कॅम्पसमधून नोकरी लागली.मुंबईला शिफ्ट झाले, जेमतेम सहाच महिने झाले असतील माझ्या नोकरीला आणि बाबांनी एका दिवशी फोनवर सांगितलं की, आता तुझं शिक्षण, नोकरी सगळं व्यवस्थित झालंय तर आपण लग्नाचं बघू! पहिला विचार माझ्या डोक्यात आला की, ओ गॉड! लग्न!! इतक्या लवकर!! नो वे!!! मी बाबांना म्हटलं, माझी नोकरी पक्की तर होउ देत मग आपण बघू ना..

काही काळानंतर पुन्हा बाबांनी तोच विषय काढला आणि मला क्लिक झालं की, माझी नोकरी पक्की होउन सुध्दा २ महिने झाले होते, खरंच वेळ इतका भुर्रकन का पळाला :-(

ह्यावेळेला आता काय कारण द्यावं ह्याचा विचार करेपर्यंत आई-बाबांनी एक एक गोष्ट सांगायला सुरूवात केली. सगळ्यात आधी वधु-वर सूचक मंडळांची यादी वाचली गेली, कोणतं चांगलं आहे, कोणाकडे सगळ्यात जास्त स्थळं येतात, कोणाकडे जास्तीत जास्त लग्न कमीत कमी वेळात जुळविण्याचं रेकॉर्ड आहे वगैरे वगैरे.. 

मला खरं तर काही समजत नव्हतं काय चाललं आहे ते पण त्या दोघांचं मन नको दुखवायला म्हणून मी, माझ्या दोन्ही मोठया बहिणींसाठी ज्या वधु-वर सूचक मंडळात नाव नोंदवलं होतं तिथेच करूया म्हटलं. दोघेही एकदम खुश झाले आणि पहिली गोष्ट फायनल झाली.  

लगेच पुढचा प्रश्न आला, नाव नोंदणी करायची म्हणजे फोटो हवाच, हे ऎकुन माझ्या पोटात खड्डाच पडला! फोटो काढायचे आणि ते पण ते अगदी टिप्पीकल, बोअरिंग पोज मधले!! श्याss..पण, आईचं सुरूच होतं की, तू मुंबईला काढणार की घरी येउन काढणार? मी थोडा विचार केला आणि म्हणाले, ताईशी बोलून मी ठरवते

पण अजून प्रश्न संपले नव्हते, उलट आता खूप मोठ्ठा प्रश्न सुरू झाला होता आणि तो किती दिवसांनी नाही नाही किती महिन्यांनी, वर्षांनी सुटणार होता देवच जाणे!!  

मला माझ्या दोन्ही बहिणींच्या वेळेस जे काही घडलं होतं ते आठवत होतं, तेंव्हा खरं तर खुप मजा वाटली होती ते सगळं बघायला, पण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे! आज जेंव्हा माझ्यावर ती वेळ येउ घातलीये तेंव्हा अगदी अजुन कशात काही नसतांना पण मला भिती वाटत होती, टेन्शन आलं होतं!!

आई-बाबांनी जसा हा विषय सुरू केला तसं माझ्या बहिणींनी सुध्दा ह्याच विषयावर माझ्याशी बोलायला सुरूवात केली, जवळपास रोज घरचे सगळेजण फक्त ह्या एकाच विषयावर बोलायले लागले. मला तर सुरूवातीलाच कंटाळा येत होता पण त्या सगळ्यांमधे एक सळसळता उत्साहच जणू संचारला होता आणि आता माझं लग्न हा एकच ध्यास त्यांनी घेतला होता!!

बाबांनी एका दिवशी ठरवलेल्या वधु-वरसूचक मंडळाचा फॉर्म आणला, जुजबी माहिती त्यांनी भरली आणि एका ठिकाणी ते थांबले, ’जोडीदाराबद्दल अपेक्षा.मला लगेच फोन आला की सांग तुला नवरा कसा हवा!! मला हे ऎकुन एक क्षण कळालच नाही की बाबा काय विचारत आहेत मला?? मी चक्रावून विचारलं तसं बाबांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला, पण मला कुठे माहित होतं उत्तर?!! मला खरंच माहित नव्हतं की मला कसा नवरा हवाय म्हणून, माझं डोकं बधिर झालं, काहीच सुचेना :(

शेवटी मी बाबांना सांगितलं की मला थोडा वेळ द्या, लेट मी टॉक टू मायसेल्फ अबाउट ऑल धीस!! बाबा हो म्हणाले, ३ महिन्याचा वेळ मिळाला :)

क्रमशः